अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू-मंगळ वृश्चिकेत, रवी-बुध धनूमध्ये, शुक्र (वक्री), शनी-नेपच्यून मकरेत, गुरू-नेपच्यून कुंभेत, हर्षल (वक्री) मेषेत, चंद्र आठवड्याच्या सुरवातीला सिंह राशीत, त्यानंतर कन्या, तूळ आणि आठवड्याच्या अखेरीस वृश्चिकेत.
दिनविशेष – २५ डिसेंबर रोजी नाताळ, ३० डिसेंबर रोजी सकला एकादशी.
मेष – कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कामाच्या ठिकाणी अचानक एखादी समस्या निर्माण होईल. मात्र, न डगमगता तोंड दिलेत तर त्यातून सहीसलामत बाहेर पडाल हे नक्की. मंगळ केतूच्या सान्निध्यात अष्टमात आहे. कोणतेही काम करत असताना थोडे सबुरीने घ्या. वडिलांसाठी भाग्यवर्धक काळ आहे. विद्यार्थीवर्गाला आठवडा उत्तम जाईल. नोकरदार मंडळींचा बढतीचा मार्ग आता मोकळा होईल. काहीजणांना अनपेक्षितपणे शुभवार्ता कानावर पडेल. घरात धार्मिक कार्य पार पडेल. सामाजिक कामासाठी सढळ हाताने मदत कराल. लांबचा प्रवास होण्याचे योग आहेत. दशमातील शनी-शुक्र युतीमुळे व्यवसायात चांगले लाभ मिळतील.
वृषभ – येणारा आठवडा चांगला जाणार आहे. कामात घवघवीत यश मिळेल. २५ आणि २६ डिसेंबर रोजी होणार्या गुरु-चंद्र समसप्तक योगामुळे गृहसौख्य लाभेल. उद्योग-व्यवसायातून चांगले लाभ मिळतील. सप्तमातील केतू-मंगळामुळे जोडीदार-भागीदार यांच्याबरोबर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. योगकारक शनीबरोबर शुक्राचे भ्रमण हे खास करून सिनेतारका, कलाकार यांच्यासाठी लाभदायक राहील. लेखकांना मानधन मिळेल. गृहकर्ज, व्यावसायिक कर्ज, मंजूर होईल. घरामध्ये वडीलधार्या मंडळींची काळजी घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात जर वाद सुरू असतील तर आताच्या घटकेला चर्चा, सल्लामसलत, या माध्यमातून विषय पुढे ढकलावेत, अन्यथा अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
मिथुन – कुटुंबाबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. विषय तुटेपर्यंत ताणू नका, सामंजस्याने सोडवा. रवीबुधादित्य योग सप्तमात होत असल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. त्यामुळे चिडचिड होऊ शकते. सरकारी कामकाजात, राजकीय क्षेत्रात काम करत असाल तर सकारात्मक निर्णय होईल. महत्वाचे काम मार्गी लागेल. कुंडलीत राजयोग होत असल्यामुळे काही अनपेक्षित फळे मिळणार आहेत. प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. वायदेबाजारातून चांगले लाभ मिळतील.
कर्क – बुद्धिचातुर्याचा वापर करून पैसे मिळवण्याचे योग जमून येत आहेत. चंद्राचे द्वितीयाल भ्रमण, मंगळाचे पंचमातील भ्रमण आणि लाभातील राहू यामुळे चांगले अनपेक्षित लाभ पदरात पडतील. विद्यार्थी आळसावतील. वैवाहिक जोडीदारासोबत वीकेण्ड मौजमस्ती करण्यात घालवा. तसे केले नाही तर नव्या वर्षाची सुरुवात रुसव्याफुगव्याने होऊ शकते. पती-पत्नीची मर्जी सांभाळा. आठवड्याचे नियोजन लवकर करा. शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी उत्तम संधी चालून येईल. खेळाच्या स्पर्धेत सहभागी झालात तर नक्की यश मिळाले म्हणून समजा…
सिंह – आता तुमची आर्थिक बाजू चांगली भक्कम होणार आहे. मौज-मजा करण्यासाठी हातात पैसा खेळता राहील. रवी पंचमात, रवीबुधादित्य योगात, विद्यार्थी वर्गासाठी शुभदायक आठवडा राहणार आहे. मंगळ योगकारक असून केतू चतुर्थ भावात आहे, त्यामुळे कुटुंबात काही कुरबुरी सुरु असतील, तर त्याचा त्रास अजून काही काळ सोसावा लागणार आहे. महिलांना आरोग्य सांभाळावे लागणार आहे. दशमेश शुक्र षष्ठात, शनी-प्लूटो त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होतील. जुना वाद उफाळून येऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या आणि शांत राहा.
कन्या – माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्या मंडळींना हा काळ एकदम मस्त जाणार आहे. बुध चतुर्थ भावात, रवीबुधादित्य योगात. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकून पडलेले काम आता मार्गी लागेल. नवीन वास्तूची खरेदी होऊ शकते. त्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक पैसे खर्च होतील. ग्रहांच्या शुभस्थितीमुळे सर्व कार्ये मनासारखी घडत जातील. त्यामुळे उत्साह वाढलेला दिसेल. महिलांना मायग्रेन, शिरांच्या संदर्भातील आजारांचा त्रास होऊ शकतो. कायदेपंडितांसाठी प्रसिद्धीचा काळ राहणार आहे.
तूळ – कोणासाठीही मध्यस्थाची भूमिका करू नका, ते महागात पडू शकते. शुक्र वक्री असून शनी-प्लुटोसोबत आहे, त्यामुळे वादविवादाच्या विषयापासून दोन हात लांबच राहा. भागीदारी-व्यवसायातून चांगला फायदा मिळेल. खासकरून अभियांत्रिकी व्यवसायाशी निगडित मंडळींना अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळेल. यात्रा कंपनी, टूर-ट्रॅव्हल व्यवसाय करणार्या मंडळींना अच्छे दिन दिसतील. कामाच्या निमित्ताने छोटे-मोठे प्रवास घडतील. पराक्रम भावातील रवीबुधादित्य योगामुळे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आर्थिक वृद्धी होईल. पत्रकार मंडळीसाठी लाभदायक आठवडा. मोठी प्रसिद्धी मिळवून देणारी एखादी बातमी हाताला लागेल.
वृश्चिक – स्फूर्ती आणि अपेक्षा यांच्यामध्ये वाढ होणार आहे. गुरूचे सुखस्थानातले भ्रमण, गुरुचंद्र समसप्तक योग यामुळे व्यापारवृद्धी होईल. त्यामधून चांगली आर्थिक आवक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडताना दिसतील. जोडीदारासोबत सलोख्याचे संबंध ठेवा, त्यामुळे आनंदात नक्कीच वृद्धी झालेली दिसेल. शनीचे पराक्रमात भ्रमण होत असल्यामुळे वाहनाचे सुटे भाग, गॅरेज व्यवसाय, ब्रोकरेज, आर्किटेक्ट असे व्यवसाय करणार्यांना पैसे कमावण्यासाठी चांगला काळ आहे. प्रवास होतील, क्रीडापटूंना स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळेल.
धनू – साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू आहे, त्यामुळे हळूहळू सर्व कामामध्ये सकारात्मक बदल झाल्याचे जाणवतील. आर्थिक बाबतीतील, व्यवसायातील पिछेहाट हळूहळू पूर्वपदावर येताना दिसेल. नव्या वर्षात अनेक सकारात्मक घटना घडताना दिसून येतील. जुनी येणी सहजपणे वसूल होतील. दशमेश आणि भाग्येश रवी-बुधाचे लग्नातले भ्रमण तुम्हाला यश मिळवून देईल. सासुरवाडीकडून मदत मिळेल. व्ययस्थानातील मंगळ-केतू अंगारक योगामुळे अति धावपळ होईल. तिचा आरोग्यावर परिणाम झालेला दिसेल. त्यामधून एखादी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मकर – कामासाठी अतिप्रमाणात धावपळ करावी लागेल. पण ती अंगाशी येणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्या. शुक्र लग्नी असल्याने साडेसातीमुळे विस्कळीत झालेली उद्योगाची घडी आता हळूहळू पूर्वपदावर आलेली दिसेल. वैद्यकीय व्यवसायासाठी लाभदायक काळ आहे. मंगळ-केतूचे भ्रमण अनपेक्षित लाभाचे. गुरूच्या भ्रमणामुळे आर्थिक बाजू चांगली सांभाळली. नव्या घराचे प्लॅन प्रगतीपथावर येतील. नोकरदारांना कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याचे योग आहेत. प्रमोशनसुद्धा मिळू शकते.
कुंभ – कठीण काळ राहणार आहे. नको ती शुक्लकाष्ठे मागे लागू शकतील, त्यामुळे कोणतेही काम करताना सावध राहा. खार्चिकपणा वाढू शकतो. शुक्राचे व्ययातील भ्रमण होत असल्यामुळे विनाकारण पैसे खर्च करण्याची वृत्ती वाढू शकते. बिनकामाची महागडी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक सहलीचे आयोजन होईल. लाभातील रवीबुधादित्ययोगामुळे सर्व कामे सुरळीत पार पडतील. नवीन व्यावसायिक धाडस करण्यास काहीच हरकत नाही, पण भविष्यातील फायदा-तोटा यांची सांगड घालून निर्णय घ्याल, तर चांगले यश मिळू शकते.
मीन – राशीस्वामी गुरूचे व्ययातील भ्रमण आणि सर्व ग्रहांचे शुभ राश्यांतर अनुकूल असल्यामुळे वर्षाच्या अखेरीस तुम्ही दिवाळीच साजरी करणार आहात. हात लावाल तिथे सोने होईल अशा काळाचा अनुभव या काळात येईल. मनातल्या इच्छा नक्की पूर्ण होतील. नोकरदार मंडळींना मोठ्या पदावर बढती मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी सेवेतील मंडळींची पदोन्नतीचा काळ जवळ येत आहे. राजकीय क्षेत्रात काम करणार्या मंडळींना सन्मानाचे पद मिळू शकते. नव्या गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. शेअर, सट्टा, लॉटरी, यामधून नशीब उजळू शकते.