कै. सुधीरभाऊ जोशी १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारमधील माजी शिक्षणमंत्री तसेच १९७३मधील मुंबईचे सर्वात तरूण, तडफदार उमदे व्यक्तिमत्त्व असणारे मुंबई महानगरपालिकेचे महापौर यांच्या स्मृतीस मनापासून दंडवत व त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना.
मी त्यांच्याबरोबर आलेले काही अनुभव येथे नमूद करू इच्छितो.
मी खार शिवसेना शाखेत उपशाखाप्रमुख असताना त्यांचा सत्कार आम्ही आयोजित केला होता. तेव्हा ते स्वामी विवेकानंद मार्ग येथून आले. नियोजित ठिकाणी पोहोचणारा मार्ग एकमार्गी होता. तेव्हा मी म्हणालो, सर हा रस्ता नो एण्ट्री मार्ग आहे. आपल्याला थोडं फिरून यावं लागेल, तेव्हा ते म्हणाले. बस माझ्या गाडीत व मार्ग दाखव. मी त्या महापौरांच्या आलिशान गाडीत बसून त्यांना नियोजित स्थळी नेले. सांगायचा मुद्दा, ते कायद्याचे पालन करणारे होते.
दुसरा अनुभव साधारण १९९६-९७ साली ते माजी शिक्षणमंत्री असतानाचा आहे. या काळात कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांच्या तृतीय श्रेणी-चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांनी पगारवाढीच्या मुद्यावर संप झाला होता. या संपात ११वी-१२वीचे विद्यार्थी
ऑक्टोबर ते डिसेंबर जवळजवळ ४० दिवस घरी बसून होते. तेव्हा मी जागृती पालक संघटना, मुंबई याद्वारे जनजागृती करून सर्व पालकांना घेऊन मा. सुधीरभाऊंना भेटायला गेलो. त्यांनी आम्हाला एकच सांगितले की, मला शिक्षकांचे म्हणणे मान्य आहे, परंतु या पगारवाढीच्या तरतुदीसाठीचा निधी हा विषय अर्थखात्याचा आहे. त्यांनी मान्यता दिल्यास माझी हरकत नाही. तेव्हा हे प्रकरण मातोश्रीवर मा. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नेऊन आम्ही तो संप मिटवला. सांगायचा मुद्दा मा. सुधीरभाऊंचा आम्हाला वक्तशीरपणा भावला. माझ्या निर्णयामुळे अर्थखात्यावर परिणाम होत असेल तर तो मला मान्य नाही, असे हे शिक्षणमंत्री होणे नाही.
तिसरा अनुभव म्हणजे १९७३-७४ साली महापौर असतानाचा. सर्व पक्षांना योग्य न्याय देऊन सर्व नगरसेवकांत लोकप्रिय असे महापौर होणे नाही. मार्च १९७४ साली महापौर म्हणून निवृत्त झाल्यावर दुसर्या दिवशी आपल्या घराजवळील प्लाझा जवळील बसस्टॉपवर उभे राहून बेस्टच्या बसने ते महानगरपालिकेत मुख्य कचेरीत हजर झाले. तो बसस्टॉपवरील फोटो सर्व वर्तमानपत्रांत आला होता. तो मला अजूनही आठवतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेची दुसरी ओळख म्हणजे स्थानीय लोकाधिकार समिती, जी आज आम्हा मराठी नोकरदारांना दिलेली त्या काळातील संघटना. तिच्यामुळे आज आपण पदवीधर मतदारसंघात एक आमदार महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये पाठवू शकलो. मा. सुधीरभाऊंसारखे व्यक्तिमत्त्व होणे नाही. अशा या थोर नेत्याचा आदर्श अनुभव घ्यावा. नगरसेवकांनी तो अंगीकृत करावा ही त्यांना खर्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
– सुरेश आत्माराम लाड,
ज्येष्ठ शिवसैनिक