□ केंद्राने शिपिंग कॉर्पोरेशनही विकायला काढली. सप्टेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करणार.
■ अजून समुद्र नाही विकायला काढलेला, हेच नशीब.
□ प्लॅटफॉर्म तिकीटही महागले. १० रुपयावरून ५० रुपये तिकीट दर होणार.
■ त्यापेक्षा चालत निघालेलं बरं.
□ देशात एक असा पक्ष आहे की जो कुठेही दंगल घडो, त्यातील गुंडांना आणि लफड्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतो. जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर त्यांच्यासोबत जा, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे नाव न घेता केले.
■ इतकं स्पष्ट वर्णन केल्यावर नाव घ्यायची गरजच काय!
□ रिझर्व्ह बँकेने अलीकडे व्याजदरात केलेली वाढ आश्चर्यकारक नव्हती, मात्र तिची वेळ आश्चर्यकारक आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी व्यक्त केले आहे.
■ पण, अजूनही जगात सगळ्यात आश्चर्यकारक आहे ती अर्थमंत्री पदावर तुमची नियुक्ती!
□ केंद्र सरकारची माघार; देशद्रोह कायद्याचा फेरविचार करणार. सर्वोच्च न्यायालयाला केली विनंती.
■ तलवार दुधारी आहे, हे कळलं की म्यान होते.
□ कोरोनामुळे चीनमधून होणारी निर्यात ठप्प. जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता
■ सगळं जग कोरोनाग्रस्त होण्यापेक्षा ते परवडले.
□ सिनेअभिनेत्री कतरिना कैफ मेडिमिक्स साबणाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
■ काही दिवसांनी डायपर, बेबी लोशन, बेबी फूडच्या जाहिरातीत दिसणार ती.
□ ब्रेड, बिस्किट जूनपासून महागणार
■ आता स्वस्त आहेत काय?
□ देशाची वाटचाल विनाशाच्या दिशेने, मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक याचा भाजपला घरचा आहेर
■ यांची मुस्कटदाबी कशी होत नाही, कोणत्या चाव्या आहेत यांच्या हातात?
□ सोमय्या पुन्हा अडचणीत. त्यांच्या `युवक प्रतिष्ठान’ला संशयाच्या देणग्या, ईडी, सीबीआयकडे चौकशीची मागणी.
■ मागणी ढीग करू, या यंत्रणा चौकशी करतील का पण?
□ हरयाणाचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय लोकदलाचे सर्वेसर्वा ओमप्रकाश चौटाला ८७व्या वर्षी दहावी, बारावी पास झाले
■ जबरदस्त! अशी जिद्द पाहिजे!
□ महाबळेश्वरमधील मांसरमध्ये देशातील पहिले मधाचे गाव
■ या गावातले लोक फार गोड आहेत, असं म्हटलं जाईल ना आता!
□ मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय. मुख्यमंत्री योगी यांची घोषणा
■ उत्तर प्रदेशातच काढा की! तिथेच उद्धार करा. म्हणजे इथे येण्याची गरज राहणार नाही आणि तुम्हाला नको तिथे काड्या घालायची गरज पडणार नाही.
□ भाजपच्या मॉडेलनेच भारताचे गरीब आणि श्रीमंत असे दोन भाग केले- राहुल गांधी
■ फोडा आणि राज्य करा, हे ब्रिटिशांची कारकुनी आणि हेरगिरी करतानाच आत्मसात केलेलं आहे त्यांनी.
□ हिंदुत्व ही शिकण्याची गोष्ट नाही. ते रक्तातच असावे लागते! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
■ फितुरांच्या औलादींना सांगून उपयोग काय!
□ श्रीलंकेत भयंकर हिंसाचार, आजी-माजी पंतप्रधानांच्या घरांना आगी. लोकांचा सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांवर रोष.
■ वेळ आली तेव्हा हनुमानाची शेपटीही पुरली होती पापाची लंका जाळायला.
□ चित्रिकरणासाठी सिंधुदुर्गाला प्राधान्य देणार- नागराज मंजुळे
■ व्यक्तिरेखा मालवणीत बोलतील ना पण? की त्या सोलापुरी लहेज्यात बोलणार?
□ अदानी-अंबानीसह जगातील अव्वल श्रीमंतांच्या संपत्तीत घट
■ सामान्य लोक बरबाद होताहेत, यांना काय झळ बसणार?
□ खर्च वाढल्यामुळे मद्याच्या किंमती वाढविण्याची परवानगी देण्याची मद्य उत्पादक कंपन्यांची सरकारकडे मागणी
■ वाढत्या महागाईच्या कडाक्यात तोच एक छोटासा आधार आहे, तो कशाला महाग करताय?
□ वृत्तपत्रांमधील जाहिरातींवर ८२ टक्के लोकांचा विश्वास
■ बातम्यांवर किती लोकांचा विश्वास आहे, ते विचारा.
□ मुंबईत बोगस डॉक्टरांची दुकानदारी, नागरिकांची फसवणूक. सलाईन लावण्यात हातखंडा
■ अनेकदा पेशंटच सांगतात सलाईन लावायला. मग यांचे फावते.
□ महागाईवर चळवळ उभी राहील. मूलभूत प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी- शरद पवार
■ महागाई इतकी आहे की तुमच्या तोंडात साखर पडो, असंही म्हणता येत नाही पवार साहेब.
□ चीनला सीमावाद संपवायचा नाही : लष्करप्रमुख मनोज पांडे
■ ते सगळ्यांनाच माहिती आहे, त्यावर आपली तयारी काय, ते महत्त्वाचे.