नवनीत राणा तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांची आणि भाजपचे क्रांतिकारी नेते सर्कीट भूमय्या यांची लीलावतीच्या वॉर्डात झालेल्या ऐतिहासिक भेटीचा वृत्तांत माझा मानलेला परममित्र पोक्या याच्या हाती लागला आणि त्याच्या डोळ्यांतून वाहणार्या अश्रुधारा अजून थांबलेल्या नाहीत. हृदय हेलावून टाकणारी भेट होती ती, असं त्यांच्या एकंदर बोलण्यावरून त्याची वाग्दत्त वधू पाकळी हिला जाणवलं. लीलावतीमध्ये पोक्याची पूर्वीपासूनच चांगली ओळख असल्यामुळे नवनीत यांची एन्ट्री लीलावतीमध्ये झाल्याबरोबर डॉक्टरच्या वेशात तो त्यांच्यासोबत पाठोपाठ वॉर्डमध्ये गेला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून बाजूच्या टेबलावर जाऊन बसला, तेव्हा एका नर्सने आतमध्ये धावत येत सर्कीट भूमय्या येत असल्याची वर्दी दिली आणि ती निघून गेली. तेवढ्यात सर्कीटजी कॉटजवळ आले आणि नवनीतला पाहून ढसाढसा रडू लागले. बाई, काय दशा झालीय तुमची! किती वाळलात! साधा चहासुद्धा तुम्हाला दिला नाही हो या सरकारच्या पोलिसांनी! बाकी कुचंबणा केल्या त्या वेगळ्याच. मी सांगतो, एका लढाऊ स्त्रीवर झालेला अन्याय मी आणि माझा पक्ष कधीच सहन करणार नाही.
पण त्या दिवशी खार पोलीस स्टेशनात मला भेटल्याशिवाय का गेलात तुम्ही? तुमचा गालावर झालेल्या त्या भल्या मोठया जखमेची बातमी ऐकून केवढा शॉक बसला होता मला! किती सुजला होता तुमचा गाल? अशावेळी इतर कुठली औषध लावण्यापेक्षा टॉमॅटोचा सॉस चोळावा, जखम पाच मिनिटात गायब होते.
-तेच केलं ना मी! म्हणून तर आज जखमेचा व्रणही दिसत नाही कुठे! त्याशिवाय का तुळतुळीत दाढी करून आलो असेन तुम्हाला भेटायला? माझं जाऊ दे, तुमची तब्येत कशी आहे आता?
– अहो, पाठ दुखतेय माझी. तुरुंगात जमिनीवरच झोपायची ना मी. मेल्यांनी चादर आणि उशीसुद्धा दिली नाही मला. रात्रभर मच्छर चावायचे. मी मागणी केलेलं गुडनाइटही दिलं नाहा. हे तिकडे तळोजाच्या तुरुंगात खितपत पडलेले. त्यांच्या काळजीने रात्र रात्र जागून काढायची मी. सारख्या अमरावतीच्या आठवणी यायच्या. तुरुंगातून सुटल्यावर तिथेच जाणार होती मी. चालताना पाठ दुखायची. त्यामुळे पाठीला हात लावूनच चालताना माझा व्हिडियो पाहिलाच असेल तुम्ही टीव्हीवर. मान पण दुखायची. पण सांगणार कुणाला? बहुतेक मला स्पाँडिलायसिस हा आजार झाला असावा. – हो ना, मागे मला पण झाला होता. पण मी रामदेवबाबांना भेटून त्यांनी सांगितलेली आसनं दिवसातून तीन वेळा करायचो. त्यानंतर सकाळी बर्फाने आणि दुपारी वाफेने पाठ शेकायचो. त्यामुळे पुण्यात तीन वेळा पायर्यांवरून गडगडत गेलो, तरीही मला काहीही झालं नाही. डॉक्टरी उपायांपेक्षा हे घरगुती उपाय बरे. अमरावतीला गेल्यावर ते नक्की सुरू करा हां. वाटल्यास अधूनमधून मीही मार्गदर्शन करायला येत जाईन. रामदेवबाबांची आसनं खूप कठीण असतात. त्यापेक्षा मी तुम्हाला तांबडेबाबांची आसनं करून दाखवीन. कंगणीबाबांच्याही आसनांचा उपयोग होतो म्हणतात. पण पाठीच दुखणं म्हणजे वाईटच. सगळीच वाट लागते. या कुशीवरून त्या कुशीवर आणि या उशीवरून त्या उशीवर वळताना आम्हा पुरुषांची इतकी हालत होते तर तुम्हा महिलांचे काय होत असेल. आम्हाला डोक्याला केशसांभाराचं ओझं तरी नसतं, पण त्या ओझ्यामुळं तुमच्या मानेवर किती ताण येत असेल बरं. मला लांबसडक वेण्याही आवडतात आणि गरगरीत अंबाडाही आवडतो.
-बराच अभ्यास दिसतोय तुमचा सर्कीटजी.
-म्हणजे काय? समाजात वा ईडीच्या समाजकार्यामुळे इतकं फिरणं होतं की कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी आपोआप संपर्क होत असतो. पण तुमच्यासारख्या धडाकेबाज नेत्या मी पहिल्यांदाच पक्षात पाहिल्या. कुणालाही न घाबरणार्या. आज देशाला आणि पक्षाला अशाच लढाऊ नेत्यांची गरज आहे. नुसत्या चिवचिवाट करणार्या चिमण्या नको आहेत, तर नागिणीचे फुत्कार सोडणार्या तुमच्यासारख्या नवनीतजी हव्या आहेत. नवनीत म्हणजे काय तर लोणी. ते तापल्यावर त्याच्याजवळ जाण्याचीही कुणाची हिंमत नसते. मॅडम मी जर मोदी किंवा अमित शहा असतो ना तर तुम्हाला भावी मुख्यमंत्री म्हणूनच फोकस केलं असतं. काय तुमचा तो त्यावेळचा आवेश, काय ते पोलीसांना दम देणं, काय ते तलवार फिरवल्यासारखे हातवारे आणि तोंडाचा दांडपट्टा; पण या सरकारने सगळ्याची माती माती केली. तुमच्यावर झालेले अन्याय आणि `भाजपा माझा’ चॅनलवरच्या तुमच्याविषयीच्या बातम्या ऐकून आत्ताच्या आता तुरुंगात जाऊन त्या अधिकार्यांना जाब विचारावा असं वाटत होतं. पण पोलिसांनी जाऊ दिलं नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या खासदार, तुमची संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणं ऐकलीत मी. केवढी विद्वत्ता आहे तुमच्या शब्दाशब्दात. मोदींनी तर तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं. तुमच्यासाठी एक स्वतंत्र खातं तयार करायला होतं. त्यांच्याजागी मी असतो तर मी तुम्हाला क्रीडामंत्री केलं असतं आणि समस्त स्त्रीवर्गाला न्याय दिला असता. तुम्ही मल्लखांब फेकून मारण्यासारखे नवे खेळ सुरू करायला लावले असते. स्त्रियांसाठी दोरीच्या उड्या आणि बैठे खेळही सुरू करून घेतले असते. तुमची पाठ बरी होऊ दे, मग मोदींशी मी बोलतो आणि पुढे मोदींचे रामराज्य आल्यास तुम्हाला क्रीडामंत्री करायला लावतोच.
-सर्कीटजी, मी तुमची फार आभारी आहे. मी तुरुंगातून सुटल्यावर माझ्या बॅकपेनचे दुखणे ऐकून तुम्ही ईडीची धाड पडल्यासारखे इस्पितळात धावून आलात त्याबद्दल मी तुमचे कसे आभार मानू, हेच मला समजत नाही. हा मणक्यांचा आजार तर नसेल ना? त्यातून आणखी काही उद्भवणार नाही ना? मला लीलावतीमध्ये आणण्यामागे यांचा काही संशय वाटण्यासारखा हेतू नसेल ना? कारण इथून मुख्यमंत्र्यांचा बंगला जवळ आहे आणि त्यांचे त्या इस्पितळाशी चांगले संबंध असल्याची मला माहिती आहे. तुम्ही खोलवर चौकशी करून मला रिपोर्ट द्या, अशी मी तुम्हाला विनंती करते.
-नवनीतजी, तुमच्यासाठी बंदा हाजीर है। ज्याप्रमाणे रामासाठी हनुमान केव्हाही मदत करायला तत्पर असायचा तसा मीही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेन. तुम्ही फक्त एक मिस्ड कॉल द्या. मग मी आलोच म्हणून समजा. स्पाँडिलायसिससाठी गळ्यात घालतात तो पट्टा तुम्हाला विकत आणून देऊ का? त्याचे खूप उपयोग असतात. नंतर बरे झाल्यावर, घरात कुत्रा असल्यास त्याच्या गळ्यात घालण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. हनुमान करो आणि तुम्हाला तसला काही आजार न होवो. येतो मी. तुमचे पतिदेव येताहेत. मी पळतो…
त्यांच्या मागोमाग पोक्याही पळाला.