अशी आहे ग्रहस्थिती
राहू मेषेत, रवि मीनेत, शनि-मंगळ-शुक्र-प्लूटो मकरेत, गुरू-नेपच्यून-बुध कुंभ राशीत, केतू तुळेत, चंद्र कन्या राशीत, त्यानंतर तूळ आणि वृश्चिकेत. दिनविशेष – २१ मार्च रोजी संकष्ट चतुर्थी
मेष – तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर येत्या आठवड्यात चांगले यश मिळणार आहे. विद्यार्थी आणि गृहिणीवर्गालाही हा आठवडा उत्तम जाणार आहे. या आठवड्यात मार्गस्थ होणारे छायाग्रह राहू-केतू अनुकूल परिस्थिती निर्माण करणारे ठरतील. शिक्षक, प्राध्यापक, शैक्षणिक संस्थांचे संचालक यांना हा आठवडा खूपच लाभदायक ठरणार आहे. अपेक्षापूर्ती होईल, पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. विवाह-मुंज अशा शुभकार्यासाठी योग्य काळ आहे. विवाहेच्छुक मंडळींच्या कानावर शुभवार्ता पडेल.
वृषभ – कोर्ट-कचेरीच्या कामात निर्णय घेताना कोणतीही गडबड करू नका. कायदे-कानून नियमित पाळा. राहू-केतूचे राश्यांतर होत आहे. पोलीस चौकी-कोर्टाची पायरी चढायची की नाही ते ठरवा. तिथे खेटा घालावा लागू शकतो. वक्री ग्रहमान उत्तम आहे. कौटुंबिक लाभ, भागीदारी व्यवसायात फायदा संभवतो. वैवाहिक जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. नोकरीच्या निमित्ताने दूरचा प्रवास घडेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थीवर्गाला प्रसिद्धीचा काळ.
मिथुन – येणार्या काळात अनपेक्षित धनलाभ होणार आहे. विपरीत राजयोगाची ग्रहस्थिती, लाभात राहू, पंचमात केतू. ध्यानी नसलेल्या काही खासगी आणि व्यावसायिक गोष्टींच्या माध्यमातून हा आठवडा खूप फायदेशीर ठरणार आहे. भाग्यस्थानातील गुरू-बुध युतीमुळे धार्मिक कार्य, प्रवचन, देवदर्शन तीर्थयात्रा, या माध्यमातून मानसिक आनंद देणारा आठवडा राहणार आहे. नव्या नोकरीचा प्रयत्न करत असाल तर ते सुरूच ठेवा. त्यात चांगले यश मिळताना दिसेल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे.
कर्क – कुटुंबात कटुतेचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. सुखस्थानातील राहूचे राश्यांतर काही गोष्टींबाबत विनाकारण वादाचे प्रसंग निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल. कुटुंबापासून काही दिवस लांब राहण्याचा योग निर्माण होणार आहे. परदेशात अथवा नोकरीसंदर्भात नियोजन करत असाल तर त्यात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आईचे चांगले सहकार्य मिळेल. नवीन वास्तूबाबत निर्णय घ्याल. प्रॉपर्टीबाबत व्यवहार करणार्या मंडळींना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती होईल. विशेष अधिकार प्राप्त होतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.
सिंह – कुणाशीही संवाद करताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गुप्त शत्रूपासून सावध राहा. नवविवाहितांसाठी उत्तम काळ आहे. ज्यांच्या विवाहाला उशीर होत असेल, त्यांच्या कानावर लवकरच गुड न्यूज पडेल. विद्यार्थीवर्गाला ज्ञानाच्या माध्यमातून नावलौकिक मिळेल. अन्य कार्यक्षेत्रात कलागुणांना चांगला वाव मिळेल. त्यातून प्रसिद्धीचा अनुभव येईल. कौटुंबिक हेवेदावे संयमाने सोडवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर शाब्दिक वादाचे प्रसंग घडतील. स्फोटक वृत्ती टाळा.
कन्या – एखाद्या गोष्टीवर निर्णय घेताना चलबिचल होत असेल तर निर्णय घेण्याचे तूर्त तरी टाळा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. नोकरदारांकडून दिशाभूल होऊ शकते, त्याकडे विशेष लक्ष द्या. महिलांना आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु काळजीचे कारण नाही. पंचमातील उच्चीचा मंगळ-शनि युती. विद्यार्थ्यांना करियरमध्ये संघर्ष करावा लागू शकतो. शुभकार्यात अडथळे येतील. प्रवासादरम्यान अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. प्रवास लांबणीवर पडेल. अतिमहत्वाच्या व्यक्तींबरोबर गाठीभेटी होतील. परीक्षेच्या निकालात असमाधानकारक निर्णय येऊ शकतो, त्यामुळे खचू नका. नव्या उमेदीने काम सुरू करा.
तूळ – नव्या संधी चालून येणार आहेत. राहू-केतूचे राश्यांतर पथ्यावर पडणार आहे. काही महत्वाचे निर्णय घेण्याची संधी चालून येईल. प्रभाव पडण्याची संधी चालून येईल. जनमानसात वजन वाढणार आहे. जमीन-खरेदी व्यवसाय, बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी लाभदायक आठवडा आहे. पंचमातील गुरू-बुध युती शुभकार्यात यश मिळवून देणारे ठरेल. वडील बंधूंकडून आर्थिक मदत मिळेल. त्यांच्या ओळखीचा चांगला फायदा होईल. उच्चशिक्षणाबाबतचे निर्णय फायद्याचे राहतील. महत्वाचे निर्णय सहजासहजी मार्गी लागतील.
वृश्चिक – व्ययस्थानातील केतूचे राश्यांतर आणि षष्ठम भावातील राहूचे राश्यांतर त्यामुळे एखाद्या जुन्या विषयाबाबत पुन्हा कुरापती सुरू होतील. वादविवाद वाढवू नका. ते आपसात मिटवा. पराक्रमात राशिस्वामी मंगळ-शनि युती संघर्ष वाढवतील. पण त्यामधून भविष्यात चांगले यश संपादन होईल. कामाच्या ठिकाणी संघर्ष करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आळस टाळा. भावंडासोबत वाद नकोत. काही मंडळींना कानाचा त्रास होऊ शकतो. कुटुंबासाठी खर्च वाढतील. सुखस्थानात गुरू-बुध युती असल्याने नवीन वस्तूची इच्छा पूर्ण होईल.
धनू – साडेसातीचा काळ संपायला आलेला आहे. राहू-केतूचे राश्यांतर अपेक्षापूर्ती करणारे आहे. लाभातील केतूचे राश्यांतर धनस्थानातील ग्रहबळ याचा विचार करता आर्थिक स्थिती उत्तम राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हातून एखादे शुभकार्य पार पडेल. पत्रकार, निवेदक, लेखक यांच्यासाठी लाभदायक काळ राहणार आहे. १९ आणि २० तारखांना कौटुंबिक आनंद देणारी एखादी बातमी कानावर पडेल. प्रवासात नवीन ओळखी होतील. तुमच्या वाणीने एखाद्या व्यक्तीवर भुरळ पडेल, त्यामधून ओळखी होतील.
मकर – राहू-केतू यांचे सुख आणि कर्म स्थानातील राश्यांतर. काही मंडळींसाठी कटकटीचे राहणार आहे. काही जणांना जोश, इच्छाशक्ती वाढल्याचा अनुभव येईल. एखाद्या कामात झटपट यश मिळेल. आर्थिक गणित सांभाळा. कामातून आर्थिक लाभ होतीलच असे नाही. काही ठिकाणी अर्थप्राप्तीसाठी मोठा संघर्ष करावा लागेल. स्टोरी रायटर, लेखनाचे काम करणार्यांना कामातून आर्थिक प्राप्ती होईल. सार्वजनिक ठिकाणी होणार्या समारंभात सन्मान होईल.
कुंभ – काही जणांचा अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. कष्टाप्रमाणे हवे तसे काम होत नसल्याची खंत देखील काही जणांना टोचत आहे. अजून काही दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे. आपले काम नेटाने सुरू ठेवा. त्यात नक्की यश मिळेल. गुरू महाराजांच्या लग्नातील वास्तव्यात बुधाची जोड, त्यामुळे काही निर्णय आपल्याला बुडत्याला काडीचा आधार असे वाटतील. येत्या आठवड्यात समाधानकारक स्थिती अनुभवयास येईल. परदेशी जाण्याची संधी चालून येईल, ती सोडू नका.
मीन – यश म्हणजे नक्की काय असते, याचा अनुभव येत्या आठवड्यात येईल. हातात घेतलेली कामे वेळेवर पार पडतील. राहू-केतूच्या राश्यांतरामुळे मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. उधार उसनवारी टाळा, भविष्यात ते त्रासदायक ठरू शकेल, असे कोणतेही काम आता करू नका. कुटुंबासोबत भ्रमंती होईल. देवदर्शन, तीर्थयात्रा या ठिकाणी जाण्याचे योग जुळून येत आहे. आयात-निर्यात, परदेशस्थित व्यवसाय करणार्यांसाठी अनपेक्षित लाभाचा काळ राहणार आहे.