निसर्गाने माणसाला सर्व काही भरभरून दिले आहे. शक्ती, युक्ती, भावना आदी. तसेच माणसाला आणखी एक मन नावाची एक संस्था दिली आहे, जी डोळ्यांना दिसून येत नाही पण जाणवते. या मनाच्या ताब्यात माणूस आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. परंतु याउलट वन्यजीव अथवा पशु-पक्षी यापासून वंचित राहिले आहेत. ते आपल्या विश्वात रमत असल्याचे माणसाला वाटत असले तरी पशु-पक्ष्यांना मन, भावना, दुःख, आनंद हे सर्व काही असते. फरक फक्त एवढाच की, माणूस आपल्या भावना व्यक्त करतो तसे प्राणी करत नाहीत. हे वास्तव समोर दिसताना मात्र, एक अवलिया चक्क हत्तीशी बोलून त्यांच्या मनातील ठाव शोधतो. वाचून थोडे नवल वाटले ना! परंतु ठाण्यात राहणारे आनंद शिंदे यांनी हत्तीच्या सहवासात राहून त्यांच्याशी संवाद साधण्याची अनोखी कला अवगत केली आहे. त्यांनी फोटो जर्नालिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली खरी! परंतु हत्तीचे फोटो काढताना त्यांच्यातले बारकावे शोधून हत्ती आपलाही मित्र बनू शकतो हे त्यांनी पटवून दिले आहे. त्यांची ही कहाणी, त्यांच्याच शब्दात…
—-
भविष्यात मला प्रसिद्ध छायाचित्रकार व्हायचेय, हे महाविद्यालयीन जीवनात मनाशी ठाम केल्यानंतर फोटो जर्नालिस्ट म्हणून वृत्तपत्रात काम करण्यास मी सुरुवात केली. पुढे एका नामवंत इंग्रजी दैनिकात काम करत असताना, २०१२ मध्ये मला केरळमध्ये नोकरी करण्यासाठी जावे लागले. त्या ठिकाणी मुंबईच्या तुलनेत फारसे काम नव्हते. इकडे ज्या पद्धतीने फोटो काढण्यासाठी धावपळ करावी लागते तशी तिकडे नव्हती. त्यामुळे काहीसा आरामच होता. दरम्यानच्या काळात ‘इंडिया टुडे’ ग्रुपचे फोटो एडिटर बंदीप सिंग यांनी सांगितलं की, तू जर केरळमध्ये असशील तर मला हत्ती दाखव. तेव्हा केरळमध्ये त्रिचूर फेस्टिवल सुरू होतं. यावेळी हत्तीदेखील मोठ्या संख्येने बघायला मिळतात. हत्तीचे फोटो पूर्वी काढले होते. पण जवळून फोटो काढण्याची तशी पहिलीच वेळ होती.
कॅमेर्यामधून फोटोचे क्लिक सतत सुरूच होते. हत्तीच्या प्रत्येक हालचाली, सगळे बारकावे कॅमेर्यात टिपले जात होते. अशातच हत्तीच्या डोळ्यात खोलवर बघण्याची संधी मिळाली आणि माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. फोटोग्राफर फोटो जर्नालिस्ट म्हणून मी नावलौकिक मिळवला होता. पण असा त्या क्षेत्रापासून दूर होण्यास सुरुवात झाली. हत्तीचं स्वतःचं वेगळं विश्व असतं हे त्यावेळी मला समजलं. हत्ती किती चांगल्या प्रकारे जगतो, हत्तीच्या डोळ्यात जे दिसतं तेच त्याच्या मनात असतं आणि तेच कृतीत असतं. या माझ्या बदललेल्या प्रवासाला कारण ठरलेला हा डोळ्याचा फोटो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
हत्तीलाही भावना आहे. तो रडताना अनेकांनी बघितलं असेल परंतु हत्ती खोड्याही करतो. याचा अनुभव कोडणाडा जंगलात गंगा या हत्तीच्या पिल्लाने दाखवला. त्याचं असं झालं मी आणि गंगा खेळत होतो. आणि काही कारणाने ती जोरात ओरडली आणि मी तिला तिच्या भाषेत सांगितलं, एवढं ओरडायची गरज नाही. त्यावेळी तिला प्रचंड राग आला. मात्र याचा गंगाला राग आला आणि तिने मला ढकलून दिलं. तीनशे किलो वजनाच्या पिल्लाचा धक्का, म्हणजे मी किती लांब पडलो असेन याची कल्पना करा. आणि हे सर्व करून ती धावत धावत आपल्या राजू माहुताकडे गेली. आणि तिथून चकचक करत हसत होती. एकूणच काय हत्ती जवळच्या माणसाशी खेळतो, थट्टा-मस्करी करतो. विशेष म्हणजे हे पिल्लू असल्याने खोड्या करताना त्याला किती मजा येत असेल!
हत्तीला माणसाचा लळा किती लागावा याचा अनुभव ताडोबा अभयारण्यात आला. आमचा १० दिवसाचा मुक्काम होता. येथील गजराज नावाच्या हत्तीने नोव्हेंबर २०१९मध्ये रागाच्या भरात एका माहुताला ठार मारले होते. त्यामुळे या हत्तीला काबूत कसे आणायचे हा प्रश्न वन विभागाला पडला होता. माहुताला मारल्यामुळे इतर माहूतदेखील गजराजला हँडल करण्यासाठी घाबरत होते. यावेळी वन विभागाने माझ्याशी संपर्क करून गजराजला काबूत आणण्यास सांगितले होते. एवढे वर्ष हत्तीच्या सानिध्यात घालविल्यामुळे ़गाठीशी जमा झालेला अनुभव कामी येणार होता. त्यामुळे कसलाच विचार न करता ताडोबा गाठले. गजराजला बघताच त्याच्यामधील अनेक बारकावे ओळखले. त्याच्या गरजा काय, हवे-नको याची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्याच्या भाषेत बोलून संवाद साधला. गजराजनेदेखील सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. हातात कोणतीही काठी नाही किंवा इतर वस्तू नव्हत्या. त्याच्या जवळ जाऊन प्रेमाने बोलू लागलो. तब्बल १० दिवस गजराज आणि मी सोबत होतो. चिडलेला हत्ती नॉर्मल वागू लागला. पुढचे पाच दिवस जंगलात गजराजला घेऊन फेरफटका मारत होतो. एक वेगळी ओढ गजराजला वाटत होती. हत्तीला सोडून जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा मी त्याच्या काही दिवस आधी भेटणं कमी करतो. ताडोबातून निघण्यापूर्वी गजराजला सांगितलं की आता मस्ती करायची नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. हे सांगून गाडीत बसलो. त्यावेळी गजराज झाडांच्या मागे दोन पाय वर करून मला बघत होता. अशा वागण्याचा अर्थ स्पष्ट होता की तुम्ही इथून जाऊ नका. म्हणजे हत्तीला लळा लागल्यावर तो स्वत:पेक्षाही माणसावर प्रेम करतो.
माणूस आजारी पडल्यावर घरातील कोणीतरी पटकन दवाखान्यात घेऊन जातं. परंतु हत्तीदेखील आपल्या सहकार्यांची काळजी घेतात. कोडणाडा येथे कृष्णा हत्तीच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो एका कुशीवर झोपून रहायचा. खरंतर एका बाजूला कमाल चार तासापेक्षा अधिक वेळ हत्ती झोपून राहिला तर कदाचित एखाद्या अवयवाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे एका कुशीवर झोपू नये म्हणून गंगा ही हत्तीण कृष्णाला तीन ते चार तासांनी उठवण्याचा प्रयत्न करते आहे. कृष्णाला त्रास होऊ नये म्हणून गंगाला काही लांब अंतरावर ठेवलं होतं. तरीदेखील सोंड त्याच्या गालावर हळुवारपणे नेत होती. कृष्णा उठवत नसेल तर त्याच्या सोंडेत सोंड घालून खेळण्याचा प्रयत्न करत होती. फार भावुक करणारं दृष्य होतं ते.
हत्तीला पाणी गवत आणि चिखल हे खूप महत्वाचे ठरतात. त्याच्या प्रवासात कुठे तळ, नदी दिसली की हमखास दोन ते तीन तास पाण्यात राहून मजा घेतो. हत्तीचा पूर्ण कळप शाही थाटात पाण्यात वावरतो. पण्यात अथवा चिखलात हत्ती का रहातो याच शास्त्रीय कारणदेखील आहे. हत्तीची त्वचा ही एक इंच जाड असून त्याला घाम नाही येत. मग अशावेळी शरीराचं तापमान संतुलित ठेवणं महत्वाचं असत. त्यामुळे दिवसभरातले दोन ते तीन तास चिखलात अथवा पाण्यात पोहताना दिसतो. या कमलापूर येथे काढलेल्या फोटोतदेखील हत्ती मस्त खेळत आहेत.
कमलापूर येथे काढलेल्या फोटोत मंगला हत्ती माझ्यावर माया करते आहे. खरं तर मंगला खूप दुःखी होती. काही दिवसांपूर्वीच तिचं पिल्लू दगावलं होतं. त्यामुळे तिचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झालं होतं. तिची केविलवाणी स्थिती वनविभागाला बघवत नव्हती. त्यामुळे मंगला हिला चांगलं करण्यासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुनील लिमये यांनी मला बोलावले. मंगला पूर्वीपासून ओळखायची. जेव्हा तिथे गेलो त्यावेळी मला बघून मंगला पाण्यातून पटकन बाहेर आली. त्यावेळी कृतीतून तिने सांगितलं की माझं पिल्लू मेलं आहे. मात्र तिची कृती आमच्यासाठी हृदयद्रावक होती. मी पटकन जवळ गेलो आणि मायेने हाथ फिरवला आणि बाजूला पडलेलं गवत खाऊ घातलं. थोड्या वेळाने पुन्हा ती पाण्यात गेली. तिथे देखील गवत खाऊ घातलं. माझ्यासाठी कोणीतरी आलं आहे. हे तिला जाणवलं होतं. दिवसभर आम्ही तिच्यासोबत काढला. हत्तींना आपलेपणा समजतो. त्यामुळे मंगलादेखील येण्याने खुश झाली होती. जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा तिच्या भाषेत समजावलं की खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस.
हत्ती जिथे रहातो तो परिसर आवडीचा असतो आणि हा परिसर सोडून दुसरीकडे स्थलांतर करण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे मोहर्ली सेंटरमधून बोटेजरी गावात नवीन वसवलेल्या सेंटरमाधव हत्तीचा कळप घेऊन जायचा, हे मोठं आव्हान होतं. कळपात पिल्लू असेल तर शक्यतो हत्ती कळपात इतरांना शिरकाव करून देत नाही आणि दुसरीकडे जायची ही दूरची गोष्ट राहिली. परंतु या कळपातील गजराज आणि लक्ष्मी हत्ती दोघेही मला ओळखत होते. हत्तीशी संवाद साधताना त्यांना कन्विंस करून सांगितलं की नवीन जागा खूप छान आहे. तिथे तुम्हाला खूप आनंद मिळेल. हे सांगितल्यानंतर वन विभागाचे अधिकारी हत्तीचा मागे आणि आम्ही चारजण पुढे चालत हत्तींना मार्ग दाखवत होतो. हत्तींचं असं स्थलांतर करण्याची ही पहिलीच वेळ असावी.
आपल्याकडे जसं मोठ्यांचं ऐकलं जातं, असंच काहीसं हत्तींच्या कुटुंबात आहे. हत्तीमध्ये मोठ्यांचा मान राखला जातो. यांच्यात मातृसत्ताक कुटुंबपद्धती असते. या फोटोत कोट्टूर एलिफंटा सेंटरमधील मीना हत्तीण असून ती इतरांना दिशा देण्याचे काम करते. जी सर्वात वयस्कर हत्तीण असते ती कुटुंबप्रमुख म्हणून वावरते. किती चालायचं कुठे थांबायचं कधी आराम करायचा, या सर्व बाबी तीच ठरवत असते. कारण तिच्या अगोदरच्या मादीकडून अनेक गोष्टी शिकलेल्या असतात. त्यामुळे सर्वच निर्णय कळपाला मान्यच असतात.
हत्तीच्या जीवनात माणसाचं वेगळंच महत्व आहे. एवढा विशालकाय देह पाच साडे पाच फुटाच्या माणसाचे ऐकतो. माणूस जसं सांगेल तसं तो वागतो. ज्या पद्धतीने हत्ती प्रेम करतो तसंच माणसाने देखील तसंच प्रेम करावं अशी अपेक्षा हत्तीची असते. पाळलेले हत्ती माहुतामध्ये सर्वच नाती बघतात अशाच पद्धतीने माहुताने त्याचे वडील, आई, भाऊ-बहीण असं नातं जोडून प्रेम करावे. गुरुवायूर एलिफंट सेंटरमधील फोटो असून हत्तीला अंघोळ करण्यासाठी जागा नसल्यामुळे हत्तीला पाण्याने स्वतः अंघोळ घालून माहूत सेवा करतो आहे.
पाण्याचा दुष्काळ पडला की हत्तींना पाण्यासाठी खूप वणवण करावी लागते. कोट्टूर एलिफंट सेंटर परिसरात पाऊस कमी बरसल्यामुळे पाण्याचा ठणठणाट झाला होता. यामुळे हत्तीना जंगलातील पाणवठ्यावर घेऊन जावं लागतं होतं. हत्तींना कोट्टूरजवळील जंगलात नेताना आम्हाला निसर्गाची नजाकत बघायला मिळत होती. पाण्यात डुबकी मारून उभा राहणारा हत्ती बघून एक वेगळाच आनंद मिळत होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक छटा या निमित्ताने जवळून बघायला मिळाल्या.
कोडणाडा जंगलातील कृष्णा हत्तीचा हा फोटो आहे. या हत्तीमुळेच ‘र्हमलिंग’ भेटला आणि हत्तीशी संवाद कसा साधायचा हे शिकलो. कृष्णा हत्ती तसा लहानच होता पायाला दुखापत झाली, परंतु माहूत आपली काळजी घेतो आहे. हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. त्यातच फोटो काढताना मी काय करतो आहे, हे जरी कळत नसलं तरी त्याचा अल्लड आणि खेळकर स्वभावात दाखवून तो सकारात्मक प्रतिसाद देत होता. दुर्दैवाने आज कृष्णा आपल्यात नाही. परंतु हत्तीच्या विश्वातील तो माझा गुरू आहे.
१५ दिवसाचा किंग हत्ती
२०१५मध्ये केरळमधील मुतंगा जंगलात एक १५ दिवसांच्या किंग हत्तीच्या पिलांची आपल्या आईशी ताटातूट झाली होती. लहान बाळासारखेच होते ते पिल्लू. त्यामुळे त्याचे करायचे काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मोठ्या हत्तीला हँडल करण्याची खुबी समजली होती. परंतु या पिल्लाला कसे जगवायचे हेच मोठे आव्हान होते. यामध्ये पिल्लाला स्किन इन्फेक्शन झाले होते. सर्वच अवघड गोष्ट होती. हत्तीचा अभ्यास करताना हत्तीण पिल्लांना दूध कशी पाजते हे माहीत होते. त्यामुळे प्रथम पिल्लाला दूध पिताना आईची उणीव भासणार नाही, अशा दृष्टीने दूध पाजण्याची सोय केली. साधारण दर ४५ मिनिटांनी त्याला दुधाची तलफ आली की त्या अंधार्या जागेत दूध पाजत होतो. स्किन इन्फेक्शन काढण्यासाठी औषध लावले जात होते. परंतु फारसा परिणाम दिसला नाही. म्हणून हत्ती सतत चिखलात लोळतो त्यामुळे स्किन डिसीज होत नाही हे वाचनात आले होते, त्यानुसार काही दिवस पिल्लाला चिखल फासून ठेवत होतो. पुढच्या काही दिवसात पिल्लू ठणठणीत दिसू लागले. आता हा हत्ती मोठा झाला आहे.
२०१२ मध्ये काही कारणांनी अनेक हत्ती मृत्युमुखी पडले होते. मन सुन्न करणारे फोटो बघून, हत्तीचे संवर्धन करणे किती महत्वाचे आहे. तसेच यात आपला खारीचा वाटा असावा, हा माझा प्रयत्न होताच; त्यामुळे हत्ती अभ्यासकांचे काही रिसर्च पेपर चाळले. मी काढलेल्या फोटोंमधून मला हत्तीच्या स्वभावाचे कंगोरे समजले होते, पण इथून तिथून माहिती मिळवत गेलो. काठीविना हत्तीला काबूत कसे करता येईल याचा पूर्ण अभ्यास केला. फोटो शूटच्या माध्यमातून हत्तीसमोर जाण्याचा प्रसंग अनेकदा आला होता. तो कोणत्या मूडमध्ये आहे हेदेखील पटकन समजत होते. सततच्या सान्निध्यामुळे हत्तीशी बोलण्याची कला अवगत झाली होती. त्यामुळे हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीला प्रेमाने जवळ करता येते यातील गमक समजले होते.
२०१४मध्ये ‘ट्रंक कॉल : दि वाइल्ड लाईफ फाउंडेशन’ची स्थापना करून मग पूर्णवेळ हत्तीवर संशोधन आणि हत्तीचे संवर्धन करण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन-चार वर्षात हत्तीच्या जवळ राहिल्यामुळे त्याच्या आवडीनिवडी, स्वभाव यांचा चांगलाच अभ्यास झाला होता. परंतु काठीविना हत्तीला हँडल करण्याचा धाडसी निर्णय तेव्हा घेतला. एलिफंट सेंटरमधील हत्तींना हँडल करतेवेळी काठी किंवा तत्सम प्रकारची वस्तू हातात घेऊन मगच त्याच्यासमोर जाण्याचे माहूत धाडस करतात. मात्र काठीविना हत्तींना हँडल करण्याची कल्पना मूर्खपणाची ठरू शकते, असे तिथल्या माहुतांना वाटले. केरळ वन विभागाकडे एक प्रस्ताव दिला. हत्तीशी संवाद साधून त्यांना प्रेमाने हाताळले तर कठीची आवश्यकता भासत नाही. हे माझे स्वतःचे संशोधन असल्याचे सांगितले. वनविभागालाही आश्चर्य वाटले. परंतु माझा अनुभव आणि हत्तीबद्दल असलेली तळमळ बघून त्यांनी परवानगी दिली. सुरुवातीचे काही दिवस अवघड जात होते. सेंटरमधील इतर माहूतदेखील माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहत होते. नवखा पोरगा आम्हाला काय शिकवणार, असे त्यांना वाटत असावे कदाचित. पुढच्या काही दिवसात हत्तींशी माझी गट्टी जमली. त्यांच्या चेहर्यावरील प्रत्येक भाव समजत होता. त्यामुळे हत्तीच्या कलानुसार वागून त्याच्याशी अधिक जवळीक होत गेली. त्यावेळी सेंटरमधील साधारण ५० माहुतांपैकी ४३ माहुतांना माझी शिकवण्याची पद्धत खूप आवडली होती.
थोडे हत्तीविषयी!
दक्षिण आशिया आणि आप्रिâका खंडात हत्तीचे सर्वाधिक वास्तव्य आहे. भारतात आढळणार्या हत्तीच्या तुलनेत आप्रिâकन हत्ती थोडे उंच आणि रुबाबदार दिसतात. मुळात हत्ती शांत स्वभावाचे असून त्यांना कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तरच ते आक्रमक होतात. भारतात २०१७मध्ये हत्तीगणना झाली तेव्हा सुमारे २७ हजार ३१२ हत्तींची संख्या होती. परंतु आता ही संख्या वाढू किंवा कमी होऊ शकते. सर्वसाधारणपणे हत्ती हा ५० ते ७० वर्ष जगतो. दिवसभरात १५० किलो अन्न खातो. त्यामध्ये गवत, बांबू, फणस आदींचा समावेश असतो. दिवसभरात १५ ते २० किमी प्रवास करताना दोन ते तीन तास पाण्यात डुंबायचे, चिखलात लोळायचे आणि केवळ चार ते पाच-तास विश्रांती घ्यायची. वाघ, सिंह यासारखी श्वापदे हत्तीच्या जवळपास फिरकत नाहीत. चुकून कधी पिल्लावर हल्ला करण्यासाठी श्वापदे येतात. परंतु त्यांना तो परतवून लावतो. जंगलात सात किमी परिसरात हत्ती एकमेकाशी संवाद साधतात.
र्हमलिंग पॅटर्न!
हत्तीच्या चित्कारण्याचा आवाज अनेकांनी ऐकला असेल. एखादी अप्रिय घटना किंवा कोणी चाल करून येत असेल तर हत्ती सोंड वर करून आवाज काढतो. मात्र यावेळी हत्ती दुसर्या हत्तीशी संवाद साधतो. आणि स्वतःला काय हवे- नको तेही या संवादात सांगत असतो. पण सर्वसामान्यांच्या ही गोष्ट लक्षात येऊ शकत नाही. कारण पोटातून ‘घुमारा’युक्त (र्हमलिंग) आवाज काढतो आणि आवाजाची स्पंदन दुसर्या हत्तीला समजतात. ही गोष्ट मला समजली, त्यावेळी त्याच्या प्रत्येक लकबी मी हेरून आत्मसात केल्या आणि पुढे त्याच्याशी संवाद साधायचा झाला की मीदेखील त्यांच्यासारखे बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे हत्तींना माझी भाषा समजू लागली. त्यांना काय हवे आहे, काय नको आहे या सर्व बाबींचे आकलन होत गेले आणि यातून हत्ती माझे ऐकू लागले होते.