एलियनबाबतच्या चर्चा नेहमी होत असतात. थरार अनुभवण्यासाठी अनेकांना एलियनवरील चित्रपटही आवडतात. आता पुन्हा एकदा एलियनबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेतून उड्डाण केलेल्या एका हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला वाळवंटात एक विचित्र गोष्ट दिसली. त्यानंतर एलियन पृथ्वीवर उतरल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ही विचित्र वस्तू धातूची असून त्याची लांबी 10 ते 12 फूट आहे. उटाह वाळवंटाच्या दुर्गम आणि निमनुष्य भागात ही वस्तू कशी आली, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. आपण याआधी उड्डाण करताना अशी वस्तू पाहिली नसल्याने आपण स्थानिक प्रशासनाला याबाबतची माहिती दिल्याचे वैमानिक ब्रेट हुचिंग्स यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या बायोलॉजिस्टनेही ही विचित्र वस्तू असल्याचे सांगत याबाबत प्रशासनाला माहिती दऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. याआधी अशी वस्तू कधीही दिसली नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी या विचित्र धातूच्या वस्तूचे फोटो प्रसिद्ध केले आहे. तसेच याबाबत कोणाला काही माहिती असल्यास ती द्यावी, असे आवाहन केले आहे. या वस्तूबाबत प्रशासनाला कळवण्यात आले असून पुढील तपास करायचा किंवा नाही, याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. एखाद्या शिल्पकारने हा धातूचा खांब या परिसरात उभा केल्याची शक्यता काहीजणांनी वर्तवली आहे. मात्र, या दुर्गम आणि निमनुष्य भागात एखादा शिल्पकार असा खांब का उभा करेल आणि या भागापर्यंत तो कसा आणला असेल, असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारी जमीनीवर अशाप्रकारची कोणतीही गोष्ट उभारणे बेकायदा आहे. भलेही तो कोणत्याही ग्रहावरील असो, असे करणे बेकायदा आहे. याचा तपास करण्यात येणार असून हे नेमके काय आहे,याचा शोध घेणार असल्याचे सुरक्षा विभागाने म्हटले आहे. या विचित्र वस्तूमुळे एलियन पृथ्वीवर येऊन गेले असावेत. ही त्यांच्या यानातील किंवा तबकडीतील एखादी वस्तू असावी, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
सौजन्य : दैनिक सामना