तर मंडळी, रामराम…
आमच्या गावात मातर भुत हाय न थे नुसतंच नाही त आंगात गी येते, येच्यावर निस्ता इस्वास नाही त श्रद्धा हाय. आमच्या गावची थे परंपरा हाय. टाकीज मंध जसा पिक्चर लागते का नाही दर शुक्रवारी नया, तसं एक नय भूत किमान दर मयन्याले कोनाच्या आंगात येतेच आमच्या गावात. मंग त्याच्या कहान्या- कथनात अवघा मयना निंघून जाते. आता हे टिव्ही आला, तेच्यावर मालिका आल्या न तेच्यापायी लोक बाह्यर निंघन बंद झाले. मानसं मानसात मनोरंजनच नाही त काहीच पाहात नाही.
त सांग्याचा मतलब ह्याच का गावात टिव्ही आला, तेच्यावर सास्वा- सुनाच्या मालिका आल्या, तेच्यापायी लोक गावखेड्यातबी सांजच्याले घराच्या बाह्यरं पडत नाही. त्याच्यापायी गावात भुत दिसना झाले, कोनाले झोंबना झाले. मालिकायचा टिआरपी वाढवन्याच्या नादात भुतायचा टिआरपी घसरला. बरं, सांजच्याले ज्यायले हटकून घारच्या बाह्यर पडाच लागते थे लालाचे गिर्हाईक रायते. नाइंटी पोटात गेली का भुतच त्यायले भेते. बरं नाइंटी मारू मारू एकदिवस हे मरनार अन् लवकरच आपल्या जमातीत जमा होनार, हे भुतायले समजे. त्यापायी आपल्या भावी भुतायले हे भूतं काही झोंबेना!
बरं भुतं सांजच्याले बाह्यर निंघते अंधार पडल्यावर. त्या टायमाले लोक टिव्हीत घुसेल रायते. त्यापायी भुतायले एकटं एकटं वाटा लागलं. म्हून मंग त्यायनं गाव देल्लं सोडून. तेच्यात आता हरेकच चाहिनेलवर एकतबी भुताची मालिका रायतेच. घरातच असे कॅमेरा, अॅक्शन मोडवर भूतं पहाले भेटल्यावर लोक बाह्यर कहाले जातीन? गावात आत काहीच काम नाही रायलं म्हून आधीच्या टायमाले मानसं गावाच्या बाह्यरं पडले, शह्यरात गेले. आता भुतायची अवस्था तसी होत हाय. गावातले भुतं आता शह्यरात गेलेले हायत.
आमच्या गावात पिंपळाच्या झाडाले असे लय भुतायचे खिळे आहेत… भगतानं भूत झोंबलं त्याले झाडून मंग भूत पकडून त्याले खिळ्यानं झाडात बांधून टाकलं हाय.
आता काही गोठी साथीचे रोग पसरतेत तस्या लागनदार असतेत. चोरी, अॅक्शीडेन, भुतप्रेत, जादू, साप-इच्चूकाटा, अस्या लय गोठी हायत ज्या ‘हे त काहीच नाही…’ परकारात मोडतेत. म्हंजे एखांद्यानं एक किस्सा सांगला वर सांगलेल्या लागदार विषयाचा का थो संपत नाही त दुसरा म्हनते, हे त काहीच नाही, आमच्या घरी निंघाला होता सरऽऽप थो त साध्या डोयानं दिसेच ना! म्हंजे हे ‘हे त काहीच नाही’ स्पेशॅलिस्ट लोक अतरेक करततेत.
असेच आम्ही बसलो होतो फकाल्या हाकलत गावात एका राती.
आता याच बैखटीत मंग भुताच्या गोठी निंघाल्या. एकझन म्हने का कडू आबाच्या घराजवयच्या पिपयावर मुंजा हाय. म्या पायला हाय. एक पाय पिपायवर न दुसरा पाय नदीच्या जवडच्या वडाच्या झाडावरच होता ना त्याचा… तेच्यावरून मंग आमच्या गावातले भूत स्पॉट कोंचे कोंचे हायत, हे चर्चा सुरू झाली. ध्यानात आलं का हायवेवर जितले टोलनाके नसतीन ना, त्याच्यापेक्षा जादा भुतनाके आमच्या गावात हाय!
आमच्या गावापासून दोनेक कोस अंतरावर एक फाटा व्हता. आता रस्तेच असे झाले हायत का गाव ओलांडून हावे जाते, गावाले फाट्यावरच मारलं हाय महामार्गानं. त त्या फाट्याचं वळन धोक्याचं होतं. त्याच्यापायी तठी हमेशाच अॅक्शीडेंट व्हाचे ना. आता गावच्या नियमानुसार अॅक्शीडेंटमंध मेलेला मानूस कसाबी असला त त्याचं भूत व्हाचं. त्यापायी त्या फाट्यावर कानाई भुतायचा मॉलचा व्हाता ना बावा! आता गावात हे भुत मारत येत नोते. काहूनका मंध नय मारोतीचं मंदिर व्हतं ना. मारतीले ओलांडून भुतायले मनात असूनबी गावात येता येत नोतं. आता तठी फाट्यावर हे मंदिर कसंकाय उभं झालं हे तुमाले वाटनं. त तठी अॅक्शीडेंट व्हाचे हे त म्या आदीच सांगलं तुमाले. त तठी काय मानसायचेच अॅक्शीडेंट होऊन थे मराचे असं नाही. एका बंदाराचा म्हंजे भड्या बंदाराचा टरकखाली येऊन चेंदा झालता तठी. गावकर्यायनं त्याची समाधी बांधली अन् तठी मंग मारोतीचं मंदिर झालं… भड्याचा देव झाला. आता मानूस मेला का त्याचं भूत होते न बंदर मेलं का त्याचा डायरेक हनुमान देव कसाकाय होते, असा सवाल मले मनातल्या मनात पडला होता. आता मानूस बंदराची उत्क्रांती होऊन झाला असं म्हनतेत, मंग बंदराचं विकसित रूप असेल मानसाचं भूत अन् जनावर असेल बंदाराचा देव काहून होत असन, असाबी सवाल मले पडेल होता; पन व्यवस्थेनं कानफटीत मारून मले ‘समजुतदार’ केलतं म्हून म्या सवाल कईच इचारला नाही.
त फाट्यावर एक भूत मातर कायमच दिसे. आमच्या गावातलाच एक ठेकेदारी करणार होता, झोटींग. तो ट्रक अॅक्शीडेंट मंध मेला होता. मंग त्याच गावरीती परमानं भूत झालं. झोटींगले सिगारेट फुकाचा शौक होता त्याच्यापायी त्याचं भूतबी सिगारेट फुके. झोटींगचं भूत कानाई फाट्यावरच्या पुलावर बसून राहे. राती कोनी आमच्या गाववाला तिकडून आला का त्याले थे सिगारेट मागे… अनेकायले हे झोटींगच भूत दिसेल होतं.
आतात दर आठ-पंधरा दिवसात कोनीना कोनी हे सांगेच का रातीले थो नाल्याजवडच्या फाट्यावरून येतानी त्याले पुलावर बसेल एक मानूस दिसला. त्यानं मले हात दावला. मले वाटलं का त्याले लिफ्ट पाह्यजेन असन. म्हून थांबलो त थो मानूस मले म्हने का, मेरी गाडी पंक्चर हुई है… चक्का बदलता हुं, तबतक टॉर्च दिखाओ… आता झोटींग हिंदी बोलाचा त्यापाई त्याचं भूतबी भाषाभिमानाले जागे.
मंग सांगनारा पुढं सांगे का, तो म्हनला का सिगारेट असन त द्या. म्या त्याले सिगारेट देल्ली. त मंग आमी पुलावर बसलो फुकत. त काही टायम झाल्यावर बाजूले मानूस नाई, असं वाटलं म्हून पायलं त निस्ती सिगारेट हवेत तरंगत न धूर निंघत हाय, मानूस नाहीच! मंग त्या पाह्यनार्याचे दहा जाचे न पाचच रहाचे.
आता मंग ध्यानात याचं का हे त बेटा झोटींग व्हय. भूत व्हय हे… मले ह्याबी सवाल मनात आलता का झोटींग ज्यायले असा दिसेना त्यायच्यातले बरेच सिगारेट पेनारे नोते तरीबी त्याच्यापासी नेमकी त्याच टायमाले सिगारेट आली कुठून? पन ह्याबी सवाल म्या इचारो नाही, काहून का म्या ‘समजूतदार’ होतो.
तर आमच्या गावा जवळच्या त्या फाट्यावरच्या वडाच्या घनदाट झाडाखालच्या पुलावर या झोटींगची वसती असाची रातच्या टायमाले. झोटींगले एका टरकवाल्यानं ढाब्यावर भांडन झालं म्हून खुन्नस खाऊन मांगच्या चक्क्यात घेतलं होतं. असी स्टोरी हयू हयू डेव्हलप झालेली. झोटींग सिगारेट फुंकतानी ज्याले दिसला त्याले सावध करे. टरकवाल्यायपासून थो गाववाल्यायचं, एकटा दुकटा येनार्याचं रक्षन करे.
झोटींग दिसला, असं सांगनारे तिथं थ्यो दिसते, हे मालूम असूनबी त्याले वळखे नाही. मंग हवेत सिगारेट तरंगत अन् भसाभसा धुर दिसला का हे ठरल्यापरमानं बेसुध पडे शहान्यासारखे… मंग बेसुध झाल्यावर का झालं हे काही समजेना; पन सकायी गाववाले त्याले गावात उचलून आने न याले मंग आपन भूत पायलं म्हून ताप ये!
झोटींगचा टीआरपी खूपच वाढला होता. एखादा सिनेमा जसा अनेक थेटरात दनक्यात चालते तसा हा झोटींग आमच्या गावात दनक्यात चालत होता. आमच्या गावाजवळच एक सैनिक शाळा निंघाली होती. तिथे एक मेजर आला होता पोरायले सिकवाले मिलिटरीवाला.
थ्यो त्याच्या बुलेटवर कई कई जिल्ह्याले जाचा न राती बेराती याचा गावात. झोटींग इतकाच त्या रीटायर मेजरचाबी टीआरपी दन्न होता. काहूनका लयदा त्यो त्याची बंदुक साफ करत बसेल दिसाचा अन् त्याच्याकडं मिलिटरीची रम रायते, त्यायले एक खून माफ रायते अन् रम जिंदगीभर त्यायले फुकटात भेटते, अस्या कहान्या पसरल्या होत्या.
आता ह्या मिलिटरीवाला पंजाबी होता. झोटींगले पंजाबी मान्सयचा लय राग होता, कारन त्याले मारनारे टरकवाले पंजाबी होते. आता हेबी आमच्या गाववाल्यानंच ठरवलं होतं. काहूनका झोटींग कोंच्या वाहनानं मेला हे पोलिसलेबी नोतं समजलं गेल्या दहा-वीस वर्षात.
त्या मिलिटरीवाल्यायले गावकर्यानं लयदा सांगल झोटींगबद्दल; पन तो म्हने का भूत वुत कुच्च नय रयता!
एकदा आमच्या गावातल्या जगू आवार्याले झोटींग भेटलाच. आवारी कापसाचे चुकारे घेऊन येत होता. त्याने मग मेजरले ही घटना सांगितली… मेजरने सवाल केला, कपासका पैसा लेके आ रहे थे क्या?
त मेजर एका राती तिकडून येत होता. जिल्ह्याले गेल्ता. त्याच्या सैनिक स्कुलसाठी बँकेतून पैसे काढून आननार होता.
मेजर रात्री त्याच्या बुलेटवर धडधडत येत होता. त्याले मंग झोटींग दिसलाच. त्यानं हात दाखवला. मेजर थांबला. झोटींग म्हनला, मेजरसाहब जरा सिगारेट तो देना… आता झोटींगला हा मेजर आहे, असे कसेकाय माहीत? पन थे महत्त्वाचं नाई… मेजरनं मंग सिगारेट देल्ली. दोघं बसले पुलावर गप्पा मारत. थोड्या टायमानं मेजरनं बाजूले पाह्यलं त का??? सिगारेट हवेत तरंगत होती अन् हा त्यातून भसाभसा धूर… मानूस गायब!!
मेजर हे सांगत होता. गावकरी आयकत होते. प्रत्यक्ष मेजरलाच दाखवलाना हिसका!
मेजरनं स्टोरीचा क्लायमॅक्स दाखवला. म्हने का मैं साथ मे लेके आया हुं झोटींग और उसके टोली को… असं म्हनत मेजरनं त्याच्या खोलीत हातपाय बांधून ठेवलेले दोन-चार तरने पोट्टे वढत आनले ना बाह्यर त्याच्या खोलीतून.
झालं असं होतं का निस्ती सिगारेट हवेत तरंगतानी पाहून मेजर बेसुध नाही पडला. त्यानं टॉर्च कहाडला अन् प्रकाश टाकला त काळ्या टेलिफोनच्या ताराच्या स्टँडमंध सिगारेट अडकवलेली दिसली. मेजर मग पुला खालच्या नाल्यात उतरला अन् तिथं लपून बसेल चौघायले पकडून हानला ना…
त्या दिसीपासून गावा कोनाले झोटींगच भूत दिसलं नाही… भूतं साध्या नागरिकायले भेवाडतेत, मिलिटरीवाल्याले नाही, असंबी गावकर्यानं ठरवलं!
– श्याम पेठकर
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत)