अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, मंगळ (अस्त), रवी, बुध (अस्त) कन्येत, शुक्र-केतू-चंद्र तुळेत, गुरू (वक्री), शनि (वक्री), प्लूटो मकरेत, हर्षल (वक्री) मेषेत, नेपच्यून (वक्री) कुंभेत, बुध, गुरू, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून हे सात ग्रह वक्री, ९ ते १५ ऑक्टोबरपर्यंत शनी स्तंभी. ११ ऑक्टोबरला शनी मार्गी.
दिनविशेष – १० ऑक्टोबर रोजी ललित पंचमी, १३ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी, १५ ऑक्टोबर विजयादशमी,
१६ ऑक्टोबर रोजी पाशांकुशा एकादशी.
मेष – या आठवड्यात मानसिक स्वास्थ सांभाळावे लागणार आहे. लग्नात वक्री हर्षल, षष्ठात अस्त असणारा राशीस्वामी मंगळ यामुळे विवंचनेत भर पडणार आहे. त्यामुळे रक्तदाब वाढण्याचा त्रास संभवू शकतो. मायग्रेनचा त्रास असणार्या मंडळींना तीव्र डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता. त्यामुळे यापासून लांब राहण्यासाठी थोडे सबुरीने घ्या. सप्तमाधिपती शुक्र आणि केतू यांची युती आहे, त्यामुळे जिवलगांबरोबर वाद टाळा. प्रेमी युगुलासाठी आणाभाका देण्यासारखी वेळ नाही. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. दशमातील वक्री शनी-गुरू व्यवसायातील चढउतार दाखवतील. व्यवसायातील वायदे आणि ठरलेले व्यवहार यामध्ये चालढकल आणि वेळकाढूपणा होईल.
वृषभ – पदरात पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी येणारा आठवडा उत्तम आहे. शनी महाराजांचे गुरूबरोबर भाग्यातील भ्रमण होत असल्यामुळे तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात चांगले रमाल. एखादे धार्मिक कार्य पार पडेल. अनेक दिवसांपासून तीर्थयात्रा करण्याचे किंवा दानधर्म करण्याचे डोक्यात असेल, तर ते योग या आठवड्यात जुळून येतील. राशीस्वामी शुक्राची केतूसोबत युती असल्यामुळे जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहा. विनाकारण संशयामुळे वैवाहिक जीवनात वाद होतील. सप्तमेश मंगळ आणि पंचमेश बुध दोघेही अस्त, त्यामुळे मित्रमैत्रिणींकडून सकारात्मक दृष्टिकोन अनुभवायास मिळेल.
मिथुन – कोणतंही काम केलं तरी त्यात समाधानकारक स्थिती राहणार नाही, असा अनुभव या आठवड्यात येईल. त्यामुळे नाराज होऊन जाऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत राहा. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. एखादा जुना आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो. आळस जाणवेल. या ना त्या कारणामुळे आर्थिक नुकसान होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीतला शुक्रामुळे विवाहबाह्य संबधांपासून दोन हात दूरच राहा. अन्यथा मानसिक शांती गमावून बसाल.
कर्क – राशीस्वामी चंद्राचे वृश्चिकेतील केतू आणि शुक्राबरोबर भ्रमण होत असल्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीचे दोनतीन दिवस विवंचनेत जातील. योग्य मार्ग न सापडल्यामुळे त्रस्त राहाल. भरपूर प्रयत्न करून कामाला विलंब होत असल्यामुळे आणि मनासारखी कामे होत नसल्यामुळे चिडचिड होईल. १४ ऑक्टोबरनंतर हळूहळू कामाला वेग येईल. सप्तमातील स्तंभी शनीसोबत वक्री गुरू यामुळे विनाकारण हितसंबंधात बाधा निर्माण होण्याचे प्रसंग घडतील. त्यामुळे शांत राहा. श्रद्धा, सबुरीने घ्या. कुठेतरी अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मानसिक शांती लाभेल.
सिंह – येत्या आठवड्यात आर्थिक गणित बिघडू शकते, नवीन गुंतवणूक करण्याचे टाळा. त्यामध्ये घाटा होऊ शकतो. राशीस्वामी रवीचे द्वितीयेतील भ्रमण आणि त्यासोबत वक्री आणि अस्त असणारे बुध आणि मंगळ यामुळे डोळ्याचे विकार उद्भवतील. षष्ठ स्थानातील स्तंभी शनी आणि वक्री गुरू महिलावर्गाबाबत फारसे अनुकूल नाहीत. ओटीपोटाचे त्रास, पचनसंस्थेसंदर्भात त्रास उदभवू शकतात. सुखस्थानातील केतू-शुक्र युती, सोबत चंद्र त्यामुळे आईकडून विशेष लाभ होईल. मात्र, त्यामुळे इतर भावंडं नाराज होणार नाहीत, याची काळजी घ्या.
कन्या – एखाद्या क्षेत्रात कौशल्यप्राप्तीसाठी उत्तम काळ सुरू होणार आहे. शिक्षणक्षेत्रात नावलौकिक वाढण्यासारखे कार्य घडेल. कवी, गायकांसाठी शुभ काळ आहे. राशिस्वामी बुधाचे रवी आणि मंगळाबरोबर भ्रमण असल्यामुळे चंचलता वाढेल. तृतियेतील शुक्र-केतू युतीमुळे कमी श्रमात अधिक चांगली फळे मिळतील. मानधनाच्या माध्यमातून पैसा मिळेल. प्रवासाचे बेत सफल होतील. स्वार्थासाठी चापलुसी टाळा.
तूळ – राशीस्वामी शुक्राचे द्वितीयेत भ्रमण होत असल्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडणार आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खर्च वाढू शकतो. त्यामुळे अंदाज ठेवून पैशाचे नियोजन करा. उगाच वायफळ खर्च करू नका. व्यवसाय, शिक्षणानिमित्त प्रवासाचे योग येतील. शिक्षणक्षेत्रात काही करत असाल, तर त्यासाठी हा आठवडा उत्तम काळ आहे. स्तंभी शनीमुळे कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. खासकरून आई- पत्नी यांच्याबरोबर अनपेक्षित वाद होऊ शकतात.
वृश्चिक – आर्थिक लाभाचे प्रमाण बेताचे असले तरी येणार्या काळात खर्च वाढणार आहे, त्यामुळे आतापासूनच पैशांची बचत करून ठेवा. अन्यथा दिवाळीत कर्ज काढून सण साजरा करावा लागू शकतो. नोकरीत अनपेक्षित बदल घडतील. पगारवाढीची सुवार्ता कानावर पडेल. व्यवसाय करत असाल तर त्यात चांगली वाढ होईल. समाजात पतप्रतिष्ठा वाढेल. तृतीयेतील शनी-गुरू यांच्यामुळे केवळ संवादाच्या अभावामुळे काही गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहार पारदर्शी ठेवा. नाहीतर निराशा पदरी पडेल.
धनू – काही दिवसांपासून आर्थिक, कौटुंबिक बाबतीत ताणतणाव निर्माण झालेले असतील तर या आठवड्यात निश्चितपणे मार्ग सापडेल. चूक भूल देणे घेणे या तत्वाचा अवलंब करून हित साधा. फायदा होईल. साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, त्यामुळे कोणतेही पाऊल जरा जपूनच टाका. १४ ऑक्टोबरनंतर व्यवसायात चांगला फायदा होईल. पैसे खिशात आले असतील तरी लाभेश शुक्र व्ययात असल्यामुळे खर्च वाढेल. शुक्र-केतूची व्ययातील युती असल्यामुळे भूलभुलैया करणारी परिस्थती निर्माण होईल. मोहापासून लांब राहा.
मकर – एकांतवासात जाऊन राहावे अशी इच्छा होईल. अध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्या मंडळींना मन:शांतीचा अनुभव येईल. वृत्ती थोडी उदास राहील. दशमस्थानावर शनीची दृष्टी आणि भाग्य भावावर गुरूदृष्टी, गुरू, शनी-रवी नवपंचम योग, यामुळे एका वेगळ्या अनुभूतीचा अनुभव येईल. योगकारक शुक्र लाभात असल्यामुळे अनपेक्षित लाभ होतील. महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च होतील. लॉटरी, शेअरमधून चांगली कमाई होईल.
कुंभ – उत्साहाच्या भरात कोणतेही काम करत असताना नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. राशीस्वामी शनी गुरूसोबत व्ययस्थानात, षष्ठ स्थानावर दृष्टी त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. अष्टमातील बुध-मंगळ रवीमुळे मालमत्तेसंदर्भात वाद निर्माण होतील. कोर्टकचेरीच्या कामात नुकसान होण्याची शक्यता. परोपकारात नुकसान होईल. जोडीदाराबरोबर समजूतदारपणाची भावना ठेवा म्हणजे नात्यात कटुता येणार नाही. उच्च रक्तदाब असणार्या मंडळींनी काळजी घ्या. झोपेसंबंधी त्रास होईल.
मीन – राशीस्वामी गुरूचे लाभातले भ्रमण, ११ ऑक्टोबरपासून मार्गी झालेले शनी महाराज त्यामुळे अनपेक्षित लाभाचे प्रमाण आता वाढणार आहे. ये दिल मांगे मोर, अशी स्थिती राहणार आहे. षष्ठातील रवी-मंगळ बुध व्यावसायिक घोडदौड प्रगतीपथावर आणतील. स्वतंत्र्यरित्या उद्योग करण्यासाठी अनुकूल काळ आहे. काही ठिकाणी तडजोड स्वीकारावी लागेल. भाग्यस्थानातील शुक्र केतू युती, नि:स्वार्थ सेवाभाव, मदतकार्य यासाठी कटिबद्ध राहील.