हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आणि थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा जसा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आला आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यंगचित्रकलेचंही बाळकडू त्यांना बाळपणीच मिळालं होतं… त्यांनीही काही काळ हाती कुंचला धरला होता… पण, ज्या लहान वयात त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सलाच जायचं, असं मनाशी पक्कं ठरवलं, त्याच वयात हातात कॅमेरा आला आणि छायाचित्रणाच्या कलेने त्यांना मोहवून टाकलं… कुंचला कालौघात हातातून दूर गेला असला तरी व्यंगचित्रकाराची तीक्ष्ण नजर आणि व्यंगावर व ढोंगावर शब्दांचे अचूक फटकारे ओढण्याची लकब आणि ढब व्यंगचित्रकाराचीच आहे… त्यांच्यातल्या या सुप्त व्यंगचित्रकाराची ओळख करून देणारी, मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी घेतलेली मुलाखत…
—-
गेल्या वर्षीची गोष्ट. प्रबोधन प्रकाशनाचे विश्वस्त, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारातून ‘मार्मिक’ नव्या ढंगात आणि नव्या रंगात आणण्याचे घाटत होते… कोरोनाच्या तडाख्यामुळे त्याच वर्षी साठीत पदार्पण केलेल्या मार्मिकचे प्रकाशन काही काळापुरते स्थगित झाले होते. त्यानंतरचा पहिलाच अंक हा ‘मार्मिक हीरक महोत्सवी विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्याचे ठरले… पुण्यातले नामवंत व्यंगचित्रकार घन:श्याम देशमुख यांच्या प्रेरणेने देशभरातील व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांना व्यक्तिचित्ररूप मानवंदना देतात. त्यांतील काही चित्रे आणि प्रदीप म्हापसेकर, मिका अझीझ आदींकडून खास रेखाटून घेतलेली चित्रे यांच्यापैकी एक निवडून या अंकाचे मुखपृष्ठ करावे अशी कल्पना होती. जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू होते, त्याची प्रगती पाहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ती मुखपृष्ठ कल्पना दाखवण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी सगळी एका दमात पाहून रिजेक्ट केली… त्यातल्या एका व्यंगचित्रात बाळासाहेबांना व्याघ्रस्वरूपात दाखवण्यात आलं होतं. ते पाहून उद्धव साहेब इतकंच म्हणाले, हा वाघ आहे हे बरोबर आहे, पण हा शिवसेनेचा वाघ नाही, डिस्नेचा वाघ आहे… तेव्हा लक्षात आले की बाळासाहेबांचा व्यंगचित्रकलेचा वारसाही उद्धव साहेबांकडे आलेला आहे. ‘मार्मिक’च्या पहिल्यावहिल्या अंकात खुद्द बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेल्या त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिचित्राची निवड अखेर मुखपृष्ठासाठी झाली.
त्यानंतर उद्धव साहेबांचं ‘मार्मिक’च्या वर्धापनदिनाच्या ऑनलाइन सोहळ्यातलं भाषणही व्यंगचित्रकलेची सखोल जाण अतिशय सोप्या शब्दांत मांडणारं होतं, या कलेची मर्म उलगडून दाखवणारं होतं, व्यंगचित्रं कशी पाहावी, याचाही वस्तुपाठ त्यातून मिळत होता… त्यांच्याकडे आपला व्यंगचित्रकलेचा वारसा आलेला आहेच, हे खुद्द बाळासाहेबांनीच एका भाषणात सांगितलं होतं… त्यामुळे यासंदर्भात तुमची मुलाखत हवी, असं सांगितल्यावर त्यांनी ‘हातात कुंचला धरत नसताना व्यंगचित्रकलेवर बोलणं म्हणजे हातात बॅट नसताना क्रिकेटची कॉमेंटरी करण्यासारखं वाटतं,’ असं, अगदी व्यंगचित्रकाराच्याच शैलीत म्हटलं खरं… पण भेट झाली आणि दिलखुलास, मनमोकळी मुलाखतही झाली. तीच आता तुमच्यापुढे शब्दरूपात…
उद्धव साहेब, आपले वडील, आदरणीय बाळासाहेब कॅनव्हासवर काहीतरी रेखाटतात, त्या रेषांमधून काही जादू घडते, असं तुम्हाला कोणत्या वयात लक्षात आलं?
– ‘फटकारे’ या बाळासाहेबांच्या पुस्तकात माझं छोटं मनोगत आहे. त्यात मी म्हटलंय की या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणापासून बघत आलोय. त्याच्या तपशीलात जात नाही, कारण त्यात बर्याच गोष्टी आहेत. बर्याचदा असं होतं की, एखाद्या इतिहासाचे आपण साक्षीदार असतो, हे आपल्याला त्या वर्तमानाचा इतिहास झाल्याशिवाय लक्षात येत नाही. मी लहानपणापासून अत्यंत जवळून पाहिला हा इतिहास घडताना. त्या मनोगतात मी म्हटलंच आहे की आमचं एक छोटं घर होतं. त्याच्या पाठी छोटी पडवी होती. तिथे किंवा दिवाणखान्यामध्ये बाळासाहेब, माझे काका मांडी घालून बसायचे आणि समोर ड्रॉइंग बोर्ड असायचा… त्यावर व्यंगचित्रं आकार घ्यायची… दर आठवड्याचंच ते काम होतं. त्यावेळी हा काहीतरी मोठा इतिहास घडतोय माझ्यासमोर असं कधीच मला वाटलं नाही. कारण, आमचं अख्खं कुटुंबच व्यंगचित्रांमध्ये नेहमी डुंबलेलं असायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण, माझ्या माँचंसुद्धा एक स्केचबुक होतं. ती त्यात चित्रं काढायची. मोठा भाऊ पण काढायचा, दुसरा भाऊही काढायचा, मी पण काढायचो. त्यामुळे आपल्या विसुभाऊ बापटांचं ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ होतं तसं आमचं कुटुंब हे रेषांमध्ये आणि व्यंगचित्रांमध्ये रंगलेलं असायचं. आम्ही सगळे ड्रॉइंगमध्येच होतो. शाळेमध्ये सातवी-आठवीत असताना माझा विचार पक्का होता की जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं. साहेबांनी मी साधारण नववी-दहावीमध्ये आल्यानंतर मला एक पुस्तक दिलं. ते होतं अॅनाटॉमी ड्रॉइंगचं. म्हणजे माणसाच्या शरीररचनेच्या रेखाटनाचं. त्यांनी सांगितलं की तुला कॉलेजमध्ये जायचं असेल आणि पुढे आर्टिस्ट व्हायचं असेल तर अॅनाटॉमी ही आलीच पाहिजे. साधारणत: शरीराची कशी रचना असते, ते आलंच पाहिजे. ते आत्मसात केल्यानंतर मग थोडं थोडं कार्टून्स काढायचा प्रयत्न मी करत होतो. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं एक वाक्य माझ्या कायम स्मरणात राहील. ते म्हणाले होते, लक्षात घे, व्यंगचित्रकार हा उत्तम चित्रकार असलाच पाहिजे. पण एक चांगला चित्रकार हा व्यंगचित्रकार असेलच असं नाही. कारण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं बघण्याची एक दृष्टी असली पाहिजे. व्यंगचित्रकलेतले अनेक बारकावे बाळासाहेबांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये आणि त्याहीपेक्षा ‘फटकारे’मध्ये सांगितले आहेत. मार्मिकमध्येही थोडीफार व्यंगचित्रं मी काढत होतो. साधारणत: ८०-८१च्या आसपास असेल. नंतर माझ्या हातात कॅमेरा आल्यावर ब्रश बाजूलाच पडला. पण बाळासाहेब ती व्यंगचित्रं बारकाईने पाहायचे आणि त्यांच्यातील करेक्शन्स मला बारकाईने सांगायचे. ब्रशचे फटकारे कसे मारायचे ही एक साधना आहे. हे येर्या गबाळ्याचं काम नाही. बाळासाहेबांची व्यंगचित्रं काढण्याची पद्धत म्हणजे ते आधी स्क्रिबल करायचे कागदावर… आणि इंकिंग करताना, म्हणजे शाई भरताना त्याला फायनल स्वरूप येत असे. म्हणजे मूळ चित्र पेन्सिलने काढलं आणि त्याच्यावरच ब्रशने गिरवलंय असं कधीच व्हायचं नाही. एक रेषाटन असायचं साधं, कंपोझिशन स्पष्ट करणारं आणि मग अॅक्चुअली ते ब्रशनेच व्यंगचित्र काढायचे. ब्रशच्या फटकार्यातून पर्सपेक्टिव्ह द्यायचे म्हणजे अंतराचा आभास निर्माण करायचे… आणि दुसरं त्यांचं असं असायचं की कमीत कमी रेषांमध्ये व्यंगचित्र हवं. मग त्यातून त्यांना कधी वाटलं की यात आणखी थोडी डेप्थ यायला पाहिजे, तर मग चारकोलने थोडं काम करायचं.
तुम्ही त्यांना विल्सन अँड न्यूटन्सचे ब्रश आणून दिले होते…
– हो, ते आता इथे सर्रास मिळत असतील, पण तेव्हा ते मिळणं खूप दुरापास्त होतं. जे मिळायचे ते दर्जेदार नसायचे. या ब्रशचं वैशिष्ट्य काय की, त्या ब्रशने फटकारा मारला की त्याचे केस स्प्रिंग अॅक्शनने परत त्याच्या जागी आले पाहिजेत. झोपणारा ब्रश नकोय तेथे. तसे ब्रश आता मिळतात, पण मी चित्रकला सोडून बरीच वर्षे झाली…
तुम्ही व्यंगचित्रकलेऐवजी फोटोग्राफीकडे कसे वळलात? त्याला काही विशेष कारण होतं का?
– मी आधी तुम्हाला सांगितलं ना, त्याप्रमाणे जसं शाळेत असतानाच मी ठरवलं होतं की, जेजे स्कूलमध्ये जायचं, तसं शाळेत असतानाच मी फोटोग्राफीही करत होतो. तेव्हा माझ्याकडे कॅमेरा होता तो आग्फाचा क्लिक-थ्री. माझ्यात फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्यामुळे, कॉलेजमध्ये गेल्यावर फोटोग्राफी हा विषयच घेतला मी. फायनलला फोटोग्राफी हा माझा विषय होता. तेव्हा मी फोटोग्राफीत पहिला आलो होतो आणि टोटल राज्यामध्ये चौथा होतो.
ख्यातनाम प्रेस फोटोग्राफर घन:श्याम भडेकर हे तुमचे वर्गमित्र. ते म्हणाले की तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहात ते जेजेमध्ये एक वर्षभर कुणाला कळलंही नव्हतं…
– (हसून) हो, तिथे मी जाहिरात कशी करावी… दुसर्याची… ते शिकायला गेलो होतो… माझी करायला गेलो नव्हतो.
डेव्हिड लो हे बाळासाहेबांचे आदर्श. त्यांची पुस्तकं तुम्ही बाळासाहेबांना मिळवून दिली होती ना!…
– डेव्हिड लो, दीनानाथ दलाल, बॅन बेरी, वॉल्ट डिस्ने हे साहेबांचे लाडके कलावंत. या सगळ्यांच्या कलेची, व्यंगचित्रकलेची काही पुस्तकं बाळासाहेबांनी गोळा केली होती. तेव्हाच्या वृत्तपत्रांमध्ये येणारी कार्टून्स, कार्टून्स स्ट्रिप्स ब्राऊन पेपरवर चिकटवून त्याचाही संग्रह केला होता त्यांनी. ती काळाच्या ओघात गेली. एक दिवस त्यांना ती हवी होती. म्हणाले, माझी ती पुस्तकं होती, ती कशी मिळणार? मी त्यांना म्हटले, देतो मी आणून. ते म्हणाले, तू कुठून आणणार? मी म्हणालो, मी करतो, बघतो काहीतरी. हे बोलून मी खोलीच्या बाहेर आलो आणि मग मनात म्हटलं, मी हे काय बोललो? आतमध्ये मी आपला बोलून गेलो पण हे कसं साधणार? सुदैवाने मी नंतर एकदा लंडनला गेलो होतो. तिथे डेव्हिड लोच्या पुस्तकांचा शोध घेतला. पुस्तकांच्या दुकानात कुठे डेव्हिड लो वगैरे शब्दच कुणाला माहिती नव्हता. मग वेबसाइटवर गेलो, सगळं शोधलं. तेव्हा एक व्यक्ती मला अशी सापडली, जिने डेव्हिड लोवर पीएचडी केली होती. मग त्याच्याशी संपर्क केला. त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडे डेव्हिड लोची काही पुस्तकं मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे डेव्हिड लोची काही ओरिजनल कार्टून्स होती. त्यातली काही मी घेतली विकत. मी लंडनला असताना एका ठरावीक वेळेला बाळासाहेबांना फोन करायचो. गप्पा व्हायच्या. या सगळ्या शोधात ती वेळ चुकली. फोन झाला नाही. नंतरच्या फोनवर ते जरा घुश्शात होते, फोन का नाही केला, असं विचारलं. मी सांगितलं, ते एक सिक्रेट आहे, आलो की सांगतो. भारतात परतल्यावर मी त्यांच्यासमोर बॉक्स ठेवला. त्यांनी विचारलं, हे काय आहे? मी म्हणालो, तुम्ही बघा ना हे काय आहे… त्यांनी सगळा पुस्तकांचा गठ्ठा पाहिला आणि ती दोनतीन ओरिजनल कार्टून्स पाहिली आणि ती पाहून ते असे काही खूश झाले, की तो एक माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात मोठा क्षण होता. त्यांनी डेव्हिड लोची ती कार्टून्स त्यांच्या खोलीत ठेवली होती, ती आम्ही अजूनही तशीच ठेवली आहेत. त्यांच्या समोरच असावी लागत ती.
साहेबांच्या पिढीतले किंवा त्यानंतरच्या पिढीतले कोणते व्यंगचित्रकार चांगले वाटतात तुम्हाला?
– कोण चांगलं आणि कोण वाईट हे ठरवणं खूप कठीण आहे. मी ज्या पिढीमध्ये लहानाचा मोठा झालो, जेव्हापासून समज आली तेव्हापासून घरामध्येच बाळासाहेबांचीच व्यंगचित्रे बघत मोठा झालो. त्यामुळे माझ्या मनावर त्यांच्या शैलीचा खूप मोठा प्रभाव आहे. व्यंगचित्र म्हणजे केवळ व्यंग काढणं नाही. तर त्याचा स्वभाव उतरला पाहिजे. माझ्या मनोगतातही मी लिहिलेय की, व्यंगचित्रावरून त्याचे कॅरेक्टर लक्षात यायला पाहिजे. रेषा आणि कल्पना यांचा मिलाफ पाहिजे. काहीजण असे असू शकतात की त्यांची स्टाईल चांगली असते, पण विचारच नसतात. काहीवेळा विचार चांगले असतात, पण त्यांच्यात स्टाईल नसते. हा मिलाफ असला पाहिजे.
बाळासाहेबांचे फटकारे आज पुस्तकरूपाने उपलब्ध तरी आहेत, तुमचे फटकारे कसे सापडायचे?…
– खरं सांगायचं तर फटकारे हे पुस्तक तयार करणंही त्यावेळी खूप मोठं आव्हान होतं. कारण, बाळासाहेबांची ओरिजनल काही ५-१० कार्टून्सच फक्त हाताशी राहिली असतील. बाकीची मुळात ठेवायला अशी जागाच नव्हती. दादरला असताना त्यांनी एकदा बघितलं तर त्या चित्रांना वाळवी लागली होती. मग ती सगळी चाळण झाली. त्यात मी म्हटलं तसं, एखादी गोष्ट घडत असताना आपल्याला कळत नाही की तो इतिहास घडतोय म्हणून. तोच आमचा खाक्या होता. साहेबांची व्यंगचित्रे एकदा ब्लॉकमेकरकडे गेली की त्यांचं काम संपलं. त्यांचे ब्लॉक झाले की काम झालं. आता फटकारेसाठी चित्रं आणायची कुठून? मग आम्ही जुन्या ‘मार्मिक’मधून कॉपी केली आणि मी ती लॅपटॉपवर डिजिटाइज करून बॅकऑन केली. म्हणजे इकडे बघायचो आणि तिकडे स्ट्रोक मारत होतो. कारण ते साहेबांचे स्ट्रोक माहिती होते. त्यामुळे ती बहुतेक सर्व व्यंगचित्रं मीच रिटच केली. ही करेक्शन्स केल्यावर ती बाळासाहेबांना परत दाखवायचो. ते म्हणायचे, हां बरोबर आहे. काही ठिकाणी नाक, डोळा ब्लॉक झालेलं असायचं, तिकडे बरोब्बर ते सोडवणं असं ते करत करत गेलो. आता मला असं वाटतं की, एकाअर्थी त्यांनी मारलेले फटकारे त्यांनी माझ्याकडून गिरवून घेतले.
…आणि लाकडाचा वाटणारा वर्ल्डकप चांदीचा झाला!
१९७०-८०च्या काळात पद्धत अशी होती की कव्हर हे बाळासाहेब करायचे. रविवारची जत्रा बाळासाहेब स्क्रिबल करून द्यायचे. इंकिंग काका करायचे. हे अर्थातच नंतर नंतर… आणि मधली जी दोन व्यंगचित्रे असायची ती काका काढायचे. त्यावर त्यांची सही असायची. याच काळात मीही काही व्यंगचित्रे काढली होती. ती आता माझ्याकडे नाहीत. ती इतिहासजमा झाली. कारण ती माझ्या नावाने नाही प्रसिद्ध झालेली. आता त्यातलं एकच व्यंगचित्र आठवतेय मला… १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकला होता तेव्हाचं कपिलच्या हातात कप असलेलं कव्हरवरचं व्यंगचित्र मी केलं होतं. कल्पना बाळासाहेबांची होती. मी इंकिंग केल्यावर बाळासाहेब मला म्हणाले, हा कप आहे तो लाकडाचा आहे की चांदीचा आहे? मग त्यांनी थोडंसंच व्हाईटने रिटचिंग केलं आणि जो आधी खरंच लाकडाचा वाटत होता तो वर्ल्ड कप चांदीचा वाटायला लागला.