• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

थोडक्यात गोडी

- अनंत अपराधी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 14, 2022
in पुस्तकाचं पान
0

प्रसिद्ध विनोदी लेखक अशोक नायगावकर यांचे ‘नायगावकरी’ हे पुस्तक अनघा प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातील हा एक लेख.
– – –

प्रिय तातूस,
खूप दिवसांनी तुला लिहितोय. वॉर्डमधला आयडॉल म्हणून तुझी निवड झाली याबद्दल प्रथम अभिनंदन. आम्ही तुझ्या वॉर्डमध्ये असतो तर पोत्याने एसएमेस केले असते. तुझ्या भागातला सर्वात शहाणा माणूस म्हणून निवड होणं हे तसं अवघडच होतं. गोव्यात सध्या कुठले सरकार आहे या प्रश्नाचं उत्तर केव्हाही अवघडच असतं. पण तू तात्काळ ‘माहीत नाही’ असं म्हटल्यावर परीक्षकांनाही माहीत नसल्याने अखेरच्या क्षणी तू जिंकलास. तिथल्या लोकल वाहिनीवर हा कार्यक्रम लाइव्ह दाखवल्याने आजूबाजूच्या सर्वांनाच पाहता आलं. खरं तर एसएससीला माझ्यापेक्षा कमी मार्क पडूनही तू पुढे गेलास याचं थोडं वाईटही वाटलं. आमची ही तर म्हणते बघा, ‘भावजी कुठच्या कुठं गेले! नाहीतर तुम्ही? मलादेखील इथल्या एका दुकानदाराने ‘ब्रँड अ‍ॅम्बेसडर’ची ऑफर दिली होती. एवढा वेळ दुकानात उभं राहायचं आणि त्यात किराण्याचा वास म्हणजे कठीण वाटलं, त्यात गिर्‍हाईकाने काही विचारायला आणि तोंडात आपलं पान जमायला गाठ पडली तर प्रॉब्लेमच होणार. मी सरळ नकार दिला. हिचं म्हणणं, तेवढंच नाव तरी झालं असतं. आता बसा घरात नि घरात दिवसभर.
तीन रुपयाच्या खाली बनारसी पान मिळत नाही. आणि बजेट आलं की पहिला घाव पान-तंबाखू-सुपारीवर असतो. मला तर आपली एक संघटना बांधून सरकारवर मोर्चा न्यावा असं वाटतं. सिगरेट कंपन्या एवढे लाखो रुपये खर्चून गाण्याचे कार्यक्रम करतात, मग आम्हाला का नाही स्पॉन्सर करणार? आबांशी बोलून काही करता येईल काय बघतो. ते मला या एका गोष्टीमुळे आपले वाटतात. पण संघटना आली की कार्यालय आलं. फोन आला. बरं, आपण बार तोंडात असताना बोलतो त्यामुळे रिसिव्हर साफ करणं आलं. आता रंगाचा प्रश्न सर्वच पान खाणारे असल्याने येणार नाही म्हणा, कधीतरी अर्थमंत्र्यांना अडकित्त्यात पकडून सुपारीसारखं फोडावं असं वाटतं. आता अर्थमंत्र्यांचंही बरोबरच आहे म्हणा. त्यांनी तरी एवढा खर्च कसा भागवायचा? नवीन निवडून येणार्‍यांना नव्या कपबश्या, आतलं डेकोरेशन, बंगल्याची डागडुजी म्हणजे पैसा लागणारच. त्यात पुन्हा आधीच्या राहणार्‍यांनी डुप्लिकेट चाव्या बनवल्या असतील या भीतीने कुलुपंदेखील बदलावी लागतात. नाना म्हणत होता, बँकेतदेखील हल्ली नवे मॅनेजर आले की कुलुपं बदलावी लागतात. (आपल्याकडे इतकी अनास्था आहे की सिक्युरिटी गार्ड बिचारे खुर्चीतच पेंगत असतात. त्यांची रात्री झोपायची पण धड सोय करत नाहीत. असो.) अरे, आपला घरचा खर्चच चालवणं इतकं कठीण झालंय तर एवढ्या मोठ्या देशाचा खर्च चालवणं म्हणजे अवघड काम आहे. अर्थमंत्र्यांना म्हणे रोज बँकेत लवकर जाऊन पैसे काढावे लागतात आणि मग सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना पैसे द्यावे लागतात. पुन्हा संप किंवा सुट्टी असली तर आदल्या दिवशी एवढी रक्कम काढायची म्हणजे रिस्कच. मी तर पैसे काढायचे तर आधी पैसे पिशवीत खाली कांदे ठेवतो, वर पैसे आणि त्याच्यावर मेथीची जुडी म्हणजे कुणालाच शंका येत नाही. मुली तर म्हणतात, तुमच्याकडे बघून कुणाला शंकापण येणार नाही. घरातले सगळे हल्ली मला बावळटात काढतात. उन्हाळा असला तरी मी त्यांना म्हणतो, उगाच नाही एवढे पावसाळे काढले. त्यावर एवढे पावसाळे काढले तरी दरवर्षी छत्री हरवून येता, म्हणतात. मुलांना आपल्यापेक्षा जास्त शिकवू नये म्हणतात ते काही खोटं नाही म्हणा.
आता दहा हजारांच्या वर काढले तर म्हणे त्याच्यावर पण टॅक्स लावणार आहेत. सचिन एवढा वेळ उगाच नाही ९९९९ वर थांबला, त्यालाही भीती आपल्याला टॅक्स लागेल की काय! दहा हजारच्या वर रन काढणं म्हणजे अर्थात खायची गोष्ट नाही. म्हणजे एकूण किती किलोमीटर होतात ते कळवलंस तर बरं होईल. हल्ली कोण काय प्रश्न विचारेल तर सांगता आलं पाहिजे आणि तेवढंच जनरल नॉलेज. इतक्या सेंच्युर्‍या मारूनसुद्धा त्याचं समाधान झालेलं नाही. थोडक्यात गोडी असते. मेट्रिक पद्धती आली आणि सेंच्युर्‍यात मोजायला लागले. नाहीतर आपल्या वेळेला डझन ग्रोसचाच हिशेब होता. काळाबरोबर सगळं बदलतं म्हणा. यंदा परीक्षेच्या दिवसांत दौरा आखल्याने मुलांवरचा अभ्यासाचा ताण कमी झालाय. परीक्षेच्या वेळी खरं तर टीव्हीचीसुद्धा सोय पुढच्या वर्षापासून करणार आहेत. मुलांचं तेवढंच मनोरंजनही होईल आणि मॅच चालू असेल तर पेपर लिहिता लिहिता स्कोअरपण कळेल. हल्ली बर्‍याच ठिकाणी मुलांना धीर द्यायला पालकदेखील पेपर सोडवताना हजर असतात. देशासमोरचं जाऊ द्या, पण निदान परीक्षेचे प्रश्न तरी असं सर्वांनी एकत्र येऊन सोडवायला खरं तर काय हरकत आहे. पण पोलिसांना कोण समजावणार? परवा बर्‍याच ठिकाणी पालकांना चिठ्ठ्यांसह हुसकावून लावलं. लाठीमार पण झाला. एरवी मराठी माणूस मागे आहे म्हणून ओरडायचं आणि आता बिचारे पुढे येताहेत तर केवढा गदारोळ उठवतायत. काहीही करून आता आपल्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. ‘वाकेन पण मोडणार नाही’ ही भूमिका स्वीकारली पाहिजे असं वाचलं.
अरे, परवा लग्नात मी पहिल्या पंक्तीला खुर्ची पकडली. तर मला तिथून उठवलं आणि मागच्या पंक्तीला बसा म्हणाले. मी उगाच डोक्यात राख घालून न घेता अर्धा तास बसून राहिलो. अपमान झाला म्हणून काय झालं, जेवायला मिळाल्याशी कारण! कदाचित तू स्वाभिमानी असल्याने हे विचार पटणार नाहीत. पण मी हल्ली स्पष्ट बोलायचं ठरवलंय.
पुन्हा एकदा तू तिथला आयडॉल झाल्याबद्दल अभिनंदन.
सचिनला देखील पत्र पाठवायचंय. लहानपणी किती लहान होता. पण सारखं क्रिकेट एके क्रिकेट खेळून त्याला कंटाळा कसा येत नाही. खरं तर आता त्याने दुसर्‍या खेळात भाग घ्यायला पाहिजे असं वाटतं, असो,
तुझा
अनंत अपराधी

Previous Post

श्याम जोशी : एक खट्याळ व्यंगचित्रकार

Next Post

मेरे अपने… सिप्पीसाहेब!

Next Post

मेरे अपने... सिप्पीसाहेब!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.