फुटबॉल… दी मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून जगभरात गौरविण्यात येत असलेला खेळ.
पेले-मॅराडोना असे जगभरातील फुटबॉलभक्तांचे जणू देवच. क्रिकेटला धर्म मानत असलेल्या भारतामध्येदेखील फुटबॉलची क्रेझ काही कमी नाही. किंबहुना, देशभरात सर्वदूर प्रचार-प्रसार होत असलेला फुटबॉल हा अव्वल खेळ आहे, असे खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) अहवाल सांगतो. त्यानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फुटबॉलच्या या वाढत्या लोकप्रियतेची कारणे शोधण्यासाठी आणि त्यानुसार क्रिकेटचादेखील विविध स्तरांवर प्रसार करण्यासाठी नव्याने धोरणे आखण्यासाठी समिती नेमली आहे. भारतामधील क्रीडा माध्यम आणि जाहिरात क्षेत्रात तब्बल ६४ टक्के वाटा संपादन करीत फुटबॉल आघाडीवर झेपावला आहे.
इंग्लंड, स्पेन, जर्मनी, इटली आदी देशांमध्ये व्यावसायिक साखळी स्पर्धेला भारतामध्ये तुफान टीआरपी आहे. त्याचप्रमाणे, या स्पर्धांमधील मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, चेल्सी, आर्सनेल, बार्सिलोना, रियल माद्रिद, ज्युव्हेंटस, बायर्न म्युनिक आदी क्लबना भारतामध्ये प्रचंड फॉलोअर्स आहेत. भारतामध्ये त्यांच्या अधिकृत समर्थक गटांची (फॅन क्लब) धूम असते. तसेच, रोनाल्डो-मेस्सी, नेमार, एम्बापे, बेल आदी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंचा भारतामध्ये मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच, फुटबॉलला भारतामध्ये ‘अच्छे दिन’ आले आहेत. (खरोखरीचे बरं का. दिल्लीतील ‘शेठ’ने डोळे वटारल्यासारखे नव्हे!)
आता हे फुटबॉल पुराण उगाळण्याचे कारण म्हणजे, गोव्यात सुरू झालेली हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) ही भारतीय फुटबॉलची सर्वांत लोकप्रिय स्पर्धा. यंदा या वार्षिक स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. राष्ट्रीय साखळी स्पर्धेचा दर्जा तिला बहाल करण्यात आला आहे.
युरोपमधील फुटबॉल स्पर्धेच्या धर्तीवर क्रिकेटच्या आयपीएलची रचना करण्यात आली. त्यानंतर शहर स्तरावरील संघ स्थापन करून फुटबॉलमध्येदेखील व्यावसायिकतेची धूम सुरू करण्यात आली आहे.
अर्थात, क्रिकेटप्रमाणे जगभरातील आघाडीचे, अव्वल खेळाडू फुटबॉलच्या या साखळी स्पर्धेत सहभागी होत नाहीत. तरीही, भारतीय फुटबॉलचा महाकुंभ म्हणून आयएसएलची गणना नक्कीच केली जाते.
गतविजेता एफसी गोवा, बंगळुरू एफसी, मुंबई सिटी, जमशेदपूर, चेन्नईयन, केरळा ब्लास्टर्स, हैदराबाद, नॉर्थ ईस्ट युनायटेड, ओडिशा एफसी हे संघ यंदाच्या हंगामात झुंजणार आहेत. यंदाचे खास आकर्षण ठरणार आहेत ते कोलकात्यामधील दोन दिग्गज क्लब – एटीके मोहन बगान आणि एस सी ईस्ट बंगाल. हे क्लब भारतीय फुटबॉलचा इतिहास, वर्तमान आणि आता भविष्यदेखील आहेत. इतकी वर्षे ते व्यावसायिकतेच्या मैदानात किक मारण्यास अनुत्सुक होते. पण, आता कालौघात तेदेखील आयएसएलच्या माध्यमातून व्यावसायिक गोल साधण्यासाठी सज्ज आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल भारताबाहेर आखाती देशांमध्ये खेळविण्यात आली. परंतु, फुटबॉलने मात्र भारतीय क्रीडाविश्वाला संजीवनी देण्याचा गोल लगावला आहे. किंबहुना, जगभरातील क्रीडाविश्वात कोरोना संसर्गाच्या धोकादायक काळातदेखील कोणत्या खेळाने पुनःश्च हरि ओम केले असेल, तर तो बहुमानदेखील फुटबॉललाच जातो!
यंदाची आयएसएल अत्यंत चुरशीची होणार यात शंकाच नाही. आतापर्यंतच्या सहा वर्षांमध्ये अटलेटिको डी कोलकाता संघाने (आता तो मोहन बगान या दिग्गज संघासमवेत एकत्रित झाला आहे) तब्बल तीनदा आयएसएलचे विजेतेपद पटकाविले आहे. चेन्नईयन संघाने दोनदा, तर बेंगळुरू संघाने एकदा जेतेपद पटकाविले आहे. गोवा आणि केरळ या संघांना प्रत्येकी दोनदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तर, चेन्नईयन आणि बेंगळुरू यांनीदेखील प्रत्येकी एकदा उपविजेतेपद मिळविले आहे.
सुनील छेत्री, संदेश जिंघन, जेजे, उदान्ता, राहुल भेके, निशू कुमार, गुरप्रितसिंग यांच्यासारख्या भारतीय आघाडीच्या फुटबॉलपटूंबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील गाजलेल्या फुटबॉलपटूंनी आयएसएलच्या माध्यमातून भारतीय फुटबॉलप्रेमींवर मोहिनी टाकली आहे. डेल पिएरो, रॉबर्टो कार्लोस, ल्युसिओ, मॅटारेझ्झी यांच्यासारख्या वर्ल्डकप जिंकलेल्या फुटबॉलपटूंचा त्यामध्ये समावेश आहे. व्हाईट पेले म्हणून गौरविण्यात येणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू झिको हेदेखील प्रशिक्षकाच्या भूमिकेत आयएसएलमध्ये आपला करिष्मा दाखवून गेले आहेत. त्याच्याच जोडीला सध्या स्पेन, ब्राझील, नायजेरियासह फुटबॉलविश्वात आघाडीच्या असलेल्या देशांमधील खेळाडू आयएसएलच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवित आहेत. अर्थात, युरोपीय साखळी स्पर्धांच्या तुलनेत आयएसएलला आखणी खूप मजल मारायची आहे.
भारतामध्ये २०१७ साली जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) १७ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली होती. आता २०२२ साली १७ वर्षांखालील मुलींचा वर्ल्डकप आणि आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार आहे.
तसेच, अनेक आघाडीच्या युरोपीय क्लबने भारतामध्ये युवा फुटबॉलपटूंच्या प्रतिभेला हेरून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दीर्घकालीन प्रकल्प कार्यान्वित केले आहेत.
या पार्श्वभूमीवर आयएसएल आणि एकूणातच भारतीय फुटबॉलला शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींकडून मिळत असलेला वाढता प्रतिसाद आशादायी आहे. विशेषतः, मुलींच्या फुटबॉलच्या क्षेत्रात भारतामध्ये खूपच उत्साहवर्धक चित्र आहे.
भारतीय फुटबॉल क्षेत्राला स्लीपिंग जाएंट म्हणून संबोधिण्यात येत होते. आता आपल्या क्षमतेला न्याय देत भारतीय फुटबॉलविश्व प्रगतीपथावर आहे. भारतीय राष्ट्रीय संघाने जागतिक मानांकन १६०-७० अशा गटांगळ्या खात होते. ते आता शंभरच्या आतमध्ये आणि त्या आसपास आले आहे. म्हणूनच, आता पॅशनेट जाएंट म्हणून गौरविण्यात येत आहे. मैदानातील खेळाबरोबरच फुटबॉलच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ बहुराष्ट्रीय कंपन्यांना खुणावत आहे. म्हणूनच, गोव्यामध्ये भरलेला हा भारतीय फुटबॉलचा महाकुंभ अनेकार्थांनी लक्षवेधी ठरणार आहे, यात शंकाच नाही!