देवेंद्र फडणवीस
लोक मलाच सीएम म्हणतात
त्यांची तोंडे कोण धरणार?
अमित म्हणाले, घाबरू नकोस
पुढल्या जन्मी तुलाच करणार
मध्यरात्रीचा शपथविधी
अजून माझ्या स्वप्नात येतो
जागा झालो तरीसुद्धा
काळ्या टोपीचा भास होतो
अजून मात्र माझ्यामध्ये
तसा बदल झाला नाही
जसा होतो तसाच आहे
भित्रा ससा म्हणतात काही
—-
अमृता फडणवीस
हे सीएम आहेत असे
मलासुद्धा अजून वाटते
पत्नी म्हणून वावरताना
तेव्हासारखीच आता नटते
स्टुडियोत गाणे गाते तेव्हा
आवाजसुद्धा तसाच लागतो
तेव्हाचा तो आत्मविश्वास
आजसुद्धा गळ्यात दाटतो
ट्विटरमध्ये टिवटिव करता
तेच बळ अंगी येते
झुल्यावरती झोके घेता
मन त्यांच्यासारखेच झुलते
—-
किरीट सोमैय्या
स्वप्नात गुंग होण्यापेक्षा
एकेकाची घेतो मापे
इडी तर घरचीच आहे
त्यांचे काम करतो सोपे
मापानुसार आरोपांचे
कपडे शिवणे त्यांचे काम
त्यांना नाही जमले तर
विचार करून फुटतो घाम
आज जिथे जातो तिथे
सगळे करतात मला सलाम
अगदीच थोडे म्हणतात हसून
हा तर पत्त्यांमधला गुलाम
—–
नारायण राणे
एकेकाळी मी सुद्धा
या राज्याचा होतो सीएम
त्यांनी गेट आऊट केले तेव्हा
सुरू केले माझे गेम
इकडून तिकडे, तिकडून इकडे
मारत होतो, बेडूक-उड्या
अखेर ज्यांनी आधार दिला
त्यांच्याच हाती दिला नाड्या
आता मला खेळवत बसतील
काही काळ फिदीफिदी हसतील
जर अपयश आले गळ्यात
मोठा धोंडा हाती देतील
—-
नरेंद्र मोदी
जिकडे तिकडे माझाच आवाज
ऐकून ऐकून कंटाळलो मी
आता पट्टी बदलून पाहतो
दाढी जशी वाढवली मी
दूरदर्शन आकाशवाणी
त्यांचे सुद्धा कान बसले
रोज रोज तेच रेकणे
अनाउन्स करून खूप पकले
मेरा कहना सिर्फ एक है
सब का भला सबका विकास
आम आदमीसाठी सगळे
विकून करू देश भकास
—-
अमित शहा
छोटा भाई-मोटा भाई
पाहून आमची छान जोडी
जळतात सगळे आमच्यावरती
करतो म्हणे आम्ही लबाडी
गुजरात आमची कर्मभूमी
देव देते, कर्म नेते
तसेच घडेल वाटते आता
मनात येता धरणी फाटते
पूर्वीचे ते दिवस स्मरतात
सगळे राज्य होते हातात
निवडणुकीत काय होईल
ऐकून गोळे येती पायात