मुल्ला नसरुद्दीनच्या गावातून तीर्थयात्रेचा रस्ता जायचा. त्याच्या गावात नेहमी प्रवाशांची गजबज असायची. त्याचं घरही गावातल्या प्रमुख रस्त्यावरच होतं. राज्यातल्या कोणत्याही भागातून तीर्थयात्रेला निघालेले नातेवाईक-मित्र एक मुक्काम त्याच्या घरी करायचेच.
एक दिवस त्याच्या घरी एक प्रवासी आला. त्याच्या हातात दोन तगड्या कोंबड्या होत्या. मुल्लाला त्याने लांबच्या एका नातेवाईकाची ओळख सांगितली, हातातल्या दोन कोंबड्या मुल्लाकडे सोपवल्या आणि म्हणाला, एक भाजू, एकीचा छान रस्सा करू आणि खाऊयात.
स्वयंपाकासाठी स्वत:हून काही घेऊन आलेला तो पहिलाच पाहुणा होता. नजमाने आनंदाने स्वयंपाक केला. सगळ्यांनी कोंबडीवर ताव मारला. दुसर्या दिवशी सकाळीच तो पाहुणा, अजमत निघूनही गेला.
काही दिवसांनी मुल्लाच्या दारावर टकटक झाली. एक अनोळखी पाहुणा होता… ‘अजमतचा भाऊ’ अशी त्याने ओळख दिली… कोंबडीचा स्वाद अजून जिभेवर ताजा होता… अजमतच्या भावाची चांगलीच खातिरदारी झाली… त्याने कोंबडी आणली नसली, तरीही.
काही दिवसांनी आणखी एक पाहुणा आला, ‘अजमतचा चुलतभाऊ’…
काही दिवसांनी आणखी एक पाहुणा आला, ‘अजमतचा मामेभाऊ’..
काही दिवसांनी आणखी एक पाहुणा आला, ‘अजमतचा आतेभाऊ’…
असे बरेच भाऊ येऊन गेले… नंतर त्याचे मित्र येऊ लागले, मग भावांचे मित्र येऊ लागले, मग मित्रांचे मित्र येऊ लागले… प्रत्येकजण ओळख द्यायचा, ‘तो अजमत आला होता ना दोन कोंबड्या घेऊन, त्याच्या अमक्याच्या तमक्याचा मी ढमका.’
…असा बराच पाहुणचार केल्यानंतर एकदा मुल्लाचं दार वाजलं. दारात अनोळखी माणूस पाहताच मुल्ला म्हणाला, ‘बोला, माझ्याकडे दोन कोंबड्या घेऊन आलेल्या अजमतचे तुम्ही कोण?’
तो अजमतच्या भावाच्या मित्राच्या मित्राचा मित्र होता…
मुल्लाने त्याला बसायला सांगितलं आणि म्हणाला, ‘मी कोंबडीचं सूप घेऊन येतो.’
मुल्लाने आणलेलं सूप पिताच पाहुण्याचं तोंड वाकडं झालं… तो म्हणाला, ‘अहो, हे काय आहे? हे तर नुसतं गरम पाणी आहे… यात कोंबडी तर सोडा, साधं मीठ आणि हळदही नाहीये…’
मुल्ला म्हणाला, ‘नाही हो. सूपच आहे. हे तुमच्या अजमतने आणलेल्या कोंबडीच्या सूपच्या सूपच्या सूपचं सूप आहे…’
…त्यानंतर अजमतची ओळख सांगून अजून तरी मुल्लाकडे कोणी पाहुणा गेलेला नाही म्हणतात.