क्रिकेट आणि राजकारण ही सर्वसामान्य मराठी माणसाची हक्काची खेळपट्टी. गावसकर-सचिनने कसा फटका मारायला हवा होता, इथपासून ते एखाद्या नेत्याचा तो निर्णय चुकलाच, इथपर्यंतच्या सर्व ‘पिंका’ या नाके-कट्ट्यांवर टाकल्या जातात. नव्हे, तो तर आपला जन्मसिद्ध हक्कच ठरतो!
परवा, भल्या पहाटे उठून टीव्हीसमोर बसलो होतो. करणार तरी काय, टीम इंडियाचा विजय दृष्टिपथात होता आणि अजिंक्य रहाणेच्या संघाला अजिंक्य राहण्यासाठी नैतिक बळ देणे हे माझे राष्ट्रीय कर्तव्यच नव्हते का?
असो. तर अजिंक्यने विजय साकारला. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यामध्ये कांगारूंना जबरदस्त पंच मारला. ऑलआऊट ३६ च्या नामुष्कीदायक पराभवानंतर संपूर्ण देशाला टीम इंडियाने आगाऊ नववर्ष भेटच दिली. मेलबर्नमधील भारतीयांबरोबरच जगभरातील भारतीयांनी पुन्हा टीम इंडियाचा जयजयकार सुरू केला.
माझ्या मनात मात्र काहीसा वेगळाच विचार घोळू लागला. विक्रमवीर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचे आता काय होणार? ऑलआऊट ३६ नंतर भारतीय संघ मालिकेत आपले आव्हान कसे टिकवून ठेवणार? अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व दिले असले, तरी त्याला विराटची सर नाही. विराट किती आक्रमक आणि अजिंक्य किती लेचापेचा! सद्यःस्थितीत भारतीय संघाला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. रहाणेच्या या दुबळ्या नेतृत्वाखाली भारतीय संघ लढत तरी कशी उभी करणार? आता तर कांगारूंचा संघ भारताचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही. वगैरे वगैरे…
टीव्हीवर अशा प्रकारच्या ब्रेकिंग न्यूजदेखील झळकत होत्या. त्यामुळे मन खूप खिन्न होत गेले होते. पण, मनाच्या कोपर्यात कुठे तरी आशेचा किरण दिसत होता. अजिंक्यच्या व्यक्तिमत्त्वामधील साधेपणा, त्याचा अव्यक्त निर्धार, सर्वस्व पणाला लावून लढण्याची तयारी, कोणताही गाजावाजा न करता आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करण्याबाबत असलेली तन्मयता, त्यासाठी आवश्यक असणारे भान आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला देश-संघाप्रती असलेली कमालीची निष्ठा!
नाही. जे दिसते त्यावर किमान आपण तरी भुलून जाऊया नको, असे स्वतःच्या मनाला मी पटवीत राहिलो.
आणि अखेर तो दिवस उजाडला. यापूर्वीच्या मालिकेत अजिंक्यप्रमाणेच सौम्य स्वरूपाच्या, पण कमालीचा निग्रही, दी वॉल राहुल द्रविडने सिडनीच्या मैदानावर मारलेला तो विजयी स्क्वेअर ड्राइव्ह आठवला. रथी-महारथींवर द्रविड भारी पडला होता आणि तशाच पद्धतीने अजिंक्यने अलौकिक विजय साकारला!
आणि मग एक गोष्ट मेलबर्नमधील सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ झाली. विद्या विनयेन शोभते, हे द्रविडच्या बाबतीत सिद्ध झाले होते. अजिंक्यच्या बाबतीमध्ये – आक्रमकता संयमेन शोभते हे सिद्ध झाले!
आता तुम्ही विचाराल की, दुबळ्या म्हणून हिणविण्यात आलेल्या अजिंक्य सेनेने ही करामत कशी करून दाखवली मग?
त्याचं असंय ज्ञानदा… (एबीपी फेम खांडेकरांची माफी मागून, त्यांच्याच श्टाईलमध्ये!) म्हंजे बघा, तुम्ही कायमच आक्रमक असला, दात-ओठ खाऊन आक्रस्ताळेपणा करणारे असला किंवा कायमच काळी सातचा स्वर लावून दटावणीच्या स्वरात बोलणारे असला, तरच तुम्ही आक्रमक असता का? आक्रमक-विजिगिषु असणे आणि आक्रमक भासणे यामध्ये नक्कीच फरक आहे, होय की नाही?
असंय… की आक्रमकता, विजिगिषुपणा हा केवळ दिखावा नाही. तर, ती एक वृत्ती आहे. तुमच्या बाह्य वर्तनामधून ती प्रत्येक वेळेस दिसलीच पाहिजे असा अट्टहास योग्य नाही. किंबहुना, तो केल्यास देवाधिदेव देवेंद्राप्रमाणे गर्वाचे घर खाली कोसळल्याशिवाय राहात नाही. ससा-कासव शर्यतीची गोष्ट आपण ऐकलीच आहे. तसेच, शांत-संयमी आणि स्थिरचित्ताने आपल्या लक्ष्यावर नजर ठेवून त्या दिशेने आश्वासक वृत्तीने पावले टाकली, की लक्ष्यपूर्ती नक्कीच होते.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट असो, की आयुष्य. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, तोच खरा नेता असतो. सर्वकाही मलाच समजले आहे, मीच सर्वकाही करणार आहे, अशा आविर्भावात वावरत असलेल्या व्यक्तीला तात्पुरते यश मिळते किंवा त्याचे लोक ऐकतातही. पण त्यांना मनापासून साथ कोणीच देत नाही. तुम्हाला ‘लगान’मधील भुवन आठवत असेलच ना. तर त्या संघाप्रमाणेच आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या बलस्थानांचा योग्य पद्धतीने वापर करून विजयश्री खेचून आणणारा तोच खरा नेता ठरतो.
तुमच्याकडे अधिकार असले की लोकं तुमच्या हातामधील त्या छडीचे ऐकत असतात. तसेच, इतरांच्या विचारांना महत्त्व न दोता तुम्ही, हम करे सो कायदा अशी राजवट राबवत गेलात, तर कालांतराने आपलेच सहकारी आपल्याला सोडून जातात. विकासाकरिता सत्तेचे केंद्रीकरण आवश्यक ठरते. पण, जेव्हा त्या नेतृत्वाचे हुकूमशाही, हेकेखोरपणाकडे अधःपतन होऊ लागते, तेव्हा त्या आक्रमकतेचा उबग येतो. विकासामधील भंपकपणा प्रकर्षाने जाणवू लागतो.
त्याउलट शांत, संयमी, संघभावनेला महत्त्व देणारे नेतृत्व जनतेला भावते. त्यामध्ये प्रसंगी इव्हेंटबाजी नसेल, झगमगतेपणाही नसेल. पण, म्हणून त्या नेतृत्वाची गुणवत्ता कधीच दुय्यम ठरत नाही. दहावी-बारावी परीक्षेत बोर्डात येणारे विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल ठरणारे विद्यार्थी हे कधी आक्रमक किंवा आक्रस्ताळे पाहिले Dााहेत का हो? त्यांच्यामध्ये कायमच एक संयत भाव आणि स्वभावनिष्ठ विश्वास असतो.
मी आणि मीच मोठा होत जाण्याच्या नेतृत्वाच्या हव्यासापोटी एक दिवस ती बेडकी फुटून जाते. त्याऐवजी महेंद्रसिंह धोनीचे उदाहरण इथे प्रकर्षाने द्यावेसे वाटते. संघाला जिंकून दिल्यानंतर ट्रॉफी स्वीकारण्याच्या वेळेस तो संघातील इतर, विशेषतः नवोदित खेळाडूंना पुढे करून स्वतः पाठीमागे राहणेच पसंत करतो.
उगाच तलवारबाजी न करता शांत-संयत कारभार करणे, म्हणजे पळपुटेपणा नाही. जंगलाचा राजा वाघ हा काय कायम आपली वाघनखं दाखवीत हिंडतो का हो? ती पंजामागे दडविलेलीच असतात. आक्रमणाची वेळ आली, की मात्र वाघनखांनी शत्रूचा कोथळा बाहेर काढण्यास तो वेळ दवडत नाही!
… एव्हाना हर्षा भोगलेचा पोस्ट मॅच शो संपला होता. अर्थात, मला त्याचे भान कुठे होते. अजिंक्यच्या या विराट यशाचा रहस्यभेद करण्यात मी गुंतलो होतो ना!
आणि हो… विराट-अजिंक्यच्या या कथेमधील पात्रे तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे भासत असली, तर… तर… तर तो योगायोग नक्कीच नाही! तुम्ही बरोब्बर ताडले आहे!!
ऑस्ट्रेलियामध्ये अजिंक्य सेना विजय साकारणार म्हणजे काय, साकारणारच! तो साकारल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत!! आणि मग त्या विजयाचे विश्लेषण करण्यासाठी मी नक्कीच पुन्हा येईन!!!
– आशिष पेंडसे