‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाची जुळवाजुळव करताना स्व. बाळासाहेबांना काय काय सव्यापसव्य करावे लागले, किती समस्यांना तोंड द्यावं लागलं, याचा खुमासदार आढावा त्यांनी त्यांच्या पहिल्यावहिल्या अग्रलेखात घेतला आहे. हे ‘सचित्र वर्तमानपत्र’ कशासाठी या प्रश्नाची त्यांनी दिलेली वेगवेगळी उत्तरं खास वाचण्यासारखी आहेत हा सगळा उपद्व्याप कशासाठी, याचं उत्तरच आपण शोधत आहोत, असं बाळासाहेब अग्रलेखात शेवटी म्हणतात, “तेव्हा नियती मनाशी हसली असेल, या साप्ताहिकातून पुढे केवढा मोठा अंगार फुलणार आहे, हे तिलाच तर माहिती होतं.”
देशापुढे आज अनेक समस्या आहेत. समस्या म्हणजेच भानगड आणि भानगड म्हणजेच समस्या.
त्यातल्या त्यात दोन खर्या समस्या. तुमानीच्या कापडाच्या वाढत्या किमती ही एक आणि दुसरी – मराठी व्यंगचित्र साप्ताहिक काढण्याचा खटाटोप. पहिलीबद्दल न बोललेले बरे. तुमानीशिवाय स्वत:चे चित्र कसे दिसेल या कल्पनेतच त्या भानगडीचा खुलासा येईल. दुसरीचा अनुभव घेण्यासाठी व्यंगचित्र साप्ताहिकाचा आटारेटा करूनच पाहायला हवा.
आम्ही तो पाहिला आणि पाहातच आहोत आणि समस्या म्हणजे समोसा नव्हे हा साक्षात्कार पटला. समोसा कोणत्याही बाजूने तोडला तरी परवडतो, पण समस्या? अरे बापरे! तिला अनेक कोन. कोणता प्रथम तोडावा नि कोणता नाही, हेच उमगायचे नाही.
कागद, छापखाना, साहित्य, चित्रे, ब्लॉक्स, एजंट्स, पत्रव्यवहार, स्नेही जोडताना पक्षीय प्राबल्याची लाथाळी, त्यातच पत्नीचे बाळंतपण, रस्त्याने किंचाळत जाणार्या मोर्चांच्या ‘झिंदाबाद, मुर्दाबाद’च्या कर्कश आरोळ्या, मस्तकशूळ उठवणारे, आसपासच्या समंजस गृहिणींनी फुलटॉप सोडलेले रेडिओचे गीत… एक ना दोन भानगडी. त्यातली खासगी खासगत कोणती आणि साप्ताहिक कोणती, हे हुडकणे महाकठीण काम.
अहो, काय सांगावे? बावरलेल्या मनस्थितीत प्रेस असे ठळक तांबड्या पेन्सिलीने लिहिलेले पुडके ब्लॉकमेकिंगऐवजी हॉस्पिटलाकडे रवाना झाले, हॉस्पिटलच्या बादलीची रवानगी स्टुडिओकडे झाली नाही यात बचावले.
समोसे खाणे सोपे, पण समस्या सोडवणे फार बिकट. सचित्र विचित्र वर्तमानपत्र काढणे केवढ्या त्रांगड्याचे होऊन बसले आहे, त्याची कल्पना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. अगदी सातारी प्रकार. एक पाऊल उचलावे तो दुसरे चिकटले खड्ड्यात. एक भानगड निस्तरावी तो दुसरी जबडा वासून समोर दत्त. सहकारी जमले. लेखक, चित्रकार सगळे. कागदाची तरतूद झाली. चित्रांचे ब्लॉक्स आले. छापखाना आधीच ठरून तसे मॅजिस्ट्रेटसमोर डिक्लेरेशनही झाले. ते परतही आले. साहित्याचे गाठोळे पाठंगुळी मारून छापखान्यात जातो तो काय? दादरच्या रामकृष्ण छापखान्यातल्या मालकाला नि व्यवस्थापकांना फेपरे आलेले. आमच्या वडिलांचे स्नेही कै. बाबुराव सापळे यांच्या वेळची स्नेहबुद्धी आटलेली. ठरलेल्या कराराचीही कोणी दाद घेईना. मारली त्यांनी आम्हाला टांग. स्पष्ट नकारच दिल्यावर तेथल्या महाभागांच्या नावाकडे पाहण्यात अर्थच तो काय उरला?
लहान मोठ्या अनेक सापळ्यांमधून सहीसलामत बाहेर पडलो. आता हा सापळ्यांच्या छापखान्याचा सापळा ऐन प्रकाशनाच्या बोकांडी बसला. कारण काय? त्याचाही उलगडा नाही. गोळाबेरीज इतकीच निघाली की, कै. बाबूराव सापळ्यांच्या वेळची मोकळ्या मनाची व्यवहारी दिलदारी त्यांच्याबरोबर स्वर्गवासी झाली.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणतात. यात अतिशयोक्ती असेल. पण तोही अनुभव आला. आमचे ‘आवाज’ वार्षिकाचे प्रयत्नवादी स्नेही मधुकर पाटकर हे सक्रिय पाठिंब्याला हाक मारताच धावून आले. ‘‘हात्तिच्या! आपला ‘आवाज प्रिंटर’ छापखाना खडा आहे ‘मार्मिक’च्या दिमतीला. आपला स्नेह काय इतरांच्या सारखा ‘पट्टीस घे पावली’चा आहे थोडाच?’’ या त्यांच्या दिलाशाने आम्हा ठाकरे बंधूंच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. तत्काळ श्री. पी. वसंतराव यांनीही आमच्या वडिलांविषयीचा पूर्व ऋणानुबंध ओळखून आम्हाला लागेल ते सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
समस्येच्या हल्ल्याला अनुलक्षून आमचे एक सहकारी म्हणाले, ‘मानली तर समस्या, उलटीकडून वाचली तर काहीच बोध होत नाही.’ इतक्यात पेशवाई थाटाचा जामानिमा केलेले शास्त्रीबोवा विडीच्या धुराचा चौफेर भपकारा सोडीत ‘मार्मिक’ कचेरीत अवतरले. म्हणाले, ‘काय म्हणता? समस्या उलटी वाचण्यात अर्थबोध होत नाही? सोडवा पाहू ही आमची समस्या.’
रन्नसि क्षत्रिय सामाय साकुभि. आम्ही शास्त्रीबोवांच्या विडीचे व्यंग तेव्हाच हुडकले, पण त्यांच्या समस्येचे बिंग मात्र हाती लागले नाही. अहो, आमचे संस्कृत ताकापुरत्या रामायणाचे. रानडे रोडला रानडे पथ म्हणण्यापुरते. आम्हाला निरुत्तर केल्याच्या दिमाखात शास्त्रीबोवाने विडीचा एक झुरका ठासून प्रवचन केले. ‘करा उलटी समस्या आणि बघा आमच्या विडीच्या झुरक्याचा बाप कोण तो त्यात.’ खुद्द शास्त्रीबोवा हेच एक समस्या निघाले. ते एका विडी कारखानदाराचे बोलके प्रचारक होते.
या साप्ताहिकाची जुळवाजुळव एक मोठा गंमतीदार व्याप ठरला. गीतोक्त लोकसंग्रह काय चीज आहे आणि तिचे फायदे-तोटे कसे हुडकावे याचे ज्ञान आपोआप होत गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून उत्तेजनाचा सारखा वर्षाव होत होता. त्यामुळे थकवा आलाच नाही. कष्ट जाणवले नाहीत.
आमच्या सोयीसाठी रात्री दिवस झाल्या आणि दिवसांनी रात्रीची भूमिका बजावली. घराची कचेरी झाली आणि कचरीचे घर बनले. ब्रशाची शिस्पेन्सिल, शिस्पेन्सिलाचे कानकोरणे, ज्ञात-अज्ञात रसिकांनी टेलिफोन आणि पोस्टाला जणू वेठीला धरले. त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांचे सहकार्य नसते तर आम्हाला ऋणी होता आले असते?
हे साप्ताहिक आम्ही काढले. त्यामागला उद्देश काय? असे एक (कल्पनिक) वाचक विचारतात. खरेच. काय बरे उद्देश? लोकशिक्षणार्थ म्हणावे तर हे १९ वे शतक आहे थोडेच! ते अगदी जुन्या वळणाचे ओबडधोबड उत्तर आणि ते द्यायचे तर आमच्या डोक्यावर भलेमोठे जात्याएवढे पागोटे आहे कुठे? बरे, जनताजनार्दनाच्या सेवेकरिता? किंचित जुने नि प्रेमळ उत्तर असले तरी त्यालाही गांजा-भांगेसारखा किंचित उग्र दर्प आहेच आहे. तशात हेच उत्तर देऊन वेळ मारायची तर अंगावर खादीची जाडजूड वल्कले आणि खांद्यावर एखादे घोंगड्याचे रकटे वागवणारांनी ते दिल्यास शोभण्यासारखे आहे. ज्ञान आणि मनोरंजनासाठी? आहे हे अप टु डेट फॅशनचे उत्तर. पोटासाठी हे प्रामाणिक उत्तर. उगीच हे खरे उत्तर आणि आमचे उत्तर?
अहो, तेच तर आम्ही शोधीत आहोत.
वाचकांनी हातभार लावावा!
वृद्ध तरुण
पंतप्रधान नेहरूंनी ‘मार्मिक’ला संदेश पाठवावा हे स्वाभाविक आहे. कारण सत्तरी ओलांडली तरी थट्टामस्करीत एखाद्या तरुणासारखा रस घेणारा हा पुरुष आहे. मोटारीतून जाताना प्रेक्षकांच्या अंगावर ते हार फेकतात व काँग्रेसच्या व्यासपीठावरही तक्क्यांच्या फेकाफेकीचा खेळ खेळतात. रंगपंचमीच्या दिवशी नेहरूंना गुलाबाने माखून काढणे हा दिल्लीकरांचा वार्षिक कार्यक्रम होऊन बसला आहे. नेहरू रंग खेळतात म्हणून इतर मंत्र्यांना नाइलाजाने त्यात भाग घ्यावा लागतो हे त्यांचे फोटोतले दुर्मुखलेले चेहरे पाहून स्पष्ट कळते. महात्माजींकडून त्यांच्या इतर शिष्यांनी पंचा व टकळी घेतली. नेहरूंनी मात्र राजकीय दृष्टी नि निरागस हास्य घेतले.
स्वातंत्र्य आल्यापासून या पुरुषासमोर केवढे प्रश्न आले. निर्वासित, गांधी-वध, भाषिक राज्ये, द्राविड कझागम, नागा, चिनी आक्रमण, काँग्रेस संघटनेची भ्रष्टता यापैकी कोणताही एक प्रश्न एका माणसाचे कंबरडे मोडण्यास पुरेसा आहे. पाकिस्तानात डझन, अर्धा डझन पंतप्रधान झाले नि अखेर हुकूमशहाच आला. इंडोनेशिया, ब्रह्मदेश, सिलोनात हीच अवस्था आहे. २५ वर्षे राजकारणात मुरलेले ईडन एका सुवेझच्या कालव्यात गारद झाले. पण सर्व प्रश्नांना तोंड देऊन पं. नेहरू ताजेतवाने राहिले आहेत. इतके की, त्यांच्या बटन होलमधील गुलाब व ते यांच्यात अधिक टवटवीत कोण असा प्रश्न पडावा. तासा दोन तासांत गुलाबही कोमजतो; पण सकाळपासून रात्री दोन वाजेपर्यंत काम करणारे नेहरू हास्यवदन असतात.