कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्या ‘सर्वात्मक शिवसुंदरा’ची आराधना करताना अशी प्रार्थना केली होती की ‘तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना…’ ते म्हणतात, प्रभू, आमच्या आयुष्यांना अंधारातून तेजाकडे ने… लहानपणी शाळेत ही कविता शिकताना आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या घनगंभीर स्वरात हे गीत ऐकताना आपल्याला कधी वाटलंही नसेल की कधीकाळी आपण या ओळींमधली आर्तता साक्षात अनुभवणार आहोत… आपलं आयुष्य अंधारलं आहे, कसलीतरी काजळी दाटली आहे, प्रकाशवाटच दिसेनाशी झाली आहे, असा व्यक्तिगत अनुभव सगळ्यांनाच येतो आयुष्यात एखाद्या टप्प्यावर. तेव्हा ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याची धडपड आणि तडफड अनुभवाला येते. पण, सगळं जगच अंधारात ढकललं गेलं आहे, असं कधी घडत नाही सहसा… गेल्या वर्षी सगळ्या जगाने कोरोनासंकटाच्या रूपाने तो काळाकभिन्न अंध:कार अनुभवला… आठवा गेल्या वर्षीची दिवाळी… दीपपूजनाचा हा मंगलमय सण, पण त्यातलं तेजच हरवून गेलं होतं… सगळ्या जगाचं चलनवलन सूक्ष्मदर्शकाखालीही न दिसणार्या एका क्षुद्र विषाणूने थांबवून टाकलं होतं… लोक जागच्या जागी जखडले होते… ज्यांच्यापाशी पोटापाण्याची भरभक्कम तजवीज होती, त्यांनी सक्तीची पण हवीहवीशी सुटी मिळाली म्हणून कुकर केक, डालगोना कॉफी, कमी साहित्यात पावभाजी, घरच्या घरी बटर बनवणे, घरच्या घरी पिझा चीज बनवणे, असे उद्योग करून, टीव्हीवर कार्यक्रम पाहून, वेबसिरीजचा फडशा पाडून सुटीचा आनंद सार्थकी लावला. हातावरचं पोट असलेल्यांवर रस्त्यावर उतरून चालत हजार किलोमीटर अंतरावरच्या घराकडे निघण्याची वेळ आली… जिथे संघटित क्षेत्रात काम करणार्यांनाही फोनवरून, मेलवरून नोकरीतून कमी केलं गेलं तिथे असंघटित वर्गाचं काय झालं असेल?… लाखो लोक क्षणात रस्त्यावर आले…
देशातल्या कोरोना संकटाला कोण जबाबदार होतं, त्याची हाताळणी व्यवस्थित झाली का, त्याचंही राजकारण कसं केलं गेलं, हे सगळे या मंगल प्रसंगी चर्चा करण्याचे विषय नव्हेत… पण, सगळा देश कोरोनासंकट काही प्रमाणात थोपवणं शक्य असताना त्यात ढकलला गेला आणि नंतर रोगाचा प्रसारच झालेला नसताना लोकांना कसलीही पूर्वसूचना न देता लॉकडाऊनच्या जोखडात अडकवला गेला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही… त्या भयाण वातावरणातच गेल्या वर्षीची दिवाळी आली आणि गेली… तिच्या पाठोपाठ आलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने आणखी जोरदार तडाखा दिला… जीवनदायिनी गंगा शववाहिनी बनल्याचं भेसूर चित्र जगासमोर आणलं आणि जागोजाग पेटलेल्या चितांनी देशाच्या कोरोना हाताळणीतली लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली…
या काळात महाराष्ट्रवासी मात्र मनोमन देवाचे आभार मानत होते, कारण इथे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वातलं महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे कोरोना संकटाचा सामना करत होतं आणि कोरोनाच्या हाताळणीपासून, आरोग्यसुविधांपासून ते लसीकरणापर्यंत सगळ्या बाबतीत महाराष्ट्राने देशाला एक आदर्श घालून दिला… महाराष्ट्राचं प्रागतिकत्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं… आज आपण कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत आहोत, तिमिरातून तेजाकडे निघालो आहोत, दिवाळीत महाराष्ट्र दिव्यांच्या तेजाने उजळणार आहे, त्याबद्दल आपण कोरोनाशी लढताना प्राण गमावलेल्या कोरोनायोद्ध्यांचे ऋणी असले पाहिजे. पोलिस अधिकारी, महापालिका कर्मचार्यांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांपर्यंत सगळ्यांनी जिवाची बाजी लावली म्हणून आजची दिवाळी आपण पाहू शकतो आहोत, तिचा आनंद लुटू शकतो आहोत, हे विसरता कामा नये… म्हणूनच या अंकाच्या मुखपृष्ठावर आम्ही कोरोनायोद्ध्यांना विनम्र मानवंदना दिली आहे.
दिवाळी अंक ही खास मराठी परंपरा. आकाशकंदील, विविध प्रकारचे दिवे, विजेच्या माळा यांची रोषणाई, अभ्यंगस्नान, फराळाचं ताट आणि नव्या कपड्यांचा, सुगंधी अत्तरांचा थाट यांच्याबरोबर आपल्या दिवाळीत दिवाळी अंकांसाठीही खास पाट मांडला जातो. त्याशिवाय मराठी माणसाची दिवाळी पूर्ण होत नाही. या अंकात वाचकांना नेहमीच्या अंकांपेक्षा वेगळा आणि दीर्घ पल्ल्याचा मजकूर अपेक्षित असतो. ‘मार्मिक’मध्ये वाचकांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
मराठी माणसांवर गेली जवळपास १०० वर्षं वैचारिक प्रभाव टाकून असलेल्या ‘ठाकरे फॅमिली’तल्या तीन पिढ्यांच्या तीन धुरंधरांचा वेगवेगळ्या प्रकारांनी परिचय करून देणारा विभाग हे अंकाचं मुख्य आकर्षण आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेच्या पैलूवर प्रकाश टाकणारी त्यांची दिलखुलास मुलाखत आहे. ज्ञानेश सोनार या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचं अतिशय आंतरिक जिव्हाळ्याने रेखाटलेलं शब्दचित्र आहे आणि सचिन परब यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आयुष्यातील एका संघर्षमय पर्वाचं दर्शन घडवलेलं आहे. वाचकांना ठाकरे फॅमिलीची नव्याने ओळख करून देणारा हा विभाग ठरेल, याची आम्हाला खात्री वाटते.
सोशल मीडियाच्या काळात ‘गल्लीत ओळखत नाही कुत्रं आणि फेसबुकवर पाच हजार मित्र’ अशी अनेकांची अवस्था झालेली आहे. सोशल मीडियाने जग जवळ आणलं, असं म्हटलं जातं, पण ही जवळीक आभासी आहे. उलट जवळच्या माणसांना या माध्यमांनी परस्परांपासून दूर केलं आहे, त्यांच्यात वितुष्ट आणलं आहे. समाजमाध्यमी ट्रोल आणि शिवीगाळीच्या या गदळलेल्या माहौलात गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत समाजात वैचारिक अभिसरण घडवून आणण्याचं केंद्र ठरलेल्या अड्डा संस्कृतीची ओळख करून देणारा खास विभाग अंकात आहे. ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोडबोले यांनी पुण्यातील कॅफे डिलाइटमध्ये रंगणार्या वादचर्चांच्या आठवणी जागवल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले यांनी पुण्यातील मंडईत कशी विविध विचारांची घुसळण चालते, याचं शब्दचित्र रेखाटलं आहे. माणसं समोरासमोर भेटून वाद घालतात तेव्हा त्यात जिव्हाळा असतो, तो सोशल मीडियावर कधीही सापडणार नाही, हेच अधोरेखित करणारे हे दोन लेख आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’सारखी अजरामर रचना निर्माण करणार्या अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकहाणीच्या माध्यमातून या ओजस्वी लढ्याची कहाणी ख्यातनाम लेखक विश्वास पाटील यांनी जिवंत केली आहे. ज्यांच्या उल्लेखावाचून आजच्या सत्ताधीशांना घास जात नाही आणि ज्यांना कमी लेखल्यावाचून आपण मोठे आहोत, असा आभासही निर्माण करता येत नाही, त्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अनेक लोभस पैलूंची ओळख ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी करून दिली आहे.
फोटोग्राफीकडून वन्यजीव संवर्धनाकडे वळलेले आणि ‘हत्तीशी बोलणारा माणूस’ अशी ख्याती प्राप्त केलेले ज्येष्ठ वन्यजीव कार्यकर्ते आनंद शिंदे यांच्या फोटोंमधून आणि शब्दांमधून हत्तींचं अनोखं जग उलगडणारा खास छायाचित्रलेख हे या अंकाचं एक आकर्षण ठरावं.
मार्मिक म्हटलं की व्यंगचित्रं आलीच. मार्मिकचे तरूण मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव यांच्यासह यशवंत सरदेसाई, प्रभाकर झळके, पुरुषोत्तम बेर्डे आदींच्या खुसखुशीत व्यंगचित्रांनी आणि श्रीकांत आंब्रे यांचे खुसखुशीत वात्रटायनाने या अंकाची शोभा वाढवली आहे.
आज कोरोना संकट निवळलं असलं तरी पूर्णपणे टळलेलं नाही आणि कोरोनाकाळाने व्यक्तिगत पातळीवर जो अंधार आणला, त्या तिमिरातून तेजाकडे वाटचाल आता कुठे सुरू झाली आहे… मार्मिकच्या वाचनाच्या आनंदाने आपली ही वाटचाल आनंदमय, सुकर आणि सुसह्य होवो, हीच प्रार्थना.
सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.
जय हिंद, जय महाराष्ट्र!