अपत्य होत नसलेल्या दांपत्यासाठी वैद्यक शास्त्रात एक अनोख्या घटनेची नोंद झाली आहे. अपत्य होत नसलेल्यांसाठी वैद्यक शास्त्रात टेस्ट ट्यूब बेबीपासून आयव्हीएफपर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अमेरिकेत अपत्य हव्या असलेल्या दांपत्याने तब्बल 27 वर्षांपूर्वी साठवण्यात आलेल्या भ्रुणाची (एम्ब्रयो) निवड करून अपत्याला जन्म देण्याचे ठरवले. त्यात त्यांना यश आल्याने वैद्यक शास्त्रातील ही अनोखी घटना ठरली आहे.
अमेरिकेतील टेनेसी शहरात ही घटना घडली आहे. 1992 मध्ये एका महिलेने साठवलेले (फ्रिझ केलेले) भ्रुण टीना नावाच्या महिलेच्या गर्भाशयात ट्रान्सप्लांट करण्यात आले. 12 फेब्रुवारी 2020 मध्ये ही ट्रान्सप्लांटची प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 26 ऑक्टोबरला टीनाने मॉली नावच्या मुलीला जन्म दिला आहे. आतापर्यंत एवढे वर्षे फ्रिझ केलेल्या भ्रुणाद्वारे अपत्याला जन्म देण्याची ही पहिलीच घटना आहे. वैद्यक शास्त्रातील ही अनोखी घटना विक्रम असल्याचे सांगण्यात आले. सीएनएनने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टीनाने याच तंत्रज्ञानाद्वारे 2017 मध्ये एमा नावच्या मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी त्यांनी 24 वर्षे जुन्या भ्रुणाची निवड केली होती. आपले पती सिस्टिक फायब्रोसिस आजाराने त्रस्त आहेत. या आजारामुळे अपत्य होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे फ्रिझ केलेल्या भ्रुणाची निवड करून अपत्याला जन्म देण्याचे आम्ही ठरवले, असे टीना यांनी सांगितले.
या तंत्रज्ञानाबाबत आपल्या वडिलांनी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. एका मॅगजीनद्वारे त्यांनी एम्ब्रयो फ्रिझिंग तंत्रज्ञानाची माहिती मिळाली होती. त्यानंतर या तंत्रज्ञानाबाबतची आणखी माहिती आम्ही घेतली आणि नॅशनल एम्ब्रयो डोनेशन सेंटरला भेट दिली. त्यानंतरची प्रक्रिया सेंटरकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महिलेच्या बीजाडांचा शुक्रजंतूशी संपर्क झाल्यावर भ्रुणाची निर्मिती होते. त्यानंतर भ्रुणाचा विकास होतो. या काळात काही दांपत्ये भविष्यातील अपत्यप्राप्तीसाठी भ्रुण फ्रिझ करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे भविष्यात अपत्य हवे असल्यास त्या भ्रुणाचा वापर करता येतो. तर काही दांपत्ये हे भ्रुण डोनेटही करतात. त्यामुळे अपत्य होण्यास अडचणी असलेल्या दांपत्यांना त्याचा वापर करता येतो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि अद्ययावत तंत्रज्ञानामुळेच आपल्याला अपत्य झाले, असे टीना यांनी सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना