घरच्या पाळीव कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचा संशय तपासात बळावला आहे. नागपूरच्या एका फार्मासिस्टच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही महत्वाची माहिती उघड झाली आहे.
डॉ.शीतल आमटे यांनी घरच्या पाळीव कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्ट कडून ही इंजेक्शन्स मागवली होती. ही इंजेक्शन्स ‘अॅनेस्थेशिया’ श्रेणीतील आहेत. डॉ. शीतल यांनी मागवलेल्या 5 इंजेक्शन्स पैकी 1 शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत मिळाले होते. त्यामुळे आता पोलिसांचा तपास या इंजेक्शन थिअरीवर केंद्रित झाला आहे. या तपासाबाबत मात्र पोलीस विभाग किंवा आरोग्य अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
डॉ. बाबा आमटे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा शीतल यांचे वडील डॉ. विकास आणि आई डॉ. भारती हे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात गेलेले होते. आनंदवनमध्ये शीतल, त्यांचे पती गौतम करजगी व सासरे होते.
डॉ. शीतल यांच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली होती. पण काही वेळातच डिलीट केली होती. त्यानंतर आमटे परिवाराने एक पत्रक जारी केले होते. या पत्रकावर डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यात शीतल या सध्या मानसिक ताण आणि नैराश्यग्रस्त असून त्यांनी केलेली म.से.स. या संस्थेच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल अनुचित वक्तव्ये आणि त्यांचे भाष्य तथ्यहीन आहे, असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.
दरम्यान, कुटुंबीयांकडून दिला जात असलेला त्रास सहन न झाल्यामुळे शीतलने स्वत:ला संपवल्याचा आरोप डॉ. शीतलच्या सासू सुहासिनी आणि सासरे शिरोष करजगी यांनी समाज माध्यमांवर पत्र टाकून केला आहे.
सौजन्य : दैनिक सामना