ब्रिटनने या पदार्थाला राष्ट्रीय पदार्थाचा दर्जा दिलाय, इतका तो तिथे लोकप्रिय आहे.
ब्रिटनमध्ये भारतीय स्थलांतर फार जुने आहे. किंबहुना पाकिस्तान, बांगला देश इथून तिथे अनेक लोक चांगला रोजगार मिळावा म्हणून गेले. यात आपले पंजाबी शीख मुंडे आघाडीवर होते. हा काळ साधारण ८०/८५ वर्षे आधीचा. कदाचित त्याहून आधी. तेव्हा आतासारखी सर्व चवीचे जेवण देणारी ठिकाणे नव्हती. आणि ब्रिटिश पारंपरिक अन्न हे बेचव म्हणून जगभर प्रसिद्ध आहे (की कुप्रसिद्ध?), तर मुद्दा हा की या लोकांच्या देशी जिभेला ते काही रुचेना. परत आर्थिक स्थिती गरीब. नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या? मग यांनी स्वतःचे जेवण स्वतः करायला सुरुवात केली. घरून डबे नेणे हा भारतीय स्थायीभाव, त्यानुसार हे लोक लंच घेऊन जायचे. त्यांच्या डब्यातील जेवण स्थानिक लोकांनी चाखले, बेचव फिश अँड चिप्स आणि थंडगार सँडविच खाणार्या ब्रिटिश जिभेला ते भावले. परत इथे भारतात ब्रिटिश अंमलदार किंवा अधिकारी होते, ते चमचमीत भारतीय जेवणाचे चाहते होऊन मायदेशी गेले. त्यांनी तिथं मग असे पदार्थ करणे सुरू केले. म्हणजे त्यांच्या खानसाम्यांना. अनेक अधिकारीवर्गाचे उच्चभ्रू क्लब होते, तिथे त्यांनी भारतीय स्वयंपाकी नेले. काही देशी स्थलांतरित लोकांनी छोट्या छोट्या खानावळी सुरू केल्या. मटण किंवा कोंबडी रस्सा आणि पाव, हा तिथला मुख्य मेनू असायचा. गोर्या सायबाने अशा हॉटेल्सना मग करी हाऊस नाव दिले. पंजाबी शीख लोकांची तंदुरी प्रसिद्ध, त्या उरलेल्या तंदुरीच्या तुकड्यांना भारतीय मसाल्यात घोळवून त्याचा टिक्का मसाला झाला. ब्रिटिश जिभेला तिखट झेपणार नाही म्हणून रस्सा/मसाला सौम्य करून त्यात लोणी/बटर घालून टिक्का मसाला/बटर चिकन आले, जे आजतागायत ब्रिटिश मनावर राज्य करून आहे. काळाच्या ओघात मग बाकी भारतीय पदार्थ पण प्रवेश करते झाले, पण चिकन टिक्का मसाला/बटर चिकनचे गारूड अबाधित आहे.
भारतात पण बटर चिकन तुफान लोकप्रिय आहे आणि शाकाहारी जनतेसाठी बटर पनीर.
हॉटेलमध्ये असे काय करतात की घरी तशी चव येत नाही हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच नेहमी पडतो. तर एकेकाळी संपूर्ण जगावर अधिराज्य करणार्या ब्रिटिश सत्तेच्या जिभेला, गुलाम करणार्या बटर चिकनचे गुपित आता जाणून घ्या.
हॉटेलमध्ये मिळणारे रस्सा/ मसाले, मास स्केलमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावर मागवले जातात. ज्या वेगवेगळ्या रंगाच्या ग्रेव्या हॉटेलात मिळतात, तो मसाला आधीच तयार असतो. ऑर्डरनुसार कोरडे मसाले, तिखट घालून दिले जाते. हॉटेलमधील गरम मसाले हा एक स्वतंत्र विषय आहे. बहुतेक रेस्टॉरंटमध्ये मिळणारे जेवण किंवा समारंभ, लग्न अशावेळी असणारे जेवण एका समान मसाल्यात केलेले असते आणि तो मसाला पंजाबी पद्धतीचा असतो. आपला गोडा, कोल्हापुरी, मालवणी मसाले वापरले जात नाहीत. अगदी चिकन कोल्हापुरी, मालवणी असली, तरी मुख्य मसाला पंजाबी असतो. अर्थात हल्ली अस्सल मराठी, कोळी, मालवणी जेवण देणारी हॉटेल्स लोकप्रिय झाली आहेत, त्यामुळे माझा मराठी बाणा सुखावतो खरा. असो.
बटर चिकन
साहित्य : चिकन शक्यतो बोनलेस असावे ५०० ग्रॅम, कांदे २ मोठे, टोमॅटो १ मोठा, आले लसूण मिरची चिरून, लाल तिखट शक्यतो काश्मिरी, हळद, किचन किंग मसाला, अख्खे गरम मसाले थोडे, तुकडा काजू/ काजू कणी/ मगज बी, १ छोटी वाटी
घट्ट मलई/ क्रीम, बटर, तेल, मीठ
कृती : चिकन धुवून लिंबू, हळद, थोडे मीठ लावून मुरवत ठेवावे.
तोपर्यंत कांदे, टोमॅटो चिरून घ्यावे.
अर्ध्या तासाने थोडे तूप तेल घालून बोनलेस चिकन किंचित लालसर करून घ्यावे. ही पायरी चुकवू नये.
ते बाजूला काढून त्याच तेलात कांदे लाल करावे.
मग टोमॅटो, काजू कणी/ मगज बी, आले, लसूण, थोडी मिरी, छोटी दालचिनी, दोनेक लवंग, एक तमालपत्र, थोडे जिरे, एक मोठी वेलची, घालून व्यवस्थित मऊ करून घ्यावे. गार करत ठेवावे.
तोपर्यंत क्रीम छान मऊ फेटून घ्यावे.
गार झालेला कांदा टोमॅटो आणि बाकी एकदम गंध वाटावे. गाळणीतून गाळून घ्यावे. यामुळे ग्रेव्ही एकदम मुलायम होते.
त्याच भांड्यात बटर + तेल घालून हा मसाला मंद आगीवर १० मिनिटे खमंग परतावा.
त्यात हळद + लाल तिखट + किचन किंग मसाला + आले लसूण घालून परत परतावे.
बाजूने तेल सुटू लागले की चिकन + मीठ घालून, परतून, झाकण ठेवून, छोट्या आगीवर पाचेक मिनिटे वाफ घ्यावी.
आता फेटलेले क्रीम + कसुरी मेथी घालून, ढवळून परत पाच मिनिटे वाफ घ्यावी.
आग बंद करून, वरून कोथिंबीर पेरावी.
तुमच्याकडे कोळसा असल्यास, त्याला धुमसवून, त्यावर तूप घालून, एका वाटीत ठेवून तो तयार मसाल्यात ठेवून झाकण दडपावे. अतिशय खमंग दरवळ येतो.
लक्षात ठेवायच्या बाबी :
– या कृतीत कोणतेही पारंपरिक मसाले वापरायचे नाहीत.
– पंजाबी गरम मसाला/किचन किंग हेच हवेत.
– लाल तिखट काश्मिरी घ्यावे.
– क्रीम अगदी शेवटी टाकावे, मग उकळू नये. क्रीम फाटते.
– हा पदार्थ तसा मध्यम तिखट असतो.
– जास्त तिखट हवे तर हिरवी मिरची वाढवावी.
– शाकाहारी करायचे तर पनीर/फ्लॉवर/गाजर/मटार वापरता येतात.