पळसाला पाने तीन, पालथ्या घागरीवर पाणी, अशा म्हणी कोणी बनवल्या असतील?
– रितेश जैस्वाल, नागपूर
ज्यांची तोंडावर बोलण्याची हिम्मत नाही.
सांताक्लॉजने मोठ्या माणसांनाही भेटवस्तू द्यायला सुरुवात केली, तर तुम्ही काय मागाल?
लक्ष्मी रेंदाळे, चिखलदरा
तुम्ही जे मागाल त्याच्याविरुद्ध.
कसं काय मांगले, बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?
रेवा देशमाने, इचलकरंजी
अरे देवा, तुमच्यापर्यंत कसं पोचलं?
नवीन वर्षाचा तुमचा संकल्प काय?
पंडित कुंभार, पुणे
शक्यतो खरं बोलणं!
जुन्या काळातल्या कोणत्या मराठी सिनेमाचा रिमेक केला जावा असं तुम्हाला वाटतं? त्यात कोणती भूमिका साकारायला आवडेल?
जुही येलमाडे, बेळगाव
मुंबईचा जावई. शरद तळवलकर.
तुम्ही आत्मचरित्र लिहिलंत तर त्याचं नाव काय असेल?
सुरेश पंडागळे, भोसरी
खोट्यापाठी लपलेलं खरं!
कोल्हापुरात कोणीही कोणालाही प्रेमाने रांडीच्चा अशी शिवी देतो. कोकणातही सहज बोलण्यात इरसाल शिव्या येतात. मग आपल्या सिनेमांना शिव्यांचं इतकं वावडं का असतं?
संतोष कोठारे, वालचंद नगर
किमान तिथे तरी सभ्यपणा असावा म्हणून!
गर्दीच्या ठिकाणीही तोंडावर मास्क न लावलेले किंवा हनुवटीवर मास्क लावलेले लोक दिसतात, त्यांना निर्बंधांचे पालन करायला शिकवायची काही युक्ती आहे का तुमच्याकडे?
प्रेरणा वाकटकर, गोंदवले
तोंडावर खोकावे.
पंडित नेहरू म्हणतात, आळस हा माणसाचा शत्रू आहे, महात्मा गांधी म्हणतात, शत्रूवर प्रेम करा… मी काय करू?
रियाझ शेख, भिवंडी
शत्रू सर्वनाश करतो हे कळलं तर सोयीने प्रेमाने करणे शिकतो माणूस.
३१ डिसेंबर जवळ आला की हे ‘आपले’ नववर्ष नाही, असे संदेश यायला लागतात… त्यांना काय उत्तर द्यावे?
हिरा वेल्हाळ, श्रीरामपूर
ढोंगी आणि सोयीने राष्ट्रप्रेम करणार्यांना फाट्यावर मारावे.
देव कुठे भेटेल?
आराधना बावडेकर, पुणे
कुठेच नाही… अंधश्रद्धा आहे ही!
तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे मानवजातीचा अंत या शतकाअखेरपर्यंत ओढवेल, असा इशारा काही तज्ज्ञ देत आहेत. तुम्हाला काय वाटतं?
मनोहर सुर्वे, कणकवली
माणूस खूप चिवट आहे.
आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो, या गाण्याचा अर्थ काय?
सोनाली देशपांडे, बदलापूर
अर्थ घेईल तसा आहे… मी कोकणातले आंबे गोड असतात हा अर्थ घेतला.
तुम्ही म्हणताय, नया है वह… मग जुना कोण आहे?
बर्नर्ड डिकोस्टा, नालासोपारा
तुम्ही!
जेवणात तुमचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता?
मनाली शेळके, सातारा
आंबोळ्या.
तरूण वयात चरित्र अभिनेता म्हणून काम करायला लागण्याचं कधी वैषम्य वाटतं का?
श्रीनिवास बोरकर, चारकोप
नाही… यातच खूप काळ करियर आहे हे लक्षात आलं.
दक्षिण भारतात स्थानिक भाषा शिकल्याशिवाय चार दिवस राहणंही कठीण जातं, आपल्याकडे लोक मराठीचा एक शब्दही न शिकता कित्येक पिढ्या राहात आहेत. असं का होत असावं?
उमा बेंद्रे, डोंबिवली
सगळ्यांनाच भीषण हिंदी येतं हे आपलं वैष्यम्य आहे. हिंदी फिल्मही म्हणूनच इथे खूप चालतात.