‘आम्ही नाट्य परिषद सोडून पळून जाऊ’ असा जाहीर दावा अनेकांनी केला होता. पण आम्ही कुठेही गेलो नाही किंवा पदावरून मागे झालो नाही. कारण केलेल्या सर्व कामांची आम्ही जबाबदारी घेतली आणि सामोरेही गेलो. कारण, ‘कर नाही त्याला डर कशाला’. आम्ही तुमचे आपले आहोत.. तुम्ही आम्हाला आपलं मानलं म्हणून हे करणं शक्य झालं, असे सांगत ‘आपलं पॅनल’ रंगभूमीचा सर्वांगिक विकास करण्यासाठी, कलाकार, रंगमंच कामगार, निर्माते, लेखक, दिग्दर्शक, हौशी, प्रायोगिक आणि रसिकांमधला दुवा होण्यासाठी पुन्हा एकदा नाट्य परिषदेच्या निवडणुकीत उभे ठाकले आहे.
गेली पाच वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही नाट्य विषयक हालचालींपेक्षा वादामुळेच अधिक चर्चेत राहिली. म्हणजे नाट्य विषयक घडामोडी झाल्या नाहीत असे आहे का? तर तसे नाही. रंगभूमीच्या विकासासाठी अनेक कामं या पाच वर्षात झाली. पण इतका स्वच्छ आणि निर्भेळ कारभार काहींना सहन न झाल्याने वैयक्तिक आकासापोटी जाणीवपूर्वक काहींना हाताशी धरून दिशाभूल करण्यात आली, असेही पॅनलकडृून सांगण्यात आले.
या निवडणुकीत प्रसाद कांबळी, सुकन्या कुलकर्णी-मोने, मंगेश कदम, राजन भिसे, प्रमोद पवार, संतोष काणेकर, रत्नकांत जगताप, सुनील देवळेकर, अनिल कदम आणि प्रभाकर वारसे हे मुंबई (मध्यवर्ती) उमेदवार म्हणून उभे असून दिगंबर प्रभू, अविनाश नारकर, अशोक नारकर, ऐश्वर्या नारकर हे मुंबई (उपनगर) उमेदवार आहेत. नाट्य परिषदेची ही निवडणूक येत्या १६ एप्रिलला होणार असून आपल्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहनही यावेळी पॅनलकडून करण्यात आले.