अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे 25 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सर्वोत्तम आक्रमक मिडफिल्डर, सेकंड स्ट्रायकर, पासिंग, बॉल पंट्रोलिंग अन् पासिंगचे बादशहा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या अर्जेंटिनाला एकाहाती वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिएगो मॅराडोना यांच्या निधनानंतर क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली.
अनेक दिग्गज खेळाडूंनी आणि त्यांच्या जगभरातील चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण, दिएगो यांना श्रद्धांजली वाहण्याच्या नादात अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याला मात्र दंड भरावा लागणार आहे.
अशी वाहिली श्रद्धांजली
त्याचं झालं असं की, रविवारी स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये मेसीचा क्लब बार्सिलोना आणि ओसासुना या दोन क्लबमध्ये फुटबॉल मॅच झाली. बार्सिलोनाने ओसासुनावर 4-0 असा विजय मिळवला. या मॅचमध्ये गोल केल्यानंतर मेस्सीने बार्सिलोनाची जर्सी उतरवली आणि मॅराडोना यांचा जुना क्लब असलेल्या नेवेल्स ओल्ड बॉईजची जर्सी घातली. त्यानंतर त्याने दोन्ही हात उंचावून हवेत चुंबन केलं.
श्रद्धांजली वाहिली आणि दंड पडला
या कृतीतून त्याने दिवंगत मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, त्याच्या याच कृतीमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. लीगने त्याला 600 यूरोंचा म्हणजे 54 हजार रुपयांचा दंड ठोठावला. इतकंच नव्हे तर लीगने बार्सिलोनालाही 180 यूरोंचा दंड ठोठावला. सामन्यादरम्यान जर्सी काढल्याने मेस्सीला यलो कार्ड दाखवून इशाराही देण्यात आला. या कारवाई विरोधात मेस्सी आणि बार्सिलोना क्लब या दोघांकडून अपील केले जाण्याची शक्यता आहे.
सौजन्य : दैनिक सामना