ख्रिस्मस हा जवळपास जगभरात साजरा होणारा उत्सव.
भारताची सर्वसमावेशक संस्कृती इतकी विशाल की तो प्रत्यक्षात दोन तीन टक्के लोक साजरा करत असले तरी सगळ्या देशात ख्रिस्मसचा माहौल असतो. आपल्याकडे वसई-विरारच्या पट्ट्यात ख्रिस्मसचं जंगी सेलिब्रेशन होतं. त्यात नाताळगोठ्याच्या व रोषणाईच्या सजावटीसारखेच खाण्यापिण्याचेही विशेष प्रकार बनवले जातात. त्यातलाच एक आहे भरलेली कोंबडी.
हे नाव ऐकताच अनेकांना ‘स्टफ्ड टर्की’ची आठवण झाली असेल. कोंबडीच्या वर्गातलाच पण वजनाने अनेक पट मोठा असलेला हा पक्षी म्हणजे ख्रिस्मसच्या खाद्यसोहळ्याचा सर्वात प्रसिद्ध घटक. वेगवेगळ्या ठिकाणी पोटात वेगवेगळ्या गोष्टी भरून ही टर्की भट्टीत भाजली जाते आणि ख्रिस्मसच्या सहभोजनासाठी जमलेले सगळे कुटुंबीय तिचे काप काढून ताटात घेऊन खातात.
आपल्याकडे हल्ली अनेक ठिकाणी टर्की मिळू लागली आहे. पण, ती मिळण्याआधी भारतीय संस्कृतीतून ख्रिस्ती बनलेला वसई परिसरातील आम्ही मंडळींनी टर्कीच्या जागी कोंबडीची योजना केली आणि ‘भरलेली कोंबडी’ हा खास खाद्यविशेष नाताळाच्या काळात बनवू लागलो. आमच्याकडेही नाताळला सगळं कुटुंब एकत्र बसून सहभोजन करतं आणि त्यात या कोंबडीचा फडशा पाडतं.
बघू या, ही भरलेली कोंबडी कशी बनवली जाते..
भरलेली कोंबडी
सामग्री : अख्खी कोंबडी एक साधारण ८००/९०० ग्रॅम (पिसे काढल्यानंतरचे वजन)
तिखट २ चमचे
काजू ८ ते १०
मनुका ८ ते १०
गोडे तेल २ टेबलस्पून
देशी तूप/ बटर २०० ग्राम
हिरवे वाटाणे एक वाटी
खिमा (मटणाचा) पाव किलो
दही १ वाटी (मीठ टाकून फेटून ठेवा.)
१ लिंबाचा रस
१ अंडे उकडून सोललेले
कांदे दोन मोठे बारीक चिरलेले
बटाटा १ बारीक चिरलेला
लाल मिरच्या १०/१२
हळद १ चमचा
कोथिंबीर अर्धी वाटी
पुदिना पाने ८ ते १०
बदाम ८ ते १०
खालील गोष्टी मिक्सरमध्ये एकत्र बारीक वाटून घ्याव्यात.
लवंग ८ ते १०
दालचिनी २ तुकडे
काळी मिरी अर्धा चमचा
वेलची ५ ते ६
धणे अर्धा चमचा
आल्याचा बोटभर तुकडा
लाल मिरची १० ते १२
अर्धी वाटी लसूण पाकळ्या
कृती : स्वच्छ धुवून कोंबडीला सुरीने खोलगट चिरा पाडाव्यात व तिला लिंबाचा रस चोळून १५ मिनिटे तशीच ठेवावी.
मीठ घातलेली दही फेटून कोंबडीला लावावे. हे पुन्हा १५ मिनिटे मुरण्यासाठी ठेवावे.
खिम्यामधे अर्धा चमचा हळद, दोन चमचे तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यावे.
कांदा तेलात लालसर परतून घ्यावा. त्यानंतर चिरलेला बटाटा व हिरवे मटर व पुदिना पाने टाकून ३ ते ४ मिनिटे परतून घ्यावे. मग मिक्सरमध्ये वाटलेला मसाला त्यातच खरपूस ३ ते ४ मिनिटे परतून घ्यावा. मग त्यात मसाला लावलेला खिमा घालून तोही ५ ते ६ मिनिटे परतून घ्यावा. त्यात बदाम काजू मनुके व चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करावे. खिमा चांगला परतून मोकळा करून घ्यावा.
हा झाला पोटात भरायचा मसाला तयार. दही लिंबू लावून मुरवलेल्या कोंबडीच्या आत हा मसाला भरायला सुरुवात करा. त्यात अंडे भरून वरून परत मसाला भरा.
कोंबडीला आपण ज्या खोलवर चिरा पाडलेल्या आहेत, त्या बाहेरूनही मसाल्याने भरून घ्या आणि सुईदोरा घेऊन भरण्यासाठी कापलेला भाग लांब लांब टाके मारून शिवून घ्या. दोरी नंतर सोडवण्यासाठी धागा थोडा लांब घ्यावा.
कोंबडी सहज फिरवता येईल असे एक खोलगट पातेले घेऊन त्यात दोन टेबलस्पून तेल टाकून चांगले गरम होऊ द्या.
त्यात कोंबडी हळूच ठेवा. मसाला उरला असेल तर तो कोंबडीवर चोपडा आणि त्यानंतरही उरला तर तोही पातेल्यात घाला आणि अधूनमधून फिरवत ती चांगली परतून घ्या.
असं दोन-चार मिनिटे केल्यावर त्यात बटर किंवा देशी तूप २०० ग्राम घाला. पातेल्यावर ताट ठेवा. त्या ताटात पाणी घाला आणि अर्धा तास मंद आचेवर ठेवा. अर्ध्या तासात आपली चवदार भरलेली कोंबडी तयार…
३१ डिसेंबरला नववर्षस्वागताच्या मैफलीसाठी ही डिश बनवलीत, तर २०२१चा शेवट धमाकेदार होईल आणि २०२२ हे वर्ष अगदी पहिल्या क्षणापासून यादगार ठरेल याची गॅरंटी.
ख्रिस्मसमध्ये आणखी एक पदार्थ भरल्या कोंबडीसोबत खाण्यासाठीच घरोघर बनतो. ही आहेत सांदणं. हा पदार्थ आप्पे या नावाने दक्षिणेत बनतो, आपल्याकडे कोकणातही सांदणं याच नावाने बनतो. आम्हा वसईकर ख्रिस्ती समुदायात तो कसा बनतो, ते पाहू या.
सांदणं
साहित्य : दोन कप तांदूळ (कोणतेही आवडीनुसार), एक टेबलस्पून यीस्ट (आंब), एक टेबलस्पून साखर, पाव कप कोमट पाणी, पाव कप पोहे, टेबलस्पून मीठ.
(कपाचे माप आपण हवे तसे निवडू शकता. त्याप्रमाणे यीस्ट व साखर कमी जास्त घ्यावी.)
कृती : तांदूळ धुऊन दोन ते तीन तास भिजत ठेवा.
नंतर त्यातील सर्व पाणी काढून तांदूळ मिक्सरला लावून जाडसर दळून घ्या. सोबत स्वच्छ धुतलेले पोहे पण तसेच दळून घ्या.
एक टेबलस्पून यीस्ट व टेबलस्पून साखर घालून मिश्रण दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवा. नंतर ते मिश्रण या बॅटरमधे चांगले घोळवून टाका आणि सर्व मिश्रण किमान दोन तास आंबवण्यासाठी तसेच ठेवा. आंबल्यानंतर ते चांगले फुलून येते. त्यानंतर ते मिश्रण पुन्हा चमच्याने व्यवस्थित फिरवून घोळवून एकजीव करा.
इडली वाफवण्याच्या भांड्यात पाणी घालून त्यावर बसणार्या पसरट थाळीत तेलाचा हलकासा ब्रश फिरवा व आंबवलेले बॅटर एक पेलाभर घाला. झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफवून घ्या.
पहीले सांदण ८ ते १० मिनिटांत बनते, नंतरची ५ ते ६ मिनिटांत बनत जातात. वाफवलेली थाळी बाहेर काढून थंड पाण्याच्या परातीत अर्धा मिनिट ठेवावी. त्यामुळे सांदण नीट बाहेर काढता येते.
भरल्या कोंबडीसोबत सांदणं छान लागतात.