मुंबईत दिवाळीत फक्त चारशे पॉझिटिव्ह रुग्णांपर्यंत नोंद झालेली दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांत एक हजारांवर नोंदवली जात असली तरी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नसून चाचण्या वाढल्यामुळेच रुग्णसंख्या जास्त नोंदवली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दिवाळी दिवशी केवळ चार हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या, मात्र आज चाचण्यांची संख्या 17 हजारांवर गेल्याने जास्त रुग्ण आढळल्याचेही काकाणी म्हणाले. ही संख्या लवकरच नियंत्रणात येईल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द करा
मुंबईत कोरोना आटोक्यात आला होता, मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ा रद्द करा, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. लोक कोरोनाबाबत गांभीर्य बाळगत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत मुंबईकरांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सर्वसामान्यांसाठी तूर्तास ‘लोकल’ नाही
दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. तब्बल पाच महिन्यांनंतर मुंबईतील रुग्णसंख्या वाढली असून दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्वसामान्यांसाठी तूर्तास तरी रेल्वेची लोकल सेवा सुरू होणार नसल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या सेवा टप्प्याटप्प्याने सुरू कsल्या जात आहेत. जलतरण तलाव, शाळा आणि सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नसल्याचे आयुक्त चहल यांनी म्हटले आहे.मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. मात्र मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाहीत. तीन ते चार आठवडय़ांनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना