कोरोना लसीचे उत्पादन करणाऱया दोन कंपन्यांच्या क्लिनिकल ट्रायल संपल्या आहेत. या कंपन्यांनी केंद्र सरकारकडे लसीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. राज्य सरकारने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत दिली.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, लसीच्या वापराला केंद्र सरकारने परवानगी दिल्यावर लसीकरणाला सुरुवात होईल. लसीकरणासाठी तयारी सुरू आहे. मतदानासाठी ज्या प्रकारे बूथ बांधण्यात येतात त्याच धर्तीवर बूथ उभारून लस दिली जाईल.
राज्यात कोरोना नियंत्रणात आल्याची माहिती देताना ते पुढे म्हणाले की, कोरोना चाचण्यांचे दरही कमी केले आहेत. मास्कच्या किंमतीही कमी केल्या आहेत. आता एन-95 मास्कची किंमत 19 रुपये तर थ्री प्लाय मास्क 3 ते 4 रुपयांपर्यंत मिळायला लागला आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांना रक्तही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात 82 टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांच्या बिलांवरही नियंत्रण ठेवले आहे. राज्यात डेथ ऑडिट कमिटी असून कोरोनाने होणाऱया प्रत्येक मृत्यूचे ऑडिट करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. आरोग्य विभागातील रिक्त 50 टक्के पदे पुढच्या एक महिन्याच्या आत परीक्षा घेऊन भरण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
सौजन्य- सामना