पर्यटकांना विदेशात घेऊन जायचे आणि गाडीतून फिरवून देश दाखवायचा व्यवसाय सुरु झाला २०१३मध्ये… आपण विदेशात ज्या प्रकारे फिरतो त्याचा व्यवसाय होईल असे मला कधीच वाटले नव्हते. मित्रांच्या आग्रहाखातर सुरु केलेला हा व्यवसाय कितपत यशस्वी होईल, लोकांना तो कितपत आवडेल, असे प्रश्न मनात होते. आपण ज्या देशात गेलेलो नाहीत, त्या ठिकाणी पर्यटकांना घेऊन जाण्याचे ठरले, त्यासाठी भरपूर होमवर्क केला आणि २०१३च्या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाला ट्रीप नेण्याचे पक्के केले. जुलै महिन्यापासून त्याचे नियोजन सुरु केले. तिथून या ट्रीपच्या माऊथ टू माऊथ पब्लिसिटीला सुरवात झाली. आपल्यासोबत आलेले पर्यटक खूष झाल्यामुळे मला देखील आनंद झाला होता.
– – –
बहुतेकांना कोणता ना कोणता छंद असतो, काहीजण त्याचा वापर मर्यादित स्वरूपाचा करतात, तर काहीजणांच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात कसे झाले, हे त्याचे त्यांना समजत नाही. मला पहिल्यापासूनच भटकण्याची सवय, दर वर्षाला देशातले एखादे राज्य निवडायचे, तिथली हट के लोकेशन्स शोधायची, बॅग भरायची आणि कुटुंबासोबत ट्रिपला बाहेर पडायचे. या ट्रिपसाठी दोन आठवड्याचा वेळ राखून ठेवायचा. या उपक्रमाची सुरवात सुरु झाली १९९७मध्ये. २००० साली मी यूरोप फिरायला गेलो. मीच तिकीट काढले, ऐनवेळी हॉटेलचे बुकिंग केले, अगदी माझ्या सोयीनुसार मी ती ट्रिप केली. त्यानंतर २००३मध्ये सिंगापूर, २००५मध्ये थायलंड अशा ट्रिपा केल्या.
२०१० साली मी इंग्लंडला फिरायला गेलो, तेव्हा ही सफर गाडी चालवत करायची हे निश्चित केलं होतं. तिथे पोचल्यावर गाडी भाड्याने घेऊन इंग्लंड, स्कॉटलंड अशी सेल्फ ड्राइव्ह रोड ट्रिप केली. लंडन, मँचेस्टर, लेक डिस्ट्रिक्ट अशी सगळी सफर स्वत: गाडी चालवत पूर्ण केली. या सफरीत नवी ठिकाणे पाहायला मिळाली. मनमोहक निसर्गरम्य दृश्य दिसले की गाडी थांबवायची, फोटो काढायचे, तिथे रमायचे, तिथल्या लोकांशी संवाद साधायचा, तिथल्या पदार्थाची चव चाखायची, त्यामुळे त्या ट्रिपला फारच मजा आली. पुण्याला परतल्यावर त्या सेल्फ ड्राइव्ह ट्रिपची माहिती मित्रमंडळीपर्यंत पोहचली होती. त्यांचा आग्रह सुरू झाला, तू स्वतः गाडी चालवत फिरतोस, तर हाच व्यवसाय का करत नाहीस? ट्रॅव्हलिंगची ही कन्सेप्ट फारच भन्नाट आहे, तिला चांगला रिस्पॉन्स मिळेल. व्यवसायाने सीए असणारा मित्र जयेश दुधेंडिया याने तर आग्रहच धरला… मग मी हे धाडस केलं आणि माझ्या पॅशनमधून उभा राहिला हा अनोख्या फॉरमॅटचा व्यवसाय… इतकेच नाही तर पहिल्याच ट्रिपमध्ये तो पर्यटकांच्या पसंतीला उतरला…
सीएचे शिक्षण, पेन्टिंगचा व्यवसाय
तसा माझा पर्यटनाच्या व्यवसायाशी काहीच थेट संबंध नाही. मी पेशाने सीए. १९९३मध्ये पुण्याच्या बीएमसीसी
कॉलेजमधून बी.कॉम झाल्यानंतर सीए, आयसीडब्ल्यूएचे शिक्षण पूर्ण झाले. घरचा रंगकामाचा व्यवसाय होता. त्यामुळे सीए करत असताना देखील घरचा व्यवसाय पुढे चालवायचा, कुठेही सीएचे प्रोफेशन करायचे नाही, नोकरी करायची नाही, काहीतरी वेगळे करायचे, हे ध्येय सुरुवातीपासून ठेवले होते. घरचा व्यवसाय सांभाळत वर्षातून एकदा देशात कुठेतरी फिरायला जायचे, एक वेळापत्रक सेट होऊन गेले होते. २०१०पासून विदेशात फिरायला लागलो. २०१२पर्यंत दरवर्षी युरोपमधले दोन देश, अमेरिका नॉर्थ वेस्ट कोस्टपर्यंतचा ८००० किलोमीटर अंतराचा प्रवास स्वतः कार चालवत पूर्ण केला. त्यात नऊ नॅशनल पार्क, पाच मोठी शहरे त्यामध्ये कॅलिफोर्निया, नेवाडा, ओरिझोना, मॉन्टाना, ओरेगॉन अशी राज्य गाडीने प्रवास करून पहिली. गाडीने प्रवास करताना बर्याचदा विरळ लोकसंख्येचा प्रदेश, गाडी बंद पडणे, पंक्चर होणे, अशा अडचणींना सामना करायला लागू शकतो, याची तयारी ठेवावी लागायची.
सुरुवातीला मी आणि माझी पत्नी आरती आम्ही दोघेच जण असायचो. स्वतः गाडी चालवत तो देश बघण्यात जी मजा आहे, ती एखाद्या टूरसोबत जाऊन अनुभवता येणार नव्हता. पण, कशाला नको ते साहस करतोयस, एखाद्या टूर कंपनीबरोबर जायचे, देश बघायचा, परत यायचे, ते कसे अगदी सुरक्षित असते, त्यांच्यावर आपली जबाबदारी असते, अशी पट्टी मला नातेवाईकांनी पढवू पाहात होते. पण त्याकडे लक्ष द्यायचे नाही, हो ला हो करायचे, हे मी ठरवले होते. साहसाची मला पहिल्यापासूनच आवड.
२०१३ मध्ये व्यवसायाला सुरुवात
पर्यटकांना विदेशात घेऊन जायचे आणि गाडीतून फिरवून देश दाखवायचा व्यवसाय सुरु झाला २०१३मध्ये… कोणतीही जाहिरात न करता, ऑफिस न थाटता करत असलेल्या या व्यवसायाला किती प्रतिसाद मिळेल, याची कल्पना नव्हती. आर्थिकदृष्ट्या हे कितपत परवडेल, हाही प्रश्न होताच. नेमका मी ज्या देशात गेलेलो नव्हतो, त्याच ठिकाणी पर्यटकांना घेऊन जाण्याचे ठरले. भरपूर होमवर्क केला आणि २०१३च्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाला ट्रिप नेण्याचे पक्के केले. जुलैपासून त्याचे नियोजन सुरु केले. पहिलीच व्यावसायिक ट्रिप घेऊन जाताना सहा लोक जमतील की नाही अशी धाकधूक मनात होती, पण चक्क १२ जण जमले, त्या ट्रिपसाठी. मनातून आनंद झाला होता, पण ती एकदम हटके करण्याचे एक आव्हान माझ्यासमोर होते.
नोव्हेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार सर्व १२ जणांना घेऊन ऑस्ट्रेलियात दाखल झालो. सिडनी, मेलबोर्न, ग्रेट ओशन रोड या जागा दाखवताना ग्रेट बॅरियर रीफ (ज्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे नैसर्गिक कोरल फॉर्मेशन आहे ती जागा) रस्ताने ब्रिस्बेन ते केन्स (पोर्ट डग्लस) असा एकूण १७४३ किलोमीटर अंतराचा प्रवास स्वतः गाडी चालवत या पर्यटकांना प्रवासात येणारी विविध ठिकाणे दाखवली. पर्यटकांना अनोखा अनुभव आला, त्यांनी या नियोजनाचे तोंडभरून कौतुक केले. जोरदार माऊथ पब्लिसिटी झाली.
टाऊन ऑफ १७७०मध्ये एक मँगो ट्री मोटेल नावाचे हॉटेल होते, तिथे आम्ही सर्वजण गेलो होतो. तेव्हा, हॉटेलचा मालक म्हणाला, भारतातून इथे पर्यटकांना फिरायला घेऊन येणारे तुम्ही पाहिले असाल. त्याच्या त्या वाक्यावर मी दोन मिनिटे थबकलो होतो. पण ती माझ्यासाठी चांगल्या कामाची एक पावतीच होती. पर्यटकांना सोयीचे काय आहे ते दाखवण्याऐवजी उत्तम काय आहे ते दाखवायचे, हे मी पहिल्यापासूनच ठरवले होते. त्यात कुठेही तडजोड करायची नाही, हे निश्चित केले.
एखादा देश पाहण्यासाठी उत्तम काळ कोणता याचा विचार करूनच ट्रिपचे नियोजन करायचे ठरवले होते, त्यामध्ये आजतागायत कोणताही बदल झालेला नाही आणि भविष्यात देखील होणार नाही.
अंतर्गत रस्त्याने फिरण्यात मजा
विदेशात महामार्गाने फिरण्याऐवजी अंतर्गत रस्त्यानं फिरण्यात वेगळीच मजा मिळते. त्या देशाची खासियत काय आहे, याची जवळून ओळख होते. लोकल फूडची चव घेता येते. त्या परिसरातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अनुभव घेता येतो. स्थानिक लोक कसे जगतात, त्यांची भाषा, वेश, जेवणातील पदार्थ, असे अनेक पैलू जवळून अभ्यासात येतात. त्याची मजा काही वेगळीच असते. २०१४च्या मे महिन्यात झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, हंगेरी अशी ईस्टर्न युरोपची सहल आयोजित केली होती. तिला देखील १२ पर्यटक आले होते. तेव्हा आपल्यासोबत आलेल्या पर्यटकांनी देखील गाडी चालवावी म्हणून मी त्यांना प्रेरणा दिली, त्यामुळे पर्यटक देखील खूश झाले.
चुकीला माफी नाही
विदेशात गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमनाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. अतिवेगाने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, शहरात फिरत असताना स्कूल बसच्या पुढे जाणे, बर्याचदा एखाद्या देशात भाषा समजत नसल्यामुळे गाडी पार्किंग करताना अनवधानाने होणारी चूक महागात पडू शकते. तिथे चूक केली की त्याचा दंड भरावाच लागतो, तिथे चुकीला माफी नाही.
२०१४मधली गोष्ट असेल अशीच ट्रिप घेऊन मी न्यूझीलंडला गेलो होतो. तिथे वेगमर्यादा लक्षात न आल्याने मला दंड भरावा लागला होता. ट्रिप पूर्ण करून मी पुण्याला परतलो, तेव्हा मी ज्या कंपनीकडून गाडी भाड्याने घेतली होती, त्यानी ते चलन माझ्या पुण्याच्या पत्त्यावर पाठवले होते, दंडाची रक्कम मला भरावी लागली होती. एकदा तर ग्रीसमध्ये भाषा समजत नसल्यामुळे चुकून नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावली होती, त्याचा दंड मी तिथल्या पोस्ट ऑफिसमध्ये भरला होता. गाडी पंक्चर होण्याचे प्रसंग अनेकदा आले.
अनुभव दक्षिण आफ्रिकेचा
२०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये टूर घेऊन गेलो होतो, तेव्हा हा देश खूप असुरक्षित आहे, आपण चाललो आहोत, पण इथे लुटालुटीचे प्रकार होतील, अशी भीती पर्यटकांच्या मनात होती. पण ती ट्रिप अगदी उत्तम झाली. जोहानन्सबर्ग, केपटाऊनपासून ते वायनरीसाठी जगात प्रसिद्ध असणार्या जॉर्जटाऊनपर्यंतचा तीन हजार किलोमीटरचा प्रवास सुरक्षित केला होता.
फेमस जपान
जपानमधल्या पायाभूत सुविधा उत्तम आहेत, असे आपण ऐकत असतो. अनेकजण तिथे गेले की बुलेट ट्रेनमध्ये बसायचा चान्स सोडत नाहीत. प्रत्यक्षात जपान रस्त्याने फिरत असताना तिथल्या पायाभूत सुविधा कशा उभ्या केल्या जातात याचा अनुभव घेता आला. पर्यटकांना देखील तो देता आला. तिथले रस्त्याचे नेटवर्क अगदी पाहण्यासारखं आहे. जपानमधल्या अनवट जागा, कंट्रीसाइड सुंदर जागा, याखेरीज टाकायामा, शिरकवागो, क्रोब हा बर्फाच्छादित प्रदेश, माउंट फुजी परिसरातील तळी, आशिकागा येथील इस्टोरिया फ्लॉवर पार्क अशा कितीतरी अनोख्या जागा सांगता येतील. हे सर्व पाहून पर्यटक भारावून गेले होते.
टूरचा व्यवहार पारदर्शी
व्यवसायात पारदर्शीपणा ठेवण्याचे तत्व पहिल्यापासून पाळत आलो आहे. कोणतेही पॅकेज करून त्याची विक्री न करता प्रवाशांना पुणे ते पुणे प्रवास खर्च, तिथले राहणे खाणे, फिरणे, पर्यटनाच्या ठिकाणी असणारी एन्ट्री तिकिटे, अन्य प्रासंगिक खर्च याची पूर्वकल्पना दिली जाते. किती सेवा खर्च लागणार आहे, हेही सांगितलं जातं. पर्यटकांची संख्या मर्यादित असल्यामुळे टूरच्या दृष्टीने ते बरे पडते. २०२०नंतर कोरोनामुळे व्यवसाय बंद झाला होता. पण आता सारं पुन्हा एकदा खुलं होतंय. परदेशप्रवासाचे नियोजन कसे करायचे, तिकीट, व्हिसा, विमा, हॉटेल बुकिंग, तिथले डे-टू-डे नियोजन, मेट्रो कुठे पकडायची, कुठे कसे जायचे याचे नियोजन करून देण्याचे काम देखील सुरु केले आहे.
शब्दांकन – सुधीर साबळे