भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोना विल्सन यांच्या लॅपटॉपशी हॅकर्सनी छेडछाड केली असून त्यात कथित दहा पत्रे प्लांट केली होती असा खुलासा अमेरिकेतील एका डिजिटल कंपनीने केला आहे. या प्रकरणी रोना विल्सन यांनी आपल्या विरोधातील खटला रद्द करावा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी रोना विल्सन, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्या सह इतर काही जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने खुलासा केला असून अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना जाणूनबुजून गुंतवण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यापैकी रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमधून 10 आक्षेपार्ह पत्रे पोलिसांना सापडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा तसेच नक्षलवादी संघटनेकडे बंदुका आणि काडतुसे यांची मागणी केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. परंतु अमेरिकेतील मॅसेचूसेटमधील आर्सेनल डिजिटल या कन्सल्टन्सी फर्मने विल्सन यांचा लॅपटॉप त्यांना अटक होण्यापूर्वी हॅक केला होता व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यात ही पत्रे प्लांट केली होती असा दावा केला आहे. या माहितीच्या आधारे रोना विल्सन यांनी खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.