• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या जन्मवेणा!

- विश्वास पाटील

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 23, 2021
in दिवाळी 21 धमाका
0

मुंबईच्या चाळीचाळींतून, उपनगरांतून पेटलेली जनता, ‘‘महाराष्ट्र”, “संयुक्त महाराष्ट्रऽऽ” असे चेकाळत झेंडे घेऊन फोर्टकडे धावत होती. असेंब्लीला गराडा घालून ती बंद पाडायचा निर्धार होता. त्या २१ नोव्हेंबरच्या मोर्च्यात मध्यमवर्गीय स्त्रिया व अशिक्षित, कामगार बायाबापड्या आणि शाळकरी पोरासोरांचाही प्रचंड भरणा होता. मोरारजींच्या पोलिसांनी फ्लोरा फाउंटनला पोलीस दलाची आडवी भिंत उभी केली. निदर्शकांच्या छातीला संगिनी लावून सर्वांना रोखून धरले. तिथे अडीच लाखांहून अधिक जनतेचा महासागरच जणू गोळा झालेला. पेटलेली जनता मागे फिरेना. त्यामुळे अश्रुधुराच्या कांड्या फुटल्या. लाठीमार सुरू झाला. पोलिसांच्या बंदुकीतून सूं सूं करून गोळ्या सुटल्या. डीसीपी बाबुलाल शहाने जोरदार लाठीमार सुरू केला. जनतेची डोकी फुटली. तीनशे जखमी होऊन रस्त्यात कोलमडले, कोसळले. २१ नोव्हेंबरच्या त्या दिवशी पंधरा जण ठार झाले! ‘अण्णा भाऊ साठे : दर्दभरी दास्तान’ या राजहंस प्रकाशित चरित्रातील रोमहर्षक अंश…
—-

१९५५मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी वातावरण पेटू लागले.
१८ नोव्हेंबर १९५५ला सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील फोर्ट विभागात प्रचंड मोर्चा निघाला. मराठीच्या वैभवासाठी आणि महाराष्ट्राच्या मागणीसाठी ट्रॅम, बस, रेल्वे भरून हजारो लोक मंत्रालयाकडे निघाले. एखादे धरण फुटून जलप्रपात दिसावा, तशी दोनअडीच लाख जनता रस्त्यावर आली. तेव्हा फ्लोरा फाउंटनला (म्हणजे आजचा हुतात्मा चौक) मोरारजींच्या पोलिसांनी मोर्चा रोखून धरला. त्या दिवशी निदर्शकांवर निर्दयी लाठीहल्ले झाले. अश्रुधुरांच्या नळकांड्या फुटल्या.
मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजींनी मुद्दाम बाबुलाल शहा नावाच्या पोलीस अधिकार्‍याच्या हाताखाली कायदा आणि सुव्यवस्थेची गचोरी देऊन आंदोलन जुलमाने दडपायला सुरुवात केली. वर वीस नोव्हेंबरला मोरारजी व स. का. पाटलांनी मुद्दाम चौपाटीवर सभा लावून “यावच्चन्द्रदिवाकरौ… म्हणजे आभाळात चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळायची नाही,” अशी मळमळ ओकली. परधार्जिणे
स. का. पाटील बोलले, ‘‘राज्य चालवायची आम्हा मराठी लोकांची लायकीच नाही.” ह्या अशा वल्गना कानावर पडताच प्रेक्षकांत मोठा गदारोळ माजला. जनतेने आपल्या चपला, पायताणे आणि जोड्यांचा पाऊस सुरू केला, तसे मुख्यमंत्री मोरारजी आणि सदोबा पाटील पोलिसांची मदत घेऊन तेथून कसाबसा जीव वाचवत पळून गेले.
दुसर्‍या दिवशी २१ नोव्हेंबरला मुंबईच्या असेंब्लीत त्रिराज्य योजनेचा (मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात अशी तीन राज्ये बनविण्याचा) ठराव मांडला जाणार होता. जनता कमालीची बिथरली होती. त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी बेळगाव आणि कारवारहूनही हजारो निदर्शक मुंबईत येऊन पोचले होते. त्रिराज्य कल्पनेला कडाडून विरोध करण्यासाठी त्याच दिवशी लाक्षणिक संप पुकारला गेला होता. जनता कमालीची खवळलेली. तेव्हाच्या मुंबईला रोज सकाळी जागवणार्‍या साठभर कापड गिरण्यांचे भोंगे मोकळेच वाजत होते. मात्र दोन लाख गिरणी कामगारांपैकी कोणीही गिरणीच्या गेटच्या आत पाऊल टाकले नव्हते.
मुंबईच्या चाळीचाळींतून, उपनगरांतून पेटलेली जनता, ‘‘महाराष्ट्र”, “संयुक्त महाराष्ट्रऽऽ” असे चेकाळत झेंडे घेऊन फोर्टकडे धावत होती. असेंब्लीला गराडा घालून ती बंद पाडायचा निर्धार होता. तेव्हाचे मंत्रालय आणि असेंब्ली म्हणजे आजची रीगल टॉकीजजवळची पोलीस महासंचालकांची भव्य इमारत व परिसर. त्या २१ नोव्हेंबरच्या मोर्च्यात मध्यमवर्गीय स्त्रिया व अशिक्षित, कामगार बायाबापड्या आणि शाळकरी पोरासोरांचाही प्रचंड भरणा होता. प्रेतांचा खच पडला तरी त्यावरून धडाडीने आगेकूच करू, पण असेंब्लीला टक्कर देऊ, असा जनतेचा निर्धार होता. मोरारजींच्या पोलिसांनी फ्लोरा फाउंटनला पोलीस दलाची आडवी भिंत उभी केली. निदर्शकांच्या छातीला संगिनी लावून सर्वांना रोखून धरले.
तिथे अडीच लाखांहून अधिक जनतेचा महासागरच जणू गोळा झालेला. त्यातच दुपारची सुट्टी झाली. फोर्टमधल्या कार्यालयातून कर्मचारी-वर्ग बाहेर पडला. पेटलेली जनता मागे फिरेना. त्यामुळे अश्रुधुराच्या कांड्या फुटल्या. लाठीमार सुरू झाला. पोलिसांच्या बंदुकीतून सूं सूं करून गोळ्या सुटल्या. डीसीपी बाबुलाल शहाने जोरदार लाठीमार सुरू केला. जनतेची डोकी फुटली. तीनशे जखमी होऊन रस्त्यात कोलमडले, कोसळले. २१ नोव्हेंबरच्या त्या दिवशी पंधरा जण ठार झाले! त्यांच्या देहात डमडमच्या गोळ्या घुसल्या होत्या. (डमडमच्या गोळीचा घातक गुण म्हणजे तिचे छर्रे एखाद्याच्या शरीरात घुसल्यावर त्यांचा आणखी स्फोट (ब्लास्ट) होऊन मनुष्यदेहाच्या अधिकच चिंधड्या उडवतात.)
महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी आयुष्याची होळी करणारे हे पहिले पंधरा हुतात्मे!
मुंबईत मग हिंसाचार सुरू झाला. दोन बस, एका पोलीस चौकीला आग लागली. काही जणांनी पोलिसांच्या हातच्या बंदुका हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. त्यात भगवा झेंडा घेऊन पुढे झेपावलेल्या फणसवाडीतल्या एका कोवळ्या विद्यार्थ्याला, सीताराम पवारला पोलिसांनी गोळ्या घातल्या. तसा ‘‘महाराष्ट्रऽ माझा महाराष्ट्र” अशा गर्जना करत रक्ताच्या गुळण्या टाकत तो खाली कोसळला. परंतु त्याने हातातले निशाण सोडले नाही.
चहूबाजूंनी गराडा घालत असेंब्लीकडे धावत आलेल्या अडीच लाखांच्या गर्दीशी मुकाबला करणे शक्य नाही, याची जाणीव मोरारजींना झाली. त्यामुळेच जनतेच्या रोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी व भयसंकट टाळण्यासाठी मोरारजींनी महासभेला परवानगी दिली. तो निरोप घेऊन असेंब्लीतून साथी एस. एम. जोशी, भरूचा व अमृत देसाई आले. त्यांनी निदर्शकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्या प्रचंड गर्दीला चौपाटीकडे वळविले. सायंकाळी तिथे प्रचंड, निर्धारी सभा पार पडली.
सभेनंतर अण्णा आणि शाहीर अमर शेख धावत बाजूच्या फणसवाडीत गेले. तेव्हा महाराष्ट्रासाठी रक्त सांडणारा तरूण विद्यार्थी सीताराम पवारचा मृतदेह त्याच्या चाळीच्या दरवाज्यात आणला गेला होता. अण्णा व अमरने गहिवरल्या स्थितीत त्या हुतात्मा विद्यार्थ्याच्या शवाचे दर्शन घेतले. त्या वेळी अण्णांचा भावनेने ओथंबून गेलेला चेहरा अमर शेखांनी बघितला. तेव्हा ते काळजीने बोलले, ‘‘अण्णा, गड्या तू आज घाटकोपरकडे जाऊच नकोस. इथंच पल्याड भाऊसाहेब राऊतांच्या घरी रहा किंवा इकडेच गवाणकरांच्या घरी मुक्काम कर. तू प्रचंड थकल्यासारखा दिसतोस रे.”
अण्णा भाऊ स्वप्नात जाबडणार्‍या मनुष्यासारखे बोलले, ‘‘अमर, तू आज मला इकडे कुठे थांबवायच्या फंदात पाडूच नकोस. अरे, माझ्या मस्तकातच डमडमच्या गोळ्या घुसल्या आहेत.” रात्री स्मशान बनलेला फ्लोरा फाउंटनचा परिसर बघत अण्णा वादळासारखे माघारी वळले. जीवनातील त्या भयंकर रात्रीच अण्णांच्या मेंदूत एका मैनेने थैमान घातले होते. ती प्रतीकरूपाने वर वर मैना दिसली, तरी ती साक्षात महाराष्ट्रलक्ष्मीच होती! तिचीच घुसळण अण्णा भाऊंच्या कवटीत अखंड सुरू होती.
अण्णांनी ट्रॅम, टॅक्सी असे मिळेल त्या वाहनाने घाटकोपर गाठले. रात्री बाराच्या दरम्यान चिरागनगरच्या बोळांतून आत घुसतानाच अण्णांनी हाका मारायला सुरुवात केली, ‘‘शिवाऽऽ ये महादू… उठा रे. घ्या ढोलकी, घ्या झांजा… हत्यारं घेऊन तत्काळ पडा बाहेर.” अण्णांच्या झोपड्यांना चिकटून त्यांच्या सहकलाकार, झीलकर्‍यांच्या झोपड्या होत्या. आपल्या पुण्यवान पित्याची आठवण जागवताना शकुंतलाबाई मला सांगत होत्या, ‘‘त्या रात्री दारात उभ्या राहिलेल्या अण्णांचा चेहरा काय सांगावा? डोळे असे जर्द लालेलाल. एखाद्या चक्रीवादळातून मुसंडी मारत येणार्‍या पेटत्या मशालीसारखे दिसत होते ते.”
मग त्याच मध्यरात्री झोपड्यासमोरच्या त्या लतामंडपात अण्णांनी रात्रभर आराधना चालवली ती पेटत्या शब्दांची आणि उसळत्या सुरांचीही. पहाटेपर्यंत तो शब्दोत्सव तसाच सुरू होता. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे हत्यार बनलेली
`माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतीया काहिली’
ही रणलावणी त्या क्रांतिकारक कवीच्या मुखातून जन्म घेत होती. उपाशी पोटाने अण्णा तसेच हातात डफ घेऊन बसले होते. पुर्‍या रात्रीत त्यांनी चहाचे फक्त दोन वेळा घोट घेतले. अण्णांच्या हातचा डफ कडाडत होता. शिवाची बोटे ढोलकीवर नाचत होती. रात्र थरारत होती. बघता बघता पहाट झाली. अंधार फाटला.
सकाळी उजाडेपर्यंत अण्णांनी त्या रणलावणीची दोन जबरदस्त कडवी लिहून काढली.
मैनेच्या गावरान बांध्याचे आणि भोळ्याभाबड्या प्रीतीचे वर्णन करणार्‍या आरंभीच्या बर्‍याच ओळी त्याच रात्री सुरुवातीला लिहून झाल्या.
`मैना माझी हसून बोलायची। मंद चालायची।
सुगंधी केतकी। सतेज कांती रेखीव भुवया।
कमान जणु इंद्रधुनची। हिरकणी हिर्‍याची।’
वगैरे वर्णने करत गावंदरीचा निरोप अशा बर्‍याच ओळी व ‘ही मुंबई यंत्राची, तंत्राची, घामाच्या मंत्राची’ अशा वर्णनातला बराच मजकूर त्याच रात्री लिहून काढला. तो त्यांनी सूरतालाबरोबर घोटवला. पण पुढच्या काही ओळी लिहिताना सर्वांग अग्नीच्या ज्वाळांनी लपेटून टाकावे अशी अण्णा भाऊंची अवस्था झाली-
`त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची,
बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एका भाषिक राज्याची,
चकाकली संगीन अन्यायाची। फौज उठली बिनिवरची
कामगारांची। शेतकऱ्यांची। मध्यमवर्गीयांची।
उठला मराठी देशऽऽ। आला मैदानी त्वेष। वैरी करण्या नामशेष।
गोळी डमडमची छातीवर साहिली… माझी मैना गावाकडं राहिली।
…सांगे अण्णा भाऊ साठे। घरं बुडणार गर्वाची,
मी-तू पणाची। जुलमाची।
निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची।
चौदा चौकड्यांचं राज्य रावणाचं। लंका जळली त्याची
तीच गत होणार कलियुगी ह्या जुलूमशहांची।
उचला रे उचलाऽऽ तिरडी स. का. पाटील आणि मोरारजीची
ही साक्ष आहे शाहिराच्या गरम रक्ताची!
कशी पळवाल वैर्‍यांनोऽऽ गाय वासराची
बुडाली पृथ्वी, घडला प्रलय तरी मुंबईच होणार महाराष्ट्राची!
झालं फाउंटनला जंग। तिथं बांधूनी चंग। आला मैदानी रंग।
धार सिताराम बाळाच्या रक्ताची म्या पाहिलीऽऽ
माझ्या जिवाची होतीया काहिली।’
बलिदानाची आणि हौतात्म्याची महती गाणार्‍या ह्या ओळी त्याच वेळी कारुण्याच्या दहिवरातही भिजल्या होत्या.
रात्रभर डफ, हलगी, ढोलकी आणि मंजिरी व तुणतुण्यांचा नुसता घायटा उडाला होता. अण्णा भाऊंनी आपल्या मस्तकात घुसलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा शब्दांच्या मशालींनी चांगल्या डागून काढल्या, तेव्हा कुठे त्यांना हायसे वाटले.
अवघ्या काही दिवसांच्या आत अण्णा भाऊंच्या ह्या रणलावणीचे शब्द कापराच्या वड्यांसारखे पेटले. चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचले. अन् निर्दशकांच्या हातचे शस्त्र बनले. पुढे चळवळीला मिळालेले वळण, घडणार्‍या घटना बघत अण्णा भाऊंनी या लावणीतील शब्दरचनेत काही सुधारणा केल्या. क्रांतिकारी निखार्‍यासारख्या शब्दांची ही माळ ते बदलत राहिले.
संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्णत: आकाराला आले नाही. तसेच बेळगाव, कारवार, भालकी, बिदर्गी, डांग हा मुलूख महाराष्ट्राला मिळाला नाही. ती तगमग व्यक्त करणार्‍या ओळीही अण्णा भाऊंनी पुढे लिहून महाराष्ट्रापुढे पेश केल्या.
`महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची।
दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढण्याची।
परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची।
गावाकडं मैना माझी। भेट नाही तिची।
तीच गत झाली या खंडित महाराष्ट्राची।
बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची। धोंड खंडणीची।
कमाल दंडेलीची। चीड बेकीची। गरज एकीची।
म्हणून विनवणी आहे
शिवशक्तीला शाहिरीची।
आता वळू नका। रणी पळू नका। कुणी चळु नका।
बिनी मारायची अजून राहिली। माझ्या जिवाची होतीया काहिली।।’
पुढे हा बदल अगदी १९६२च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवसांपर्यंत होत राहिला.
`बिनी मारायची अजून राहिली’ या ओळीवरून काही अभ्यासक अण्णा भाऊंनी ही लावणी १९६०नंतर लिहिल्याचा निष्कर्ष काढतात. तो चुकीचा आहे. अण्णा भाऊंवर अन्याय करणारा आहे. कारण या लावणीतले काही अंतरे नंतर काळाप्रमाणे बदलत गेले. तरी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे ही रचना एक महत्त्वाचे हत्यार बनली होती. तिचा जन्म फाउंटनच्या रक्तपाताच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर २१ नोव्हेंबर १९५५च्या रात्री झाला. लगेचच दोन महिन्यांच्या आत शाहीर अमर शेख यांच्या मेघकंठी आवाजात ती पहिल्यांदा १६ जानेवारी १९५६ या दिवशी शिवाजी पार्कवर जनतेला ऐकायला मिळाली. त्यानंतर लगेचच ती उभ्या महाराष्ट्रात गावागावांत जाऊन पोचली होती.
जेव्हा दिल्लीच्या मोर्च्यासाठी मुंबईतील महिला नेत्यांनी व कार्यकर्तींनी भरलेला पंजाब मेलचा डबा देशाच्या राजधानीकडे चालला होता, तेव्हा त्या डब्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मातोश्री विठाबाईंनी व त्यांच्या मावशींनी `माझी मैना गावावर राहिली’ ही लावणी खड्या आवाजात गाऊन दाखवली होती. तिची झील कॉ. अहिल्या रांगणेकर व कॉ. तारा रेड्डी यांनी पकडली होती. या घटनेचा उल्लेख आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी `हुतात्मा’ या ग्रंथात केला आहे. तसेच हा किस्सा मी कवयित्री शिरीष पै यांच्या मुखातूनही ऐकला आहे.
क्रांतिसिंहांचे नातू कॉ. सुभाष पाटील यांनी त्या मावशी म्हणजे कोहिनूर मिलच्या कामगार चाळीत राहणार्‍या व सर्व भूमिगतांच्या मावशी असलेल्या सुंदराबाई जाधव ह्या होत्या; तसेच या मेळ्यात नाना पाटलांच्या कन्या हौसाबाईसुद्धा हजर होत्या, असे मला सांगितले. काही वर्षांपूर्वी कॉ. डॉ. आर. बी. मोरे यांच्यासमवेत सुंदराबाई जाधव ह्या माउलीला भेटायचे भाग्य मला लाभले होते. वृद्धत्वातही त्यांच्या अंगाचा सळसळता उत्साह आणि त्यांची लिंबासारखी पिवळी कांती या दोन्ही गोष्टींना कोणाचीही नजर लागली नव्हती.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हे अण्णा भाऊ, आचार्य अत्रे, ग. त्र्यं. माडखोलकर अशा साहित्यिकांसाठी व शाहीर अमर शेख, गवाणकर, आत्माराम पाटील, शाहीर करीम, प्रताप अशा मराठी मातीतील बुलंद आवाजांच्या शाहिरांसाठी जीवनातले एक धगधगते पर्व होते. मोरारजी देसाई व पंडित नेहरूंना मुंबई शहर महाराष्ट्रापासून तोडून वेगळे बनवायचे होते. अंदमान आणि निकोबार यांसारखा तो केंद्रशासित प्रदेश घोषित करून मुंबई म्हणजे केंद्रीय सत्तेच्या हातातला एक खुळखुळा बनवायचा होता.
त्रिराज्य निर्मितीच्या कल्पनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरुषसुद्धा प्रक्षुब्ध बनले होते. त्यांनी तर १ मे १९५६ या दिवशी राज्यसभेमध्ये सर्वांना असा सक्त इशारा दिला होता की, “मुंबई शहरासाठी मी अन्य महाराष्ट्रीयांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहे, असे सरकारला स्पष्ट सांगू इच्छितो.” त्याच वेळी त्यांनी मुंबईतील आधुनिक उद्योगधंद्याचा पाया देशातील गुजराती व अन्य व्यापार्‍यांनी नव्हे, तर ब्रिटिश व्यापारी व उद्योगपतींनी घातल्याची आठवणही सर्वांना करून दिली होती. घटनेच्या या शिल्पकाराने भाषिक तत्त्वावर राज्यांची निर्मिती करण्यामध्ये कसलाही धोका नसल्याचेही राज्यसभेला स्पष्ट सांगितले होते.
दिवसेंदिवस संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा जोर वाढत होता. रणांगणावर सपासप चालणार्‍या तलवारींसारखे शाहिरांचे डफ कडाडून वाजत होते. शाहीर आत्माराम पाटील तर सत्ताधार्‍यांना,
‘संयुक्त महाराष्ट्र उगवतो सरकारा खुशाल कोंबडं दाबून धरा”
असा रोखड इशारा देत होते. १९५६ची मुंबई राज्याची विधानसभेची निवडणूक ही संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरच खूप गाजली. काँग्रेस विरोधातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेली संयुक्त महाराष्ट्र समिती सत्तारूढ काँग्रेस पक्षाशी खूप चिवट झुंज देत होती. समितीच्या प्रचाराची धुरा तेव्हाच्या प्रचंड ताकदीच्या वत्तäयांबरोबरच शाहीर अमर शेख आणि अण्णा भाऊ व गव्हाणकर अशा दोन कलापथकांवर मुख्यत: येऊन ठेपलेली. समितीच्या प्रचारासाठी या दोन्ही कलापथकांनी एक झंझावात निर्माण केला होता.
चळवळीच्या दिवसांत या दोन्ही कलापथकांच्या प्रचाराच्या वादळी तडाख्याने सत्ताधारी काँग्रेस पक्ष गडबडून गेला होता. मग त्यांनी कवी ग. दि. माडगूळकर यांना मैदानात उतरवले. माडगूळकरांनी ‘‘डांग्या खोकला झाला गं बाई, यंदा समिती जगत नाही,” असे समितीचे विडंबनगीत सुरू केले. मात्र अण्णा भाऊंच्या “अरे वाघाला नखं, गरुडाला पंख, तशी मुंबई मराठी माणसाला” आणि अमर शेखांच्या मुखातील ‘‘जागा मराठा, जमाना बदलेगा” या झंझावातापुढे माडगूळकरांचा प्रचार खूपच तोकडा पडत होता.
संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष धगधगतच राहिला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकारणीने व सीमा लढा समितीने १८ डिसेंबरला दिल्लीला संसदेवर मोर्चा काढायचा निर्णय घेतला. त्याबाबत आचार्य अत्रे ‘दिल्लीमध्ये औरंगजेबाचे वारस’ या लेखात लिहितात की, ‘‘दिल्लीश्वर नेहरू ह्यांनी औरंगजेबाच्या गढूळ डोळ्यांनी आणि कलुषित हृदयाने महाराष्ट्राकडे बघावयाचे जर ठरविले नसते, तर महाराष्ट्राला ह्या जमान्यात दिल्लीवर चाल करून जाण्याचे मुळी कारणही पडले नसते.”
तेव्हा महाराष्ट्रातील तमाम शाहिरांनीही पहाडी कवनांनी दिल्ली गाजवून सोडायचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीकरांच्या काळजाची तार छेडण्यासाठी त्यांच्याच अस्सल हिंदुस्थानी भाषेची लय व सुरावट असणार्‍या शब्दांची गरज होती. त्याबाबत दादरला शाहिरी मंथन सुरू होते. तेव्हा तोंडातील जळती बिडी विझवत अण्णांनी सर्वांना हसून सांगितले, ‘‘चलाऽ गणित सुटले.”
त्या रात्री उशिरा अण्णा भाऊ आपल्यासोबत गव्हाणकर, अमर शेख आणि शाहीर जाधव यांना घेऊन खारकडे निघाले. आधी फोनवर ठरल्याप्रमाणे कवी शैलेंद्र यांनी रात्री साडेअकरानंतरच अण्णांना घरी यायचा निरोप दिला होता. १९४९च्या `बरसात’ सिनेमापासून कवी शैलेंद्र यांनी पुढे `आवारा’, `श्री चारसो बीस’, ‘चोरी चोरी’, `यहुदी’, ‘मधुमती’, ‘सीमा’, ‘अनाडी’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांच्या गीतलेखनाद्वारे स्वत:चा जमाना सुरू केला होता. दिवसभर कुठल्या न् कुठल्या रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये ते व्यग्र असायचे. त्यामुळेच उशिराची भेट ठरलेली.
आपल्या संघर्षमय दिवसांतल्या मित्राला शैलेंद्र यांनी तातडीच्या भेटीमागचे प्रयोजन विचारले. अण्णांनी थोडक्यात संयुक्त महाराष्ट्र, दिल्लीला धडक आणि नेहरूंना सुनवायचे बोल, असा विषय सांगून टाकला. तेव्हा शैलेंद्र गोड हसले. एखाद्या प्रांतातील जनतेचा स्वाभिमान डिवचला की ती कशी गाजून गर्जून उठते, याचा अनुभव स्वत: शैलेंद्र यांनी घेतला होता. आपल्या उमेदवारीच्या ‘जलता है पंजाब’ नावाची अतिशय जबरदस्त कविता त्यांनी लिहिली होती. त्या रचनेनंतरच ते काव्य संमेलनांच्या व्यासपीठावर झमकन पुढे आले होते.
शैलेंद्र यांच्या जवळ बसलेले अमर शेख आणि अण्णा भाऊ अगदी हटून बसले होते, ‘‘भाऊ, असं काही तरी जबरदस्त लिहून द्या की अख्खी दिल्ली नागासारखी डोलली पाहिजे.” तेव्हा हिरमुसले होत शैलेंद्र बोलले, ‘‘अरे अण्णा, आपने पहले क्यूं नहीं बताया? हिंदी गाना तो जरूर तैय्यार हो जाएगा, लेकिन उसका दिल, चाहत, मकसद मराठीही रहनेवाला है. साथमें आप अपनी ढोलकी और डफलीया लेके आते तो बात बन जाती.” त्यावर अण्णा भाऊ हसून बोलले, ‘‘अरे भैय्या, बात अभीबी बननीच है. येताना टॅक्सीत टाकून हत्यारं संगतीनं घेऊनच आलोय.”
मग शाहीर जाधवांनी व गव्हाणकरांनी डिकीतली आयुधे बाहेर काढली. ढंगदार ढोलकी वाजवण्यात गव्हाणकरांचा हात धरणारे कोणी नव्हते. अण्णा भाऊंनी हाती हातखंडी कडाडती हलगी धरली. तर अमर शेखांच्या हाती डफली निनादू लागली. एकीकडे शैलेंद्र लिहीत राहिले आणि शाहीर अमर शेखांनी त्यांच्या बंगल्यातच खडा सूर पकडला.
‘‘जागा मराठाऽऽ
आम जमाना बदलेगा
उठा है जो तुफान
वह आखिर बंबई लेकर दम लेगा।।
आयेगी मुश्किलें हजार
पर हम भी लाचार नहीं
दो कौडी के मोल मराठा
बिकने को तैय्यार नही
इस भारत का इतिहास
आज से एक नयी करवट लेगा
जागा मराठाऽऽ
आम जमाना बदलेगा”
डिसेंबरच्या अठरा तारखेला सत्याग्रहींचं सैन्य दिल्लीच्या स्टेशनात उतरले. स्वखर्चाने एवढ्या दूर जायचे होते. त्यामुळे जास्तीत जास्त पाचशे निदर्शक दिल्लीपर्यंत कसेबसे पोचतील, अशी नेत्यांची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात अडीच हजारांची फौज दिल्लीत उतरली. तेव्हा महाराष्ट्राच्या मागणीसाठी काँग्रेसला कडाडून विरोध करून जनतेने १९५६च्या निवडणुकीत १९ खासदार व १०२ आमदार समितीच्या तिकिटांवर निवडून दिले होते. ते सर्व लोकप्रतिनिधी, तसेच ५४ म्युनिसिपल कौन्सिलर व १५० महिलांची फलटण सोबत होती.
चार चार निदर्शकांचे गट तयार करून मोर्चा पुढे चालला. त्याची लांबी दोन कि.मी.हून अधिक होती. कनॉट सर्कलमार्गे मोर्चा दुपारी साडेबाराच्या दरम्यान संसद भवनाजवळ पोचला. मोर्च्याच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक व वासुदेव बळवंत फडके यांच्या चित्रांचे फलक घेऊन मोर्चेकरी मोठ्या थाटात चालले होते. अत्रे, उद्धवराव पाटील, दाजिबा देसाई, कॉ. नाना पाटील, कॉ. एस. ए. डांगे, बॅ. नाथ पै सारे दिवसभर मोठ्या त्वेषाने पुढे निघाले होते. त्यामध्ये कर्‍हाड व कोल्हापूरकडील भगव्या फेट्यातील कुर्रेबाज सत्याग्रही तर सर्वांच्या डोळ्यांतच भरत होते. दिल्लीच्या त्या कुडकुडत्या थंडीत अनेक स्त्रियांनी अंगावरची तान्ही लेकरे सोबत घेतली होती.
अण्णा भाऊ, अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर तर त्या मोर्च्यात अशा रुबाबात गात होते, गर्जत होते; जसे काही त्या एका दिवसासाठीच ते जन्माला आले होते. शाहीर अमर शेखांच्या मुखातून शैलेंद्रांच्या त्या ओळी, ‘‘जागा मराठाऽऽ आम जमाना बदलेगा” आगीच्या पलित्यांसारख्या बाहेर पडत होत्या. मोर्च्याच्या आगेमागे पोलिसांचा कडा पहारा आणि दहशत माजविणार्‍या लांब काळ्या पोलिसी गाड्यांचाr माळ चालली होती.
संसदेत घुसू पाहणारा मोर्चा पोलिसांनी दारातच अडवला, तसा संसदेला निदर्शकांचा अर्धगोलाकार गराडा पडला. जबरदस्त घोषणाबाजी आणि पोवाड्यांची पहाडी पेशकश अखंड सुरू होती. अमर शेखांच्या हाती डफ होता, तर अण्णा भाऊंच्या हाती तुणतुणे.
आघाडीच्या तिन्ही शाहिरांसोबत शाहीर आत्माराम पाटील, शाहीर गजानन बेणी, शाहीर जैनू शेख, केशर जगताप असे सारे होते. शाहिरांच्या त्या विराट ललकार्‍या, मायमराठीच्या कुशीतून फुटलेल्या त्या ओव्या, ती धुंदी आणि कडकडत्या डफावरची बेहोशी पाहण्यासाठी दिल्लीमध्ये पंजाबी आणि हरियानवी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
लोकसभेत व राज्यसभेत मुंबई-म्हैसूर राज्यांतील सीमाप्रश्न व संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी खासदार कॉ. डांगे, बॅ. नाथ पै व भूपेश गुप्ता यांनी मांडलेली तहकुबीची सूचना डॉ. राधाकृष्णन यांनी फेटाळून लावली, तसे विरोधी खासदार सभात्याग करून बाहेर निदर्शनात येऊन सामील झाले. रात्री सातनंतर हाडात शिरणारी उत्तरेतली थंडी सत्याग्रहींना बेजार करू लागली. तरीही मागे हटायला कोणी तयार नव्हते. शेवटी रात्री स्त्रियांना हातापाया पडून तेथून निवार्‍याच्या जागी जाण्यास भाग पाडले गेले.
शाहिरांनी तर जोमदार पहाडी गीतांनी व पोवाड्यांनी जणू काही दिल्लीची ती अख्खी रात्र जळत्या पलित्यांच्या प्रकाशात जागूनच काढायचे ठरविले होते. निदर्शकांच्या उशाला रात्रभर शेकोट्या पेटल्या होत्या. कोणी खवचटपणे “तुम्ही मराठे असेच पानिपतच्या थंडीत मरून गेला होतात”, अशी आठवण करून देत होते. तेव्हा निदर्शक ‘‘या वेळी मात्र आम्ही विजयाचा झेंडा हिसकावून नेण्यासाठीच इथे आलो आहोत,” असे गर्वाने सांगत होते. त्या रात्री स्त्रियापोरांना मुक्कामाच्या जागी पांघरुणे कमी पडली. उषा डांगे यांनी तर बंगल्यातले मोठ्या उंचीचे पडदेसुद्धा हिसकावून खाली उतरवले. त्याच्या गुंडाळीत काही निदर्शकांना झोप मिळाली.
लोकसभेच्या दारात हजारो स्त्रीपुरुष अर्धउपाशी स्थितीत तीस तास ठिय्या मारून बसून होते. मात्र पंडित नेहरू निदर्शकांकडे एकदाही फिरकले नाहीत. ना त्यांनी चौकशी केली. रात्रभर ‘जागा मराठाऽऽ’बरोबरच शाहीर अमर शेख यांनी ‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’चाही सूर सतत आळवता ठेवला होता.
शाहिरांनी दिल्लीतले वातावरण असे मंत्रमुग्ध करून सोडले होते की, अखेरीस आचार्य अत्रे अत्यंत भारावून गेले. डोळ्यांतून घळघळ वाहणारे अश्रू पुसत ते शाहिरांना निरोपाच्या सभेत बोलले, ‘‘अरे बापड्यांनोऽऽ कशाला उगाच तुम्ही चुकीच्या काळात जन्माला आला रे? दिल्लीच्या रस्त्यात जो तुम्ही गेले तीस तास मायमराठीचा जागरण गोंधळ घातला आहे, तो बघायला इथे साक्षात शिवाजी महाराजच असायला हवे होते. त्यांनी त्या अज्ञानदासासारखी शेर-शेरभर वजनाची सोन्याची कडी तुमच्या मनगटात बांधून तुमचा गौरव केला असता.”
मुंबईच्या प्रश्नावर `माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची’ ह्या वगनाट्याने तर उभा महाराष्ट्र पेटवून काढला होता. त्यामुळे एखाद्या गावात या वगनाट्याचा खेळ लागायचा अवकाश, तेव्हा त्या गावागावांत गुढ्यातोरणे उभारून व कमानी बांधून अण्णा भाऊंच्या कलापथकाचे स्वागत व्हायचे. जनसामान्यांना कळणार्‍या भाषेत ते मुंबईभोवती भांडवलदार व राजकारण्यांनी उभ्या केलेल्या कटकारस्थानाची नेमकी कहाणी विशद करायचे.
त्या दिवसांत घडलेली एक अमूल्य घटना अनेकांच्या अजून स्मरणात आहे. त्याची आठवण मला सोपान खुडे यांनी करून दिली. एकदा कर्‍हाडजवळचे एकवीस शेतकरी तेथून चक्क मुंबईपर्यंत चालत आले होते. त्यांच्याजवळ मोटारभाड्याचे पैसेही नव्हते. त्यांनी निर्दशनात भाग घेतला. समितीच्या इतर नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या गरीब शेतकर्‍यांच्या दिव्य धाडसाला पाहून अत्रे यांनी कठोर शब्दांत खडसावले, ‘‘या प्रश्नासाठी इतक्या लांबून चालत यायची गरजच काय होती?” तेव्हा त्या शेतकर्‍यांनी कळवळ्याने उत्तर दिले, ‘‘साहेब, आमी नाय येणार तर मग कोण येणार? त्यो मोरारजी आपली मंबय दुसर्‍याच्या वट्यात टाकायला निघालाय. तेव्हा आम्हास्नी तरी गावाकडं झोप कशी लागावी?” हा सारा परिणाम अण्णा भाऊ व अमर शेख या दोघांच्या तुफानी प्रचाराचा होता. एका वेळी त्या दोघांच्याही कलापथकांनी `माझी मुंबई’चे प्रयोग अनेक ठिकाणी करून महाराष्ट्र ढवळून काढला होता. जनामनावरचा त्याचा प्रचंड प्रभाव पाहूनच मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी त्या वगनाट्यावर सरकारी हुकूम काढून बंदी घातली होती.
शेवटी १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून अनेक शाहीर व लेखककवींच्या त्यागातून हाती काय गवसले?
देशभक्तीने व महाराष्ट्रप्रीतीने भारावलेले, विजयाने हुरळलेले महाराष्ट्रवादी बेसावध होते. सत्तेची सिंहासने बळकाविणारे मात्र त्या मानाने खूपच हुशार आणि जात्याच चलाख होते. त्यांनी शेवटी जनतेच्या रेट्यापुढे नाइलाजाने महाराष्ट्र राज्यनिर्मितीला मान्यता दिली. परंतु ते मागणे मान्य करतानाही ही राज्यनिर्मिती हुतात्म्यांच्या रक्तातून व शेतकरी-कामगारांच्या संघर्षातून झाल्याच्या जन्मखुणा त्यांना अजिबात पाठीमागे राहू द्यायच्या नव्हत्या.
श्रेय हिसकाविण्याच्या मनोवृत्तीमधूनच ते सत्ताधार्‍यांना सोयीचा असा नवा इतिहास बिंबवू पाहत होते. जसे काही एखाद्या स्वर्गस्थ देवतेने नेहरूंना उदार मनाने यशाचा कुंभ सुपुर्द केला अन् पंडित नेहरूंनीही तो मंगल कलश तसाच फुलांच्या परडीतून अलगद यशवंतरावजींच्या हाती दिला, असाच इतिहास त्यांना महाराष्ट्रापुढे उभा करायचा होता.
या राज्याच्या व भाषेच्या संवर्धनासाठी जे झुंजले, त्यांच्या त्याग व स्मृतीवरून बोळा फिरवायचा जसा काही निर्धारच झाला होता. त्यामुळे दिल्लीने जरी फेब्रुवारी १९६०च्या आरंभी महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा निर्णय मनोमनी मान्य केला, तरी छोट्या छोट्या बाबींसाठी अडवणूक करण्यात आली. तेव्हा शिवजयंती जवळ येऊ लागली होती. त्यामुळे शिवजयंतीच्या मंगल दिवशी महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा मुहूर्त साधावा, जेणेकरून दरसाल `शिवजयंती’ व `महाराष्ट्र दिन’ मोठ्या आनंदात एकाच दिवशी साजरा करता येईल, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली गेली होती. पण तो आनंद सत्ताधार्‍यांना जनतेला मिळूच द्यायचा नव्हता. त्यामुळे नेहरूजींनी शिवजयंतीऐवजी `एक एप्रिल’ हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त निश्चित करून तो खाली कागदोपत्री कळवूनही टाकला.
कॉम्रेड डांगे यांची जवाहरलालजींशी व्यक्तिगत पातळीवरची मैत्री खूप जुनी होती. अगदी १९२४-२५पासूनची. त्यामुळे डांगे यांनी तातडीने विमानाने दिल्ली गाठली. तीन मूर्ती भवनावर नेहरूंना एकटे गाठून हळूच सांगितले, ‘‘एक एप्रिलच्या मुहूर्ताने आम्हाला मूर्ख बनविल्याचा आनंद तुमच्या जवळच्या अनेक सहकार्‍यांना खचितच होईल. मात्र जवाहर, या निर्णयाने तुमची प्रतिमा मात्र महाराष्ट्राच्या मनात खलनायकासारखी चिरकाल टिकून राहील.” डांग्यांनी कथन केलेल्या गोष्टीमागचे इंगित नेहरूंच्या तत्काळ ध्यानी आले. त्यामुळे महाराष्ट्रवादी नेत्यांशी सल्लामसलत करून १ मेचा `कामगार दिन’ हाच `महाराष्ट्र दिन’ बनवायचे ठरले.
राज्यनिर्मितीची मागणी मान्य करताना राज्याचे नाव `महाराष्ट्र’ न ठेवता ते ‘मुंबई राज्य’ करावे, असेही दिल्लीपतींनी तिकडे निश्चित करून टाकले होते. त्यावर नेहरूंचे मन दुखवायचे नाही म्हणून चव्हाणसाहेबांनी ‘मुंबई (महाराष्ट्र)’ असा तोडगा सुचवला. त्या सल्ल्याची आचार्य अत्रे यांनी ‘‘गायीच्या पोटात वासरू की वासराच्या पोटात गाय” अशा खरमरीत शब्दांनी खिल्ली उडवली. शेवटी अनेक उठाबशा काढत `महाराष्ट्र’ या नावाची देणगी दिल्लीकरांनी मोठ्या उदार मनाने महाराष्ट्राच्या झोळीत टाकायचे पुण्यकर्म साधले.

Previous Post

वात्रटायन

Next Post

अमहाराष्ट्रीयन दिवाळीचा फराळ

Next Post

अमहाराष्ट्रीयन दिवाळीचा फराळ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.