काँग्रेसचे दिवगंत नेते अहमद पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसचा चाणक्य गेला. अहमद पटेल यांनी काँग्रेसकडे पदाची अपेक्षा न करता वाहून घेतले होते. पटेलांसारख्या दिग्गज नेत्याच्या जाण्यामुळं काँग्रेसचं मोठ नुकसान झालं आहे. महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये अहमद पटेल यांचे योगदान होते. त्यांच्या जाण्यानं महाविकासआघाडीचेही नुकसान झालंय, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अहमद पटेल यांच्या शोकसभेवेळी व्यक्त केल्या.
काँग्रेस आणि सेना एकत्र येते, राजकीय नाते पुढे जाते आणि अचानक राजकीय आघात होतो, हे दुŠखदायक आहे. बऱयाच वेळा काँग्रेस डावपेच करायचे आणि आम्ही शोध लावायचो त्यावेळी कळायचे की यामागे अहमदभाई आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. घडय़ाळ न बघता काम करणारे असे ते नेते होते. अहमद पटेल यांच्या सारखी काम करणारी माणसं शोधून सापडणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीनं करण्यात आलं होते.
1984 साली राजीव गांधी यांच्याबरोबर काही तरुण चेहरे दिसत होते त्यात अहमद पटेल हे दिसत. उभं आयुष्य त्यांनी संघटनेसाठी काम केले. सतत संघटनेचाच विचार त्यांच्या मनात असायचा. यूपीएचे सरकार केंद्रात असताना दहा वर्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. यूपीए सरकारच्यावेळी काही समस्या निर्माण झाली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी यांच्यावतीने मनमोहनसिंग यांच्यावतीने ते जबादारी पार पाडत असत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत. दहा वर्ष मनमोहन सिंग यांचे सरकार हे सरकार कसे टिकेल, सर्व पक्षात सामंजस्य कसे टिकेल, मार्ग कसा काढता येईल याची जबाबदारी अहमदभाईंवर असायची. सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही. त्यांचा स्वभाव, कल हा संघटनेसाठी काम करण्याकडे होता, अशा शब्दांत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पटेल यांच्या आठवणीनं उजाळा दिला.
सौजन्य- सामना