बायकोला थापा मारून ऑफिसच्या कारणावर थायलंडला फिरणाऱ्या नवऱ्याचं बिंग त्याच्या बायकोसमोरच फुटलं आहे. त्याच्या पासपोर्टवरच्या फाटलेल्या पानांनीच त्याच्या या ‘गुप्त’सहलीचा खुलासा केला आहे.
बायकोला थापा मारून ऑफिसच्या कारणावर थायलंडला फिरणाऱ्या नवऱ्याचं बिंग त्याच्या बायकोसमोरच फुटलं आहे. त्याच्या पासपोर्टवरच्या फाटलेल्या पानांनीच त्याच्या या ‘गुप्त’सहलीचा खुलासा केला आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार घडला. शनिवारी रात्री नऊच्या सुमाराला वाराणसीचं एक जोडपं दुबईला जाण्यासाठी विमानतळावर दाखल झालं. त्यांना इमिग्रेशन पडताळणीसाठी नेण्यात आलं.
पासपोर्ट तपासणी करतेवेळी अधिकाऱ्यांना त्याच्या पासपोर्टची दोन पानं फाडली असल्याचं निदर्शनाला आलं. त्यांनी याची विचारणा केली असता त्या माणसाने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे त्याच्या पासपोर्ट क्रमांकावरून त्याच्या मागील दोन सहलींचे तपशील शोधून काढण्यात आले.
हे सगळं होत असताना त्याची पत्नी बाजूलाच बसली होती. तपशील शोधून झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पत्नीसमोरच त्याला त्याच्या थायलंड ट्रीपविषयी विचारलं. तो एक नव्हे तर दोन वेळा थायलंडला जाऊन आला होता. आणि त्याची ही गोष्ट कळू नये म्हणून त्याने बायकोला ऑफिस टुरचं कारण दिलं होतं. मात्र, आपण देशाबाहेर जात आहोत, हे तिला सांगितलं नव्हतं.
पासपोर्टवरचा खुलासा पाहिल्यानंतर त्याच्या थायलंडवारीची अजिबात कल्पना नसलेली पत्नी त्याच्याकडे आश्चर्यमिश्रित रागाने पाहू लागली. तेव्हा त्याने अधिकाऱ्यांना पत्नीला वेगळीकडे नेऊन मग याविषयी विचारणा करण्याची विनंती केली. ते ऐकताच त्याच्या बायकोचा पारा चढला आणि तिने तिथेच थांबण्याविषयी सांगितलं.
त्याने बायकोसमोर थायलंडला गेल्याचं कबूल केलं. त्याची बायको त्याच्यावर या कारणाने प्रचंड नाराज झाली आणि तिने दुबईला त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. तो तिच्या मिनतवाऱ्या करू लागला. या सगळ्या गडबडीत पासपोर्टशी छेडछाड केल्याच्या कारणावरून विमानतळ पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकाराचा तपास सुरू आहे.
सौजन्य : दैनिक सामना