प्रतिभावान कवी, लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार गुलजार यांच्या आयुष्यात अनेकांनी त्यांच्या जीवनाला वळण दिलं. ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाचे संपादक, गुलजार यांचे निस्सीम चाहते आणि मित्र अरुण शेवते यांनी गेली तीस वर्षे गुलजार यांच्या आयुष्यात आलेल्या माणसांवर, घटनांवर त्यांच्याकडून अंकासाठी लिहून घेतलेल्या लेखांचे ‘धूप आने दो’ हे पुस्तक आता प्रकाशित झाले आहे. त्यातीलच प्रसिद्ध निर्माते एन. सी. सिप्पी यांच्यावरील हृदयस्पर्शी लेखातील मेरे अपने या गुलजार दिग्दर्शित पहिल्या सिनेमाची संपादित जन्मकथा…
– – –
एन. सी. सिप्पी हा मोठा निर्माता. हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत ते अतिशय आशयपूर्ण चित्रपट तयार करत. चांगल्या विषयांवर त्यांचा विश्वास होता. त्यांची एक छान टीमच तयार झाली होती. कोणताही आव न आणता, कसलीही घोषणाबाजी न करता अतिशय शांतपणे त्यांचं काम सुरू होतं. त्यांनी जे चित्रपट बनवले ते उत्तमच होते. मध्यमवर्गीय मूल्ये आणि साधी माणसं त्यांच्या चित्रपटांत असायची. मी कलकत्त्याहून मुंबईत परतल्यावर सिप्पीसाहेब मला म्हणाले, ‘‘‘आपनजन’ खूप चांगला सिनेमा आहे, असं म्हणतात.’’ मी म्हणालो, ‘‘हो, आहे खरं. प्लॉट चांगला आहे आणि छायादेवींनी खूप सुंदर काम केलंय त्यात.’’ सिप्पीसाहेब म्हणाले, ‘‘सिनेमाचे हक्क तुझ्याकडे आहेत का?’’ ‘‘माझ्याकडे तर नाहीत. मी पटकथेचा फक्त अनुवाद केलाय हिंदीत. हिंदीत ती अॅडॉप्ट केलेय म्हणा हवं तर. पण हिंदीत हा सिनेमा तपनदा करणार नाहीत. हे मात्र मला नक्की माहीत आहे,’’ मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला कथेबद्दल विचारलं. तोवर मूळ कथा माझ्या हाती आली होती. मी सिप्पीसाहेबांना त्या अंगाने गोष्ट सांगितली. त्यांना आवडली. तडकाफडकी निर्णय घ्यायचा स्वभाव होता त्यांचा. लगेच म्हणाले, ‘‘सिनेमाच्या हक्कांचं काय ते बघ.’’ मी म्हणालो, ‘‘ते मामाजींकडे आहेत. मिळतील…’’
त्यानंतर अगदी मजेदार घटना घडली. अगदीच अनपेक्षित. मोहन स्टुडिओमध्ये हृषीदांच्या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. मीही होतो तिकडे. शूटिंगचा फ्लोअर होता, तिथून पार्किंग थोडं दूर होतं. मी आणि सिप्पीसाहेब पार्किंगच्या दिशेने सोबत चालत होतो. तोवर माझ्या ध्यानात आलं होतं, यांना हा चित्रपट बनवायचा आहे. ते आणि हृषीदा एकत्र काम करायचे. मी विचारलं, ‘‘सिनेमाचं दिग्दर्शन कुणाकडे देताय? हृषीदा? ते करणार नसतील तर माझी इच्छा आहे. मला आवडेल करायला.’’ ‘‘हृषीदा दिग्दर्शन करत असतील किंवा नसतील. तुला दिग्दर्शक व्हायचं नाही का?’’ मी पटकन म्हणालो, ‘‘हो तर. म्हणूनच विचारलं ना मी. माझी इच्छा तर आहेच.’’ एवढं बोलणं होईपर्यंत आम्ही त्यांच्या गाडीपर्यंत पोहचलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे फियाट होती. त्या गाडीचा दरवाजा उलटा उघडायचा. त्यांनी तो विशिष्ट पद्धतीने उघडला आणि मागच्या बाजूला जाऊन बसले. दरवाजा बंद करत म्हणाले, ‘‘स्क्रिप्ट आहे ना तुझ्याकडे? मग घेऊन ये. उद्या पहाटे चार वाजता.’’ गाडी सुरू झाली आणि ते निघून गेले. पहाटे चार ही त्यांची आवडती वेळ होती. ते खूप लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे. फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांसारखे ते अजिबात नव्हते. खूप वेगळा माणूस होता तो आणि खूप मोठा. त्यांच्या योग्यतेएवढं त्यांना मिळालं नाही. त्यांना मिळालं त्याहून कितीतरी अधिक त्यांना मिळायला हवं होतं. तो त्यांचा हक्क होता, असं मी नेहमी म्हणतो.
दुसर्या दिवशी पहाटे चार वाजता त्यांच्याकडे पोहचलो. अगदी वेळेत. कारण वेळ पाळणं मलाही आवडतं. वक्तशीरपणा हा माझा स्वभाव आहे. तो माझ्या मानेत अडकलाय म्हणा ना. जोवर एखाद्या ठिकाणी मी दिलेल्या वेळेत पोहचत नाही तोपर्यंत मला तो त्रास देत राहतो. मी पोहचलो तेव्हा ते चहा तयार करत होते. आम्ही दोघांनी चहा घेतला आणि नंतर मी त्यांना स्क्रिप्ट ऐकवलं. पूर्ण ऐकल्यावर त्यांनी मला विचारलं, ‘‘याचं कास्टिंग कसं करशील?’’ साधा प्रश्न. तोवर मला त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. मी दिग्दर्शन करतोय असं ते अजिबात म्हणाले नव्हते. कास्टिंग काय करशील, हा मोघम प्रश्न होता. मी आपला तेवढाच अर्थ त्यातून घेतला. ‘‘छायादेवींनी मूळ सिनेमात खूप छान काम केलंय. त्यांना हिंदी येतं. त्या हिंदी बोलतातही खूप चांगलं…’’ मला मधेच तोडत ते म्हणाले, ‘‘मुंबईतल्या कुणाचा तरी विचार कर ना.’’ त्या क्षणी डोक्यात नाव आलं – मीनाकुमारी. मी सिप्पीसाहेबांना तसं सांगितलं. तर लगेच म्हणाले, ‘‘असं का नाही करत… तू निम्मीला घे.’’ मी पटकन म्हणालो, ‘‘भाईसाब, निम्मीजी नाही करू शकणार ही भूमिका.’’ ‘‘का?’’ त्यांचा आग्रह सुरूच होता. मी त्यांना समजावत म्हटलं, ‘‘निम्मीजी अभिनेत्री म्हणून चांगल्या आहेत. दिसायलाही सुंदर आहेत. पण प्रत्येक भूमिकेची एक विशिष्ट मागणी असते. या भूमिकेत त्या नाही योग्य ठरणार.’’ यावर ते मनमोकळं हसले आणि म्हणाले, ‘‘अरे बघ की होतंय का. माझं कॉलेजच्या दिवसांपासून क्रश होतं निम्मीवर..’’ अगदी प्रामाणिक आणि मोकळा माणूस. क्षणाचाही विलंब न लावता पुढचं वाक्य आलं, ‘‘मीनाजींशी कोण बोलणार? तू की मी?’’ अच्छा! म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक मी होतो तर! माझ्या चेहर्यावर त्यांनी ते वाचलं असणार. ते माझ्याकडे बघत सहज सुरात म्हणाले, ‘‘काल आप्ाण मोहन स्टुडिओमध्ये पार्किंगपर्यंत चालत आलो. कारपर्यंत येताना मी ठरवून टाकलं होतं की मला नवीन दिग्दर्शक मिळतोय. त्याला ब्रेक द्यावा लागेल. कारमध्ये बसताना तुला म्हणालो. चार वाजता ये. चार वाजता उठायची माझी सवय आहे. चार वाजता मी बोलावल्यावर जो वेळेत पोहचतो त्याची आपसूक परीक्षाही होते. तुझी काही मी परीक्षा घेत नव्हतो पण त्यातून कळतंच की तुमची इच्छाशक्ती किती तीव्र आहे…’’ मी नुसताच हसलो. त्यांना म्हणालो, ‘‘मीनाजींशी तुम्हीच बोला. मी नंतर भूमिकेबद्दल सांगेन त्यांना. पण पैशांबाबत मात्र तुम्हीच बोलून घेतलेलं बरं.’’ मी बोलत असताना ते थोडे विचारात पडल्यासारखे वाटले. मी म्हटलं, ‘‘तुम्ही द्विधा मन:स्थितीत आहात का?’’ त्यावर सिप्पीसाहेब चटकन उत्तरले, ‘‘छे. छे. द्विधा का असेन? मी ठरवलं तर आहेच की फिल्म तूच करतो आहेस.’’ ‘‘पण निर्माता मी नसेन!’’ ‘‘तुम्ही नसाल? मग कोण?’’
‘‘रोमू आणि डड्डू असतील.’’
डड्डू हे राज सिप्पींचं टोपणनाव. सिप्पीसाहेबांकडे ‘उत्तम चित्र’ हे आणखी एक बॅनर होतं. ‘‘रोमू, डड्डू आणि तू असे तिघे मिळून ही खिचडी पकवा. माझं नाव यात कुठेही नसेल. तू कुणाकडे याचा उल्लेखही करू नकोस.’’ याचं कारण होतं हृषीदा! हृषीदा आणि सिप्पीसाहेबांची पार्टनरशिप होती. त्यांचे सगळे सिनेमे हृषीदा दिग्दर्शित करत. त्यामुळे सिप्पीसाहेबांना त्यांना याविषयी सांगायचं नव्हतं. हृषीदांना पुढे या चित्रपटाविषयी कळलं तेव्हा त्यांनी विचारलंही. सिप्पीसाहेब त्यांना म्हणाले, ‘‘अहो मुलांनी मिळून काहीतरी उद्योग चालवलाय. माझा तो बॅनर तसाच पडून होता. म्हटलं करा काय करायचं ते. मलाही माहीत नाही नक्की काय सुरू आहे.’’ आणि एवढं बोलून त्यांनी विषयच बदलला.
सिप्पीसाहेब मला म्हणाले, ‘‘रोमू आणि डड्डूला तुझ्याकडे असिस्टंट म्हणून घे या सिनेमासाठी. माझ्या घरात दिग्दर्शक तरी तयार होईल.’’ त्यांचे हेतू स्पष्ट असायचे. त्यात कोणतीही लपवाछपवी नसायची. अगदी पारदर्शक माणूस! पण रोमू म्हणाला, ‘‘नाही, मला नाही करायचं हे. मी आपला प्रॉडक्शनला बरा आहे. पुढे मला तेच करायचं आहे.’’ राज मात्र आनंदाने तयार झाला. अतिशय चांगला असिस्टंट आणि अतिशय चांगला माणूस. राजकडे त्याच्या वडिलांचे सारे गुण आहेत. प्रचंड यश मिळवूनही तो अतिशय विनम्र आहे. त्याचे चित्रपट चालले, पडले. चित्रपटसृष्टीत त्याने त्याचं स्थान मिळवलं. पण तो कायमच विनम्र राहिला. हा महत्त्वाचा गुण त्यांच्या कुटुंबातच आहे. त्यामुळे या कुटुंबासोबत काम करणं मला नेहमीच आवडत आलंय…
…आणि अशा तर्हेने माझ्याकडे ‘मेरे अपने’ आला. सिप्पीसाहेबांचं नावही सोबत आलं, पण ते प्रेझेंटेड बाय असं होतं. ते आम्ही दोघांनी एकत्र केलेल्या सगळ्या चित्रपटांत येतं. ते तसं देणं माझं कर्तव्यच होतं. टायटल्समध्ये ‘गुलजार्स मेरे अपने’, ‘गुलजार्स घातक’ असं जात असेल तर एन. सी. सिप्पी प्रेझेंट्स असं जोडीने यायलाच हवं होतं. सिप्पीसाहेबांचं नाव सिनेमाच्या शेवटीही यायचं.
मीनाजींचं नाव येण्यापूर्वी माझ्या डोक्यात खरं तर छायादेवी यांचं नाव होतं. पण मीनाकुमारी आल्या आणि आमच्या फिल्मशी स्टारडम जोडलं गेलं. त्या वेळच्या दोन आघाडीच्या अभिनेत्यांना मुख्य भूमिकांसाठी विचारलं. मित्रच होते ते. तर दोघेही नाही म्हणाले. त्यांचं म्हणणं होतं, ‘‘कथा तर वृद्धेची आहे. आमचं कामच काय त्यात? दुसरी काहीतरी फिल्म बनवा. आम्ही करू तुमच्यासोबत काम.’’ सिप्पीसाहेबांना आश्चर्य वाटलं. म्हणाले, ‘‘यार, ही हिरो मंडळी आपल्या फिल्ममधल्या म्हातारीला एवढं घाबरतात का? ती हिरॉईन थोडीच आहे? साधी म्हातारी आहे.’’ मी त्यांना समजावलं, ‘‘आपल्या फिल्ममध्ये हिरॉईन नाही. ती असती तर मधे मधे रोमान्स, गाणी वगैरे आलं असतं. त्यामुळे अडचण येतेय. बाकी काही नाही.’’ सिप्पीसाहेब म्हणाले, ‘‘अरे मग टाक ना तसा सीन एखादा. नाही तर गाणं टाक.’’
‘‘अहो, जागाच नाहीये तशी कुठे. एक टांगा आहे. त्यात आहे एक सीन. तुम्ही म्हणत असाल तर टाकतो…’’
मला मधेच तोडत सिप्पीसाहेब चटकन म्हणाले, ‘‘छे छे… तसं असेल तर आधीची कथा बिघडवायची गरज नाही. राहू दे आहे तसंच.’’
मी निर्धास्त झालो. त्यांना सांगितलं, ‘‘एक नाव आहे समोर. ‘मेरा गाव मेरा देस’मध्ये आलाय खलनायक म्हणून. मोठं रुबाबदार व्यक्तिमत्त्व आहे. विनोद खन्ना नाव आहे.’’ माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आत त्यांनी काही विचार केला. ‘मेरा गाव मेरा देस’ तेव्हा इम्पिरिअलमध्ये लागला होता. सिप्पीसाहेबांचा एक दक्षिण भारतीय प्रोडक्शन इंजिनिअर होता गोपालकृष्णन. त्याला बोलावलं. म्हणाले, ‘‘गोपाल, इम्पिरिअलला तीनच्या शोची तिकिटं मिळतील?’’ मग माझ्याकडे वळून म्हणाले, ‘‘चल, बघून येऊ.’’ काही कळायच्या आधी त्यांनी ठरवून टाकलंही. तेव्हा आत्ताच्यासारख्या सीडी आणि व्हिडिओ वगैरे नव्हते. सिनेमा बघायचा असेल तर थिएटरला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. गेलो दोघे इम्पिरिअलला. अर्धी फिल्म पाहिली आणि मध्यंतरात उठवलं. बाहेर आलो. तिथेच म्हणाले, ‘‘मुलगा चांगलं काम करतोय. त्याच्याशी बोलून घेऊ.’’ झालं! विनोद खन्नाचं नाव असं इम्पिरिअलच्या बाहेर फायनल झालं. शत्रुघ्न सिन्हा स्वतःच सिप्पीसाहेबांच्या संपर्कात होता. तोही आला. राहिली इतर तरुण मुलं. सगळे नवे चेहरे.
डॅनी डेंझोपा नवा होता. दिनेश ठाकूर सलीलदांकडे भेटला होता. तो तेव्हा थिएटर करत होता. त्याला म्हटलं, ‘‘चल, जवळच आमचं ऑफिस आहे, तिथे भेट.’’ तो आला आणि त्याची निवडही झाली. त्याच दरम्यान हॉटेल ‘अजंता’मध्ये बसलो होतो. कुठल्याशा पटकथेवर अखेरचा हात फिरवत होतो. अचानक सुभाष घई आणि असरानी हे दोघे आले. सिनेमाचं बोलणं निघालं. मी सांगितलं, ‘‘बघा, एकच रोल शिल्लक आहे. खरंतर तुम्ही दोघंही त्या भूमिकेसाठी योग्य आहात. सांगा काय करायचं?’’ क्षणाचाही विलंब न लावता सुभाष ताबडतोब म्हणाला, ‘‘असरानीला घ्या.’’ मी म्हटलं, ‘‘का? तुला नाही करायचं काम?’’ तर म्हणाला, ‘‘नाही, त्यालाच घ्या.’’ त्यानंतर अनेकदा भेट झाली. पुढे केव्हातरी बोलताना विषय निघाला तेव्हा म्हणाला, ‘‘मी इकडे तिकडे काम शोधत होतो तरी तेव्हाही आपल्याला दिग्दर्शन करायचं आहे, हे डोक्यात पक्कं होतं. म्हणून असरानीचं नाव सुचवलं. आणि तसंही पाच तरुण मुलांपैकी एक मी असणार होतो. वेगळं काय केलं असतं मी तिथं?’’…आणि असं असरानीचं नाव फायनल झालं.
‘मेरे अपने’मध्ये चार गाणी आहेत. प्रत्यक्षात दोनच पडद्यावर दिसतात. ‘हालचाल ठिकठाक है’ आणि ‘कोई होता जिसको अपना…’ ही ती गाणी.
‘रोज अकेली आती है…’ हे गाणं मीनाजींवर चित्रित करायचं होतं. पण नंतर मीनाजी खूपच आजारी पडल्या आणि ते राहून गेलं. अंगाई गीत होतं ते. जे मूल सांभाळायला त्यांना आणलेलं असतं, त्याचे आई-वडील रात्री उशिरा येतात घरी. म्हणून बाळाला झोपवण्यासाठी त्या अंगाई गीत म्हणतात असं दृश्य होतं. त्या गाण्यात शब्द आहेत, ‘चांद कटोरा लिये भिकारन रात…’ मी चंद्राला कटोरा म्हटलेलं तेव्हा अनेकांना आवडलं नव्हतं. सुरुवातीला अशी टीका मी अनेकदा सहन केली. मीनाजींशीही एकदा बोललो होतो या गाण्याबद्दल. म्हटलं, ‘‘अनेकांना आवडलेलं नाही हे गाणं.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तू बदलत नाहीस ना ते गाणं?’’ तोवर रेकॉर्डिंग झालं होतं. बदल करणं अवघड होतं. आत्तासारखं एखादी ओळ बदलून चिकटवायचं तंत्र तेव्हा नव्हतं. मी त्यांना नाही म्हटलं. मीनाजी मला म्हणाल्या, ‘‘अरे, तुला जर तो कटोरा दिसत असेल तर कटोराच लिहिशील ना? तुला वाटतंय तसंच राहू दे. दुसर्यांची फिकीर कशाला करायची?’’ आणि ते गाणं तसंच राहिलं. मीनाजी ते करू शकल्या नाहीत हे दुर्दैव…
दुसरं गाणं होतं, ‘‘गंगा… गंगा की भरी गोद में…’ मन्ना डे यांनी गायलं होतं. क्रांतिकारी नावेत बसून गंगेमधून जाताहेत, असा तो प्रसंग होता… आम्ही चित्रितही केलं होतं. ते नंतर चित्रपटात राहिलं नाही.
‘मेरे अपने’ची पोस्टर्स त्या फिल्मच्या पात्रासारखी येतात आणि चित्रपट संपल्यावरही ध्यानात राहून जातात. मी प्रत्येक प्रसंगात पोस्टर्स, भिंतीवरल्या जाहिराती वेगवेगळ्या दाखवल्या आहेत. त्यावेळी बांगलादेशात नरसंहार सुरू होता. ती चित्रं मी ‘हालचल ठिकठाक है’मध्ये पार्श्वभूमीला भिंतीवर रंगवली होती…
‘मेरे अपने’च्या शूटिंगच्या वेळच्या काही आठवणी आहेत. मोहन स्टुडिओमध्ये आम्ही ‘मेरे अपने’चा सेट लावला होता. पावसाचे दिवस होते. रस्ता, दुकानं असं दाखवायचं असल्याने सेट उघड्यावर लावला होता. एक दिवस प्रचंड पावसात पूर्ण सेट कोसळला. मी अस्वस्थ झालो. त्यात सिप्पीसाहेबांना कुणीतरी म्हणालं, ‘‘त्याला एवढंही कळत नाही. पावसात उघड्यावर सेट लावतो म्हणजे काय? आणखी नुकसान करून घेण्याआधी बंद करून टाका फिल्म.’’ पण ते सिप्पीसाहेब होते. त्यांनी ते बोलणं कानामागे टाकलं आणि शांतपणे सेट पुन्हा उभारला. पण हे इथं थांबायचं नव्हतं. मीनाजींचं गावाकडचं घर दाखवणारा सेट स्टुडिओच्या आत लावला होता. स्टुडिओमध्ये अचानक आग लागली आणि तो पूर्ण फ्लोअर जळून खाक झाला. त्या हितचिंतकांनी सिप्पीसाहेबांना पुन्हा सांगितलं, ‘‘पाहिलंत? पुन्हा तसंच घडलं. निसर्गही तुमच्यासोबत नाही. तो काहीतरी सांगू पाहतोय. पण तुम्ही ऐकत नाही…’’
सिप्पीसाहेबांना पहाटेच बातमी कळली आणि ते होते तसे, कपडेही न बदलता, तडक सेटवर गेले. त्यांनी एकूण नुकसानीचा अंदाज घेतला आणि तसेच माझ्या घरी आले. मला तोवर कुणी काही कळवलं नव्हतं. सिप्पीसाहेबांच्या अंगावर नाइट सूट होता. निर्माते होते ते… सारा सेट जळला होता आणि ते दृश्य बघून माझ्याकडे आले होते. पण चेहरा शांत होता. तेव्हा मी छोट्या घरात राहायचो. त्यांना इतक्या सकाळी अचानक बघून मला आश्चर्य वाटलं. म्हटलं, ‘‘भाईसाहेब, इतक्या सकाळी सकाळी इकडे कुठे?’’ तर म्हणाले, ‘‘असाच बाहेर पडलो होतो. म्हटलं, तुझ्याकडे जाऊन थंडगार बिअर पिऊ. आहे ना तुझ्याकडे?’’ मी म्हटलं, ‘‘नाही हो, बिअर तर नाही.’’ ‘‘अरे काय हे! दिग्दर्शक म्हणवतोस आणि साधी बिअर नाही तुझ्याकडे! चल मग चहा दे.’’ चहा पिता पिता म्हणाले, ‘‘जर आपल्याला मोहन स्टुडिओमधून आपला सेट हलवायचा असेल तर काय करावं लागेल?’’ मला आश्चर्य वाटलं. म्हटलं, ‘‘का? तुम्हाला का हलवायचा आहे सेट?’’ ‘‘काही नाही रे. तिथे काहीतरी कामगारांचा संप वगैरे होणार आहे. शूटिंग होणार नाही म्हणून म्हटलं दुसरीकडे बघूया. राजकमलमध्ये करूया का?’’ मी जरा विचारात पडलो. म्हटलं, ‘‘तो सेट पूर्ण काढून पुन्हा जुळणी करून दुसरीकडे उभारणं अशक्य आहे.’’ शेवटी आता याला सांगायलाच लागणार असा चेहरा करून ते म्हणाले, ‘‘अरे मोहन स्टुडिओमध्ये काहीतरी आग लागली आहे…’’ मी घाबरून म्हटलं, ‘‘कुठल्या सेटवर?’’ तर म्हणाले, ‘‘आपल्याच. पूर्ण जळालाय सेट.’’ मला हा जबर धक्का होता. पण मला तो तसा बसू नये म्हणून ते ज्या पद्धतीने सांगत होते त्यासाठी माणसात केवळ जिगर पाहिजे! मी हादरलो होतो. माझ्या पहिल्याच सिनेमाचा सेट जळाला होता. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी म्हटलं, ‘‘मला बघायचा आहे.’’ सिप्पीसाहेब मला समजावत म्हणाले, ‘‘अरे नंतर बघ.’’ माझा आग्रह कायम होता, म्हणून ते पुन्हा माझ्यासोबत आले. आम्ही गेलो. पाहिलं. पूर्ण फ्लोअर जळून खाक झाला होता. काही म्हणजे काही राहिलं नव्हतं…
‘मेरे अपने’च्या वेळी तब्बल तीनवेळा माझ्यावर ही संकटं आली. एकदा सेट कोसळला. दुसर्यांदा अख्खा सेट जळला आणि तिसर्यांदा सिनेमाचा क्लायमॅक्स शूट करताना खुद्द मीनाजी खूप आजारी पडल्या… काही प्रसंगांत आम्हाला त्यांची डमी वापरावी लागली.
पण या सगळ्या संकटांमध्ये सिप्पीसाहेब खंबीरपणे माझ्यामागे उभे राहिले. माझं नवेपण कुठेही जाणवू न देता माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत.
शब्दांकन : प्रगती बाणखेले
(ऋतुरंग दिवाळी २०१७)
धूप आने दो
लेखक : गुलजार
प्रकाशक : ऋतुरंग प्रकाशन
मूल्य : ३५० रु.