प्रबोधनकारांनी वैदिक विधीनुसार लावलेली लग्नं ही सत्यशोधकी लग्नं असल्याचं मानण्याची गफलत होताना दिसते. कारण या दोन्ही लग्नांच्या पद्धतीत ब्राह्मण पुरोहितांची आवश्यकता नाकारली होती.
– – –
हिंदू मिशनरी सोसायटीच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून गजाननराव वैद्य यांनी वैदिक विवाहविधींचं संशोधन केलं होतं. त्याच पद्धतीनुसार प्रबोधनकारांनी काकडवाडीत तुकाराम काकडेंचं लग्न १९२९ साली लावलं. त्याचे तपशील महावीर मुळे यांच्या संशोधनामुळे उपलब्ध झाले आहेत. `सत्यशोधक प्रबोधनकार आणि कर्मवीर` या त्यांच्या पुस्तकात या सगळ्या गोष्टी आहेत. पण आश्चर्य म्हणजे महावीर मुळे पुस्तकाच्या सुरुवातीला असणार्या लेखकाच्या मनोगतात लिहितात, `श्री. काकडे यांच्या विवाहासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सत्यशोधक आले होते. काकडे यांचे लग्न सत्यशोधकीय पद्धतीने प्रबोधनकारांनी लावले होते.`
काकडेंचा विवाह वैदिक पद्धतीने झाला असला तरी लग्नाशी संबंधित सगळीच मंडळी सत्यशोधक चळवळीशी जोडलेली होती, त्यामुळे ही गफलत झाली असावी. स्वतः नवरा मुलगा असलेले काकडे, लग्नाचं पौरोहित्य करणारे प्रबोधनकार, लग्नप्रसंगी भाषण करण्यासाठी आलेले `राष्ट्रवीर`कार श्यामराव देसाई, कर्मवीर भाऊराव पाटील हे सगळेच सत्यशोधक होते. लग्नात वेद नाकारणार्या महात्मा जोतिबा फुलेंच्या विचारांच्या प्रभावातलं वातावरण होतं, पण लग्न मात्र लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने तयार झालेल्या वैदिक विवाहविधीने झालं होतं. तरीही महावीर मुळेंसारखा जाणकार अभ्यासकही या लग्नाला सत्यशोधकी पद्धतीचं लग्न म्हणून गेलाय.
वैदिक आणि सत्यशोधकी लग्नांच्या पद्धतीतलं महत्त्वाचं साम्य म्हणजे दोघांनीही लग्न लावण्यासाठी ब्राह्मण नाकारला होता. हे साम्य इतकं ठसठशीत आणि महत्त्वाचं आहे की त्यामुळे या दोन पद्धती एकच वाटू शकतात. वैदिक विवाहविधी रचणारे गजाननराव वैद्य स्वतः ब्राह्मणेतर होते. त्यांच्या या पद्धतीचा प्रचार करणारे प्रबोधनकारांसारखे मुख्य प्रचारकही प्रामुख्याने त्यांच्यासारखेच सीकेपी म्हणजे कायस्थ होते. त्यांनी एकीकडे ब्राह्मण जातीच्या पुरोहिताची आवश्यकताच नाकारली होती, पण त्याबरोबरच ब्राह्मण पुरोहितांकडून होणार्या प्रचलित विवाहविधीच्या तुलनेत प्राचीनतेच्या जवळ जाणारा असा वेदाधारित विधी रचला होता. एखाद्या ब्राह्मण जातीच्या पुरोहिताने वैदिक पद्धतीने लग्न लावलं, तर त्याला त्यांची हरकत नव्हती. पण ब्राह्मण पुरोहितांना जुनी पद्धत सोडून नव्या पद्धतीकडे वळण्याची गरज वाटत नव्हती. शिवाय ब्राह्मणेतरांची लग्नं वैदिक पद्धतीने लावण्यासाठीही ते तयार नव्हते.
गजाननराव वैद्य लग्नासाठी ब्राह्मण नाकारू शकले, त्यासाठीची सामाजिक पार्श्वभूमी सत्यशोधक चळवळीनेच तयार केली होती. स्वतः जोतिबांनीच सत्यशोधकी पद्धतीच्या लग्नाची विधी रचली होती, असं मानलं जातं. `ब्राह्मणांचे कसब` या पुस्तकात अशा बदलांची गरज असल्याचंही सूतोवाच केलं होतं. जोतिबांचे सहकारी आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी जून १८८७ला `सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी` ही पुस्तिका प्रकाशित केली होती.
त्याविषयी डॉ. सदानंद मोरे `विद्रोहाचे व्याकरण` या पुस्तकात लिहितात, `अद्वैती ब्राह्मणी धर्म ब्राह्मणश्रेष्ठत्व आणि शूद्रातिशूद्र व स्त्रिया यांचे नीचत्व यावर आधारित असल्याचे आढळून आलेल्या जोतीरावांनी आपल्या नव्या धर्मात या गोष्टींना फाटा द्यावा हे ओघाने आले. पण तात्त्विक मांडणीचा मुद्दा जसा महत्त्वाचा असतो, तसाच दैनंदिन जीवनातील काही विशिष्ट कर्मांना अधिमान्यता, पावित्र्य देण्यासाठी ज्या धार्मिक विधींची आवश्यकता असते तेही महत्त्वाचे असतात… जोतीराव ब्राह्मणी धर्म व त्याची गृहीतके नाकारतात, तसेच ते त्यांचे प्रवक्ते असलेल्या ब्राह्मण पुरोहितांची मक्तेदारीही नाकारतात. पण धर्माच्या क्षेत्रात नुसते नाकारून भागत नाही. नाकारल्यानंतर धर्मजीवनात जी पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे आवश्यक असते. ब्राह्मणी पद्धतीचे कर्मकांड नाकारल्यावर त्याला पर्याय देणे जोतीरावांसाठी व त्यांच्या धर्मासाठी आवश्यक होते.`
जोतिबांनी हा पर्याय सत्यशोधकी लग्नविधीमधून दिला. त्याला ते `मंगलरूप करार` म्हणतात. या लग्नात ब्राह्मण पुरोहिताच्या जागी वधूवरांच्या जातीचा लग्न लावणारा अपेक्षित आहे. पण तो मंगलाष्टकं म्हणत नाही. तर वधू आणि वरच मराठीतली मंगलाष्टकं म्हणत एकमेकांशी संवाद साधतात. नंतर प्रतिज्ञारूपी वचन देतात. काही मंगलाष्टकं लग्नाला हजर असणार्यांसाठी आहेत. शिवाय बहुजन समाजात परंपरेने चालत आलेल्या कुलाचारांना, कुलदेवतांच्या पूजेलाही यात स्थान आहे. विशेष म्हणजे मुलगी सासरी नेताना त्यांनी दानाचा असा आग्रह केलाय, `पोरक्या मुली मुलांस व अंधपंगूंस शक्यतेनुसार दानधर्म करत आपल्या गावी जावे.` शिवाय शेवटी म्हणण्यासाठी आदिसत्याच्या दोन आरत्याही आहेत.
जोतिबांच्या या नव्या पद्धतीनुसार आताच्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर-ओतूर परिसरात काही लग्नं झाली. ब्राह्मण पुरोहितांना नाकारून लग्नं लावणं, ही फारच मोठी बंडखोरी होती. त्याचबरोबर पुरोहितांना वारसा हक्काने चालत आलेली दक्षिणाही नाकारली होती. त्यामुळे ओतूरच्या ब्राह्मणांनी १८८४मध्ये सत्यशोधकी लग्न लावणार्या डुंबरे पाटलांच्या विरोधात कोर्टात फिर्याद केली. खालच्या कोर्टाने फिर्यादी ब्राह्मणांचा दावा योग्य मानून ब्राह्मणांना दक्षिणेचा अधिकार दिला. पण प्रतिवादींनी जिल्हा कोर्टात अपील केलं. त्याने मात्र ब्राह्मण पुरोहिताशिवाय लग्न लावण्याचा अधिकार मान्य केला, पण पुरोहिताचा दक्षिणेचा हक्कही मान्य केला. पुढे १९२६मध्ये सत्यशोधक चळवळीतले थोर समाजसुधारक सी. के. बोले यांनी ब्राह्मणांना पौरोहित्याचा हक्क देणारं जोशीवतनच रद्द करण्याचं विधेयक मुंबई इलाख्याच्या कौन्सिलमध्ये मांडलं. त्याचा कायदा झाल्यावर ब्राह्मणांचा पौरोहित्याचा कायदेशीर अधिकारच संपला.
सत्यशोधकी लग्नांमुळे सुरू झालेल्या लढ्यातून ब्राह्मणेतरांना पौरोहित्याचा कायदेशीर अधिकार मिळाला. त्यामुळेच हिंदू मिशनरी सोसायटी वैदिक विवाहांमध्ये ब्राह्मणी पौरोहित्याची सक्ती सहजपणे नाकारू शकली. तिथे करवीर संस्थानात छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच ब्राह्मणेतर पुरोहित निर्माण करण्यासाठी पावलं उचलली होती. त्यांनी उभारलेल्या वैदिक विद्यालयाच्या तीन वर्षांच्या कोर्समधून बहुजन समाजातून अनेक पुरोहित तयार झाले. शाहू महाराजांवर सत्यशोधकी विचारांचा पगडा असला तरी त्यांनी वेद नाकारले नव्हते. उलट वेदांचा प्रसार करणार्या आर्य समाजालाही उदार आश्रय दिला होता. त्यानुसारच त्यांनी वैदिक पद्धतीच्या पण बहुजन समाजातल्या पुरोहिताकडून होणार्या लग्नाचा शिरस्ता पाडला होता. ती पद्धत वैदिक असली तरी गजाननराव वैद्यांच्या पद्धतीबरहुकूम नव्हती.
काकडवाडी गावातले तुकाराम काकडे यांनी शाहू महाराजांच्याच कोल्हापूरच्या वैदिक पाठशाळेत शिक्षण घेतलं होतं. पण त्यांनीही प्रबोधनकारांना बोलावून वैदिक पद्धतीने लग्न लावून घेतलं. या वैदिक पद्धती मूळ वेदांमधलं तेवढंच शुद्ध आणि लोकपरंपरेतून आलेल्या चालीरीतीच्या विधी मात्र अशुद्ध मानत होत्या. त्याचवेळेस सत्यशोधकी विवाहविधी लोकपरंपरेला आणि लोकभाषेला मान्यता देत होता. हे प्रबोधनकारांमधल्या सत्यशोधकाला आवडायला हवं होतं, पण या मुद्द्यावर प्रबोधनकारांमधल्या हिंदू मिशनरीने सत्यशोधकी लग्नविधीवर टीका केली आहे, हेही लक्षात ठेवायला हवं. सत्यशोधकी विवाह पुरोहिताचं महत्त्व टाळून वधूवरातील थेट संवादालाच विधी मानत होता. सर्व उपस्थितांना विवाहविधीत सामावून घेत होता. महाराष्ट्रातल्या वैदिक विवाहविधीच्या तुलनेत बराच आधीचा असूनही तो बुद्धिनिष्ठेच्या निकषांवर अधिक आदर्श मानायला हवा. याच दरम्यान प्रार्थना समाजानेही अनुयायांसाठी एक विवाहविधी तयार केला होता, याचीही नोंद करायला हवी.
एकीकडे सत्यशोधकी विचारांचा स्वीकार आणि दुसरीकडे वैदिक विवाह विधीचा प्रसार या गोष्टी प्रबोधनकारांच्या कोणत्याही एका चौकटीत न अडकलेल्या जीवनात घडत होत्या. पण या सगळ्या गोष्टींपेक्षाही प्रबोधनकारांनी त्यांच्या स्वतःच्या लग्नात घातलेल्या अटी जास्त महत्त्वाच्या होत्या. अत्यंत गरीब घरातली आणि त्यातही गरिबीमुळे लग्न लागण्यास अडचण असलेली मुलगीच करणार, हे त्यांनी ठरवलं आणि ते प्रत्यक्षात आणलंही. त्यांना मुलगी बघण्याचा रिवाज मान्य नव्हता. मुलीलाही मुलगा निवडण्याचा अधिकार देण्याची गरज ते मांडत होते. त्यांनी हुंडा घेतला नाही आणि पुढे हुंड्याच्या विरोधात मोठी चळवळ चालवली. जरठबाला विवाहांचा त्यांनी विरोध केला. तसंच विधवाविवाह आणि आंतरजातीय विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी मुलीला वस्तू ठरवून तिचं कन्यादान करण्यालाही विरोध केला होता. पण वैदिक विवाह विधीत कन्यादान हा एक महत्त्वाचा विधी होता.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे एक आठवण सांगतात, ती या संदर्भात महत्त्वाची आहे. त्यांचे वडील थोर संपादक `शिवनेर`कार विश्वनाथराव वाबळे यांचं लग्न ठरलं तेव्हा प्रबोधनकारांनी त्यांना पत्र पाठवलं. त्यातल्या मजकुराचा आशय असा होता, `मी माझं लग्न करताना एक अत्यंत अन्याय्य अशी रुढी पाळून चूक केली होती. मी माझ्या बायकोचं नाव बदललं होतं. तू सत्यशोधक आहेस, तू मात्र ती चूक करू नकोस.`
रजिस्टर्ड मॅरेज आणि त्याहीपुढे जाऊन लिव्ह इन रिलेशनच्या आजकालच्या जमान्यात लग्नाच्या विधींच्या कर्मकांडांना उत्सवी रूपाशिवाय फारसं महत्त्व उरलेलं नाही. त्यामुळे प्रबोधनकारांच्या वैदिक विवाहविधीच्या संपादनापेक्षाही त्यांनी त्यांच्या लग्नातून घालून दिलेला स्त्रीसन्मानाचा आदर्श आज अधिक महत्त्वाचा ठरतो आहे.