आमच्या दोन इमारतीतली भिंत दिसायला आठ फुटाचीच असली तरी पार करणे अवघड आहे. आमची बिल्डिंग आहे आणि उर्वी राहते ती चाळ. आम्ही राहतो ती आहे कॉलोनी आणि उर्वी राहते ते गावठाण. स्वतःला वेगळे आणि उच्चभ्रू समजणार्या मध्यमवर्गीयांच्या वस्तीत आणि जगण्यासाठी रोजचा संघर्ष करण्याच्या नादात स्वतःकडे कमीपणाच्या नजरेतून बघणार्यांच्या वस्तीत जो फरक असेल तो फरक आहे भिंतीच्या या बाजूला आणि त्या बाजूला. शरयू आणि उर्वीने ती तोडली आहे, मोठं होताना पुन्हा त्यांच्यात ती बांधली जाऊ नये.
—-
सकाळ संध्याकाळी कधीही मला हाक ऐकू येते, शऽऽरऽऽयूऽऽऽ
हाक आली की माझी लेक हातातलं काम सोडून खिडकीच्या दिशेने धावते. मग तिच्या आणि तिच्या कधीही प्रत्यक्षात न भेटलेल्या मैत्रिणीच्या, उर्वीच्या गप्पा सुरू होतात. ‘तू काय करते आहेस, मी माझ्या भावाशी खेळत होते’. उर्वी जोरजोरात ओरडून सांगत असते. ‘माझा भाऊ कॉलेजला गेला आहे, त्याचा आज बड्डे आहे’. शरयू तितक्याच जोरात बोलत माहिती पुरवत असते. ही माहिती तिच्या इमारतीतल्या आजूबाजूच्या घरांना मिळत असते. आमच्याकडेही चारपाच घरांतली माणसं या गप्पा ऐकत कौतुकानं हसत असतात.
आता हे रोजचे झाले आहे. मार्च २०२०ला लॉकडाऊन लागला आणि मुलं घरात अडकली. मुंबईतल्या फ्लॅट, झोपड्यांत, चाळीत राहणार्या मुलांचे तर फारच हाल झाले. मोकळे आकाश, खेळायला मैदान, शाळा, मित्रमैत्रिणी यांना मुलं दुरावली आणि सुरू झाली असह्य घुसमट. पण मुलं हुशार. त्यांनी त्यातही मार्ग शोधले. दोनेक महिन्यांच्या संपूर्ण घरकैदेनंतर लेक बिल्डिंगबाहेर चकरा मारू लागली. घराच्या मागच्या बाजूला ती फिरत असली तर मला ती दिसते, त्यामुळे मला दिसेल असंच फिर अशा सूचना तिला होत्या.
एक दिवस घरासमोरच्या खिडकीतून हाक आली, ‘श..र..यू…’ मी बाहेर बघितलं तर लेकीपेक्षा एखाद वर्षाने लहान असलेली एक चुणचुणीत मुलगी तिच्या घरासमोरच्या गॅलरीत उभी राहून शरयूला साद घालत होती. ‘हाय उर्वी’ असं ओरडून शरयू तिच्याशी जोरजोरात बोलायला लागली होती. मला गंमत वाटली आणि मी शरयूला विचारलं, ‘अगं तू कशी तिला ओळखतेस,’ तर ती म्हणाली ‘मी फिरायला गेले की ती मला वरतून हाक मारते, मग आमची ओळख झाली’. यानंतर गेलं वर्षे दीडवर्ष दोघीजणी आपापल्या घरासमोर उभ्या राहून (शरयू खिडकीत आणि ती गॅलरीत) गप्पा मारतात. या गप्पा मोठ्या गंमतशीर असतात. कधी त्या ब्लॅक टी आणि ग्रीन टी कसा असतो यावर चर्चा करतात, कधी ती शरयूला आजीबद्दल सांगत असते. कधी त्या आज जेवायला काय केले आहे वगैरे चर्चा करत असतात. पण रोज तू काय करतेस हा प्रश्न असतोच आणि जी गोष्ट सुरू असेल त्यावर इतक्या लांबलचक गप्पा होतात की आजूबाजूच्या लोकांचेही मनोरंजन होते. विशेषतः जेव्हा शरयू मोठ्या मुलीच्या भूमिकेतून तिला नातेसंबंध (माझा दादा माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, तो कॉलेजला जातो, माझ्या बाबाच्या बहिणीला मुलगी आहे, ती माझी मोठी बहीण आहे) समजावून सांगते, तेव्हा आजूबाजूच्या लोकांचे मनोरंजन होते.
शरयूला चित्रकलेचा नाद आहे, कित्येकदा नवीन चित्रं सर्वात आधी उर्वीला दिसते. पण दोन्ही इमारतींच्या मधल्या भिंतीमुळे दोघी आजपर्यंत एकमेकींना भेटल्या नाहीत.
तशी उर्वीची इमारत आणि आमची इमारत अगदी लागून आहे. काही वर्षांपूर्वी तिथे बसकी घरं होती. माझे घर लांबलचक आहे आणि एका दिशेला खिडक्या आहेत. चार पाच वर्षांपूर्वी अचानक बसकी घरं जाऊन रातोरात ही चाळ उभी राहिली. त्यांनी खालच्या मजल्यासाठी चक्क आमच्या बिल्डिंगची कंपाऊंड वॉल वापरली. आम्ही तक्रार करून पाहिली पण काही उपयोग झाला नाही. माझ्या खिडक्यांच्या समोरचा स्वच्छ सूर्यप्रकाश आता बंद झाला. समोरच्या चाळीची सावली पडून जी चार झाडं गॅलरीत लावली होती, ती गेली. मला वैताग वाटला. मग हळूहळू डायनिंग रूममध्ये जेवायला बसलं की समोरच्या गॅलरीतले लोक दिसू लागले. कधी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे रुसवेफुगवे, कधी मुलांची शाळेची गडबड, कधी गॅलरीत कपडे वाळत घालणार्या बायका. एकूण चाळीतील मंडळी शांत होती. एक बाई इतके नीट कपडे वाळत घालते की आपल्या अजागळपणाची लाज वाटावी. तीच नंतर काही दिवस दिसेनाशी झाली आणि परत दिसायला लागली, तेव्हा डोक्यावर केस नव्हते, बहुदा केमोथेरेपी झाली असावी. डोक्यावर रुमाल बांधून ती पुन्हा व्यवस्थित कपडे वाळत घालू लागली तेव्हा मनात कुठेतरी बरं वाटलं.
ही चाळ आल्याने आपली प्रायव्हसी गेली अशी बिल्डिंगवाल्यांची तक्रार. पण मीच त्यांची प्रायव्हसी घालवतेय की काय असं मला वाटायला लागलं.
चाळीतून अचानक एका मुलीचा खूप जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला. ती इतकी जोरात रडायची की तिला कुणीतरी मारत असेल असं वाटायचं. मी खूप शोधायचा प्रयत्न केला पण शोध लागला नाही. मी आणि शेजारणीने ठरवले, ही रडायची थांबली नाही तर आपण जाऊन शोध घेऊ, हिला बहुतेक फार मारत असतील.
मग एके दिवशी एक जोरजोरात बोलणारी मुलगी आणि तिची आजी दिसली. ही मुलगी म्हणजे उर्वी. मी आजीला म्हटलं ‘इतकी का रडते हो?’ तर आजी म्हणाली, ‘आईशीला खूप सतावते, मग पडतात रट्टे’.
मला काही पटलं नाही, मी म्हटलं ‘माझ्याकडे पाठवा, मला नाही आवडत असं, मी सांभाळीन तिला’.
माझं बोलणं ऐकून उर्वीची आजी खूप मनापासून स्वच्छ हसली. मला काय म्हणायचे होते, तिला कळले होते.
हीच उर्वी लॉकडाऊन लागला, तेव्हा पाच सहा वर्षांची झाली आणि शरयूची खिडकी मैत्रीण झाली. आईशी भांडताना ज्या आवेशात ती रडत असायची, तशाच आवेशात ती बर्याचदा असते. त्यामुळे शरयूचा ठावठिकाणा लागेपर्यंत ती हाका मारत राहते. आता माझ्या इमारतीतल्या इतर मजल्यावरचे लोक तिला उत्तरं देतात, ‘शरयू गावाला गेलीए, शरयू झोपली असेल, शरयूची शाळा सुरू असेल’. मग ती जिथून आवाज येतो, त्या दिशेला तिचा पुढचा प्रश्न विचारते.
आमच्या दोन इमारतीतली भिंत दिसायला आठ फुटाचीच असली तरी पार करणे अवघड आहे. आमची बिल्डिंग आहे आणि उर्वी राहते ती चाळ. आम्ही राहतो ती आहे कॉलोनी आणि उर्वी राहते ते गावठाण. स्वतःला वेगळे आणि उच्चभ्रू समजणार्या मध्यमवर्गीयांच्या वस्तीत आणि जगण्यासाठी रोजचा संघर्ष करण्याच्या नादात स्वतःकडे कमीपणाच्या नजरेतून बघणार्यांच्या वस्तीत जो फरक असेल तो फरक आहे भिंतीच्या या बाजूला आणि त्या बाजूला. शरयू आणि उर्वीने ती तोडली आहे, मोठं होताना पुन्हा त्यांच्यात ती बांधली जाऊ नये.