मुंबईत पालिकेने नवरात्रात गरबा खेळण्यास बंदी घातल्याने एका पार्टीतील नेते, मंत्री आणि भक्त खूपच नाराज झाले. तरीही त्यांनी एका एअर कण्डिशण्ड हॉलमध्ये बंद दाराआड गरबा खेळण्याचा घाट घातला. आम्हाला आमंत्रण आल्यावर मी आणि माझा मानलेला परममित्र पोक्या काल रात्री तिथे गेलो.
स्पीकरवर गरब्याची गाणी घुमत होती. तेव्हाच समजले की येणारा प्रत्येक नेता चेहर्यावर मुखवटा घालून आणि ओळख लपवून येणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या शरीराच्या एकंदर ठेवणीवरून त्यांना ओळखणे म्हणजे हातचा मळ होता. एवढ्यात मोरांच्या बग्गीतून कपाळाला मोराचे पीस लावलेले गोर्यापान शरीराचे गृहस्थ उतरले. हॉलमध्ये येताच गरब्यासाठी `गाजले की बारा’ या गाण्याची माझी फर्माइश आहे, अशी वटहुकमी ऑर्डरही त्यांनी दिली. मात्र मला नाचाची प्रॅक्टिस करावी लागेल, असे त्यांनी म्हणताच बोबडे बोलणारे एक स्थानिक नेते पुढे आले आणि `मी थिकवतो ना!’ असे म्हणून त्यांना कोणता पाय पुढे आणि कोणता मागे न्यायचा हे शिकवू लागले. शिकवताना त्या स्थानिक नेत्याचे तोंड नॉनस्टॉप सुरू असल्यामुळे तो नेता नेमका काय बोलतोय हे त्यांना कळत नव्हते.
शेवटी दोघांची गरब्याची प्रॅक्टिस सुरू होताच एकमेकांच्या पायात पाय अडकून त्यांचा तोल जाणार एवढ्यात आम्ही दोघांनी त्यांना सावरले. मग त्या दोघांनी समोरासमोर खुर्चीवर बसून बैठा दांडिया सुरू केला. त्या गोर्यापान गृहस्थांनी सूर लावला-
मै तो भूल चला
उत्तर का देस
महाराष्ट्र मुझे प्यारा लगे
तुम दिल्लीको दे दो संदेस
दाढीवाला देगा आदेस
बाराका अंक न्यारा लगे ।।१।।
देवेन भी प्यारा और चंपा भी प्यारा
खुशियाँ ही खुशिया है जन्नत नजारा
काले टोपी में खानदानी फेस
नही मानता मैं हायकोर्ट का केस
सिस्टम ही मुझे देखके भागे ।।२।।
बरोबरच्या तोतर्या नेत्याने त्यांना दाद दिली. तेवढ्यात उंचीने लहान पण बँकेने महान असलेल्या नेत्याने दारातून अंगात असेल नसेल तेवढा जोर काढून तुतारी वाजवली आणि ललकारी दिली. बाअदब, बा मुलाहिजा, आस्ते कदम निगाह रख्खो, होशियार ऽऽऽ राज्याचे माजी माजी माजी बाजीगर आणि `मी पुन्हा येईन’ या शतकमहोत्सवी वगनाट्याचे हिरो गरबा आणि दांडिया एकत्र खेळतच पधार रहे है।
तेही मुखवटा घालूनच नाचत आले. त्यांच्या खिशातील मोबाईलमधून रेकॉर्ड केलेले एका स्त्रीच्या आवाजातले गाणे ऐकू येत होते. त्यावर ते सुटाबुटात नाचत होते-
गुमनाम है कोई, बदमाश है कोई
मुझको खबर, वो था गब्बर
चारसो बीस है कोई
रातको मुझे उसका फोन आया
गार्डन मे मुझे बुलवाया
बंगले मे दिये जलने लगे
मुँह मे मेरे पेढा खिलवाया
गुमनाम है कोई, बदमाश है कोई ऽऽऽ
एका क्षणात त्यांनी गाणे बदलले आणि ते पुन्हा सुरू झाले.
तू जहाँ जहाँ चलेगा
मेरा साया साथ होगा ऽऽऽ
एवढ्यात टूनटूनसारखा एक गोलमटोल माणूस भला मोठा मुखवटा लावून सराईत डान्ससारखा गरबा खेळत प्रवेश करता झाला.
डम डम डिगा डिगा
दुष्मन भागा भागा
सुनिये मै तो गिरा, मै तो गिरा,
मै तो गिरा, हाय लल्ला
सुरत है पार्टीकी वो मार डाला ।।१।।
देखो क्या दाढीकी बात है
चेहरा भोला भाला
अंदर नही है काला
देखो जी फ्रेंड मेरा रसगुल्ला ।।२।।
देखो उसकी बोलनेकी बात है
देता भाषन ऐसा, बोलता देगा पैसा
देखो जी सब उसने बेच डाला ।।३।।
तेवढ्यात ते दाढीवाले मुखवटा घालून आत आले. मुखवट्याखाली त्यांची लांबलचक दाढी दिसत होती. आल्या आल्या आपल्या गोलमटोल मित्राच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, केम छो? मित्र म्हणाला, सेम छो. त्यानंतर त्या दोघांनी मराठी गाण्यावर अगदी सफाईदार रीतीने गरबा खेळण्यास सुरुवात केली.
कोविडा तुझा तुझा आजार लाभला जरी
कोरोना आता तरी तू जा चिन्याघरी ।।धृ।।
तो कोरोना मस्तवाल वाट लावतो
जीव घेऊनी खुशाल फास टाकतो
गंडवून रोखूनी तो श्वास कोंडतो
सांगतो व्हॅक्सीन ते तुला परोपरी ।।१।।
सांग लस उत्सवास दृष्ट लागली
फोटो पाहुनी प्रमाणपत्र लाजली
पक्ष-पार्टी त्यात दंग-तंग जाहली
लाभला `आधार’ मार्ग आयता उरी।।२।।
सर्वांची नजर दरवाजाकडे वळली. पाहतात तो दशावतारातल्या पात्रासारखे हातात पुठ्ठ्याची चंदेरी तलवार नाचवत सूक्ष्मदर्शक मंत्री महोदयांचे मालवणी गरबा करत आगमन झाले. आल्या आल्याच त्यांनी तलवार-दांडिया सुरू केला. सर्वांनी कोरस धरला.
हकडे ये गो बायग्या तुका
सांगतय मिया काय गो
सगळे मंत्री इंग्लीश बोलतत
माकाच येना नाय गो ।।१।।
हकडे ये गो बायग्या तुका
सांगतय मिया काय गो
सगळे मंत्री माका बगताच
मान फिरवून जायत् गो ।।२।।
हकडे ये गो बायग्या तुका
सांगतंय मिया काय गो
माकाच संकासूर का बोलतात
माकाच कळाक नाय गो ।।३।।
त्यानंतर त्यांनी दाढीवाल्यांबरोबर जो दशावतारी गरब्याचा डान्स केला त्याला तोड नव्हती. त्यानंतर मध्यंतर झाले. ढोकळा, फाफडा, जिलबी आणि जिरा बीअरचा लज्जतदार बेत होता. त्या दरम्यान मी आणि पोक्याने दाढीवाल्यांची मुलाखत घेतली आणि दोघेही तिथून सटकलो.