केकेच्या निधनाची बातमी ३१ मे २०२२ला रात्रीच कळाली आणि खूप वाईट वाटलं. त्याच्या आवाजात सच्चेपणा होता तसेच त्याचे व्यक्तिमत्व ऋजू, हळूवार; पाय जमिनीवर असलेला हा गायक. त्याला हिरोच्या रोमान्सचा आवाज म्हटलं गेलं आहे आणि हे विशेषण बहुधा शानने बहाल केलं आहे. केके म्हटल्यावर पहिलं गाणं आठवतं;
‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही,
मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया
तो लूट गये, हां लूट गये
तो लूट गये हम तेरी मोहब्बत में’
१९९९मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’चे हे गाणे.
‘हम दिल दे चुके सनम’ची गाणी मेहबूब लिहित होते. संगीतकार इस्माईल दरबार. संगीतकार रहमान आणि मेहबूब गीतकार अशी जोडी त्यावेळेस होती. केके रहमानकडे गात असल्याने त्यांची मेहबूबसोबत छान मैत्री जुळलेली होती. त्यातून केकेंना हे ‘तडप तडप के’ गाणे मिळाले. या गाण्याने केकेचे नाव झाले. कोण हा गायक म्हणून लोक विचारायला लागले. हे त्याच्या कारकिर्दीतील अगदी सुरुवातीचे गाणे. त्याची नंतर आलेली गाणीही सगळ्यांना आवडतात, चांगली आहेत, पण हे त्याचे गाणे हीच त्याची हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या रसिकांसाठी ओळख बनली.
त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला होता, तेव्हा केके त्याबद्दल म्हणाले होते की, ते नवीन होते, तेव्हा हे चांगले आणि भारी गाणे मिळाले, त्यामुळे ओळख मिळाली. हे एकदम वेगळे गाणे आहे. ते स्टेजवर हे गाणे गातात, तेव्हा खुद्द त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. अशा प्रकारची गाणी आता बनत नाहीत. हे गाणे दैवी गाणे आहे. वरच्याची कृपा आहे. हे गाण्यापूर्वी संगीतकार इस्माईल दरबार आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी केकेला सांगितलं, हे गाणं तुझ्या अंतरात्म्यात आहेच, बस महसूस करून गा. हे गाणे म्हणजे जखमी ह्रदयाचा टाहो आहे.
ए. आर. रहमानबरोबर तामीळ, तेलुगू चित्रपटासांठी केकेने गाणी गायली होती. ‘मिनसारा कनावू’ हा असा एक तामीळ चित्रपट, संगीत रहमानचे, यात केकेचे गाणे होते, हा चित्रपट नंतर हिंदीत ‘सपने’ म्हणून डब केला गेला, त्यातही ‘स्ट्रॉबेरी आँखे’ हे केकेचे गाणे आहे. केकेची ‘ओम शांती ओम’चे ‘आँखों में तेरी अजब अजब सी’ गाणं ऐका, काय छान रोमान्स आहे गाण्यात, हिरो दिल लगाके गा रहा है असं वाटतं. त्याची आणखी गाजलेली गाणी, ‘वो लम्हें’मधील ‘क्या मुझे प्यार है’, ‘बचना ए हसीनों’चे ‘खुदा जाने’, ‘जिस्म’मधील ‘आवारापन-बंजारापन’, ‘काईट’चे ‘दिल क्यूं ये मेरा’, ‘झंकार बीट्स’चे ‘तू आशिकी है’, ते थेट २०१३मध्ये आलेल्या ‘आशिकी-२’मधील ‘पिया आये ना’… अशी अनेक गाणी.
त्याचे हिंदीतले एकदम पहिले गाणे, ‘माचिस’मधील ‘छोड आये हम वो गलिया’. त्या गाण्यात सुरेश वाडकर आणि हरिहरनबरोबर त्यातील काही ओळी त्याने गायल्या होत्या. याचे संगीतकार विशाल भारद्वाज. केके आणि विशालने काही जिंगल्सबरोबर केल्या होत्या, दिल्लीपासून ओळख होती. १९९५मध्ये विशालना गुलझारच्या ‘माचिस’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचे काम मिळाले. विशालनी केकेंना विचारले, एका गाण्यात वरच्या सुरात काही ओळी आहेत, तू गाशील का आणि हे ‘माचिस’चे गाणे मिळाले. सुरेश वाडकर आणि हरिहरन यांच्याबरोबर प्रथमच गायला मिळाले आणि गुलझार यांची भेट होणे हा जणू काही टर्निंग पॉईंट होता. इतके ज्येष्ठ असूनही गुलझारनी केकेला फार प्रेमाने वागवले, प्रोत्साहन दिले.
१९९९मध्ये केकेला हे ‘तडप तडप के’ गाणे मिळाले आणि त्याच वेळी दुसरी एक गोष्ट घडली. ‘सोनी म्युझिक’ तेव्हा भारतात आले होते. त्यांना एक डेब्यू आर्टिस्ट हवा होता. त्यांनी केकेची निवड केली आणि ‘पल’ हा केकेंचा सोलो अल्बम लाँच केला. गीतकार मेहबूब आणि संगीतकार लेस्ली लुईस. यात आठ गाणी होती. ती प्रचंड लोकप्रिय झाली. कॉलेज फंक्शनमध्ये तर हमखास तरूणांकडून यातील गाणी गाण्याची फर्माईश होते. ‘पल… ये है प्यार के पल’ आणि ‘यारों दोस्ती बडी ही हसीन है’ ही त्यातील दोन गाणी विशेष चांगली आणि जास्त लोकप्रिय. ‘यारों’ गाणे नंतर ‘रॉकफोर्ड’ चित्रपटात घेण्यात आले होते.
केकेंना एम. एम. क्रिम, इलिया राजासह सर्वच संगीतकारांकडून भरपूर गाणी मिळाली. अनु मलिकबरोबर त्यांचे विशेष सूर जुळले, अनू मलिकनी जवळपास पंचवीस चित्रपटातील गाण्यात केकेचा आवाज वापरला. असेच सूर जुळले प्रीतमबरोबर. प्रीतम तर सातत्याने केकेला सर्व प्रकारची गाणी दिली. प्रीतम आणि केकेचे ‘सजदे किये है लाखों’ हे ‘खट्टामिठा’चे सुमधूर रोमँटिक गाणे हे त्याने सुनिधीसह गायले आहे, इरशाद कामिलचे बोलही फार छान आहेत. एकदा ऐकून समाधान होत नाही. दोघांच्या आवाजात कमालीचा गोडवा आहे. प्रीतम आणि केकेचे ‘रेस-२’चे ‘पार्टी ऑन माय माईंड’ हे पार्टी साँगही आहे.
केकेने विशाल-शेखरबरोबर त्यांचा सुरवातीचा सिनेमा ‘झंकार बीट्स’मध्ये गाणी गायली होती, त्यांनीही केकेला सतत चांगली गाणी दिली. नंतर केकेने जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर गायले आणि सर्व प्रकारची गाणी मिळाली. सुनिधीबरोबर जसे त्याचे गाणे आहे तसेच श्रेया घोषालबरोबर मोईत्राचे ‘भीनी भीनी, महकी महकी’ हे हळूवार गाणे खूप सुरीले आहे. हे ‘वेलकम टू सज्जनपूर’मधील गाणे आहे, संगीतकार शंतनू.
‘पल’ हा केकेंचा सोलो अल्बम १९९९ मध्ये आला होता, मग एकदम २००८मध्ये त्याचा दुसरा अल्बम आला, ‘हमसफर’. याला संगीतही त्याचेच आहे.
केकेने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले नव्हते. लाइट क्लासिकल गाणं याकडे त्याचा कल होता. ‘तडप तडप के’ मध्येही तसा बेस आहेच, ते त्याला मुश्कील वाटायचं नाही. पण गाण्यात खूप आलाप घेणे, अदाकारी दाखवणे केकेने टाळले. मात्र त्याला चांगली गाणी मिळाली, त्यात विविधता आहे. गाणे ऐकून ऐकून तो शिकलो. किशोरकुमार त्याचा आवडता गायक होता, त्यांची गाणी ऐकून तो शिकला आणि नंतरही ती ऐकत असायचा आणि अर्थातच रफी, लता यांची गाणी तर सगळेच ऐकतात.
‘आवारापन-बंजारापन’, ‘सच कह रहा है दिवाना’, ‘जरा सी दिल में’, ‘तुझे सोचता हूं’ आणि ‘लाइफ इन मेट्रो’चे ‘अलविदा’ अशी केकेची अनेक गाणी घ्या. ते म्हणाले होते त्यांच्या गाण्यांमध्ये पन्नास टक्के योगदान चांगल्या गीतलेखनाचे आहे. गुलझार, जावेद अख्तर, अमिताभ भट्टाचार्य, इरशाद कामिल या सर्वांची चांगली गाणी त्याला मिळालेली आहेत. गाण्याविषयी ते मनापासून एकदा बोलले, ‘गाणे माझ्याकडे येते, मी चाल ऐकतो, गीत वाचतो तेव्हा मनात विचार येतो, काय छान लिहिलेले आहे, काय छान मेलडी आहे. चांगले गाणे मिळाल्यावर गाताना मजा येते.’
केके हे लो प्रोफाइल राहणारे व्यक्तिमत्व. गायक म्हणून त्यांच्या हृदयाला स्पर्श करणार्या गाण्यांमुळे ते कायम स्मरणात राहतील. इतकी श्रद्धा, विनम्रता त्यांच्यात होती म्हणूनच ते इतक्या सच्च्या सुरात गात राहिले असतील.