ज्युनियर ब्रह्मे ही कधीकाळी फेसबुकवर अवतरलेली एक अजब आणि अफाट वल्ली. या टोपणनावाखाली दडलेल्या लेखकाची तिरकस आणि तीक्ष्ण विनोदबुद्धी मराठी विनोदाची परंपरा पुढे नेणारी आहे. तिचा हा अफलातून मासला!
(कशाचंही असू शकेल असं वाटणारं एक दुकान. दुकानासमोर लांबलचक रांग लागली आहे. ‘रांगेत धक्काबुक्की करू नये. अन्यथा अपमान केला जाणार नाही.’ अशी पाटी लावली आहे. दुकानात काऊंटरजवळ आणखी एक कोरी पाटी टांगलेली आहे. काही लोक उत्सुकतेनं जवळ जाऊन ती पाटी वाचतात आणि काहीच लिहिलेलं नाही हे पाहून निराश होत परत रांगेत उभं राहतात.)
मालक : बोला, काय देऊ ताई?
ताई : अपमान आहे का हो?
मालक : पाटी वाचता येतेय ना?
ताई : (गोंधळून) कोणती हो? तिथं तर काहीच लिहिलं नाहीय.
मालक : नाही ना? तिथं अपमान संपला असं लिहिलेलं नसेल तोवर भरपूर अपमान मिळेल. बोला किती पाहिजे?
ताई : पाव किलोचे दोन पॅक करा. आणि हो, मला यूएसला घेऊन जायचाय. चालेल का?
मालक : का नाही चालणार? अगदी मंगळावर घेऊन गेलात तरी चालेल.
ताई : तसं नाही हो. टिकेल का तोवर?
मालक : सांगता येत नाही. अपमान शिळा झाल्यास आम्ही जबाबदार नाही-
ताई : जबाबदारी नाही घ्यायला सांगत हो. फक्त तोवर टिकेल का ते सांगा.
मालक : घरी गेल्यावर गरम जागी ठेवा. लोक उगाचच शिळ्या अपमानाला ऊत आणून त्याचा बदला घ्यायला बघतात. अपमान थंड झाला तर लवकर नासतो. गोविंदा, ताईंना परदेशी घेऊन जायचाय अपमान. अप वेगळा भर आणि मान वेगळा भर. बोला, तुम्हांला काय देऊ काका?
काका : कुत्सितपणा टेस्ट करायला मिळेल का हो?
मालक : (नाक उडवून) हुं! घ्यायचाय की नुसताच बघायचाय?
काका : टर आहे का?
मालक : अरे गोविंदा, बघ या टकलूला टर पाहिजे म्हणे! हा हा हा!
(पाठीमागं बॉक्समध्ये अपमान भरायचं थांबवून गोविंदा हसतो. रांगेतली दोनतीन गिर्हाईकंही हसतात. काका वरमतात.)
काका : आणि उद्धटपणा?
मालक : (खरखरीत आवाजात) कशाला?
काका : दुर्लक्ष कसा हो पाव?
मालक : (कानात काडी घालत, काऊंटरवर तबल्याचा ठेका धरत) अरे गोविंदा, ती पार्किंगमध्ये बाईक कुणाचीय बघ. हल्ली काही लोक पार्किंगमध्येही गाड्या लावू लागलेत.
काका : हटवादीपणा आहे का?
मालक : (त्वेषानं) अज्जिबात मिळणार नाही! (नेहमीच्या मवाळ सुरात) अहो, हटवादीपणा फक्त संध्याकाळी सहानंतर मिळतो. ताजा असतो तेव्हाच घेऊन जा.
काका : बदनामी नाहीय का?
मालक : तुम्हीच ना ते, बायकांना धक्का मारताना परवा मंडईत सामूहिक झोडपणी झाली होती ते?
काका : श्श! हळू बोला हो. आणि शिवीगाळ?
मालक : ए तुझ्या आयलार्र्र !! किती डोकं खाशील र्र्र्र्र्रे?
काका : पुरे पुरे! पाव किलो कुरकुर द्या.
मालक : (दुर्मुखल्या चेहर्याने) उगाच एवढा वेळ खाल्लात ना माझा? गोविंदा, बघ रे बाबा कुरकुर शिल्लक आहे का डब्यात? आणि पिशवी आणलीय का मालक?
काका : (जीभ चावत) नाही हो.
कॅरीबॅग द्या.
मालक : बघा, विचारेपर्यंत सांगितलं पण नाही. दुकानदारांना अगदी आपले नोकरच समजतात जणू. (प्रसन्नपणे, काऊंटरपलीकडे उभ्या छोट्या मुलीला) बोला छोट्या ताई, काय हवंय तुम्हांला?
छोटी मुलगी : काका, मला ना… मला ना… मला किनई…
मालक : (संयम संपल्यानं एकदम ताडकन) अपमान हवाय का गधडे?
छोटी मुलगी : नको नको. आईनं ना, मला ना, दहा रूपयांचं एक असंबंद्ध वाक्य आणायला सांगितलंय.
मालक : कॅरिबूच्या शिंगांच्या-
छोटी मुलगी : काका, इंडियन पाहिजे.
मालक : ओके, हे घे- उन्हाच्या काहिलीनं तो फरकांड्याच्या मनोर्यांसारखा झुलत रस्त्याकडेनं चालला असताना अचानक ब्रेकचा कर्रकच्च आवाज ऐकू आला म्हणून त्यानं दचकून पाठीमागं वळून पाहिलं तर ‘अरे ए! डोळे फुटले असतील तर खिशात परिदर्शक घेऊन फिरत जा!’ असं म्हणत एक सबमरीन पास झाली.
छोटी मुलगी : (आनंदून) छानै. चमचमीत आहे.
मालक : छान आहे ना? आता पळ घरी. बोला आजी, काय देऊ?
(आजीबाई मुठीत घट्ट पकडलेली चिठ्ठी उघडतात. ती टेबलावर ठेऊन सरळ करतात. मग पर्समधून शोधून चष्मा काढून डोळ्यांना लावतात. एकेक अक्षर लावत नीट चिठ्ठी वाचतात. वाचून झाल्यावर अचानक त्यांचा चेहरा पडतो.)
आजी : अरे देवा…
मालक : (काळजीच्या सुरात) काय झालं आजी? चुकीची चिठ्ठी आणली का?
आजी : नाही रे बाबा, चुकीच्या दुकानात शिरले वाटतं. उपमा आणि अलंकार हवे होते तर मी चुकून अपमानाच्या दुकानात शिरले.
(आजीबाई ‘हल्लीची मेली दुकानंही चुकीच्या जागी बांधतात. पूर्वी हे नव्हतं.’ असं काहीबाही पुटपुटत दुकानाबाहेर पडतात.)
मालक : (आजींकडे बघून हातवारे करत) शिरा. शिरा. तुमचा खेळ होतो पण आमचा वेळ जातो त्याचं काय? (पुढच्या गिर्हाईकाला) काय आजोबा, तुम्हीही चुकीच्या दुकानात शिरलात का?
आजोबा : (कवळी चावत) नाही रे बाबा, त्या आजीबाई जरा दिसायला बर्या दिसत होत्या. त्यांना नीट जवळून पाहावं म्हणून मी आपला रांगेत उभा होतो.
मालक : (खोचकपणे) मग, पाहिलंत ना नीट?
आजोबा : (हात उडवून) काय डोंबल पाहणार? अरे, माझा चष्मा दूरचा आहे हे विसरलोच होतो. उद्यापासून दोन्ही चष्मे घेऊन घराबाहेर पडलं पाहिजे. पेन आहे का रे?
मालक : कशाला? आता काय आजींवर कविता लिहिणार आहात का?
आजोबा : नाही रे. दोन्ही चष्मे सोबत ठेवायचं विसरेन म्हणून तशी स्मरणवहीत नोंद करून ठेवतो आत्ताच.
मालक : आणि स्मरणवही वाचायचीच विसरलात तर?
आजोबा : ती वेळ कधी येत नाही. घरी फळ्यावर ‘स्मरणवही वाचा’ असं मोठ्या अक्षरात लिहून ठेवलंय मी.
मालक : (खवचटपणे) कशाला इतकी तसदी घेता? आम्ही उद्यापासून गिर्हाईकांच्या सोयीसाठी चष्मेही पुरवणार आहोत. तुम्ही या कधीही. (आजोबा पटल्यासारखे समाधानानं मान हलवून निघून जातात.) हं बोला, तुम्हांला काय पाहिजे?
(रांगेतला पुढचा माणूस म्हणजे साजनमधल्या संजयदत्तसारखी हेअरस्टाईल केलेला आणि तितकेच विचित्र कपडे घातलेला तरुण आहे.)
संजयदत्त : काय काय आहे तुमच्याकडं?
मालक : तुम्हांला काय पाहिजे ते बोला. आपण एखाद्या हॉटेलात शिरलोय अशी तुमच्या मनाची समजूत झाली असेल तर तुमच्या मेंदूरूपी खोलीच्या कोपर्यात जे गैरसमजूतीच्या कोळ्यानं जाळं विणलंय ते पाटीवाचनरूपी झाडूच्या साहाय्यानं झाडून काढा.
(संजयदत्त हे ऐकून भेलकांडतो. मेंदूत एकदम साडेसात रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यासारखा त्याचा चेहरा होतो पण लगेच स्वतःला सावरून घेत-)
संजयदत्त : काका, (दबक्या आवाजात) कानफटात आहे का?
मालक : (हातांची घडी घालून) दुकानाचं नाव नीट वाचूनच आत शिरलात ना?
संजयदत्त : हो, पण काका त्याचं काय आहे की हल्ली लोक मेडिकल स्टोअरमध्येही गुटखा आहे का विचारतात. मग तुमच्याकडं कानफटात आहे हे विचारलं यात काय चुकीचंय?
मालक : (सुस्कारा सोडत) पलीकडच्या गल्लीत भालचंद्र हार्डवेअर आहे. तिथं मिळेल.
संजयदत्त : कशी असते हो? काही अंदाज?
मालक : तिथं गल्ल्यावर हणमंत बसलेला असेल. त्याला माझं नाव सांगितलंत तर तो एकच सणसणीत ठेवून देईल. पुढचे चांगले दोन तास तुमच्या कानातून कुंई आवाज येत राहिल.
(संजय दत्त मान हलवून मालकांचे आभार मानतो आणि झुलतझुलत निघून जातो. पाठीमागं एक काळा गॉगल-सफारीवाला ब्रीफकेस घेऊन उभा आहे.)
मालक : बोला, काय पाहिजे?
सफारी : मी माजी मंत्री भिंताडेंचा पीए आहे…
मालक : तुम्ही डोनाल्ड ट्रंपचे पीए असाल किंवा राहुल रॉयचे पीए असाल, आम्हांला त्यानं काही फरक पडत नाही. काय हवंय ते सांगा.
सफारी : आमच्या साहेबांना एक किलो अपमान पाहिजे होता.
मालक : गोविंदा एक किलो पॅक कर.
सफारी : पण कुणा दुसर्याचा अपमान करायचा असेल तर हा चालेल ना? नाही म्हणजे विरोधी पक्षासाठी म्हणून-
मालक : मग तसं आधी नाही का सांगायचं? गोविंदा, गिफ्ट रॅप कर रे. बोला झब्बावाले, काय देऊ?
झब्बावाले : (एखादं रहस्य सांगावं तसं मालकांच्या कानाशी येऊन) मी गायक आहे.
मालक : तुम्ही कोण आहात हे विचारलं का? कवी नाहीय ना?
झब्बावाले : (कानाच्या पाळ्या पकडत) नाही हो. पण मी गायक आहे. बायकोचं नाव कविता होतं, तेही मी लग्नानंतर हट्ट करून जयसंतोषीमां असं बदललं.
मालक : काय पाहिजे?
झब्बावाले : आणि मला दुधारी अपमान मिळेल का?
मालक : म्हणजे म्हटलं तर मान, म्हटलं तर अपमान असा?
झब्बावाले : हो, हो. आता नुसता अपमान सोसवत नाही हो. लग्न झालंय ना माझं.
मालक : ‘तुमच्यासारखं गाणं रफीच्या आवाजात कुणीही म्हणू शकत नाही, अगदी रफीही!’ – हे चालेल?
झब्बावाला : (आनंदून) वाहवा! एकदम दिल खूष झाला. हे घ्या पैसे. (ओवाळून टाकावेत तसे पैसे कानाला लावून काऊंटरवर ठेवतो.)
पुढचा माणूस : का हो, पार्टीच्या ऑर्डरी स्वीकारता का?
मालक : वेळ संपली. आता साडेचारला दुकान उघडेल तेव्हा या.
पुढचा माणूस : अहो पण, माझ्याकडं मोठी ऑर्डर आहे.
मालक : तेच आम्हांला परवडत नाही. एक मोठी ऑर्डर घेऊन आम्ही आमच्या रोजच्या गिर्हाईकांना नाराज करू शकत नाही.
पुढचा माणूस : अहो पण-
खटर्र (शटर खाली ओढल्याचा आवाज)