हिंदू मिशनरी सोसायटीच्या कामात प्रबोधनकारांनी स्वतःला झोकून दिलं होतं. त्यासाठी त्यांनी व्याख्यानं दिली आणि नागपूरपर्यंत दौराही काढला.
– – –
गजाननराव वैद्य आणि त्यांची हिंदू मिशनरी सोसायटी यांच्या विचारांचा प्रबोधनकारांवर प्रभाव वाढत जात होता. कल्याण येथील सत्पुरुष राममारुती महाराज यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त १९१९च्या सप्टेंबरमध्ये आयोजित व्याख्यानात त्याचा प्रत्यय आला. राममारुती महाराजही सीकेपीच होते. प्रबोधनकारांचा त्यांच्याशी संपर्क आला होता. महाराज झोपलेले असतानाही प्रबोधनकारांना त्यांच्या हातापायांतूनही रामनाम ऐकू आलं, असा चमत्कार त्यांचे भक्त आजही सांगतात. पण त्यांच्या चमत्कारांचं भावुक वर्णन असलेल्या चरित्रपर पोथीची प्रबोधनकारांनी पुढे `प्रबोधन`मधून तुफान खिल्ली उडवली आहे. प्रबोधनकारांना राममारुती महाराजांनी केलेली गरजूंची केलेली सेवा भावली असावी. त्यांनी तयार केलेली रामनामाची भाषाही आवडली असावी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दादर इंग्लिश स्कूलमध्ये प्रबोधनकारांचं व्याख्यान झालं आणि त्याला गजाननराव वैद्य अध्यक्ष होते.
`हिंदू धर्माचे दिव्य` असा या व्याख्यानाचा विषय होता. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माच्या आगमनानंतर हिंदू धर्मासमोर उभ्या राहिल्या आव्हानांचा इतिहास प्रबोधनकारांनी त्यात सांगितला. गजाननरावांच्या आग्रहामुळे लगेचच २० ऑक्टोबरला दिवाळीत या व्याख्यानाचं पुस्तक प्रकाशित झालं. या ग्रंथात हिंदू मिशनरी सोसायटीचा विचारच अतिशय आक्रमकपणे आलाय. मुस्लिम धर्माच्या आक्रमणाबरोबरच त्यांनी ब्राह्मणी वर्चस्ववादालाही भारतातल्या धर्मांतरांसाठी जबाबदार धरलं आहे. त्यासाठी त्यांनी सोसायटीने सांगितलेल्या लोकसंग्रहाच्या तत्त्वाचा आग्रह धरला आहे.
गजाननराव या ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रबोधनकारांचा गौरव करताना लिहितात, `ग्रंथकाराची ओळख करून द्यावयाची म्हणजे ते अभयाने लिहिणारे व बोलणारे सत्त्वशील इतिहासभक्त आहेत. ग्रंथ वाचीत असता वाचकांना असे आढळेल की अनेक भावनामय असा कोणी जीव आपल्याशी बोलत आहे… रा. केशवराव ठाकरे ह्यांची तपश्चर्या मोठी दिसते. त्यांच्या भाषेसारखी जिवन्त भाषा वाचण्याचे प्रसंग थोडेच येतात.`
या पुस्तकाची पहिली ३००० प्रतींची आवृत्ती फक्त चार महिन्यांत संपली. पुढे पाच वर्षांनी दादरच्या नरेंद्र बुक डेपोने त्याची दुसरी आवृत्ती काढली. त्यात मलबारमधील मोपला समाजाच्या गाजलेल्या धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर `संस्कृतीचा संग्राम` हा सविस्तर निबंध जोडलेला आहे. या पुस्तकाचं गुजराथी भाषांतर अहमदाबादच्या शुद्धीकरण संघटनेने प्रसिद्ध केलं होतं. १९९८ साली ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या `देवाधर्माच्या नावानं` या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रबोधनकारांविषयी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नव्या पिढीला हे पुस्तक वाचण्याचं आवाहन केलं होतं.
`हिंदू धर्माचे दिव्य` हे व्याख्यान ऐकण्यासाठी प्रबोधनकारांचे विद्वान मित्रही रेवरंड फरक्हॉर हजर होते. फरक्हॉर हे ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी देशभर फिरले होते आणि ते जगप्रसिद्ध ख्रिस्ती पंडित असल्याचं प्रबोधनकार सांगतात. त्यांना महाराष्ट्रातल्या भागवत धर्माने म्हणजे वारकरी संतांच्या विचारांनी प्रभावित केलं होतं. दुसरीकडे हिंदू मिशनरी सोसायटीच्या विचारांवर रामदास स्वामींच्या धर्मविषयक आग्रही विचारांचा प्रभाव होता. याच प्रभावात असताना प्रबोधनकारांनीही रामदास स्वामींचं इंग्रजी चरित्र लिहिलं होतं. `द लाइफ अँड मिशन ऑफ समर्थ रामदास` या पुस्तकाच्या नावातलं मिशनही गजाननरावांच्या विचारांच्या प्रभावामधूनच आलेलं आहे. रामदास स्वामींच्या मिशनरी वृत्तीचा गौरव `हिंदू धर्माचे दिव्य`मध्येही आहे. पुस्तकाची सुरुवातच मुळी `जय जय रघुवीर समर्थ`च्या घोषाने आहे. त्यामुळे फरक्हॉरने प्रबोधनकारांच्या व्याख्यानानंतर बोलताना आवर्जून वेगळी भूमिका मांडली होती, `भागवत धर्माने खरे म्हटले तर धर्मसंरक्षणासाठी शांततेचे पण निर्धाराचे युद्ध केलेले आहे.`
फरक्हॉरशी झालेल्या चर्चांचे उल्लेखही प्रबोधनकारांनी केलेले आहेत. त्यात या विदेशी ख्रिश्चन धर्मप्रसारकाने मांडलेली निरीक्षणं आजही उद्बोधक वाटावी अशी आहेत, `खेडुतांना अक्षरांची ओळख नसेल, त्यांना लिहिता येत नसेल, पण त्यांना अडाणी किंवा अप्रबुद्ध म्हणायला मी तयार नाही. उलट, शहरी साक्षरांपेक्षा त्यांची नीती नि धर्मविषयक बौद्धिक पातळी उंचावलेलीच मला जागोजाग आढळली. मी क्रिस्तीधर्म प्रचारासाठी एका खेड्यात गेलो असताना, शेतावर काम करणार्या एका वृद्ध खेडुताने ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई इत्यादी कितीतरी संतांचे अभंग फडाफड माझ्या तोंडावर फेकून माझ्या प्रत्येक मुद्द्याला तो सडेतोड उत्तर देत होता. खेडुतांचे संतवाङ्मयाचे पाठांतर म्हणजे त्यांच्या बौद्धिक परिणतीचा रोखठोक पुरावाच नव्हे? खेड्यातली भजनी मंडळे भागवत धर्माचे किल्लेकोटच म्हणावे लागतील.`
हिंदू मिशनरी सोसायटीचं काम आणि त्यातला प्रबोधनकारांचा सहभाग सतत वाढत चालला होता. ते सुरुवातीपासूनच सोसायटीचे पदाधिकारीही होते. सोसायटीच्या कामाचा प्रसार करण्यासाठी प्रबोधनकारांनी मुंबई पुण्याच्या बाहेर दौरे करावेत, अशी सूचना गजाननरावांनी केली. त्यानुसार त्यांनी सरकारी नोकरीतून महिनाभराची हक्काची रजा घेतली. खानदेश, वर्हाड, नागपूरपर्यंत दौर्याचा कार्यक्रम आखला. हा परिसर त्यांना परिचयाचा होताच. या परिसरात त्यांचे अनेक मित्रही होते. चाळीसगाव, जळगाव, भुसावळ करत त्यांनी अकोल्याला दिघे वकीलांकडे मुक्काम केला. अकोल्यातल्या बोट क्लबमध्ये झालेल्या भाषणाचं वर्णन त्यांनी केलं आहे. त्यात प्रबोधकारांमधला पट्टीचा वक्ता आणि प्रचारक दिसतो.
व्याख्यान हे हिंदू मिशनरी सोसायटीविषयी असलं तरी प्रबोधनकारांनी विषय हा `स्वराज्य मिळविण्याची सोपी युक्ती` असा दिला होता. ब्रिटिशांच्या राज्यात स्वराज्य हा शब्द उच्चारणं कठीण होतं. त्यामुळे श्रोत्यांचा तुडुंब प्रतिसाद मिळाला. महिलाही मोठ्या संख्येने आल्या. शॉर्टहँडमध्ये भाषण लिहून घेणार्या पोलिसांच्या रिपोर्टरांचीही गर्दी होती. प्रबोधनकारांनी भाषणच शॉर्टहँड रिपोर्टिंग म्हणजे लघुलेखनापासून सुरू केलं. ध्वनिलेखन पद्धतीने वेगाने अचून रिपोर्टिंग करता येतं असं सांगत या पोलिसांशीच संवाद सुरू केला. कारण या सरकारी मंडळींपर्यंत सोसायटीचं काम पोचवण्यासाठीच त्यांनी स्वराज्य हा शब्द संबंध नसतानाही विषयात घेतला होता. हिंदूंच्या संघटनाविषयी बोलता बोलता त्यांनी सोसायटीचा इतिहास, तिचं कार्य, उपनयनाचा विधी याविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात आलेल्यांचे फोटो दाखवायला सुरवात केली. त्यामुळे श्रोत्यांची उत्कंठा शिगेला पोचली. भाषण संपलं तेव्हा फोटो बघण्यासाठी झुंबड उडाली. पोलिस इन्स्पेक्टरनेही भाषणाला दाद दिली.
दौर्याचा शेवटचा टप्पा नागपूरला होता. तिथे या प्रसाराचा कळसाध्यायच लिहिला गेला. चिटणीस पार्कात झालेल्या सभेला जोरदार गर्दी झाली. भाषणानंतर प्रश्नोत्तरंही झाली. एक मोठे ख्रिश्चन रेवरंड आले होते. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरं प्रबोधनकारांच्या भाषेतच वाचायला हवीत.
रेवरंड : परधर्मीयांकडे अन्नभक्षण केल्याने हिंदू बाटतो की नाही?
प्रबोधनकार : हिंदूला `बाट` कशानेही लागत नाही.
रेवरंड : तुम्ही मुसलमानांकडे जेवाल का?
प्रबोधनकार : आम्ही वाटेल त्याच्या हातचे खाऊ आणि हिंदू राहू.
रेवरंड : तुम्ही गोमांस खाल काय?
प्रबोधनकार : गोमांसच काय, तुम्हाला खाऊ. तुमच्या क्रिस्ताला खाऊ. सगळ्या जगाला खाऊ आणि वर निर्भेळ हिंदू राहू. आजकालची ही नवी जनस्मृती आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी असणार्या वकील गोविंदराव प्रधानांनी वाद थांबवला. पण या वादामुळे ख्रिश्चन झालेल्या दोन तरुणांनी पुढे येऊन इच्छा व्यक्त केली की आम्हाला हिंदूधर्मात परत यायचं आहे. सोसायटीचे सक्रिय कार्यकर्ते चिंतामणराव मराठे यांनी घोषणा केली, उद्याच या तरुणांचा उपनयन विधी करून त्यांना हिंदू धर्मात परत आणलं जाईल. त्यामुळे नागपुरात खळबळ उडाली. दुसर्या दिवशी सकाळी मिरवणूक काढून त्या तरुणांना शुक्रवारी तलावाकडे नेण्यात आलं. त्या मिरवणुकीत शेकडो जण सामील झाले. धर्मांतराचा उपनयन विधी कसा करतात, याची सगळ्यांना उत्सुकता होती. तो प्रसंगही प्रबोधनकारांच्या शब्दांतच वाचायला हवा –
`तलावावर जाताच मी त्या दोघा तरुणांना, `तुमचा निश्चय कायम आहे ना? विचारले. त्यांनी जोरदार होकार दिला. आसपास बरेच क्रिस्ती मिशनरी उभे होते.
मी : बंधूंनो तुम्हाला जेव्हा क्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली. तेव्हा कसला विधी केला, ते सगळ्या लोकांना स्पष्ट सांगा.
एक तरुण : प्रथम त्यांनी बायबलातले काही वाचले. नंतर एका भांड्यात आणलेले पवित्र पाणी त्यांनी आमच्या कपाळाला, दोन्ही बावखंडाला आणि छातीला लावले. पुन्हा काही प्रार्थना केली आणि म्हणाले, `आता तुम्ही आमच्या धर्माचे झाला.`
मी : बस्स इतकेच? ठीक आहे. उतरा पाण्यात. मारा बुचकळी.
वर येताच त्यांना गायत्री मंत्र म्हणायला लावले. असे तीन वेळा केले. `कृष्णं वन्दे जगद्गुरुम` हा मंत्र म्हणत करा आता स्नान आणि या वर, मी म्हणालो. त्यांनी तसं करताच चिंतामणराव मराठेंनी गीतेचा अकरावा अध्याय मोठ्याने वाचून त्यांना ऐकवला आणि मी पुन्हा गायत्री मंत्राचा मोठ्याने उच्चार करून त्यांच्या गळ्यांत यज्ञोपविते घातली. झाला उपनयन विधी.`