वर्सोव्यात आज सकाळी गॅस सिलिंडर गोदामात सिलिंडरचा स्पह्ट होऊन भीषण आग लागली. या आगीत गोदामात काम करणारे राकेश कडू (30), लक्ष्मण पुमावत (24) हे 40 टक्के तर मनजित खान (20) आणि मुकेश पुमावत (30) हे चार कर्मचारी होरपळले असून त्यांना उपचारासाठी पुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने कार्यवाही करत तब्बल साडेतीन तासांनी आग आटोक्यात आणली. हे गोदाम निवासी परिसरात असल्यामुळे आगीची झळ आजूबाजूच्या घरांनाही बसली. घरांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. गोदामापासून जवळच अंजुमन शाळा असून सुदैवाने ही शाळा बंद असल्याने अनर्थ टळला तसेच बाजूच्या काळसेकर रुग्णालयाचीही हानी झाली नाही.
तक्रार करा! – महापौर
महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. महापौर म्हणाल्या, निवासी भागात सिलिंडरचा साठा करणे हे चुकीचे असून एका व्यक्तीच्या फायद्यांसाठी अनेकांचा जीव धोक्यात घालणे ही गंभीर बाब आहे. मुंबईत अशा प्रकारचा बेकायदा सिलिंडरचा साठा तसेच ज्वलनशील पदार्थांचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणांबाबत रहिवाशांनी पुढे येऊन महापौर कार्यालयामध्ये तक्रारी द्याव्यात.