बलात्काराचा खोटा आरोप करणाऱया एका तरुणीला न्यायालयाने चांगलीच अद्दल घडविली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणाला नुकसानभरपाई म्हणून 15 लाख रुपये तरुणीने द्यावेत, असा आदेश चेन्नईच्या एका न्यायालयाने दिला आहे. बलात्काराच्या खोटय़ा आरोपाखाली हा तरुण सात वर्षांपासून निष्कारण कारागृहात आहे.
चेन्नई येथील संतोषनामक तरुणाची इंजिनीअरिंग कॉलेजात एका तरुणीशी ओळख झाली. दोघांमध्ये मैत्रीसंबंध होते. मात्र, एक दिवस अचानक या तरुणीने संतोषच्या घरी येऊन त्याने आपल्याशी दुष्कर्म केले असून आपण गर्भवती असल्याचा बॉम्बगोळा टाकला आणि त्याला जेलमध्ये टाकले.
मुलीच्या डीएनए चाचणीत बिंग फुटले
संतोषच्या मागणीवरून मुलीची डीएनए चाचणी करण्यात आली. मात्र, मुलीचा डीएनए संतोषशी जुळला नाही. तरुणीचे बिंग फुटताच संतोषने 30 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली. कारण संतोषला तो कॉलेजात असतानाच अटक करण्यात आली. तब्बल सात वर्षे त्याला या लढाईला सामोरे जावे लागले. यामुळे त्याचे शिक्षण थांबले.