‘श्रीमंत’ असणे हे भाग्य आहे, श्रीमंती टिकवणे ही कला आणि व्यवहार आहे, श्रीमंतीचा विनियोग करणे ही मर्यादा आहे, आणि गेली ४५ वर्षे नाट्यसृष्टीत वावरताना या श्रीमंत अभिनेत्रीने आपली अभिनयातली श्रीमंती जराही ढळू दिलेली नाही, उलट त्यात भरच पडत गेली, ही कौतुकाची गोष्ट आहे. योग्य निर्णय घेण्याची दैवी देणगीही तिला लाभलेली असल्यामुळे कारकीर्दीत चढउतार भोगण्याची वेळ जवळजवळ आलेलीच नाही, अशी बहुधा ही एकच कलाकार असावी.
– – –
होय… खर्या अर्थाने श्रीमंत अभिनेत्री… हिला लक्ष्मीच नव्हे तर सरस्वतीही प्रसन्न आहे. हिच्या गळ्यात सूर आहे, अंगात ताल आहे, बुद्धी विद्वत्तापूर्ण आहे, स्वच्छंद मन आहे, आवाजात आरोह अवरोह आहेत, आकर्षक सौंदर्य आहे, सदाबहार असे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे, आपल्या कारकीर्दीचं उत्तम नियोजन आहे, किती वेगात पळावं आणि कुठे थांबावं याचा सारासार विचार करण्याची प्रवृत्ती आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रीसुलभ दाक्षिण्याबरोबर आक्रमक होऊन समोरच्याला मर्यादेत ठेवण्याची धमकही आहे. हे सर्व एकट्या ‘वंदना गुप्ते’मध्ये आहे, म्हणून ती श्रीमंत अभिनेत्री आहे.
याबरोबर आणखी एक पॅकेज आहे, तिचा दबदबा आहे, तिचा एक ‘ऑरा’ आहे, ती समोर येताक्षणी तिच्याशी कसे वागावे, कसे बोलावे याबाबतीत तुमच्या मनात एक सुंदर आराखडा तयार झाला आणि तुम्ही तसे वागलात, तर ती तुमची आयुष्यभराची मैत्रीण; अंदाज चुकला तर मात्र काही खरं नाही. ती तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टसाठी, नाटकासाठी, सिनेमासाठी, मालिकेसाठी हवी असेल, तर तुम्हाला तिच्या परीक्षेला बसावे लागेल आणि त्यात तुम्ही कमीत कमी ८० टक्के मार्क्स मिळवून पास झालात तरच ती तुमच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये असेल. आणि जेव्हा असेल तेव्हा ती १०० टक्के योगदान देण्यासाठी सज्ज असेल. ‘श्रीमंत’ असणे हे भाग्य आहे, श्रीमंती टिकवणे ही कला आणि व्यवहार आहे, श्रीमंतीचा विनियोग करणे ही मर्यादा आहे, आणि गेली ४५ वर्षे नाट्यसृष्टीत वावरताना या श्रीमंत अभिनेत्रीने आपली अभिनयातली श्रीमंती जराही ढळू दिलेली नाही, उलट त्यात भरच पडत गेली, ही कौतुकाची गोष्ट आहे.
ती जेव्हा जेव्हा सर्वत्र दिसते तेव्हा तेव्हा तो तिचा निर्णय असतो, आणि ती जेव्हा एखाद्या माध्यमातून दिसायची कमी होते, तेव्हाही तो तिचाच निर्णय असतो. ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. योग्य निर्णय घेण्याची दैवी देणगीही तिला लाभलेली असल्यामुळे कारकीर्दीत चढउतार भोगण्याची वेळ जवळजवळ आलेलीच नाही अशी बहुधा ही एकच कलाकार असावी.
बोरीबंदर स्टेशनवरून विविध प्रकारच्या ट्रेन्स सुटतात, लोकल, राज्यभर धावणार्या, देशभर धावणार्या, लांब पल्ल्याच्या, स्लो, फास्ट, जनरल, स्पेशल, अंशता: एसी, संपूर्ण एसी, सुशोभित, साध्या, फक्त पर्यटकांसाठी अत्यंत महागड्या… या सर्व ट्रेन्स एकाच रुळावरून धावत असल्या तरी त्यांचा आपापला दर्जा आहे, वकूब आहे, वेग आहे, त्यांना चालवणारे वेगळे असले तरी त्यांच्या स्वत:च्या मर्यादा आहेत. त्या हिशेबात त्यांचा संचार असतो. यातल्या कोणत्या प्रकारात वंदनाला बसवावे याचे उत्तर आतापर्यंत मिळालेच असेल.
माझ्याही कारकीर्दीला ४५ वर्षे झाली. पण मी एकांकिकेपासून सुरू केली आणि पहिले व्यावसायिक नाटक केले, तोपर्यंत वंदना गुप्ते ही एक समर्थ आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून गाजत होती. मी जी नाटके केली ती मला हवी तशी, मीच लिहिलेली आणि सर्वच्या सर्व नवीन किंवा फारसे प्रस्थापित न झालेले कलाकार घेऊनच. कारण मला तेच शक्य होतं. मी प्रस्थापित लेखक आणि अभिनेत्यांच्या वाटेला फारसा गेलोच नाही. कोणी आपल्याला ब्रेक देईल यासाठीही थांबलो नाही. आपली बॅट, आपला बॉल आणि आपलेच स्टंप, या प्रकारात मी नाटके केली. प्रायोगिक आणि व्यावसायिकही. त्यामुळे अनेक नटयांची किंवा नटांची महत्वाकांक्षा असते, की अमुक एका दिग्दर्शकाबरोबर काम केलेच पाहिजे, नाहीतर आपल्या कारकीर्दीला पूर्णत्व येणार नाही, तसे काही माझ्या बाबतीत कोणी विचार करताना दिसणार नाही आणि त्यात काही गैरही नाही. मी एक अप्लाईड आर्टिस्ट आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि तसाच विचार मी कुठल्याही माध्यमात काम करताना करतो. यातही मला काहीही गैर वाटत नाही. पण काही अभिनेत्यांबरोबर किंवा अभिनेत्रींबरोबर मला दिग्दर्शक म्हणून काम करायची संधी मिळेल असे मी कधी गृहितच धरले नव्हते. कारण मी तशा प्रकारची नाटके करीतच नाही (सिनेमात मात्र मी अशोक कुमार, अनिल कपूरपासून ते मराठीतल्या अनेक प्रथितयश गुणी कलाकारांपर्यंत सर्वांबरोबर काम केले आहे, कारण ते माध्यमच वेगळे आणि त्याच्या गरजा वेगळ्या आहेत). त्यामुळे पुढेमागे मी वंदना गुप्तेसारख्या प्रतिथयश अभिनेत्रीबरोबर कधी काळी नाटक करेन, असे मला कधीच वाटले नव्हते.
९६-९७ची गोष्ट असेल, मी नुकतेच ‘भस्म’ चित्रपटांचे शूटिंग संपवून संकलनाच्या अंतिम टप्प्यात होतो. ‘फिल्मसिटी’मध्ये मिक्सिंग सुरू होते आणि मोबाइल सुरू झाले होते, त्यांनी जोर पकडला होता. त्यावर निर्मिती सावंतचा फोन आला. उदय धुरत (निर्माता : माऊली प्रोडक्शन) या निर्मात्याचे नवीन नाटक आहे, लेखक आहेत अशोक पाटोळे, ते तू दिग्दर्शित करावं असं सगळ्यांचं एकमत झालंय? करशील का? मी नाटक वाचायला मागितले. त्याआधी मी अशोक पाटोळे यांची हिन्दी मालिका दिग्दर्शित केली होती, संवाद निर्मित, राकेश चौधरी या निर्मात्याची. त्यामुळे चांगली मैत्री होती, पण उदय धुरत माझ्यासाठी नवीन होते. मला नाटक आवडले, काही बदल अपेक्षित होते ते पाटोळेंनी करून दिले. त्या नाटकाचे कास्टिंग आधीच ठरले होते, कारण आधीचा दिग्दर्शक ते नाटक सोडून गेला होता. त्यात गिरीश ओक, निर्मिती सावंत आणि वंदना गुप्ते हे तिघे ठरले होते. आणि त्यात मी फक्त गिरीश ओकबरोबर आधी नाटक केले होते… निर्मिती ही माझ्या आधीच्या निर्मात्याची, महेश सावंत (नाटक : विच्छा माझी पुरी करा) याची पत्नी, एवढीच ओळख, आणि तिची नाटके आली होती, ती दोन्ही पहिली होती. पण वंदना गुप्ते काम करणार म्हटल्यावर मला थोडं ‘सरप्राइजच’ होतं. एवढ्या मोठ्या अभिनेत्रीबरोबर आपण काम करणार याचा मला जास्त आनंद होता. तशी ओळख फार कमी होती, पण त्याचं मला टेन्शन नव्हतं. कारण याआधी मी १९८६मध्ये भक्ती बर्वे या नामवंत अभिनेत्रीबरोबर काम केले होते. ‘सखी! प्रिय सखी’ हे नाटक मी दिग्दर्शित केले होते आणि त्याचा निर्माताही मीच होतो. त्याही वेळेला अनेकांनी मला सल्ला दिला, की भक्ती बर्वे म्हणजे प्रचंड त्रास, निर्माता मेटाकुटीला येतो… वगैरे… पण मी निर्माता म्हणून तिच्या सर्व अटी मान्य केल्या, कारण त्या सर्व तिच्या तब्येतीसंबंधी होत्या आणि वकुबाला साजेशा होत्या. शिवाय प्रयोग उत्तम व्हावा म्हणूनही होत्या. त्या नाटकाच्या दोन महिने तालमी आणि ११ प्रयोग तिने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले. त्याआधी मी तिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रातराणी’ या नाटकाचे पार्श्वसंगीत केले होते, ते तिला प्रचंड आवडले होते आणि गाजलेलेही होते. पण वंदनाबरोबर एकूणच प्रथमच काम करणार होतो. अशावेळी नाट्यक्षेत्रातल्या लांबच्या-जवळच्या मित्रांना चेव येतो आणि ते अनावश्यक सल्ला देऊ लागतात. ‘वंदना? बापरे, एकदम कडक काम आहे हां!.. सांभाळ.. खूप प्रश्न विचारेल.. खूप बदल करायला मागेल.. वगैरे..
मला आश्चर्य वाटले नाही. याआधी मी अनेक प्रश्न विचारणार्या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, भक्ती बर्वे, गिरीश ओक यांच्याबरोबर यशस्वीपणे काम केले होते. उलट हे तर जास्तच आव्हानात्मक असतं. वंदनाबरोबर रिहर्सल सुरू झाल्या.. निर्मिती, गिरीश ओक हे अतिशय समजूतदारपणे भूमिका करीत होते. गिरीश सराईत होताच, पण निर्मितीही शंका विचारण्यात मागे नव्हती. पंधरा दिवस झाले, रिहर्सल सुरू होऊन.. पण वंदनाच्या भूमिकेची मला काहीच जजमेंट येत नव्हती. त्यात तिची एका चेटकिणीची भूमिका होती. म्हणजे टिपिकल चेटकीण नव्हे, तर त्या मुलीच्या एकूण स्वभाव प्रवृत्तीमध्ये असलेली ‘चेटकीण’, अगदी पेडर रोडला राहणारी, ब्लॅक मॅजिकवाली. अशोक पाटोळेने हा सिद्धांत कुठेतरी वाचला होता, की ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही जादूटोणा, ब्लॅकमॅजिक जाणणारी चेटकीण असते. त्यासाठी त्याने जगभरातील त्या विषयावरची अनेक पुस्तके वाचून त्या ‘सातव्या मुली’चा रिसर्च केला होता आणि हे नाटक लिहिले होते, त्या चेटकिणीची अत्यंत मनोवेधक अशी भूमिका वंदना करीत होती. आतापर्यंतच्या सर्व भूमिकांपेक्षा वेगळी. तिच्यामागे तिला खोटं ठरवण्यासाठी एक पत्रकार (गिरीश ओक) लागलेला असतो. हे सर्व थोतांड आहे असे विविध ठिकाणी लेख लिहून तिच्याविरुद्ध रान उठवलेलं असतं, त्याचा बदला म्हणून ती त्याची पत्नी (निर्मिती सावंत) हिला ‘टार्गेट’ करू लागते, त्यातून होणारे एक भीषण नाट्य संहिता वाचून अत्यंत भीतीदायक पद्धतीने माझ्या डोळ्यासमोर त्यातल्या पार्श्वसंगीतासहित उभे राहिले होते. सगळेच आपापल्या भूमिकेसाठी फिट्ट होते, तशात वंदना तर त्यात वर्णन केलेल्या सुविद्य, सुंदर व उच्चभ्रू या सर्व शक्यतांना पुरून उरत होता, पण रिहर्सल अत्यंत थंडपणे करीत होती. मला पहिल्या रिहर्सलपासून ‘फुल्ल इंटेन्सिटी’ अपेक्षित आणि वंदना शांतपणे शून्य तीव्रतेने वाक्ये बोलत होती. आज चार्ज होईल, उद्या चार्ज होईल या आशेवर मी रिहर्सल रेटीत होतो. एखादी मूव्हमेन्ट सांगितली की ‘हम्म..’ असं म्हणून ती हातातल्या स्क्रिप्टवर त्या त्या ठिकाणी लिहून घेत होती. इतकंच नाही तर एखाद्या वाक्याचं मला हवं असलेलं एक्स्प्रेशनही कपाळावर एक दोन आठ्या आणून, पॉज घेऊन, मनातल्या मनांत वर्कआउट करून, ते स्क्रिप्टवर लिहून घ्यायची.. क्षणभर वाटायचं की आता ती यावरुन भंडायला उठेल, मग वादविवाद, हे असं नाही, ते तसं नाही, ‘मी मोठमोठ्या दिग्दर्शकांकडे काम केलंय, पण असं मला कोणी कधी सांगितलं नव्हतं’, वगैरे होईल की काय! दहा पंधरा दिवस अशाच रिहर्सल सुरू होत्या. गिरीश, निर्मितीला याबद्दल काही वाटत होते की नव्हते, हे कळत नव्हते. कदाचित त्यांनाही तसेच वाटले असणार, पण मी मात्र थोडा त्रस्तच झालो. अखेर एके दिवशी मी वंदनाशी स्पष्ट बोलायचे ठरवले. एक अंक बसत आला तरी चेटकीण काय पद्धतीने उभी रहातेय, हे वंदनाशिवाय कोणालाच कळत नव्हते. ती तिच्या स्क्रिप्टवर लिहीत होती, पण मला काहीच दिसत नव्हते. रिहर्सल संपली की वंदना पुन्हा फ्रेश व्हायची, हसत खेळत गप्पा मारीत आम्ही निघून जायचो. पण रिहर्सल सुरू झाली की, पुन्हा ती स्क्रिप्ट, ते पेन, आणि तेच ‘हम्म’.. आणि मग स्क्रिप्टवर लिहून घेणे. आज फैसला करायचाच. टेलर किती नामवंत असला तरी, तरी त्याने शिवलेले कपडे घालून आरशात बघितल्याशिवाय समाधान होत नाही, तसं माझं झालं. पुढच्या अंकाला हात लावायच्या आधी ‘त्या चेटकिणीचं नक्की काय झालंय? हे बघितलंच पाहिजे, असं म्हणून मी वंदनाला विनंती केली, ‘वंदना, यातला एखादा सीन फुल्ल इंटेन्सिटीने करून दाखवशील का? मला कळत नाहीय तू नेमकं काय करतेयस, काय लिहून घेतेस, कसं होणार आहे..?’ प्रकरण चिघळू नये म्हणून मी शेवटी, ‘प्लीज’.. असेही म्हटले. मला वाटले.. झालं.. ‘म्हणजे तू काय माझ्या कपॅसिटीवर संशय घेतोयस काय? हे माझं पहिलंच नाटकं आहे असं वाटलं की काय तुला..?’ वगैरे होईल, पण वंदनाने सरळ स्क्रिप्ट बाजूला ठेवलं आणि म्हणाली, ‘हो.. कोणता सीन करूया सांग.. मी गिरीश आणि निर्मितीला विचारून एक सीन ठरवला… आणि तो सुरू झाला.. माझा विश्वास बसत नव्हता, लिहून घेतलेली स्क्रिप्ट फाईलच्या रूपाने निपचित पडून होती आणि समोरची प्रख्यात अभिनेत्री, फुल्ल इंटेन्सिटीने ती भूमिका रंगवत रंगवत उभी करीत होती.. लिहून घेतलेल्या सर्व सूचना जशाच्या तशा समोर अंमलात येत असलेल्या दिसत होत्या, तो प्रसंग सर्वांनी फुल्ल इंटेन्सिटीने केला आणि मी अक्षरश: विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत राहिलो. ‘पुरू.. ठीक आहे ना?’ मी ओके म्हणून तिचा रिस्पेक्ट ठेवला. तिने ‘थँक यू’ म्हणून माझ्यातल्या दिग्दर्शकाचा ठेवला. एकदम प्रोफेशनल, ती चक्क ‘होमवर्क’ करून आली होती आणि दिग्दर्शकाने अचानक उभे राहा म्हटल्यावर सर्व काही रीतसर करूनही दाखवले. इन्कम टॅक्सची रेड अचानक पडली तरी कुठचाही प्रामाणिक व्यावसायिक न घाबरता सर्व डायर्या दाखवतो, तसं वंदनाने करून दाखवलं. या नाट्य-चित्रपटसृष्टीत अनेक मेथड अॅक्टर्स आहेत, पण ही मेथड मी पहिल्यांदाच अनुभवली. त्यानंतर मात्र मी तिच्या प्रोसेसच्या आड आलो नाही. तेवढा विश्वास या मेथडवर ठेवला आणि परिणामी एक अतिशय सुंदर अशी भूमिका असलेले ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हे नाटक उभे राहिले, आणि गाजलेही. तसा मी प्रâी फॉर्म जास्त एंजॉय करणारा दिग्दर्शक, पण पर्याय (लेखक : जयवंत दळवी) आणि सातव्या मुलीची सातवी मुलगी (लेखक : अशोक पाटोळे) या दोनच प्रतिथयश लेखकांची नाटके मी केली, तीही बॉक्स सेटवरची, प्रोसिनियममधली बंदिस्त आणि तीही सर्वच्या सर्व तरबेज नटांबरोबर, ही गोष्ट मलाही सुखावणारी होती, ती केवळ वंदना गुप्ते, निर्मिती, गिरीश (सातवी मुलगी) आणि चंद्रकात गोखले, उषा नाडकर्णी, मीनल परांजपे (पर्याय) या प्रतिथयश कलावंतांमुळे.
पहिला ब्रेक
वंदना एका अत्यंत प्रतिभावंत आणि सुसंस्कृत अशा घरात, घराण्यात जन्माला आली आणि तिथेच तिचा भाग्योदय ठरला. अत्यंत सोज्वळ, मुलायम आणि परमेश्वराची देणगी लाभलेला आवाज म्हणजे माणिक वर्मांचा आवाज. अशा माणिकताईंना चार मुली, त्यातली एक वंदना. त्याशिवाय वडील ‘अमर वर्मा’ हे संगीततज्ञ आणि साहित्यप्रेमी. थेट हरिवंशराय बच्चन यांच्याशी नाते सांगणारे. त्यामुळे आपोआपच घरात सुसंस्कृत वातावरण. संगीत रक्तात भिनलेले. त्यामुळे शाळेतही वर्मांच्या मुली म्हणून वर्मा भगिनींना गाण्याचा हमखास आग्रह धरला जात असे. वंदनाची ज्येष्ठ भगिनी भारती वर्मा (लग्नानंतर आचरेकर) उत्तम गायिका आणि अभिनेत्री. तशीच राणी वर्माही. पण गोंवा हिंदू असोसिएशनचे ‘पद्मश्री धुंडीराज’ हे नाटक, ज्यात सर्व स्त्रियाच होत्या, त्यात वंदनाला ख्यातनाम विनोदी अभिनेत्री मनोरमा वागळे तिकडे घेऊन गेल्या आणि त्या नाटकातली एका अत्यंत मॉडर्न पण अवखळ मुलीची भूमिका वंदनाला मिळाली. ती प्रचंड गाजली, इतकी की पुढे तिला ‘अखेरचा सवाल’ या वसंत कानेटकरांच्या नाटकात भक्ती बर्वेच्या भूमिकेत रिप्लेसमेंट म्हणून घेण्यात आले आणि थेट विजया मेहता, मधुकर तोरडमल, दामू केंकरे अशा दिग्गजांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि त्यानंतर वंदनाकडे खास भूमिका असलेल्या वसंत कानेटकरांच्या संहिता येऊ लागल्या आणि निर्माते मोहन वाघ यांची चंद्रलेखा ही संस्था. इतके की पुढे कानेटकर चंद्रलेखा आणि वंदना गुप्ते, या तिघांचे समीकरण झाले.
दुसरा ब्रेक
हा दुसरा ब्रेक कोणत्या विशिष्ट नाटकात मिळाला असे म्हणता येणार नाही. वंदनाचे पती अॅडव्होकेट शिरीष गुप्ते हे अत्यंत व्यग्र असे ‘सीनियर लॉयर’ आहेत. लग्नाआधीच वंदना नाट्यक्षेत्रात स्थिरावली होती, पण लग्नानंतर विशेषत: तिच्या सासूसासर्यांनी तिला, घरी नको बसू, तू खूप गुणी अभिनेत्री आहेस, आम्ही तुझी नाटके पाहिली आहेत, या क्षेत्रातला तुझा यशस्वी वावर थांबवू नकोस, असा सल्ला दिला आणि तिला पुन्हा कार्यरत केले. लग्नानंतर तिच्या नाट्यकारकीर्दीला हा अशा प्रकारे दुसरा ‘मोठा ब्रेक’ मिळाला. एक तर ती व्यावसायिक अभिनेत्री असली तरी पैसे कमावणे हा मुख्य उद्देश कधीच नव्हता. म्हणजे लग्नाआधीही तिच्यावर पैसे कमावण्याची जबाबदारी नव्हती की लग्नानंतरही नव्हती. त्यामुळे कोणती भूमिका करावी, कोणती करू नये, नाटक किती सकस आहे, आपल्याला त्यात काही करण्याचा वाव आहे की नाही, नाट्यसंस्था कशी आहे, प्रयोग कसे होतील, या सर्वांचा विचार करायची तिला आपल्या परीने संधी मिळाली. विशेष म्हणजे केलेल्या प्रत्येक नाटकाचे स्क्रिप्ट तिने आपले पती शिरीष गुप्ते यांना वाचून दाखवूनच ‘हो किंवा नाही’ याचा निर्णय घेतला. फक्त एकच नाटक तिने शिरीष यांना न वाचून दाखवता करण्याचा निर्णय घेतला, ते म्हणजे ‘चारचौघी’.. कारण त्यातली एका बंडखोर स्त्रीची भूमिका. तरी पण तिला खात्री होती की वाचून दाखवले असते तरी त्यांनी थोडीफार चर्चा करून होकारच कळवला असता. पण नकार दिला असतं तर? आणि कोर्टाच्या कामकाजाप्रमाणे निकाल रेंगाळला असता तर?
मधल्या काळात वंदना मालिका आणि चित्रपटात अचानक दिसू लागली आणि एकदम दचकल्यासारखं झालं. याआधी अनेक ताकदीच्या मराठी अभिनेत्रींना मराठी आणि हिन्दी मालिकांनी आपलंसं करून घेतलं आणि त्यानंतर त्यांचा रंगभूमीशी संबंध नाटके बघण्यापुरता शिल्लक राहिला. वंदनाचं तसं होतंय की काय? असं वाटत असतानाच तिची एकामागोमाग एक नवीन नाटकं येतच गेली आणि तिचा रंगभूमीशी कायम संबंध टिकून राहिला. ती नेहमी म्हणते, ‘नाटक ह्या माध्यमाने मला बरंच काही दिलं, आत्मविश्वास दिला, नव्या नव्या भूमिकांना सामोरं जायचं बळ दिलं. सर्वात महत्वाची अशी शिस्त दिली, वेळेचं महत्व आणि टाइम मॅनेजमेंट कशी करावी याचं शिक्षण नाटकाचे हजारो प्रयोग करताना मिळत गेले. त्यामुळे मी नाट्यसंसार आणि घरसंसार यशस्वीपणे पार पाडले.’
ब्रेक के बाद
वंदनाच्या लक्षात राहाणार्या भूमिकांमध्ये सर्वात प्रथम आठवते ती ‘चारचौघी’मधली भूमिका, त्यातला फोनवरचा उद्रेक तर टिपेला जातो. आवाजातले आरोह अवरोह सांभाळत ती रंगमंच व्यापून टाकायची. अशा संस्मरणीय भूमिका तिने अनेक केल्यात, तिला स्वत:ला आठवते ती ‘सोनचाफा‘ नाटकातली भूमिका. त्यावर तिने स्वत: बरेच कष्ट घेतेले होते. नाटककार वसंत कानेटकर तिच्यावर प्रचंड खुश होते. खास नटांसाठी म्हणून त्यांनी काही नाटके लिहिली आणि वंदनासाठी सुद्धा त्यांनी नाटक लिहावे हा तिचा बहुमान आहे.
तसं बघायला गेलं तर सोशिक, छळाऊ, आणि घाऊक अत्याचार सहन करणार्या भारतीय नारीच्या भूमिकेत वंदना कधी दिसलीच नाही. कधी कधी अशा भूमिका गरजेतून किंवा लोकाग्रहास्तव स्वीकारल्या जातात, पण वंदनाच्या बाबतीत तसा प्रश्नच नव्हता. ती स्वत:चाच सेन्सॉर बोर्ड आहे, त्याचा अध्यक्ष आणि सदस्यही तीच. शिवाय घरात वकील असूनसुद्धा कुठचा निर्णय परावलंबी दिसत नाही, शिवाय सगळं तडकाफडकी आणि विनाविलंब. त्यामुळे ‘वाडा चिरेबंदी’मधली वहिनी, पारंपरिक किंवा ज्येष्ठत्वामुळे घराण्याच्या रूढीत अडकलेली असली तरी सोशीक नाही, हे तिने समर्थपणे दाखवले, मला तिची सर्वात आवडलेली भूमिका म्हणजे, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’मधली… श्रद्धा आणि कर्तव्य, पतीनिष्ठा, या सर्व भावरेषा पुसट न ठेवता ठसठशीत ठेवून तिने त्या स्त्रीला सोशीक न दाखवता एक खंबीर आत्मसन्मानी स्त्री दाखवण्यात यश मिळवले होते. ‘मातीच्या चुली’ या चित्रपटातली भूमिका खाष्ट न वाटता, करड्या शिस्तीची भीडभाड न बाळगणारी, तशीच आणि तितकीच चांगुलपणाचा समतोल साधणारी सासू आणि आई या द्वंद्वात सापडलेली स्त्री आजही विसरता येत नाही. आठवणीत राहाव्यात अशा अनेक भूमिका तिने करून ठेवलेल्या आहेत.
हे एवढं सगळं करीत असताना तिने दोन्ही मुलांचं व्यवस्थित संगोपन करून, शिक्षण देऊन आपापल्या जगात स्थिरस्थावर करून ठेवले आहे. तिच्या या संपूर्ण कारकीर्दीच्या यशाचे श्रेय ती पतीला, अॅड. शिरीष गुप्ते यांना देते. ‘मिस्टर इंडिया’सारखे ते गुप्तपणे तिच्या पाठीशी असतात. कधीच कुठे विनाकारण दिसत नाहीत. आणि तिच्या बहिणी… भारती, अरुणा, आणि राणी… यांचा फॅमिली बॅकअप… त्याचा ती आवर्जून उल्लेख करते. या सर्व बहिणी म्हणजे तिच्याइतक्याच उत्साहाचा झरा आहेत. भारती, वंदना, राणी जिथे असतात तिथे आपोआपच वातावरण प्रसन्न बनते, त्यात जोश येतो, ‘लक्स सौंदर्य साबणाच्या तीनचार वड्या आजूबाजूला फिरतायत असं वाटतं. माणिक वर्मा यांची गाणी जितकी प्रसन्न आणि शैलीदार, तोच वसा आणि ठसा, यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतो.
या सर्व समृद्ध, सुसंस्कृत आणि कलापूर्ण विद्वततेचा ठेवा हीच खरी श्रीमंती, आणि म्हणूनच, ‘वंदना गुप्ते’ ही एक ‘श्रीमंत अभिनेत्री’ म्हणून सिद्ध होते.