कोरोना रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा अहोरात्र झटत असताना मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टोने डोके वर काढल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत मुंबईत मलेरियाचे 249 रुग्ण, गॅस्ट्रोचे 127 आणि लेप्टोचे 23 रुग्ण आढळले आहेत. या आजारांमुळे नोव्हेंबरमध्ये एकही मृत्यू झाला नसून पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.
पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपाययोजनामुळे मुंबईत कोरोना आता चांगलाच नियंत्रणात आला आहे. मात्र रात्री थंडी आणि दिवसा उकाडा अशा विषम वातावरणामुळे मुंबईत इतर आजार वाढत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. यामध्ये गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत आजार कमी असल्याने काहीसा दिलासादायक चित्र आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मलेरियाचे 299, लेप्टो 32, डेंग्यू 180, गॅस्ट्रो 535, हिपेटायटिस 73 आणि एच1एन1चे 3 रुग्ण आढळले होते. तर यावर्षी 2 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत मलेरियाचे 90, 9 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत 78 आणि 16 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत 81 रुग्ण आढळले आहेत. तर लेप्टोचे 2 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत 23 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, या आजारांचा सामना करण्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह पेरिफेरल रुग्णालयांमध्ये हजारो बेड, डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली असल्याचे पालिकेच्या प्रमुख कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. याशिवाय साथीचे आजार रोखण्यासाठी, डास प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक विभागाच्या माध्यमातून धूम्रफवारणी, डासांच्या अळ्यांची स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू आहे.
नोव्हेंबरची स्थिती
आजार रुग्ण
मलेरिया 249
लेप्टो 23
डेंग्यू 17
गॅस्ट्रो 127
हिपेटायटीस 17
एच1एन1 0
गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिती चांगली
मुंबईत गेल्या वर्षी मलेरियाचे 4357 रुग्ण 0 मृत्यू तर या वर्षी 4553 रुग्ण एक मृत्यू, लेप्टोचे गेल्यावर्षी 281 रुग्ण 11 मृत्यू तर यावर्षी 222 रुग्ण 6 मृत्यू, डेंग्यू गेल्या वर्षी 920 रुग्ण 3 मृत्यू यावर्षी 115 रुग्ण 2 मृत्यू, गॅस्ट्रोचे गेल्या वर्षी 7785 रुग्ण यावर्षी 1316 रुग्ण, हिपेटायटीस गेल्या वर्षी 1534 रुग्ण या वर्षी 245 रुग्ण, एच1एन1 गेल्या वर्षी 451 तर यावर्षी 44 रुग्ण आढळले आहेत. यावरूनमलेरिया वगळता इतर आजारांची स्थिती चांगली असल्याचे दिसते.
सौजन्य : दैनिक सामना