□ जुहू येथील `अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम १५ दिवसात हटवा! राणेंना पालिकेचा अल्टिमेटम
■ अरे देवा, असं कसं झालं?… महाविकास आघाडी सरकार पडणार होतं ना याच महिन्यात? ज्योतिषीबुवांना हे भविष्य नाही दिसलं?
□ कॉपीबहादर झाले उदंड. आतापर्यंत १३९ जणांना पकडले. यंदा कॉपीचा अमरावती पॅटर्न
■ जवळपास दोन वर्षं ऑनलाइन शिकूनही मुलं ऑफलाइन कॉपीचं तंत्र विसरली नाहीत, हे कौतुकास्पदच म्हणायला हवं, नाही का!
□ मॅगी, दूध, कॉफी महागले
■ कशाला नसते निरुपयोगी विषय काढतात बातम्यावाले?… कापा, मारा, हाणा, नष्ट करा, द्वेष करा… हाच आपल्या राष्ट्रीय दुकानातला माल आहे ना!
□ राज्यभरात उन्हाचे चटके, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट
■ टाळेबंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच चाकरमान्यांना निढळाच्या घामाचा पैसा आहे, बोलियाचा काम नाय, असं बोलायची संधी मिळणार तर.
□ दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना का भडकावले? उच्च न्यायालयाने `हिंदुस्तानी भाऊ’ला फटकारले
■ भाऊने कुणाची सुपारी घेतली असणार, हे उघडच आहे…
□ रशियाची चीनकडे लष्करी सामग्रीची मागणी— अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकार्यांचा गौप्यस्फोट
■ आता चीनने ती सामग्री दिली की नाही, याचा गौप्यस्फोट बहुदा जर्मनी करेल… अरे काय चल्लाहा काय!
□ काश्मीर फाइल्स या चित्रपटाचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नव्हे, तर राजकीय : काँग्रेसचा भाजपवर आरोप
■ विवेक अग्निहोत्रीचा सिनेमा म्हटल्यावर वेगळं सांगायची गरज काय?
□ हिंमत असेल तर माझ्याशी दोन हात करा… जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीइओ एलॉन मस्क यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना दिले थेट द्वंद्वयुद्धाचे आव्हान
■ पुतीन जिंकले तर त्यांना टेस्ला कंपनीचे सीईओ करा आणि टेस्ला जिंकले तर त्यांना रशियाचे अध्यक्षपद द्या… आपोआप युद्धबंदी होऊन जाईल.
□ आदिवासी भागात बालविवाह थांबलाच पाहिजे- उच्च न्यायालय : सर्वेक्षणाचे आदेश देणार
■ आदिवासी भागाचाच अपवाद का, मागासलेल्या राज्यांमध्ये बालविवाह सर्रास सगळीकडेच होतात.
□ रशियात सामान्यांना बसला युद्धाचा फटका?
■ कोणत्या देशात आणि कोणत्या युद्धात धनवंतांना, राजकीय पुढार्यांना आणि त्यांच्या पंटरांना युद्धाचा फटका बसतो?
□ युरोपीय देशांचा भर शस्त्रआयातीवर
■ युक्रेनचं युद्ध संपून तो देश नेस्तनाबूत झाल्यावर शमीवरून काढायला हवं ना काहीतरी!
□ युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता निर्माण करण्यासाठी मध्यस्थी करण्याचे इस्त्रायलने जाहीर केले आहे
■ आखिर ज्यू ही ज्यू के काम आयेगा…
□ उमा भारतींचे खळ्ळखट्याक; भोपाळच्या आझादनगरात जाऊन दारुच्या दुकानात घुसून बाटल्या फोडल्या
■ यांची प्रज्ञा सिंगशी गाठ घालून द्या कोणीतरी, सोबर होतील जराशा.
□ कोरोना संपलेला नाही, डेल्टा-ओमायक्रोनचा संयुक्त विषाणू घडवू शकतो विनाश. जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा
■ अरे देवा, आता पुन्हा मास्क, डिस्टन्सिंग, लॉकडाऊन, टाळ्या, थाळ्या, शववाहिनी गंगा आणि ते चित्र विसरून पुन्हा दणदणीत बहुमत!
□ नेतृत्व सोनियांकडेच! तूर्त अध्यक्ष न बदलण्याचा काँग्रेसचा निर्णय
■ ते ठीक, पण, तूर्त काहीच न बदलण्याचा निर्णय असेल, तर काँग्रेसच्या स्थितीत फक्त एकच बदल होईल… आणखी अधोगती.
□ कोलकाता येथे पुस्तकमेळ्यात चोरी केल्याप्रकरणी अभिनेत्री रुपा दत्ता हिला अटक
■ पुस्तकं घेण्याइतकंही मानधन नाही मिळत बंगाली सिनेमात?
□ राज्यात हवे `वाडी तेथे वाचनालय,’ ‘गाव तेथे ग्रंथालय’… मुंबई दूरदर्शनचे निवृत्त सहाय्यक संचालक जयू भाटकर यांची संकल्पना
■ उत्तम कल्पना, पण सध्या आहेत त्या वाचनालयांतली पुस्तकं वाचली जातायत का, वाचनाची सवय शिल्लक आहे का?
□ सबका साथ, सबका विकास हवा, पण तो मुळावर येणारा नको- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
■ आता तुमच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रानेच त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
□ शत्रुघ्न सिन्हा यांना तृणमूलची उमेदवारी
■ चांगली बातमी… शत्रूची तोफ धडाडत राहिली पाहिजे…
□ ज्यात आनंदी राहाल ते क्षेत्रच निवडा- तेजश्री प्रधान
■ त्या क्षेत्रानेही आपल्याला संधी द्यायला हवी ना! शिवाय नुसत्या आनंदाने पोटही भरत नाही.
□ फडणवीसांबाबत भाजपने इतका दंगा करण्याची जरुरी नाही. साधी चौकशी तर आहे- गृहमंत्री वळसे पाटील
■ तुम्ही चौकशी केली नसती, तरी त्यांनी दंगा केलाच असता… अजेंडा एकच आहे.
□ सात दिवसांमध्ये अडीच कोटी भरा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा… किरीट सोमय्यांना लाइफ लाइनची नोटीस
■ एकेक लाइफ लाइन कटत चालली म्हणायची.