काही वर्षांपूर्वी, म्हणजे नेमकं सांगायचं झालं तर कोरोना लॉकडाऊनमध्ये सरकारने दारूविक्रीला परवानगी दिली सुरू केली त्याच्या दुसर्याच दिवशी मित्राबरोबर फोनवर बोलत होतो. त्यामुळे अर्थातच दारुडे कसे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात, ते अर्थव्यवस्थेचा कणा असतात वगैरेचे व्हॉट्सअप फॉरवर्डेड जोक्स ऐन गप्पांत असताना मी त्याला विषय बदलण्यासाठी म्हटलं, मी आता १० किमी परिघात फिरण्यासाठी सायकल वापरणार आहे. तर त्याने घूमजाव करत माझी मिडलक्लास मेंटॅलिटी चव्हाट्यावर आणली. त्याच्या मते, सायकल वापरकर्ता हा देशाच्या अर्थव्यवस्थेला बाधक असतो. तो चारचाकी वाहन (कार) खरेदी करीत नाही. म्हणजेच, पर्यायाने कारसाठी कर्ज घेत नाही, कार विमा घेत नाही, इंधन खरेदी नाही, पार्किंगचा वापर नाही… शिवाय, कार वापरत नाही म्हटल्यानंतर लट्ठपणाही नाही.
अरे देवा, म्हणजे अर्थव्यवस्थेला निरोगी माणसे नकोच… कारण, त्यांना डॉक्टरकडे जावे लागत नाही, ते औषधे खरेदी करीत नाहीत, इस्पितळात दाखल होत नाहीत, पर्यायाने देशाच्या जीडीपीत त्यांच्याकडून काहीच भर नाही. ह्याउलट, प्रत्येक फास्ट फूड आउटलेटवर किमान १५-२० कर्मचारी (रोजगार), १० हृदयरोगतज्ज्ञ, १० दंतवैद्य, १० वजन कमी करणारे तज्ज्ञ, आणि ह्या आउटलेटशी संबंधित इतर अनेक सटरफटर काम करणारे लोक तयार होत असतात किंवा त्यावर अवलंबून असतात. त्यावर मी म्हटलं, मग पायी चालणारे तर त्याहून वाईट, ते तर एखादी सायकल देखील खरेदी करीत नाहीत. मला सध्या पायी चालायला त्रास होतो आणि पायी चालणार्यांइतकं वाईट असू, ‘दिसू’ नये म्हणून मग मीही एक सायकल खरेदी केलीय. (चला, माझी देशसेवा सायकलमार्गे.) आता तुम्हीच ठरवा अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी कोण? सायकलिस्ट, कार मालक/निर्माते की केएफसी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा/बर्गरकिंग…आणि जिथे अशा अर्थव्यवस्थेला प्राधान्य असेल तिथे पर्यावरण आपोआप मागच्या सीटवर (बाय द वे, बहुतांशी नवीन गिअर्ड सायकल्सना हल्ली तीही सोय नसतेच). मानवी इतिहासात चाकाच्या शोधानंतर जर कुठल्या क्रांतिकारी यंत्राची निर्मिती झाली असेल तर ती म्हणजे सायकल… आज स्वयंचलित दुचाकी, चारचाकी वाहनांचा बोलबाला असला तरी एकेकाळी सायकल ही सर्वसामान्यांच्या जगण्याचा आणि भावविश्वाचा अविभाज्य भाग होती. मला आठवतं, आमचे काही नातलग, स्नेही (नाना, अण्णा, अप्पा, तात्या मंडळी) अगदी त्यांच्या सत्तरीतही सायकलवर फिरत. जबरदस्त फिटनेस आणि कॉन्फिडन्स! (बादरायण संबंध नाही जोडायचा म्हटलं तरी गमतीचा भाग म्हणजे ह्या सगळ्यांना पाचहून अधिक अपत्ये)- वाह रे मेरी सायकल!!
अजून एक आठवण म्हणजे आमच्या बालपणी (सत्तरीच्या दशकात) गावी सायकली भाड्याने मिळायच्या. त्यातही दिवसाचा अन रात्रीचा वेगवेगळा दर (दिवसाचा एका तासाचा दर-मला वाटते जो आठ आणे असायचा- तोच दर संपूर्ण रात्रीसाठी) म्हणून आम्ही ५-६ भावंडांनी मिळून सायकल शिकण्यासाठी आणि त्यानंतरही सायकल चालवण्याचा निव्वळ आनंदासाठी तशी ती पौर्णिमेच्या रात्री भाड्याने घ्यायचो.
मला वाटतं…
– तुमची अशी ‘बकेट लिस्ट’ नसेल तर हरकत नाही पण प्रत्येकाची किमान काही मैल लांब अशी एकतरी ‘बाईक इट लिस्ट’ असावीच.
– व्यायामासाठी जिममध्ये किंवा पार्कमध्ये चालण्यासाठी कार घेऊन जाणे हा आजच्या विकसित (प्रामुख्याने शहरी) समाजातील मूलभूत बिघाड आहे.
– मुंबईसारख्या भरगच्च शहरात किंवा आसपास बकालपणे विकसित(?) होणार्या नवीन शहरांच्या नगरनियोजनकारांनी सायकलसारख्या स्वस्त, निरुपद्रवी (नॉन-पोल्युटिंग ह्याअर्थी), आरोग्यदायी वाहनाचा छोट्या अंतरासाठी वाहतुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून त्याच्या प्रोत्साहन-प्रचार आणि प्रसाराचा कधी विचारच केलेला दिसत नाही. अन् तेही जवळजवळ सगळीच शहरे, उपनगरे वाहन पार्किंग आणि ट्राफिक जॅम्सच्या समस्यांनी त्रस्त असताना.
– दी प्राईस ऑफ पॉवर इज एनस्लेव्हमेंट’
तसं पाहता, सायकल हे एकमेव असं वाहन आहे ज्याचा चालक हेच त्याचं इंजिन असतं आणि ह्यात उर्जेसाठी (पॉवर) ज्वलनशीलतेची गरज नसल्याने त्यासाठी कुठलेही बाह्यपदार्थ (इंधन) खरेदी करावे लागत नाही म्हणजेच हे वाहन तुम्हाला बर्याच गोष्टीपासून (चिंता)मुक्त करते.
– सायकलने वेळ आणि ऊर्जेची बचत करत, कमी जागेत जास्त वेगात येजा करता येते. शिवाय, एका कारच्या जागेत साधारणपणे १०-१२ सायकल्स उभ्या राहू शकतात. ह्याउलट, मोटोराईज्ड वेग/प्रगती वाढीबरोबर जागा आणि वेळेची मागणीही वाढत जाते. सायकल हे एक असं फक्कड साधन आहे जे आपली मेटाबॉलिक ऊर्जा गतीत रूपांतरित करतें. सायकलस्वाराचा वेग पायी चालणार्याच्या तीनपट असतो पण खर्ची पडणारी ऊर्जा मात्र पाचपट कमी असते. हे ह्या स्वयंचलित (इंजिनविरहित) वाहनाचे सहज फायदे तरीही ते दुर्लक्षित.
आपल्याकडे सायकलसाठी चांगले रस्ते, स्पेशल लेन्स, ट्रेल्स/सफारी असं काहीच नाही कारण ‘सायकलिंग’ ह्या गोष्टीचा आम्ही कधी विचारही केलेला नाही. आपलीही मानसिकता अशी की घराजवळच्या किंवा अवघ्या अर्ध्या किमी अंतरावरच्या नाक्यावरून काही आणायचं (१०-२० रुपयांची मिरची कोथिंबीर) असेल तरी आपण स्कुटर, मोटरसायकल, कार काढणार. पायी तर सोडाच पण सायकल असली तरी देखील नाही वापरणार. देखादेखी फॅड किंवा फॅशन म्हणून सायकलिंग आणि त्यासाठी नट्टापट्टा करणार्या (स्पोर्ट्स शूज, ग्लोव्हज, अँकल पॅड्स, हेल्मेट घालून शेल्फ्याकाढू) आरंभशूरांच्या सायकली मग महिन्या-सहा महिन्यांनी धूळ खात पडलेल्या बघायला मिळतात. ह्यापैकी एक चतुर्थांश ‘आरंभशूर’ जरी प्रत्यक्षात रोज सायकलवर दिसले तर शहर प्रशासनाला त्यांच्यासाठी ‘वाट’ करून ध्यावीच लागेल… किमान प्रत्येकाने जर ठरवले की ३-५ कि.मी. परिसरात कुठेही जायचे असेल तर सायकलचाच वापर करायचा तर हे सहज शक्य होईल.
…निज शैशवी जपावे म्हटलं तरी लहानपणी घेतलेल्या आनंदाच्या पुनरप्रत्ययासाठी मोठेपणी त्याच कृती करायला मन धजावत नसलं तरी सायकलिंग त्याला अपवाद ठरवायला हरकत नसावी. उठाओ सायकल, चलो चल पडो…