• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कुंपणावरून…

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 25, 2022
in कहीं पे निगाहें...
0

कधीतरी या दोहोंच्या मधल्या कुंपणावर बसून त्रयस्थपणे आपण कुठून आलोत, कुठे आहोत आणि कुठे चाललोत या दृष्टीने आपल्या आयुष्याचं सरड्यावलोकन करता यायला हवं. शारीरिक आणि आत्मिक गरजांचा बॅलन्स सांभाळता यायला हवा. महत्वाचं म्हणजे, दुसर्‍याची बाजू समजून न घेता आपलीच बाजू दामटणार्‍यांकडून कुंपणावरील लोकांना बुळे म्हणून हिणविले जात असले तरी, कुंपणावरच्या लोकांनी स्वत:ला न्यूनगंड येऊ देऊ नये, स्वत:ला कमी लेखू नये. कारण कुंपणावरच्या लोकांना एकाहून अधिक बाजू दिसण्याची निदान शक्यता तरी असतेच असते!
– – –

एखाद्याला खिजवून त्याच्या मर्यादित कुवतीची जाणीव करून देण्यासाठी आपण म्हणतो की ‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत’! पण आपली धाव कुंपणापर्यंतच आहे याचा सरड्याला कधी कॉम्प्लेक्स येत असेल असे मला वाटत नाही. का येईल हो? सरडा हा प्रॅक्टिकल प्राणी आहे. उगाच कुणा मोटिव्हेशनल स्पीकरच्या गोडगोड बोलण्याला फसून अटकेपार झेंडे फडकविण्याची स्वप्ने तो बघत नाही. सोसायटीच्या कार्यक्रमात गाणी गायच्या लायकीचाही गळा नसताना एका मागोमाग एक म्युझिक व्हिडीओ काढत नाही. ज्या विषयावर स्वतःहून दोनचार वाक्येही बोलता येत नाही त्या विषयाच्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमधे तोंड उचकटायला जात नाही. अशा या कुणाच्या अध्यात-मद्यात, गद्यात-पद्यात नसलेल्या सरड्याच्या मर्यादित धावेला नाव ठेवायचा आपल्याला काय हक्क आहे?
शत्रूपासून बचाव करण्यासाठी, आपल्या शरीराचा बाह्यरंग बदलता येणे हे जीवसृष्टीतील फक्त सरड्याचं वैशिष्ट्य आहे. पण या कलेत आपण मानवाने इतकी प्रगती केलीय की त्यामुळे कित्येक सरड्यांना न्यूनगंड येऊन त्यांनी दिल्लीतील एका सायकॉलॉजिस्टकडून सरडोपचार घेतल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. पोट भरण्यासाठी भक्ष्य शोधायचं आणि शत्रूपासून आपला जीव वाचवायचा, एव्हढंच सरड्याच्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे मनुष्य किंवा कुणी अन्य शत्रू येताना दिसला की आपल्या शरीराचा बाह्यरंग बदलायचा आणि ज्याच्या पलीकडे शत्रू सहसा येणार नाही अशा कुंपणावर जाऊन बसायचे ही त्याची मूलभूत प्रेरणा आहे. खरंतर ज्या कुंपणावर जाऊन सरडा बसतो ते कुंपण, ही सरड्याची नव्हे तर हातात दगड किंवा काठी घेऊन त्याच्या मागे लागलेल्या माणसाची मर्यादा आहे, हे त्या सरड्याला ठाऊक आहे. आपण मात्र ती सरड्याचीच मर्यादा असावी अशा प्रकारे हा वाक्प्रचार वापरतो. ज्यांच्याकडून चांगलं काही शिकता येईल असे सरड्यासारखे, कुत्र्यासारखे अनेक प्राणी-पक्षी आपल्या आजूबाजूला वावरत असतात. पण त्यांचे गुण घेण्याऐवजी आपण त्यांच्याकडून नेमकं चुकीचं ते उचलतो.
मी त्यातल्या त्यात हुशार असल्याने, कुणाकडून काय घ्यावं हे मला पक्के ठाऊक आहे. म्हणूनच मी लहानपणापासूनच कुंपणावर बसण्याचा सरड्याचा गुण आत्मसात केला आहे. जातपात, धर्म, देश अशा ज्या केवळ आपल्याला आपल्या जन्माने मिळणार्‍या गोष्टी आहेत त्याचाही गर्व बाळगण्याच्या या काळात, स्वकर्तृत्वाने आत्मसात आणि विकसित केलेल्या कौटुंबिक, कार्यालयीन, सामाजिक आणि राजकीय जीवनात कुंपणावर बसण्याच्या माझ्या या गुणाचा मला अतीव अभिमान आहे.
कॉलेजात असताना, आवडलेल्या पोरीला प्रपोज करावं की ‘वी आर जस्ट गुड फ्रेंड्स’ नावाच्या कुंपणावर बसून राहावं या द्विधा मन:स्थितीत मी चार वर्षे काढली. शेवटच्या वर्षी मात्र धीर धरवता न आल्याने एका बेसावध क्षणी ‘माझी लव्हशीप घितीस का?’ असं विचारून तिच्याकडून चारचौघात स्वतःला थोबाडवून घेतलं. तेव्हापासून आयुष्यातील सगळ्याच प्रश्नांबाबत कधीही, कुठलीही ठोस भूमिका न घेता मी जो कुंपणावर जाऊन बसलोय तो आजतागायत!
घरात काचेचं भांडं फुटल्याचा आवाज आला आणि त्यानंतर घरात शांतता असली तर आपण उगाचच कुणावर खेकसू नये, कुणाला जाब विचारायला जाऊ नये किंवा कुणाची बाजू घ्यायलाही जाऊ नये. ते काचेचं भांडं बायकोच्या हातून फुटलंय आणि यात चूक त्या भांड्याचीच आहे, इतकं जनरल नॉलेज आणि काहीच न ऐकल्याचा अभिनय करत शांतपणे कुंपणावर बसून राहण्याचा कॉमनसेन्स मी प्रयत्नपूर्वक विकसित केलाय. हा कौटुंबिक आयुष्यात कुंपणावर बसून राहण्याचा धडा मी कुठल्याही कोचिंग क्लासला न जाता, घरच्याघरी माझ्या लग्नानंतर महिनाभराच्या अप्रेन्टिसशिपमधेच शिकलोय. तुम्ही माना अगर नका मानू पण, माझ्या आणि माझ्यासारख्या अनेकांच्या, कौटुंबिक बाबीत कुंपणावर बसण्याच्या गुणामुळे, लाखो-करोडो संसार शाबूत राहिलेत आणि या जगातील ध्वनी प्रदूषण कित्येक डेसिबलने कमी झालंय.
पूर्वी आमची आजी आणि आई; तू इथं असताना दूध कसं उतू गेलं?, भाकर कशी करपली? अशा छोट्या छोट्या जुनाट गोष्टींवरून एकमेकींशी भांडायच्या. हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे त्यात बरीच सुधारणा झाली असून माझी बायको आणि आई, टीव्हीवर अकरा नंबरवरची सोडून अठरा नंबरवरची मालिका कशाला लावलीस?, सोशल मीडियावरील माझ्या फोटोला लाईक का नाही दिलास? किंवा माझ्या वाढदिवशी, तुझ्या व्हाट्सअप स्टेटसला माझा फोटो का नाही ठेवला अशा आधुनिक गोष्टींवरून भांडतात! अशावेळेस मी मात्र आमच्या खानदानाची परंपरा सांभाळत, कुणाचीही बाजू न घेता कुंपणावर बसून राहतो.
घरात, ऑफिसात आणि समाजात वावरतानाही शक्यतो समोरच्या माणसाच्या कलाने घेऊन कुंपणावरच बसून राहायचा माझा प्रयत्न असतो. कुंपणावर बसून राहणे लोकांना वाटते तितके, सोप्पे नसते. यासाठी समोरच्या माणसाच्या मनात काय आहे हे आधी जाणून घ्यायला हवे. त्याच्या हो ला हो मिळवता यायला हवा. समोरची व्यक्ती तिचं म्हणणं थेटपणे मांडत नसेल तर आपल्यालाही गोलगोल बोलून आपले पत्ते झाकून ठेवता यायला हवेत. समोरची व्यक्ती कितीही चुकीचं बोलत असली, खोटं बोलत असली, चिथावणीखोर बोलत असली आणि आपल्याला कितीही खुमखुमी आली तरी सच्च्या कुंपणावरील माणसाने समोरच्याचं म्हणणं खोडून टाकण्याचा मोह आवरायला हवा.
आज समुद्रातील कासवापासून जंगलातील वाघांपर्यंत अनेक प्राण्या-पक्षांच्या संवर्धनासाठी सरकारी योजना आखल्या जातात. पण ‘सतत कुंपणावर बसून राहणार्‍या मानवाची प्रजाती’ जपण्यासाठी ग्रामपंचायतीपासून युनोपर्यंत कुणीच काही प्रयत्न करीत नाही, ही खेदाची बाब आहे. कधीही, कुठलीही ठाम भूमिका न घेता कुंपणावर बसणार्‍या लोकांनी आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे अशी सरकारची अपेक्षा आहे काय?
सणासुदीच्या दिवसांत होणारं आवाजाचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्तीची होणारी नासधूस याविषयी आपण व्यक्त नाही झालो तर आपल्या पुरोगामी असण्यावर संशय घेतला जातो आणि याबद्दल आवाज उठवला तर व्हॉट्सअपचं पायदळ, इन्स्टाचं घोडदळ, फेसबुकची नेव्ही आणि ट्विटरचा एयर फोर्स अशी सुसज्ज ट्रोल आर्मी चहूबाजूंनी आपल्यावर चालून येते. अशावेळी ‘तुमचं बरोबर आहे, त्यांचंही चूक नाही’ असं म्हणत कुंपणावर बसता आलं तरच आजच्या या ट्रोलधाडीत आपला निभाव लागू शकेल.
आज तंत्रज्ञान सुधारलंय. आज ४जी आलंय. उद्या ५जी, १०जी काहीही येईल. पण जोवर समोरच्या व्यक्तीच्या नेटवर्कशी आपला वायफाय कनेक्ट होत नाही, जोवर तिच्या मनात काय आहे ते आपल्या मेंदूत डाउनलोड होत नाही, तोवर या टेक्नॉलॉजीतल्या प्रगतीचा, कुंपणावर बसलेल्या आपल्याला काहीच फायदा नाही. मला असे वाटते की, समोरील माणसाच्या कपाळावर एक बारकोड असावा. तो बारकोड आपल्या डोळ्याने स्कॅन करता यावा आणि त्याद्वारे आपल्याला ती व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षाची समर्थक आहे? पैसेवाली आहे की गरीब आहे? आपल्यासारख्याच सरळसोट लैंगिक भावना असलेली आहे की थ्उँऊपैकी आहे? कोणत्या सामाजिक विचारांची, कोणत्या जातीची, पंथाची, धर्माची आहे इत्यादी वाचता यायला हवं. आपल्या मनातलं बोलून तोंडावर पडण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या मनातलं वाचून त्यानुसार, आपल्याला त्या व्यक्तीशी वागायची, बोलायची स्ट्रॅटेजी ठरवता यायला हवी.
बंगला, गाडी, प्रॉपर्टी, शेअर्स, क्रिप्टो करन्सी, बँक बॅलन्स अशा भौतिक वस्तूंच्या जोरावर आपण शून्यातून विश्व केल्याची शेखी मिरवतो. पण आपण सुखी काही होत नाही. कसली तरी कमतरता असल्याचं, काहीतरी अजून हवं असल्याचं दु:ख आतल्या आत आपल्याला नेहमी सलत असतं. कधी शांतपणे, डोळे मिटून आपल्या आतल्या आत डोकावल्यास लक्षात येतं की निर्जीव वस्तू गोळा करण्याच्या नादात आपल्याकडून सजीव माणसं दुरावलेली आहेत, केवळ भविष्यात लागू पडतील अशाच लोकांचं नेटवर्किंग करण्याच्या नादात नातीगोती उसवली गेली आहेत. शून्यातून विश्व निर्माण करता करता त्या विश्वातून केवळ एक शून्य आपल्या हाती आलं आहे. आपण आस्तिक-नास्तिक, उजवे-डावे, आपले-परके, सत्ताधारी-विरोधक, गरीब-श्रीमंत, भौतिक-आध्यात्मिक अशा कुठल्याही एका बाजूला असलो की, आपला मेंदू, त्या त्या बाजूच्या झुंडीकडे गहाण पडतो. म्हणून कधीतरी या दोहोंच्या मधल्या कुंपणावर बसून त्रयस्थपणे आपण कुठून आलोत, कुठे आहोत आणि कुठे चाललोत या दृष्टीने आयुष्याचं सरड्यावलोकन करता यायला हवं. शारीरिक आणि आत्मिक गरजांचा बॅलन्स सांभाळता यायला हवा. महत्वाचं म्हणजे, दुसर्‍याची बाजू समजून न घेता आपलीच बाजू दामटणार्‍यांकडून कुंपणावरील लोकांना बुळे म्हणून हिणविलें जात असले तरी, कुंपणावरच्या लोकांनी स्वत:ला न्यूनगंड येऊ देऊ नये, स्वत:ला कमी लेखू नये. कारण कुंपणावरच्या लोकांना एकाहून अधिक बाजू दिसण्याची निदान शक्यता तरी असतेच असते!

[email protected]

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post
बाळासाहेबांचे फटकारे…

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.