अशी आहे ग्रहस्थिती
राहू मेषेत, रवि-बुध (वक्री) वृषभेत, केतू तुळेत, शनि-मंगळ कुंभेत, शुक्र-गुरु-नेपच्यून मीनेत, चंद्र-तुळेत आठवड्याच्या मध्यास वृश्चिक राशीत त्यानंतर धनु आणि मकरेत.१८ मेनंतर मंगळ मीनेत. दिनविशेष – १६ मे रोजी बुद्धपौर्णिमा, १९ मे रोजी संकष्टी चतुर्थी.
– – –
मेष – खर्च वाढण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च टाळा. मंगळाचे १८ मेनंतर व्ययातले भ्रमण. धनेश शुक्र व्ययात असल्यामुळे चंगळवादी वृत्तीपासून दूर राहा. बाकी आठवडा संमिश्र फलदायी आहे. पंचमेश रवि द्वितियात असल्यामुळे संततीबाबत सुखदायक काळ राहील. गुंतवणुकीमधून चांगला लाभ मिळेल. धनस्थानात रवि-बुधादित्य योग असल्याने चांगले आर्थिक लाभ होतील. नर्तक, वादकांसाठी चांगला काळ आहे. मानसन्मान मिळेल, प्रशंसा होईल.
वृषभ – कार्यक्रमाच्या माध्यमातून कलागुणांना चांगली प्रसिद्धी मिळेल. सप्तमेश मंगळाच्या लाभातील भ्रमणामुळे शेअर बाजार, वायदा बाजार आणि अन्य माध्यमातून झटपट पैसे हातात पडतील. या संधीचा फायदा करून घ्या. मार्केटिंग क्षेत्रातील मंडळींसाठी उत्तम काळ आहे. विवाहेच्छुंचे मनसुबे पूर्ण होतील. घरासाठी एखादी उंची वस्तू खरेदी कराल. दशमातील राश्यांतर करून आलेल्या शनीमुळे काही कामाला ब्रेक लागू शकता, सावध राहा.
मिथुन – व्यावसायिक उलाढाल वाढणार आहे. नवीन ऑफर्स येतील, चांगला लाभ मिळेल. कर्जप्रकरणे मार्गी लागतील. अडकलेले पैसे हातात पडतील. मन आनंदी राहील. कौटुंबिक कार्यक्रमातून आप्तस्वकीयांच्या भेटी होतील. कामानिमित्ताने लांबचे प्रवास घडतील. नोकरीत बदल होईल. जबाबदारीचे पद मिळेल. पतप्रतिष्ठा वाढेल. भाग्यातले शनी महाराज चांगले फळ देतील. नोकरांकडून सहकार्य मिळेल. मालक आणि नोकर यांच्यातील वाद संपुष्टात येतील. १५ आणि १६ मे रोजी मन उदास राहील.
कर्क – मंगळाचे भाग्यातील भ्रमण, शुक्र-मंगळ-गुरु यामुळे आनंददायी शुभघटनांचा काळ आहे. प्रेमप्रकरणात चांगला अनुभव येईल. खूप काळापासूनची इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. धार्मिक यात्रा पार पडतील. सामाजिक कार्यात रस घ्याल. विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाची संधी मिळेल. मित्रमंडळींकडून लाभ मिळतील. नोकरीनिमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळेल.
सिंह – कार्यक्षेत्रात प्रभावी ठसा उमटवण्यासाठी येणारा काळ उत्तम ठरेल. सरकारी कर्मचारी, राजकीय व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात चांगली कामे होतील. ठेकेदारांना चांगला काळ आहे, नवीन कामे हातात पडतील. नोकरदारांना पगारवाढीची गिफ्ट मिळू शकते. १८ मे रोजी राश्यांतर करणार्या मंगळामुळे जमिनीचे व्यवहार करणार्यांना आर्थिक लाभ मिळेल.
कन्या – बुधाच्या भाग्यातील भ्रमणामुळे पुण्य कमावण्याची संधी चालून येईल. शारीरिक कष्ट कमी होतील. वैवाहिक जोडीदारासोबत सहलीसाठी जाल. कामाच्या ठिकाणी, प्रवासात नव्या ओळखी होतील. प्रेमप्रकरण जुळेल. विवाहेच्छुकांचे लग्न जमेल. झट मंगनी, पट ब्याह असे प्रसंग देखील होऊ शकतात. सामाजिक संस्थामध्ये काम करणार्यांना उच्चाधिकार मिळतील. नवीन प्रॉपर्टी घेण्याचा मार्ग मोकळा होईल.
तूळ – आठवड्याची सुरवात मानसिक तणावाने होणार असली तरी पुढील काळ मन आनंदी राहील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैसे मिळण्याचे नवे मार्ग खुले होतील. थकीत येणी वसूल होतील. योगकारक शनि महाराजांचे पंचमातील भ्रमण अत्यंत शुभदायी आहे. विद्यार्थ्यांना दीर्घकाळ परिश्रम घ्यावे लागतील. षष्ठात येणार्या मंगळामुळे तुला लग्नाच्या महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल.
वृश्चिक – बिघडलेली गाडी रुळावर येईल. व्यवसायाचा टर्नओव्हर वाढेल. उत्पन्नात भर पडेल. चित्रकला, संगीत, मैदानी खेळात मुले बाजी मारतील. सरकारी कर्मचार्यांनी नियमाविरुद्ध काम टाळा. उन्हाळाच्या कडाका वाढलेला आहे, प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे चमचमीत पदार्थ खाण्याचे प्रकर्षाने टाळा, म्हणजे झाले.
धनु – आनंददायी आठवडा आहे. शुभकार्यात नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आर्थिक लाभ वाढतील. कामात, व्यवसायात नव्या संधी येतील. बुद्धिचातुर्यच्या जोरावर नोकरीत बाजी माराल. १७ आणि १८ रोजी गुरु-चंद्र-शुक्र-नेपच्यून नवपंचम योगामुळे संस्मरणीय अनुभव येईल. विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवावी.
मकर – चांगले आर्थिक लाभ मिळतील. कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा. सुखस्थानातील राहूचे भ्रमण, त्यावर शनिची दृष्टी यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळावे लागेल. वादाचे प्रसंग टाळा. कटुता टाळा. गुरुमहाराजांची कृपा राहील. १७-१८ हे दिवस विवंचनेत जातील. कामानिमित्ताने होणारे प्रवास फायद्याचे ठरतील. महागडी वस्तू घेण्याचा मोह टाळा.
कुंभ – मनावरील ताण कमी होईल. १८ मे रोजी राश्यांतर करून येणारा मंगळ आणि राश्यांतर करून आलेला शनि यामुळे चांगला काळ अनुभवायास मिळेल. योगकारक शुक्र उच्चीचा राहील. त्यामुळे मिष्टान्नभोजनाचा योग जुळून येत आहे. शुभकार्य पार पडतील. रवि-बुधादित्य योगामुळे आनंददायक घटना घडतील. व्यवसायातील अडकलेले पैसे मोकळे होतील. वकील, नाट्य कलावंत, नाटककारांसाठी आठवडा उत्तम आहे. सरकारी नोकरदारांना लाभदायक आठवडा आहे.
मीन – अनेक शुभ घटनांची मालिका अनुभवाल. गुरु वर्षभर स्वराशीत असेल. अध्यात्म, योगसाधना यातून विलक्षण अनुभूती देईल. नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळेल. आईची काळजी घ्या. नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. भाषण, शिक्षण या कामाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतात. पैसे खर्च करताना जर जपून करा. वायफळ उधळपट्टी टाळा. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल, त्याला आवर घाला.