सुप्रिया प्रॉडक्शनतर्फे दरवर्षी होणारी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा दोन वर्षांच्या खंडानंतर आता येत्या फेब्रुवारीत रंगणार आहे. २०१६ ते २०१९ या चार वर्षांत महाराष्ट्रभरातून १६५ संघांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विविध बोलींमधील एकांकिका सादर केल्या. प्रसिद्ध मालवणी नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला ‘यू टर्न’, ‘कथा’, ‘हिमालयाची सावली’ या गाजलेल्या नाटकांचे प्रसिद्ध निर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिले आणि सुप्रिया प्रॉडक्शनतर्फे ही स्पर्धा सुरु झाली. २०२०मध्ये गोविंद चव्हाण यांचे आकस्मिक निधन आणि २०२१पर्यंतचा कोरोना काळ यामुळे दोन वर्षे खंड पडलेली ही स्पर्धा पुन्हा सुरु करण्याचे त्यांची कन्या सुप्रिया यांनी ठरवले.
फेब्रुवारीमध्ये रंगणार्या राज्यस्तरीय बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे प्रथम पारितोषिक नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या नावे देण्यात येणार असून या वर्षी या स्पर्धेला धि गोवा हिंदू असोसिएशन आणि व्हिजन व्हॉईस एन अॅक्ट या दोन संस्थांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. या वर्षी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, नागपूर, सांगली, कोल्हापूर येथून अनेक संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. २१ हजार रुपयांचे स्पर्धेचे प्रथम पारितोषिक गोपीनाथ सावकार यांचे भाचे प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे, तर द्वितीय पारितोषिक रुपारेल महाविद्यालयाच्या माजी विभागप्रमुख प्रा. रोहिणी गोविलकर यांनी सुशीला केशव गोविलकर यांच्या नावे पुरस्कृत केले आहे.
कुलदीप पवार पुरस्कार (विनोदी अभिनेता), याज्ञसेना देशपांडे पुरस्कार (विनोदी अभिनेत्री), रमेश पवार पुरस्कार (विनोदी लेखन), राघू बंगेरा व उमेश मुळीक पुरस्कार (प्रकाशयोजना), अरुण कानविंदे पुरस्कार (पार्श्वसंगीत), गोविंद चव्हाण पुरस्कार (रंगमंच व्यवस्थापन), सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार, चेतन दातार पुरस्कार (दिग्दर्शक), सखाराम भावे व रघुवीर तळाशिलकर पुरस्कार (नेपथ्य), रंगनाथ वामन कुलकर्णी पुरस्कार (वेशभूषा), रंगमहर्शी कृष्णा बोरकर पुरस्कार (रंगभूषा), डॉ. उत्कर्षा बिर्जे पुरस्कार (वाचिक अभिनय) असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे. २९ व ३० जानेवारी रोजी या स्पर्धेची प्राथमिक फेरी कुर्ला-नेहरुनगर येथे प्रायोगिक रंगकर्मींसाठी नव्यानेच सुरु झालेल्या प्रबोधन प्रयोग घरामध्ये आणि ७ फेब्रुवारी रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे अंतिम फेरी होणार आहे. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज www.govindchavan.com या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ७०२१७१७२४७ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सुप्रिया गोविंद चव्हाण यांनी केले आहे.