अयोध्यातील राम मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. यासाठी शिवसेनेने मदत जाहीर केली. त्यापाठोपाठ आता शिवसेना उपनेता विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची वीट देण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार ही वीट तयार करून तिचे पूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही चांदीची वीट राम मंदिराच्या ट्रस्टींकडे 16 नोव्हेंबर, 2020 बलिप्रतीपदेच्या शुभ दिवशी सुपूर्द करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूजन झालेल्या विटेवर ‘जय श्रीराम’ ही अक्षरे कोरण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूस ।। श्री गणेशाय नमः ।। हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नानुसार अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने व सौ. रश्मी ठाकरे, ना.आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे, यांच्या सहकार्याने प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी एक खारीचा वाटा अर्पण करीत आहे, असा मजकूर कोरण्यात आला आहे.
सौजन्य- सामना