लॉकडाऊननंतर सरकारने आता हळूहळू अनलॉकला सुरुवात केली आणि मनोरंजन विश्वात एक नवा हुरूप आला. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी थांबले होते. पण आता अनलॉकमुळे सर्व नवीन चित्रपटांच्या घोषणा आणि अडकून पडलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन हळूहळू सुरु होत आहे. त्यातलाच एका मराठी सिनेमा म्हणजे ‘बॅक टू स्कूल’. आता हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून त्याचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाबद्दल आणि त्यात कोण कोण अभिनेते आहेत हे मात्र अजून समोर आलेले नाही. तरीही नावावरून तरी हा सिनेमा प्रेक्षकांना त्यांच्या शालेय दिवसांची आठवण करून देईल हे नक्की.
प्रत्येकजण आपापल्या शालेय जीवनात अनेक अविस्मरणीय गोष्टी करत असतो. त्याच आठवणींना हा सिनेमा ताजे करेल असे वाटू शकते. रंगसंस्कार प्रॉडक्शनच्या या सिनेमाचे दिग्दर्शन सतिश फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित बेंद्रे आणि सतीश फुगे यांचे आहे. शुभांगी सतीश फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रंगसंस्कार प्रॉडक्शन हाऊसने यापूर्वी ‘रामप्रहर’ नावाचा सिनेमा बनवला होता. तो पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.