हॉस्पिटलच्या आत कॅमेरा जातो कसा?
तापमानाचा वाढता पारा, बेरोजगारी आणि राज्यातले सगळेच महत्वाचे प्रश्न संपले की काय? कसली पत्रकारिता करतोय आपण? नवनीत राणा यांचे सीटी स्कॅन करतानाचे फोटो आणि व्हीडिओ दाखवून आपण टीआरपी वाढवतोय? नवनीत राणा, त्यांचे राजकारण या बद्दल मला काहीच बोलायचे नाही पण एखादी व्हीव्हीआयपी व्यक्ती जरी असली तरी तिचे असे फोटो आपण व्हायरल करतो? लिलावतीसारखे प्रतिष्ठित रुग्णालय हॉस्पिटलच्या आत कॅमेरा पोहोचणार नाही असे सांगू शकत नाही? परवानगी मिळतेच कशी? कुठे चाललोय आपण? नवनीत राणा कितीही महत्वाच्या व्यक्ती असल्या तर त्यांचं मेडिकल बुलेटिन काढावं की! हा काय आचरटपणा? त्यांना फोटो काढायची हौस आणि आम्हाला फोटो दाखवायची हौस.
– नेहा पुरव
मला शाहूमहाराज का भावतात..?
१) भारतातील संस्थाने आणि राजे त्यांच्या वर्तनाने लोकांच्या संतापाचे कारण ठरले.पण शाहू महाराजानी राजेपणाची व्याख्याच बदलून टाकली..कल्याणकारी राज्य कसे असते याचा वस्तुपाठ घालून दिला..
२) राजकीय स्वातंत्र्य अगोदर की सामाजिक सुधारणा अगोदर? असा वाद महाराष्ट्रात झाला पण राजकीय व्यवस्थेतून सामाजिक सुधारणा किती प्रभावीपणे अंमलात येऊ शकतात याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला.
३) पुरोहित आणि राजे अशी सांगड सर्वत्र असताना ती तोडून पर्यायी धर्मपद निर्माण करण्यापर्यंत आव्हान पुरोहितशाहीला दिले हे राजसत्तेने क्वचितच केले होते.
४) ज्या सुधारणा करण्यासाठी आज आपण झगडतो त्या अगदी त्यांनी सहज करून दाखवल्या. आज लग्नाचे मुलींचे वय १८ की २१ हा वाद सुरू असताना त्यांनी १९१९मध्ये मुलींच्या लग्नाचे वय १४ केले पण आज १०० वर्षांनी आपण त्या वयापुढील बालविवाह ही थांबवू शकलो नाही.
५) शिक्षण हक्क कायदा आणायला देशाला २००९ साल लागले पण महाराजानी ९२ वर्षे अगोदर (१९१७ला) करून दाखवले
मुले न शिकवणार्या पालकांना शिक्षा करण्याची आज हिंमत नाही. हे त्याकाळात करून दाखवले.आजही पुरेशी वसतिगृहे नसताना त्याकाळात करून दाखवली.
६) विधवा विवाह आजही फारसे होत नाहीत, समाजाची मानसिकता नकारात्मक आहे. १९१६मध्ये त्यांनी विधवा विवाह कायदा केला. हे धाडस खूप काळाच्या पुढचे होते.
७) भटक्या जमातींना आजही गुन्हेगार समजून त्यांच्यावर हल्ले होतात.नेहरूंनी येऊन १९५२ला गुन्हेगारी कलंक पुसला पण महाराजानी ते ३४ वर्ष अगोदर करून दाखवले.
८) महारोग्यांची वेदना बाबा आमटेच्या आनंदवनानंतर आपल्याला कळली पण महाराजानी १८९७ सालीच महारोग्यासाठी आश्रम काढला.
९) शेतकरी आत्महत्या होताना अजूनही तो राज्यकर्त्यांचा प्राधान्यक्रम होत नाही. पण सिंचन, दुष्काळ उपाययोजना, हे त्या काळात करून दाखवले.
१०) औद्यीगिकीकरण रोजगार यावर आज परिसंवाद फक्त होताना ते केव्हाच महाराजानी करून दाखवले.
११) मर्यादित भौगोलिक क्षेत्रात किती अमर्यादित काम करता येऊ शकते? याचे महाराज प्रतिक ठरले…
एक राज्य किती कल्याणकारी असू शकते याने आपण थक्क होतो …
वंदन या राजाला….
– हेरंब कुलकर्णी
चला पुन्हा चुलींकडे!
आज घरगुती गॅसचा भाव मोदी कृपेमुळे हजाराच्या घरात गेला. नरेंद्र मोदी सरकारने ‘चला पुन्हा चुलीकडे, आपल्या जुन्या आठवणींकडे!’ अशी योजना सुरू करून ‘उज्वला गॅस योजना’ चुलीत घातली आहे.
हिंदूराष्ट्र बनविणार्यांच्या मते हे सगळे सरकारच्या धोरणांमुळे नाही तर आरक्षण, मुस्लिम, पाकिस्तान ह्यामुळे होत आहे. त्याला कोण काय करणार? पण मोदीजी त्यांची चांगलीच ठेचत आहेत. महागाईपेक्षा भोंगे, तीन तलाक, ३७० कलम यासारख्या मोठमोठ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आमची धार्मिक अस्मिता जास्त महत्वाची आहे.
…आणि हो, गटार गॅस उपलब्ध असताना सिलेंडर कशाला पाहिजे? एकदा का गटारातून मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले की मग घरोघर ‘दीनदयाळ फ्री गटारगॅस योजना’ चालू करणार आहेत मोदीजी. ‘घर तेथे गटार, आणि गटार तेथे गॅस!’ खरे तर ह्या दीडदमडीच्या प्रदूषण निर्माण करणार्या गॅसपेक्षा हिंदूंवरील संकट मोठे आहे. ते संकट दूर करण्यासाठी होऊन जाऊ द्या इंधनवाढ! मी तर म्हणतो दहा हजार रुपये फक्त सिलेंडर झाला पाहिजे. तरीही आम्ही मत मोदींनाच देणार. आम्ही पंतप्रधान हा देशाच्या विकासासाठी निवडला आहे;
गॅस आणि पेट्रोलच्या दर कमी करायला नाही! कारण आम्ही राष्ट्रभक्त आहोत. म्हणून देशासाठी एवढी झीज सोसायलाच हवी. तसेच आमदनी वाढली की महागाई वाढणारच ना!
शेर पालना कोई आसान काम थोडे ही होता है? उसके लिये हमारे जैसे राष्ट्रवादी देशभक्तों का जिगर चाहीये। अर्बन नक्षलियों का ये काम नहीं! समझें?
जनतेला महागाई कमी व्हावी असे वाटत असेल तर टाळ्या, थाळया वाजवाव्यात. तरीही महागाई कमी नाही झाली तर… जय श्रीराम म्हणा किवा हनुमान चालीसा म्हणू शकता… एवढे महान पर्याय मोदी साहेबांनी उपलब्ध करून दिले असताना आपण उगाच मोदीना दोष देऊ नये.
– जगदीश काबरे